आशा नेगी लिखित “ब्युटी ऑफ लाइफ” हे पुस्तक वाचले. एखाद्याचा जिवंत अनुभव जेव्हा पुस्तकाचे रूप घेतो तेव्हा तो असंख्य लोकांची प्रेरणा बनतो या वास्तवाचा प्रत्यय, “ब्युटी ऑफ लाइफ” वाचताना अगदी शब्दाशब्दांतून आला.
सुनीता बोर्डे
खरं तर आईच्या जाण्यानंतर गेली तीन महिने माझं वाचन थांबलं होतं, त्यानंतर सहजच “ब्युटी ऑफ लाइफ” हातात घेतलं, चाळून पाहू म्हणता म्हणता पुस्तक पूर्ण वाचून झाल्यावरच खाली ठेवले. मनात साठलेले दुःख काही अंशी दूर होत मन सकारात्मकतेने मन भरून गेलं. आयुष्यात कॅन्सर सारख्या इतक्या कठीण प्रसंगात सुद्धा आपली मैत्रीण आशा इतकी सकारात्मक नि हसमुख राहून, कर्करोगा सारख्या आजाराला सहज हरवू शकते तर आपणही सकारात्मक विचार करून आयुष्यातील या वाईट काळाला सामोरे का जाऊ नये ? असा प्रश्न मी स्वतःच स्वतःला विचारला. क्षणभर डोळे मिटले आणि आईचा हसरा चेहरा डोळ्यासमोर आणला. इतकं मात्र खरं की, ब्युटी ऑफ लाइफने, आयुष्यातील प्रत्येक घटनेकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन दिला. कोणतीही घटना घडणं न घडणं आपल्या हातात नसतं पण ती आहे तशी स्वीकारून पुढं जाणं हे नक्कीच आपल्या हातात असतं हे आशाचं वाक्य खूप काही शिकवून गेलं, कारण ते फक्त पुस्तकातून आलेलं वाक्य नव्हतं तर आशाच्या अनुभवातून तावून सुलाखून आलेलं वाक्य होतं.
खरंच ब्युटी ऑफ लाईफ हे पुस्तक फक्त एका कर्करोगी रुग्णाच्या स्वानुभवाचे कथन अशा विषयापुरते मर्यादित नाही तर ते सर्वांगीण रूपाने एक प्रेरणादायी / मोटीवेशनल पुस्तक आहे, किंबहुना सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत आहे.
पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेनेच क्षणभर मला अंतर्मुख केलं, मलाच का ? प्रत्येक वाचक स्त्रीला ही अर्पण पत्रिका अंतर्मुख करते. ” स्वतःवर प्रेम करणाऱ्या सगळ्या स्त्रियांना समर्पित….” अशी ही अर्पण पत्रिका पुस्तक हातात घेतलेल्या प्रत्येक स्त्रीला जणू विचारते, “सखे तू ‘सर्वांवर ‘ खूप प्रेम करतेस , पण या ‘सर्वांमध्ये ‘ तू स्वतः आहेस ना? ” खरंच मुलगी, बहीण, प्रियेसी, पत्नी, आई या नि अशा कित्येक नात्यात इतरांवर भरभरून प्रेम करताना स्वतःवर प्रेम करायचे बऱ्याचदा राहूनच जाते असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. आपल्या मायेच्या माणसांची कोणतीच गैरसोय होऊ नये म्हणून केलेली अंगतोड मेहनत आणि अंगावर काढलेले कित्येक छोटी मोठी दुखणी, मानसिक ताणतणाव झर्रकन डोळ्यांसमोरून जातात.
उत्तराखंड राज्यातील, पौडी गढवाल मधील कठुड बडा सारख्या छोट्याशा गावात जन्मलेली ही मुलगी, जिला जन्मतःच पहिल्या श्वासासाठी संघर्ष करावा लागला होता. गळ्याभोवती गच्च अडकलेला नाळेचा फास सोडवून तिला स्वतःचा श्वास देऊन जग दाखविणारी तिची आई. बालपणीच पुण्यात आलेली ही मुलगी पुढे खऱ्या अर्थाने मराठी मुलगी बनली. मॉडलिंग, नाटके, जाहिरात यामध्ये अभिनयाची चुणूक दाखवत मिसेस वेस्ट इंडिया पर्यंत तिचा प्रवास, रियल इस्टेट सारख्या पुरुषप्रधान क्षेत्रात उमटलेला स्वतःचा स्वतंत्र ठसा हा संपूर्ण प्रवास खूप कमी शब्दात मांडला असला तरी तो थक्क करणारा आहे. प्रेमळ नवरा आणि दोन गोड मुली, सर्वार्थाने सुखी समाधानी अशा या कुटुंबात कर्करोगाच्या रूपाने एक तुफान आलं. इतर कुणी असती तर पूर्णपणे विस्कटून गेली असती पण ही आशा आहे !
“आशा” ला कधीच कर्करोग होऊ शकत नाही. कर्करोग फक्त शरीराला होतो, तो मनाला कधीच होऊ शकत नाही. हा प्रचंड आशावाद हे या पुस्तकाचे नि आशाच्या जगण्याचे सूत्र आहे. नवरा एका चांगल्या प्रकल्पावर काम करण्यासाठी काही महिन्याकरिता बाहेरगावी गेलाय, घरात दोन लहान मुली आणि ही एकटी! छातीत वाढणाऱ्या एका गाठीने आलेल्या संशयाचे पर्यवसान पुढे कर्करोगाच्या निदानात झाले. त्या सर्व चाचण्या त्यांचे अहवाल स्वतः एकटीने पूर्ण करणे इथपर्यंत ठीक होते पण जेव्हा आपल्या आईला त्रास होऊ नये, नवऱ्याच्या कामात त्याला अडथळा होऊ नये, मुलींना तणाव येऊ नये म्हणून कुणालाही आपल्या आजाराविषयी न सांगता स्वतः एकटीने जाऊन, सोबतीला कुणीही नसताना ऑपरेशन करून घेतले हे वाचून अक्षरशः मी स्तब्ध झाले ! बापरे किती ती हिंमत ! साधा सर्दी ताप झाला तरी नवरा सोबत असल्याशिवाय हॉस्पिटलची पायरी न चढणाऱ्या माझ्यासारख्या किती जणी असतील ! त्यांचा विचार करताना आशाच्या धाडसाला मनोमन नमन केलं.
एक फेब्रुवारी 2023 रोजी डाव्या छातीत हाताला लागलेल्या एका गाठीपासून सुरू झालेला हा प्रवास एक सप्टेंबर 2023 या दिवशी झालेली कर्करोग मुक्ती इथपर्यंतचा आहे. वरवर पाहता हा आशाचा एकटीचा प्रवास वाटत असला तरी प्रत्यक्षात तो प्रत्येक कर्करोग झालेल्या व्यक्तीने मनापासून ठरवलं तर ती कर्करोगावर मात करू शकते हा विश्वास पेरणारा प्रवास आहे. आशाच्या या संपूर्ण प्रवासात वाचकाला बुद्धाच्या अनित्यवादाचाच प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. सब्बम अनित्यम ! जीवनात सुख किंवा दुःख कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी नाही. आज ना उद्या या वेदना संपणार आहेत त्यामुळे शांतपणे त्यांना सामोरे जाणे आणि आपल्या सुप्त मनाच्या शक्तीने त्यावर मात करणे हे खूप महत्वाचे तत्व ब्युटी ऑफ लाईफ या पुस्तकाच्या रूपाने मांडले आहे. जीवनात माणसं कमावणं हीच खरी कमाई आहे याची साक्ष वारंवार हे पुस्तक देते. खूप नको पण योगिता सारखी एखादी तरी मैत्रीण असावीच असं वाचकाला नक्कीच वाटून जातं.
कर्करोगा सारख्या आजाराचे निदान झाल्यापासून या पुस्तकात आलेली माहिती वाचकाना आणि प्रामुख्याने स्त्रियांना या आजाराची एकूण कारणे, त्याची लक्षणे, मेमोग्राफी, पेटस्कॅनिग अशा आवश्यक त्या तपासण्या , उपचाराचा एक भाग म्हणून घ्यावी लागणारी पाळी बंद होण्याची इंजेक्शन्स, योग्य आहार, व्यायाम याविषयी जागरूक करते. ब्रेस्ट कॅन्सर मध्ये शंभर टक्के रिकव्हरी आहे हा विश्वास हे पुस्तक नक्की देते. ब्रेस्ट हा स्त्रीच्या शरीराचाच नव्हे तर एकूणच सौंदर्याचा देखील एक मानदंड मानला जातो. आपल्या शरीराचा असा एक भाग काढून टाकण्याचा निर्णय घेणं ही कोणत्याच स्त्रीसाठी सोपी गोष्ट नसते. आशा देखील त्याला अपवाद नाही , म्हणूनच स्त्रीसुलभ भावनेतून ती डॉक्टरला प्रश्न विचारते की ब्रेस्ट सेव्ह करून ऑपरेशन करता येईल का? डॉक्टर होय असे उत्तर देतात मात्र त्याच वेळी ‘ इन्फेक्शन पूर्ण ब्रेस्ट मध्ये पसरले आहे असे आढळले आणि गरज वाटली तर पूर्ण ब्रेस्ट काढून टाका , असंही ती खंबीरपणे डॉक्टरला सांगते . एका स्त्रीच्या मनाचे , भावभावनांचे स्पंदने आशाने खूप प्रामाणिकपणे मांडली आहेत.
रुग्णाला ‘बकरा ‘ समजणाऱ्या वैद्यकीय क्षेत्राचे अनेक किस्से देखील वाचक म्हणून आपले डोळे उघडण्यास मदत करतात. ऑपरेशन पूर्वी खूप गोड गोड बोलणारे डॉक्टर ऑपरेशन झाल्यानंतर आणि विशेष म्हणजे चुकीच्या पद्धतीने ऑपरेशन केल्यामुळे हात जायबंदी होण्यापर्यंत पेशंटची स्थिती पोहचल्या नंतरही पुन्हा पेशंटकडे ढुंकूनही पहात नाहीत हे वैद्यकीय जगताचे कटू वास्तव ब्युटी ऑफ लाईफने न डगमगता मांडले आहे. लेखिकेच्या या अनुभवातून इतराना नक्कीच चांगली मदत होईल, उपचारा दरम्यान किती सावधगिरीने डॉक्टर निवडावे याचेही भान येईल. डॉक्टरांकडून उकळली जाणारी मोठमोठी फी, दवाखान्यात स्वच्छतेकडे होणारी डोळेझाक, पेशंटच्या बाबतीत केला जाणारा निष्काळजीपणा अशा अनेक बाबींवर हे पुस्तक प्रकाश टाकते. आणि दुसरीकडे वैद्यकीय क्षेत्रात भेटलेल्या डॉ. रेश्मा पुराणिक यांच्यासारख्या चांगल्या डॉक्टरांचे उदाहरण सांगताना ‘ अजूनही या क्षेत्रात संवेदनशील आणि मानवतावादी डॉक्टर आहेत हे देखील अधोरेखित करते. रेडिएशन्स आणि किमोच्या चक्रातून पार पडत असताना भेटलेल्या डॉ. रेश्मा पुराणिक हे वैद्यकीय क्षेत्राची उजळ बाजू अधोरेखित करणारे नाव आहे हे नक्की ! असेच डॉक्टर रुग्णाला एक नवीन जीवन देतात.
ऑपरेशन नंतर होणाऱ्या वेदना, त्याही परिस्थिती हसतमुखाने घरात मुलींचे सर्व काही करणं ( याच काळात घरकाम करणाऱ्या बायकांची दीर्घ सुट्टी ) हे करत असताना मानसिक आणि शारीरिक ओढाताण होतानाही नवऱ्याला याबाबत सांगून त्याला ताप द्यायला नको म्हणून एकटीच साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडणारी आशा पाहिल्यावर हिने नवऱ्याला किंवा किमान आईला तरी बोलावून घ्यावं असं प्रत्येक पानावर मला मनापासून वाटत होतं.
शेवटी ऑपरेशन नंतरचा 33 वा दिवस उजाडला तेव्हा कुठे तिने गिरीशला अर्थात नवऱ्याला सांगितले कर्करोग झालाय, आणि तो त्याच दिवशी संध्याकाळी सर्व काम सोडून घरी आला ! तेव्हा वाचक म्हणून खूप बरं वाटलं. मी आजपर्यंत कर्करोग झालेल्या काही ओळखीच्या स्त्रियांना भेटले आहे पण आशा इतक्या धीराची एकही स्त्री माझ्या पाहण्यात नाही. कर्करोग झाला आहे हे कळल्यावरच हादरून जाऊन आपली निम्मी इच्छाशक्ती गमावणाऱ्या रुग्णाच्या पार्श्वभूमीवर आशा सारखी खंबीर स्त्री खूप ठळकपणे उठून दिसते. ती रडत बसत नाही तर लढायचे ठरवते आणि नुसती ठरवत नाही तर आजाराला हरवते सुद्धा!
मी कुणाचं काय वाईट केलंय ? माझ्याच वाट्याला हे का? असे क्षणभर तिलाही वाटतेच, पण आतापर्यंत आयुष्यात इतक्या चांगल्या गोष्टी आपल्याला मिळाल्या, मानसन्मान, यश मिळाले त्यावेळी आपण कधीच असा प्रश्न नाही विचारला की हे माझ्याच वाट्याला का? मीच का? मग आताही असा प्रश्न नाही विचारायचा, तर जे काही मिळाले आहे त्याचा स्वीकार करायचा आणि त्याच्याशी दोन हात करायचे. खरंच जगण्याचे हे तत्वज्ञान आशाने फक्त बोलून नव्हे तर प्रत्यक्ष जगून दाखवले आहे.
आपल्या आजाराचा कुठेही गाजावाजा न करता, सहानुभूती न घेता त्यावर मात करूनच आशा थांबली नाही तर आपले आयुष्य कर्करोगग्रस्त रुग्णाच्यामध्ये जागृती करण्याकरिता, त्यांना आधार देण्याकरिता उपयोगी पडावे या मानवतावादी भावनेतून ती समाजकार्य करत आहे. हॅट्स ऑफ टू यू आशा !
ब्युटी ऑफ लाईफ पुस्तकाचे , देवदत्त कशाळीकर यांनी साकारलेले मुखपृष्ठ खूपच बोलके आहे. कर्करोग झाल्यानंतर केस काढलेला फोटो फाडून त्यातून डोकावणारा आशाचा हसरा चेहरा आणि तिचे बोलके डोळे या पुस्तकातील सकारात्मक विचाराचे प्रतिबिंब आहेत. एकूणच न्यू इरा पब्लिशिंग हाऊसची ही एक उत्तम निर्मिती आहे. वाचक नक्कीच ब्युटी ऑफ लाइफचे स्वागत करतील यात शंकाच नाही! नक्की वाचा
पुस्तकाचे नावं – ब्युटी ऑफ लाईफ
लेखिका – आशा नेगी
प्रकाशक – न्यू इरा पब्लिशिंग हाऊस, पुणे
आयुष्य म्हणजे स्वतःची ओळख शोधण्याची एक प्रक्रिया. प्रत्येक अनुभवातून काहीतरी नवीन शिकणं आणि त्यातून अधिक सजग आणि सक्षम होणं. आयुष्याचा खरा अर्थ आपल्याच जीवनातील चांगल्यावाईट अनुभवांमधून शोधायला हवा, त्यातूनच खरं आयुष्य उमगतं.
मला कॅन्सर झाला, याचं मला काडीमात्र दुःख नाहीये. खरंच, कारण हे सगळंच क्षणभंगुर आहे. एक मृगजळ आहे, हे मला ह्या प्रवासाने दाखवून दिलं. आता उर्वरित आयुष्य मी बोनस मानून माझ्या बळावर जगणार आहे.
कारण आयुष्यात जगणंच जास्त मौल्यवान असतं.
आणि शेवटी एकच.... आनंदी जगा, हसत जगा... कारण आयुष्याचा हा चलचित्रपट एकदा संपला की याचे पुनर्प्रक्षेपण नाही.
जीवन अनिश्चित आहे. आशा-निराशेने भरलेले आहे. जगण्याची आसक्ती आहे. म्हणूनच आयुष्य खूप सुंदर आहे. तुमच्या वेदनेत, संघर्षात, आनंदात जीवनाचे सौंदर्य दडले आहे. 'ब्युटी ऑफ लाईफ' म्हणतात ते हेच....!
आशा नेगी
आशा नेगी लिखित “ब्युटी ऑफ लाइफ” या पुस्तकाला 17 राज्यस्तरीय साहित्यिक पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे…
गावगाडा प्रेरणा साहित्य पुरस्कार – करमाळा, सोलापूर
महात्मा फुले साहित्य गौरव पुरस्कार – पुरंदर
साहित्यकृती पुरस्कार – पालघर
प्रज्ञा बहुउद्देशीय संस्था पुरस्कार – पुणे
कर्तृत्व गौरव पुरस्कार – चिंचवड
शौर्यगाथा पुरस्कार – चिंचवड
संभाजी महाराज साहित्य सेवा पुरस्कार – फलटण
शिवांजली साहित्य सन्मान – जुन्नर
साहित्यायन उत्तम साहित्य पुरस्कार – नाशिक
सनराईज साहित्य पुरस्कार – पंढरपूर
विशेष गौरव पुरस्कार – पिंपरी चिंचवड
प्रेरणावेल साहित्य पुरस्कार – मुंबई
उत्तम साहित्य पुरस्कार – ठाणे
राज्यस्तरीय मृत्युंजय साहित्य भूषण – कोल्हापूर
साहित्य सन्मान पुरस्कार – कणकवली
अक्षर गौरव साहित्य पुरस्कार – सातारा
संत नामदेव राष्ट्रीय आत्मकथन साहित्य पुरस्कार – हिंगोली
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
 
		
 
					