आई मुळेच आपण हे जग पाहू शकलो. आईमुळेच आपले अस्तित्व आहे. तसे सद्गुरुंच्यामुळेच आपणाला आत्मज्ञानाचा लाभ होणार आहे. सद्गुरु गुरुमंत्राची पेरणी करून आत्मज्ञानी होण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. सद्गुरुंच्यामुळेच आपण आत्मज्ञानाचे लाभार्थी होऊ शकतो हे विचारात घ्यायला हवे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल 9011087406
म्हणोनि साधकां तूं माऊली । पिके सारस्वत तुझां पाउलीं ।
या कारणें मी साउली । न संडी तुझी ।। ८ ।। अध्याय १२ वा
ओवीचा अर्थ – म्हणून साधकांना तूं आई आहेस व सर्व विद्या तुझ्या चरणांच्या ठिकाणी पिकतात म्हणून मी तुझा आश्रय सोडणार नाही.
प्रथम गुरु माता
आई या शब्दातच मोठे सामर्थ आहे. आई माझा गुरू, आई कल्पतरू….हे सर्व गुण आईमध्ये असतात. मुळात आपला पृथ्वीतलावरील जन्मच आईमुळे आहे हे विसरता कामा नये. आईमुळेच आपण हे जग पाहू शकलो हे सतत स्मरणात ठेवायलाच हवे. आईच्या पोटात असल्यापासून आपणावर तिचे संस्कार सुरु असतात. जगातील आपले अस्तित्वच आईमुळे आहे. सध्या तंत्रज्ञाने प्रगती केली आहे. टेस्टट्युब बेबी, सरोगेटी मदर असे विविध प्रकार आता पाहायला मिळत आहेत. पण शेवटी गर्भाची वाढ ही उदरातच होते. आईचे संस्कार त्याच्यावर होत असतात. पालनपोषन हे तिच्याकडून केले जाते.
आईच्या उदरातूनच आपण प्रकटतो. यासाठी आईचे हे महत्त्व आपण विचारात घ्यायला हवे. तिचे उपकार मानायलाच हवेत. याची जाणीव ठेवायला हवी. प्रत्येक जीवामध्ये ही क्रिया आहे. पक्षी असो जनावर असो यामध्येही पिलाला, वासरांना जन्म ही माताच देते. जन्मानंतर तुम्हाला अन्य माता तुमचे संगोपन करू शकते. पण तिच्या उदरात झालेली आपली वाढ महत्त्वाची आहे. जन्मानंतर तुम्हाला अन्य मातेचे दुध मिळू शकते. पण उदरात पालनपोषण मात्र माताच करते. यासाठी आईचे महत्त्व विचारात घ्यायला हवे. म्हणूनच आई ही आपली प्रथम गुरु आहे. आपण हवे असणारे सर्व ती देत असते. आपल्यासाठी कल्पतरु ही असते.
अध्यात्मात सद्गुरु ही माता
अध्यात्मात सद्गुरु हे आई सारखे असतात. म्हणूनच ज्ञानेश्वरांना माऊली म्हटले आहे. सद्गुरु गुरु मंत्रच्या बीजाची पेरणी करतात. बीजाचे रोपट्यात रुपांतर कसे होईल याची काळजी सद्गुरु घेतात. गुरु मंत्राचे बीज सद्गुरुंनी साधकात पेरल्यानंतर ते बीज रुजावे यासाठी प्रयत्न सद्गुरु करत असतात. मुळात पेरणी योग्य वाफसा स्थिती आहे की नाही याची पाहाणी सद्गुरु करतात. साधकाला पेरणी योग्य बनवतात. त्यानंतरच त्यामध्ये बीजाची पेरणी ते करतात. आईच्या उदरात जसा गर्भ वाढतो तसेच सद्गुरुही या बीजाची वाढ योग्य प्रकारे व्हावी यासाठी काळजी घेतात. साधनेतून विविध संस्कार त्यावर करतात. अनुभुतीतून त्या बिजाच्या वाढीस प्रोत्साहन देतात. नऊ महिने आईच्या पोटात गर्भ वाढतो तेव्हा आई जशी त्या गर्भाची काळजी घेते तसेच येथे सद्गुरु या बिजाची काळजी घेतात. बीज रुजण्यासाठी कधी कधी वेळ लागतो. कारण प्रत्येक बीजाची सुप्तावस्था ही वेगवेगळी असते. काही बीजे पटकण उगवतात. काहींना वेळ लागतो. या सर्वांची काळजी सद्गुरु घेत असतात.
सद्गुरुंच्यामुळेच आत्मज्ञान
आई मुळेच आपण हे जग पाहू शकलो. आईमुळेच आपले अस्तित्व आहे. तसे सद्गुरुंच्यामुळेच आपणाला आत्मज्ञानाचा लाभ होणार आहे. सद्गुरु गुरुमंत्राची पेरणी करून आत्मज्ञानी होण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. सद्गुरुंच्यामुळेच आपण आत्मज्ञानाचे लाभार्थी होऊ शकतो हे विचारात घ्यायला हवे. म्हणूनच साधकांसाठी सद्गुरु हे माऊली आहेत. माऊली प्रमाणे ते साधकांची काळजी घेतात. साधक आत्मज्ञानी व्हावा यासाठी ते प्रयत्न करतात.
इये मराठीचिये नगरी अपडेटसाठी व्हा टेलिग्रामवर सहभागी https://t.me/MarathiliteratureAgriResearch
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.