विचारवंत आनंद मेणसे, कवी अजय कांडर यांच्या उपस्थितीत कट्टा नाथ पै सेवांगणच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ
कट्टा – शिवाजी महाराजानी आपले सैन्य हे गोर गरीब जनतेमधून आणि जिवाला जीव देणाऱ्या मावळ्यां मधूनच निर्माण केले होते. त्यांच्या सैन्यात हिंदूबरोबर मुस्लीमांचाही समावेश होता. त्यांच्या मोहिमांमध्ये त्यांनी आपल्या सैनिकाना रयतेच्या संपत्तीची लूट न करण्याची सक्त ताकीद दिली होती. त्यांनी रयतेसाठी निर्माण केलेली कर पद्धती पूर्णपणे रयतेच्या हिताचीच होती. स्त्रियांविषयीचे त्यांचे धोरण आणि त्यांची मानसिकता ही त्या काळातील प्रचलीत प्रथांच्या पूर्णपणे उलट होती. त्यामुळे सर्वांना शिवाजी महाराज “आपला राजा ” वाटत असत असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य आनंद मेणसे यांनी कट्टा येथे केले.
कट्टा नाथ पै सेवांगणच्या रौप्यमहोत्सवी वर्ष कार्यक्रमाचा प्रारंभ आणि सेवांगणने आयोजित केलेल्या ‘ शिवाजी महाराजांना पत्र ‘ या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ कट्टा येथे प्राचार्य मेणसे आणि कवी अजय कांडर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी सेवांगणचे अध्यक्ष ॲड.देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, कोषाध्यक्ष शैलेश खांडाळेकर, कट्टा शाखेचे अध्यक्ष बापू तळवडेकर विश्वस्त राजा खांडाळेकर, दीपक भोगटे, टीआय एफआरचे निवृत्त अधिकारी देवीदास पवार, सुभाष नेरूरकर, ॲड संदीप निंबाळकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य मेणसे पुढे म्हणाले, शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गोष्टीचे आता राजकारण केले जाते. शिवाजी महाराजांचा मालवण राजकोट येथे उभारण्यात आलेला पुतळा पडला. ही दुर्दैवी घटना होती. त्याचबरोबर त्यानंतर चाललेले राजकारण हे त्याहीपेक्षा दुर्दैवी होते. आपण समजून घ्यायला हवं..
अजय कांडर म्हणाले शिवाजी महाराजांचा इतिहास गडकिल्ल्यांचा सांगितला जातो अर्थात तेच योग्यच आहे; परंतु फक्त गडकिल्ल्यांचा इतिहास आपण समजून घेऊन महाराज समजणार नाहीत. त्यासाठी महाराज कुठल्या वर्गाच्या बाजूने कायम होते हे समजून घेतले जायला पाहिजे. मात्र दुर्दैवाने ते समजून घेतले जात नाही आणि ते समजूनही सांगितली जात नाही. महाराजांनी कुठल्याच शोषित वर्गावर कधीच अन्याय केला नाही. म्हणूनच जागतिक स्तरावर शिवाजी महाराजांचा लौकिक आहे. मालवण राजकोट येथे उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला या पार्श्वभूमीवर सेवांगणने :शिवाजी महाराजांना पत्र ‘ ही निबंध स्पर्धा आयोजित केली. याबद्दल सेवांगणला धन्यवाद द्यायला पाहिजेत. या निबंध स्पर्धेचा परीक्षक म्हणून परीक्षण करताना एक गोष्ट लक्षात आली की मालवणच्या या घटनेचा तीव्र संताप जनतेच्या मनात आहे. आणि त्याच भावना या निबंधांमध्ये स्पर्धकांच्या व्यक्त झाल्या आहेत.
ॲड. देवदत्त परुळेकर म्हणाले, महाराजांचा इतिहास फक्त वाचून चालत नाही तो समजून घेऊन आपल्या मेंदूत ठेवावा लागतो. असं झालं की महाराजांचा चांगुलपणा घेऊन आपल्याही जगण्याची वाटचाल तशी करायला पाहिजे असं लक्षात येत जातं. असं करत नसल्यामुळेच महाराजांचं नाव आपण घेतो पण तशी कृती करत नाही.
यावेळी किशोर शिरोडकर यांनी गेल्या २४ वर्षात सेवांगणने केलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. व या रौप्यमहोत्सवी वर्षात संपन्न होणाऱ्या उपक्रमांचा उहापोह केला. श्रीमती रश्मी पाटील यांनी रोटरी क्लब मुंबई माहिमच्या वतीने सेवांगण सोबत काम करताना खूप आनंद वाटतो. विचारांचा वारसा घेऊन काम करणे आचरण करणे महत्वाचे असते. निरबुद्ध होण्यापेक्षा सदसद विवेक बुद्धी जागृत ठेवून काम करणे महत्वाचे असते असे विचार व्यक्त केले.
सेवांगण कट्टा शाखेच्या कार्यवाह वैष्णवी लाड यांनी सूत्रसंचालन केले. बाळकृष्ण नांदोसकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास प्रसाद घाणेकर, श्री आकेरकर , श्रीमती आकेरकर मंगल परुळेकर, महेश परुळेकर, शोभा म्हाडगुत, दशरथ कवठकर, गणेश वाईरकर, आनंद धुत्रे, विद्याधर चिंदरकर, बाळा आंबेरकर, दादा वंजारी, दिलीप नलावडे, राजीव म्हाडगुत, संध्या म्हाडगुत, छाया म्हाडगुत, दर्शन म्हाडगुत पालक व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सर्व व्यवस्था व नियोजन विद्याधर चिंदरकर, मनोज काळसेकर, बाळकृष्ण गोंधळी व श्रीमती जांभवडेकर यानी सांभाळली.या कार्यक्रमात शिवाजी महाराजांना पत्र या निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले.
प्राचार्य आनंद मेणसे, अजय कांडर यांना त्यांचीच प्रतिमा भेट
या कार्यक्रमात सेवांगणचे पदाधिकारी तथा चित्रकार दीपक भोगटे यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य आनंद मेणसे आणि अजय कांडर यांचा सत्कार करताना स्वतः रेखाटलेली या दोघांची प्रतिमा त्यांना भेट दिली.या अनोख्या गौरवामुळे प्राचार्य आनंद मेणसे आणि अजय कांडर यांनी चित्रकार भोगटे यांना धन्यवाद दिले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.