April 26, 2024
kalyan-kale fasting researcher article by Dr Snehal Taware
Home » व्रतस्थ संशोधक : गुरुवर्य डॉ. कल्याण काळे
मुक्त संवाद

व्रतस्थ संशोधक : गुरुवर्य डॉ. कल्याण काळे

आजही भाषाविज्ञान म्हणजे डॉ. कल्याण काळे असे समीकरण दिसून येते. त्यांच्यासारखे भाषावैज्ञानिक पुन्हा होणे नाही. अतिशय सौजन्यशील, अभ्यासू , मराठी भाषेची एकनिष्ठेने सेवा करणारे आणि आपले संपूर्ण आयुष्य केवळ मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी अविरतपणे समर्पित करणारे गुरुवर्य डॉ. कल्याण काळे सर यांना भावपूर्ण अक्षरांजली.

डॉ. स्नेहल तावरे भ्रमणसंवाद ९४२३६४३१३१

१९७४ मध्ये पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात मी एम. ए. साठी प्रवेश घेतला. विद्यापीठाच्या परिसराचे एक आकर्षण जसे होते तसे गुरुजनांचेही होते. मॉडर्न महाविद्यालयातून बी. ए. झाले तेव्हा एकाच वयोगटाचे आम्ही सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी होतो. एम. ए.च्या वर्गाचे स्वरूप मात्र वेगळेच होते. अनेक महिला विद्यार्थिनी होत्या , काहीजण नोकरी करून एम.ए. करणारे होते . वर्ग भरलेला असे पण समवयस्कांची संख्या काहीशी कमी होती. त्यावेळी डॉ. रा. श. वाळिंबे मराठी विभागप्रमुख होते. त्यांना सर्वजण घाबरत असत. डॉ. मु. श्री. कानडे , डॉ.आनंद यादव, डॉ. कल्याण काळे, डॉ. सुधाकर भोसले आणि डॉ. वा. के. लेले हेसुद्धा विभागात कार्यरत होते. या सर्वांच्या शिकवण्याबद्दल माझ्या मनात प्रचंड उत्सुकता होती.

मला डॉ. काळे सरांचा पहिल्या तास आजही आठवतो. उंच, शिडशिडीत, गौरवर्ण आणि सौजन्यशील व्यक्तिमत्त्वाचे डॉ. कल्याण काळे सर वर्गात आले. आम्ही सर्वजण उभे राहिलो. ते ” बसा ” म्हणाले पण स्वतः उभेच राहिले. ” मी कल्याण काळे ” असे म्हणून त्यांनी तासाला सुरुवात केली. ते बोलत होते आणि मी जितके जमेल तितके लिहून घेत होते .पहिल्या बाकावर बसायची माझी एक सवय होती. सहज वर्गावरून नजर फिरवली तर अनेक जण तन्मयतेने ऐकत होते. लिहिणारे कमीच होते. तास संपला आणि सर निघून गेले. असामहिना निघून गेला तेव्हा अनेकांच्या लक्षात आले येथे कॉलेजसारखे कोणी लिहून देत नाही. मॉडर्नमध्ये मला शिकविणारे डॉ. भीमराव कुलकर्णी , डॉ. वि. भा.देशपांडे आणि डॉ. द . दि. पुंडे या सरांनी आम्हाला वह्याच्या वह्या कधीच लिहून दिल्या नाहीत तर विषय समजावून सांगितला .लिहिण्यापेक्षा विषयाच्या मुळाशी जाऊन शिकणे याची सवय मला असल्यामुळे पुणे विद्यापीठाच्या सर्वच गुरुवर्यांचे शिकवणे मला फार आवडले. यातूनच या सर्व गुरुवर्यांचे आणि माझे नाते दृढ होत गेले.

डॉ. कल्याण काळे सरांचे संतसाहित्य आणि भाषाविज्ञान हे आवडीचे विषय होते. मराठी भाषेप्रमाणेच त्यांचे संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते. त्यांनी एम. ए. संस्कृत आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये केलेले होते. १६ डिसेंबर १९३७ साली त्यांचा जन्म झाला . आध्यात्मिक पिंड असल्यामुळे पराड्यांचे ‘ हंसराज स्वामी : चरित्र, वाङ्मय आणि तत्त्वज्ञान ‘ या विषयावर त्यांनी पीएच.डी . केली आणि त्यांच्या प्रबंधाला पुणे विद्यापीठाची दोन पारितोषिके मिळाली होती.ही माहिती माझ्याप्रमाणेच इतर विद्यार्थ्यांनाही होती . त्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आणि अभिमान होता. वस्तुतः त्यांच्यामुळेच मला भाषाविज्ञानाची, शुद्धलेखनाची आणि संतसाहित्याची गोडी लागली. एम. ए. झाल्यावर लगेचच मी पीएच . डी.ला सुरुवात केली. माझा विषय ‘ शिवछत्रपतींवरील दीर्घकाव्ये आणि महाकाव्ये : एक चिकित्सक अभ्यास ‘ असा होता .

एकदा मी काळे सरांना या विषयासंदर्भात भेटले आणि महाकाव्याबद्दल आम्ही चर्चा केली.
तेव्हा त्यांनी सांगितले की ” तुम्ही महाकाव्यासाठी संस्कृत भाषा अधिक शिकून घ्या “. माझे अकरावीपर्यंत संस्कृत होते. पुढे मी टिळक विद्यापीठाचा संस्कृत पदविका हा एक वर्षांचा कोर्स केला . त्याचा मला माझ्या प्रबंधाच्या वेळी खूप उपयोग झाला. याचे श्रेय डॉ.कल्याण काळे सरांना जाते.

पीएच. डी. झाल्यावर मी मॉडर्न महाविद्यालयात पहिलीच मुलाखत दिली आणि माझी प्राध्यापक म्हणून १९८४ मध्ये नेमणूक झाली . १९९० मध्ये मी भाषाविज्ञान शिकवायला सुरुवात केली ती २०१७ पर्यंत . म्हणजे जवळजवळ २७ वर्ष मी भाषाविज्ञान शिकविले. प्रत्येक वेळी डॉ. कल्याण काळे सरांनी शिकविलेले भाषाविज्ञान मला आठवायचे आणि त्यांच्याइतके नाही पण विद्यार्थ्यांच्या मनात
भाषाविज्ञानाची गोडी निर्माण होईल असा प्रयत्न मी मात्र नक्कीच केला .काळे सर सहसा बसून शिकवायचे नाहीत हाच प्रयोग मी ३३ वर्षे मॉडर्नमध्ये शिकवताना राबविला . मला खुर्चीवर बसून कधीच शिकवता आले नाही.उभे राहूनच फळा आणि खडूचा वापर करीत विद्यार्थ्यांना भाषाविज्ञान शिकविले. हा संस्कारही डॉ. कल्याण काळे सरांकडूनच माझ्या मनावर बिंबवला गेला.

ज्या विद्यार्थ्यांना शिकवत होते त्यांच्याच वयाचे ज्ञानेश्वर कसे होते हा विचार मनात आला आणि ‘ ज्ञानेश्वरी व विसावे शतक ‘ या विषयावर चांगले पुस्तक होईल या विचाराने मी कामाला लागले. माझे गुरुवर्य डॉ .वि. रा. करंदीकर, डॉ .द.दि.पुंडे , डॉ. कल्याण काळे, डॉ. मु. श्री.कानडे , डॉ. वा. के. लेले यांच्याकडून आणि इतर साहित्यिकांकडून ज्ञानेश्वरीवरील विविध प्रकारचे लेख एकत्रित करून स्नेहवर्धन प्रकाशनाचे पहिले पुस्तक १९९० मध्ये मी प्रकाशित केले. त्यामध्ये ‘ ज्ञानेश्वरी आणि निसर्ग ‘अशा माझाही लेख होता. या पुस्तकाची प्रत माझ्या सर्व गुरुवर्यांना दिली तेव्हा एकूणच पुस्तकाच्या निर्मितीबद्दल त्यांना खूपच आनंद झाला .प्रकाशन माझ्यापुरतेच सीमित ठेवायचे होते पण तसे झाले नाही आणि माझ्या अनेक गुरुवर्यांची पुस्तके मी प्रकाशित करीत गेले.

‘ ज्ञानेश्वरी व विसावे शतक ‘ या पुस्तकामध्ये काळे सरांनी ‘ज्ञानेश्वरीच्या काव्यभाषेचा अभ्यास’ हा अभ्यासपूर्ण लेख लिहिला होता . मराठी भाषेवरील त्यांच्या नितांत प्रेमापोटीच मी त्यांना अक्षर लेखनाबद्दल लिहा असे सांगितले. तेव्हा १९९३ मध्ये ‘ मराठी अक्षरलेखन ‘ ही मराठी भाषकांसाठी अतिशय उपयुक्त अशी पुस्तिका त्यांनी मला तयार करून दिली .आजही या पुस्तिकेची आवश्यकता आहे कारण मुलांचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी तिची गरज आहे . सुंदर अक्षरासाठी हा त्यांचा प्रयोग खूपच यशस्वी झाला.

१९९४ च्या सुमारास डॉ. मु. श्री. कानडे मित्रमंडळाची स्थापन झाली. त्यामध्ये डॉ. गं .ना . जोगळेकर , श्री. रा .शं.नगरकर , डॉ. सु . रा. चुनेकर, डॉ . कल्याण काळे , डॉ. द .दि. पुंडे , डॉ .र. रा. गोसावी , डॉ . प्र .ज. जोशी , डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ .मीरा घांडगे आणि डॉ. स्नेहल तावरे यांचा समावेश होता. या सर्व दिग्गज मंडळीत माझा समावेश झाला याचाही मला खूप आनंद आणि अभिमान आजही वाटतो . यानिमित्ताने काही प्रकल्प करता आले.गुरुवर्यांच्या अनुभवांचा, त्यांच्या मार्गदर्शनाचा खूपच उपयोग पुढील आयुष्यात मला होत गेला .

१९९५ मध्ये ‘ व्यावहारिक मराठी ‘ हे मी संपादित केलेले पुस्तक स्नेहवर्धन प्रकाशनाने प्रकाशित केले. त्यामध्ये डॉ. कल्याण काळे सरांनी ‘परभाषकांसाठी मराठीचे अध्यापन’ हा काहीसा वेगळा पण भविष्यातही उपयोगी पडणारा लेख लिहिला . त्यांनी अनेक परदेशी विद्यार्थ्यांना मराठी शिकवले होते त्यांचे इंग्लिश भाषेतील ‘ Learning Marathi’ हे पुस्तक अमराठी भाषकांसाठी खूपच उपयुक्त असे आहे .

‘ संत साहित्य : अभ्यासाच्या काही दिशा ‘ हे डॉ .कल्याण काळे आणि डॉ. द.दि.पुंडे सरांचे पुस्तक १९९२ मध्ये मी प्रकाशित केले. संतसाहित्याच्या भाषिक अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये याकडे लक्ष वेधून भाषिक अभ्यासातील अडचणी , पाठचिकित्साभेद, व्याकरणाच्यादृष्टीने अभ्यास आणि शैलीवैज्ञानिक अभ्यासाची आवश्यकता अशा विविध अंगांचा ऊहापोह त्यांनी केलेला दिसून येतो .
‘ ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा’ आणि ‘ वछाहरण ‘ अशी दोन पुस्तके एकमेकांचे परममित्र असलेल्या डॉ .कल्याण काळे आणि डॉ. द . दि. पुंडे सर यांनी संपादित केली आणि स्नेहवर्धन प्रकाशनाने ती प्रकाशित केली. या पुस्तकांच्या निमित्ताने डॉ .कल्याण काळे सरांकडून मला अनेक गोष्टी शिकता आल्या .अतिशय टापटिपीचे असे त्यांचे लेखन असे . एकदा लिहिले आणि हस्तलिखित दिले की पुन्हा त्यात सुधारणा ते करत नसत. देतानाच सर्व काही मनासारखे झाले की देत हा गुण अनेक लेखकांना उपयोगी पडणारा असा आहे .

१९९४ साली मी ‘ शुद्ध शब्दकोश ‘ तयार करण्यासाठी घेतला . अनेक शब्द कसे लिहायचे याचे एखादे सुटसुटीत पुस्तक असेल तर पटकन शब्द सापडतील आणि ते अंगवळणी पडले तर शुद्धलेखनही सुधारेल या उद्देशाने अध्यापन करताना मी तयार केले. १९९५ मध्ये ते प्रकाशित केले . आजपर्यंत त्याच्या आठ आवृत्त्या प्रकाशित केल्या. या पुस्तकाची पाठराखण डॉ . कल्याण काळे सरांनी केली. त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे ‘ शुद्ध शब्दकोश ‘ हे मराठीतील एक उपयुक्त लेखन साधन आहे .आज मराठीत नियमाने लेखन करणाऱ्यांची संख्या भरपूर वाढली आहे . मराठी माध्यमातून शिकणार्‍या शाळा, कॉलेजातील विद्यार्थ्यांची संख्याही पुष्कळ वाढली आहे . या सर्वांचे अभ्यासविषय आणि लेखनविषय भिन्नभिन्न असल्याने सर्वांना मराठी व्याकरण , मराठी शब्दांची घडण यासंबंधीचे बारकावे माहीत असण्याची शक्यता कमी असते आणि ते जाणून घेण्यासाठी त्यांना फुरसत ही नसते . मराठीतून लेखन करताना अडणाऱ्या शब्दांचे शुद्ध स्वरूप विश्वसनीयरित्या पाहायला मिळणे ही त्यांची गरज असते. त्यांची गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रस्तुत कोश अतिशय उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो. हा कोश तयार करण्यासाठी डॉ .स्नेहल तावरे यांनी भरपूर परिश्रम घेतले आहेत . त्यांच्या अध्यापनाच्या व्यवसायातून मराठीतून लिहिणारे नेमके कोणत्या शब्दांपाशी अडतात याचे त्यांना भान आलेले आहे . अशा जास्तीत जास्त शब्दांचा संग्रह त्यांनी या कोशात समाविष्ट केला आहे . या कोशात सात हजारांहून अधिक शब्द त्यांच्या शुद्ध स्वरूपात लिहून दाखविलेले आहेत. आवश्यक तेथे त्या शब्दांची पर्यायी रूपेही त्यांनी निर्दिष्ट केली आहेत. सर्व शब्द अकारविल्ह्याने दिलेले असल्याने नेमका शब्द शोधण्यास अडचण वाटणार नाही याची दक्षता त्यांनी घेतली आहे. अशा प्रकारचे नेहमी गरज भासणारे हे सुटसुटीत लेखन साधन निर्माण केल्याबद्दल त्यांचे मन: पूर्वक अभिनंदन . “

डॉ. कल्याण काळे सरांनीफ माझ्या पुस्तकाची केलेली पाठराखण मला सुवर्णपदकासमान आहे . गुरूने एका शिष्याला दिलेला हा अनमोल आशीर्वादच आहे असे मी मानते.
गेली अनेक वर्षे मराठी शब्दांच्याबाबत मला काही शंका आली की मी डॉ . कल्याण काळे सरांना फोन करीत असे .आमची चर्चा व्हायची आणि माझे समाधान व्हायचे. फोन केला कल्याण काळे बोलतोय हे शब्द प्रथमतः यायचे खूप आस्थेवाईकपणे चवकशी करायचे .माझी एकूणच प्रगती त्यांना खूप समाधान द्यायची आणि असेच चालू ठेवा असेही ते म्हणायचे. त्यांना मिळालेल्या डॉ .गं. ना. जोगळेकर पुरस्काराच्या निमित्ताने मी आणि डॉ. लीला वेदपाठक मसापमध्ये त्यांना भेटण्यास गेलो होतो. कार्यक्रमानंतर ते मला म्हणाले ” तुम्ही घरी येणार आहात “.मी तत्परतेने म्हटले ” हो सर येते आणि माझे नवीन पुस्तकही घेऊन येते “. तेव्हा सर म्हणाले ” आता डोळे थकत चालले आहेत पण तुम्ही नक्की या .”

आणि जाऊ जाऊ म्हणतानाच कोरोनाचा प्रसार होत गेला .लॉकडाऊन सुरू झाले . मीही घरूनच काम सुरू केले आणि सरांच्या घरी मात्र जायचे राहून गेले . अचानक बातमी आली ती सर गेल्याची. सर असे अनंताच्या प्रवासाला चटकन निघून जातील असे वाटलेच नाही. पण ‘ कालाय तस्मै नमः .१७ जानेवारी २०२१ रोजी सर गेले पण या चौऱ्याऐंशी वर्षांच्या आयुष्याचे सरांनी अक्षरश: सोने केले. संतसाहित्य , भाषाविज्ञान, अमराठी भाषकांना मराठी शिकवणे, त्यांच्यासाठी पुस्तके तयार करणे यासाठी आयुष्यभर एका व्रतस्थ संशोधकाच्या दृष्टीने ते आचरण करीत राहिले .आजही भाषाविज्ञान म्हणजे डॉ. कल्याण काळे असे समीकरण दिसून येते. त्यांच्यासारखे भाषावैज्ञानिक पुन्हा होणे नाही .
अतिशय सौजन्यशील , अभ्यासू , मराठी भाषेची एकनिष्ठेने सेवा करणारे आणि आपले संपूर्ण आयुष्य केवळ मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी अविरतपणे समर्पित करणारे माझे गुरुवर्य डॉ. कल्याण काळे सर यांना भावपूर्ण अक्षरांजली.
सर तुमची उणीव मला नेहमीच भासत राहील.

Related posts

“गोष्ट एका रिटायरमेंटची” एक भावस्पर्शी गोष्ट

गुलाबी बोंडअळीचे असे करा नियंत्रण…

आरोग्यदायी बीजाचे उत्पादन करायचे की कोंड्याचे…

Leave a Comment