जागरण : जागृत जीवनानुभव
निवृत्ती नंतरही अन्य सेवानिवृत्तांना एकत्र आणून शाळाबाह्य लेकरांसाठी काम करणे हे व्रत त्यांनी अंगीकारले आहे. स्वतः जागे राहून समाजाला जाग आणणारे हे कार्य म्हणजे एक जागरणच नव्हे काय ? डोळ्यात तेल घालून आयुष्यभर ज्ञानदीप तेवत ठेवायचा हे जागरणाशिवाय शक्य आहे काय ?, जागे असणाऱ्यांना क्रियाशील बनवणे व झोपलेल्याला जागे करणे यासाठी आधी स्वतःला जागरण करायला नको का ? या सगळ्या प्रश्नांचे उत्तर म्हणजे भारत सातपुते यांचे आत्मकथन ‘ ‘जागरण’ हे आहे.
सुहास रघुनाथ पंडित,
सांगली. 9421225491
भारत सातपुते हे नाव मराठी साहित्य जगताला नवीन नाही. कथा, काव्य, वात्रटिका, व्यक्तिचित्रण, बालसाहित्य, वैचारिक लेखन असे साहित्याच्या विविध प्रांतात त्यांनी विपुल लेखन केले आहे. याशिवाय त्यांच्या साहित्यावरही अनेकांनी लेखन करुन त्यांचे निवडक साहित्य संपादित केले आहे. सातत्याने लेखन करणाऱ्या या लेखकाने आपले ‘जागरण’ हे आत्मचरित्र (एप्रिल २०२४) मध्ये प्रकाशित केले. आपले हे आत्मचरित्र वाचून माझे त्याविषयीचे मत कळवावे असे त्यांनी मला सांगितले व एके दिवशी हे पुस्तक घरी पाठवून दिले. ज्या लेखकाची पुस्तके आपण फारशी वाचलेली नाहीत त्या साहित्यिकाचे आत्मचरित्र वाचून आपण काय करणार ? त्यावर काय मत देणार ? असा विचार मनात येऊन गेला. एका पुस्तकाचे वाचन चालू होते. ते पूर्ण केले व मग’ जागरण ‘ कडे वळलो. लेखकाचे मनोगत व पुढची काही पाने वाचली. मग मात्र निश्चय झाला. हे पुस्तक, आत्मचरित्र वाचायचेच. कारण काही पानानंतरच हे लक्षात आले की हे एका व्यक्तिचे चरित्र तर आहेच पण त्याचबरोबर समाजाचा एक व्यापक पट डोळ्यासमोर मांडला जाणार आहे. ही संघर्षमय जीवनाची कथा आहे. आपल्या चुकांची कबुली देऊन ध्येयाकडे वाटचाल करणाऱ्या प्रामाणिक वाटसरुची प्रवास गाथा आहे. इथे घटनांचे, प्रसंगांचे निवेदन आहे. त्यामुळे संवाद साधला जातोय. संवादात दुसऱ्यापर्यंत पोहोचणे महत्वाचे असते. त्यामुळे भाषा अलंकारिक आहे की नाही हे महत्वाचे नाही. तर त्यात सच्चेपणा जाणवतोय की नाही हे महत्वाचे आहे. हे मनाशी पक्के झाल्यामुळेच प्रसंगी जागरण करुन ‘जागरण ‘ चे वाचन पूर्ण केले. मग त्यावर थोडेफार लिहीण्याचे धाडस केले आहे.
हे आत्मचरित्र लेखकाने क्रमवार लिहीले आहे. म्हणजे आयुष्याचा पहिला कालखंड- बालपण, तिथून निवेदनाला सुरुवात करुन एक एक प्रसंग, घटना आपल्यासमोर मांडल्या आहेत. त्यांच्या संपूर्ण बालपणाचा विचार करता ते किती संघर्षमय होते ते अनेक प्रसंगावरून लक्षात येते. १९७२ चा दुष्काळ, सरकारी विहिरींची कामे, सुकडी, घरातील भांड्याकुंड्यांचा केलेला उल्लेख, कपड्यांची अवस्था, पायात चपला नसणे, सण साजरे करतानाही त्यातील अपुरेपणा या सर्व गोष्टींचे तपशिलासह वर्णन त्यांनी केले असल्यामुळे ते सर्व प्रसंग डोळ्यासमोर उभे रहातात. पण त्याचवेळेस त्यांनी बालपणातील चांगल्या गोष्टींची नोंदही केली आहे. विशेषतः वडिलांविषयी जे लिहीले आहे ते वाचताना हे लक्षात येते की प्रामाणिकपणा, कष्टाची तयारी, खोटारडेपणा न करणे, पैसे जपून वापरणे यासारखे गुण त्यांना वडिलांकडून मिळाले आहेत. शालेय जीवनातील चांगल्या शिक्षकांचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केलेला आहे. तसेच बालवयातील चुकांची कबुलीही दिली आहे. आपली परिस्थिती, समाजातील त्यावेळी असणारे कुटुंबाचे स्थान याविषयी आईवडिलांनीच जाणीव करुन दिल्यामुळे त्यांना लहान वयातच वास्तवाचे भान आले असावे.
दहावीची परीक्षा पास झाल्यानंतर लातूर येथे डी. एड्. साठी प्रवेश घेणे, दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे, त्यानंतर लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन मुंबईत लिपीक म्हणून नेमणूक होणे व परत गावाकडे येऊन प्राथमिक शिक्षकाची नोकरी मिळणे या सर्व घटनांचा वृतांत पुढे वाचायला मिळतो. या सर्व घटनांमध्ये घडणाऱ्या व अनुभवाला आलेल्या बारीक सारीक गोष्टींचा त्यांनी उल्लेख केला आहे. मुंबईला जाईपर्यंत आपल्याला टी. व्ही. चा ॲन्टिनाही माहित नव्हता हे सांगताना त्यांना संकोच वाटत नाही. चौपाटीवर भटकणे म्हणजे वेळ फुकट घालवणे आहे याची त्यांना वेळीच जाणीव होते व हा नाद ते सोडून देतात. प्राथमिक शिक्षकाची नोकरी मिळाल्यावर लोकसेवा आयोगाच्या नोकरीपेक्षा त्यांना जास्त आनंद होतो. कारण त्यांचे लहानपणापासूनचे स्वप्न पूर्ण झालेले असते. सहकारी शिक्षकांकडून काही ना काही शिकायला मिळाले असेही त्यांनी म्हटले आहे. या सर्व कथनातून एक गोष्ट स्पष्ट होते की त्यांनी मनोगतात म्हटल्याप्रमाणे जे घडत गेले ते मोकळेपणाने सांगितले आहे. या ठिकाणी आणखी एक गोष्ट विशेषत्वाने नमूद करावीशी वाटते. एक म्हणजे लातूरला शिकत असताना तथाकथित कनिष्ठ जातीतील मित्राच्या खोलीवर राहणे त्यांना गैर वाटले नाही. तर पुढे नोकरीच्या ठिकाणी मुख्याध्यापक गुंजोटीकर या तथाकथित उच्च वर्णीय शिक्षकांनी त्यांना जात न विचारता स्वतःबरोबर जेवू घातले, आपुलकीची वागणूक दिली याचे वर्णन ही ते करतात. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी विविध जातींची माणसे एकमेकांशी सलोख्याने वागत होती याचे हे उदाहरण आहे. लेखकाने या घटनांचा उल्लेख केला नसता तर आपल्याला हे समजले नसते. आज काय अवस्था आहे असा प्रश्न मनात उभा राहतो. तसेच जातींमध्ये भेद निर्माण करणारा सामान्य माणूस नसून अन्य कोणीतरी असावे याची खात्री पटते. ‘गुरुजींना जात नसते, शिक्षक हीच त्याची जात असते ‘ असे गुंजोटीकर गुरुजी आपल्या आईला ठणकावून सांगतात व त्याचा उल्लेख लेखकाकडून होतो हे विशेष महत्त्वाचे वाटते.
शिक्षक म्हणून नोकरी करत असताना आलेले असे अनुभव त्यांनी पुढेही कथन केले आहेत. निरनिराळ्या खेड्यातील शाळा, शिक्षक, पालक यांचे अनुभव, काही वेळेला राजकारणामुळे तर काही वेळा स्वच्छ वागणुकीमुळे बदल्या होणे, कडक शिस्तीचे अधिकारी, प्रौढ शिक्षण वर्ग, छात्रभारतीचे काम, वाचनालय योजना असे कितीतरी विषय त्यांनी सविस्तरपणे लिहीले आहेत. या सर्व लेखनात प्रामाणिकपणा दिसतो. कारण हे सर्व कथन करत असताना, स्वतःच्या धडपडीसंबंधी लिहीत असताना त्यांनी स्वतःच्या चुका, इतरांशी होणारे वैचारिक मतभेद, वैयक्तीक आयुष्यात झालेली फसवणूक व नुकसान हे सर्व न लपवता खुलेपणाने सांगितले आहे. त्यामुळे या आत्मकथनात सच्चेपणा आला आहे. स्वतःच्या स्वभावामुळे, भ्रष्टाचाराला विरोध केल्यामुळे झालेला त्रासही त्यांनी सांगितला आहे. यावरुन हेच दिसते की त्रास झाला तरी खरेपणा सोडू नये हा त्यांचा स्वभावच बनून गेला आहे. आज हा गुण फार दुर्मिळ होत चालला आहे. परंतु समाजात नकळतपणे चांगले संस्कार रुजत असतात. त्यांच्या तालमीत तयार झालेले विद्यार्थी त्यांना येऊन भेटू लागले, स्वतःचे लेखन दाखवू लागले, निर्व्यसनी असल्याचे अभिमानाने सांगू शकले हाच त्यांच्या कामाचा खरा पुरस्कार आहे. जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कारही त्यांना मिळाला. पण स्पष्टवक्तेपणा व दलाली करण्याची प्रवृत्ती नसल्यामुळे जि. प. च्या शिक्षण समितीवरील स्वीकृत सदस्यत्व मात्र गमवावे लागले. भ्रष्टाचारी अधिका-यांना भ्रष्ट एवढी एकच जात असते असे एक गटशिक्षणाधिकाऱ्यांविषयी लिहीताना त्यांनी म्हटले आहे. तर दुसऱ्या ठिकाणी ते म्हणतात की सभापती आणि गटशिक्षणाधिकारी यांची चांगली जोडी जमल्यामुळे शिक्षणाचे व शिक्षकांचे भले होत गेले. यातून जे योग्य आहे तेच बोलायचे, चांगल्याला चांगले म्हणायचे अशी त्यांची प्रवृत्ती आहे हे स्पष्टहोते. याच प्रवृत्तीमुळे हंगामी वसतिगृहातील भ्रष्टाचारही त्यांनी निपटून काढला. लातूर सारख्या शहरातील बंद पडलेल्या दोन प्रशाला पुन्हा चालू करण्यातही त्यांनी यश मिळविले.
यापुढच्या लेखनातही त्यांनी शिक्षण खात्याचे विविध उपक्रम व ते राबवत असताना अनुभवास येणारे प्रसंग जसे घडले तसे रंगवले आहेत. संवाद असोत किंवा आत्मचिंतनात्मक उद्गार असोत, साध्या भाषेत पण मनाला भिडणारे कथन केले आहे. सर्व कारभार हा भ्रष्टाचार मुक्त असावा, शैक्षणिक क्षेत्राचे पावित्र्य राखले जावे ही त्यांची तळमळ यातून दिसून येते. सर्व शिक्षा अभियान,गुणवत्ता विकास अभियान, पुस्तक निर्मिती मंडळ अशा अनेक उपक्रमात काम केल्यामुळे व स्वतःची तत्वे न सोडल्यामुळे येणारे भले बुरे अनुभव कथन करताना त्यांनी नोंदवलेली निरीक्षणे वाचकाचे लक्ष वेधून घेतात. ‘आपला प्रश्न रास्त असो वा नसो, तो प्रश्न नेत्याकडून सुटावा असे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असते’,’ मला वाटते कधी समोरुन तर कधी हस्ते परहस्ते स्वराज्याचे असे आपण आपल्या क्षेत्रात सुराज्य करण्यासाठी लढले पाहिजे ‘, ‘ वैयक्तिक जीवन व सार्वजनिक जीवन यात तफावत, विसंगती असू नये ‘, ‘आधुनिक शिक्षण महर्षी शाळा विकतात, शाळा विकत घेतात, हा सध्याचा सर्वात मोठा उद्योग बनला आहे ‘, ‘ भाषणात साने गुरूजी अन् वागण्यात ‘ नाणे ‘ गुरुजींचे पीक जोमात आहे, आदर्श मात्र कोमात आहे ‘ या सारखी वाक्ये जेव्हा त्यांच्या लिखाणात येतात तेव्हा ते लिहीण्याचे धैर्य कोठून येते याचा विचार केला तर सत्याला मरण आणि भीती नसते हे मान्य करावेच लागेल. मात्र याबरोबरच स्वतःच्या हातून घडलेल्या चुकांची कबुली देऊन ते खंतही व्यक्त करतात. ‘नाही म्हटले तरी हे माझे वागणे चुकलेच ! हा कलंकित काळ सतत माझ्या आयुष्याचा, भविष्याचा कर्दनकाळ ठरणार आहे ‘ असे उद्गार त्यांच्या तोंडून निघाले आहेत.
फार कमी शिक्षणाधिकारी प्रामाणिक वाटले. चांगले उपक्रम संघटनांच्या पुढारीपणामुळे बंद झाले. अशा नोंदीही ते करतात. समाजातील वाईट, चुकीच्या कार्यपद्धतीही त्यांना मान्य नाहीत. त्यावरही त्यांनी स्पष्ट शब्दात टीका केली आहे. कडक अधिकारी गेल्यावर एखादा प्रभारी अधिकारी येतो व चुकीच्या फायलींना मंजुरी मिळते, हे कसे काय असा प्रश्न त्यांना पडतो. आपल्याला दारूचे व्यसन असते तर साहित्यिकांच्या मोठ्या गटात टिकून राहिलो असतो हे त्यांचे शब्द चीड आणि खंत मिश्रित आहेत असे वाटते. एखाद्याची शिफारस करण्यासाठी दलाल होणे त्यांना मान्य नाही. मात्र योग्य कामासाठी शब्द पाळणे त्यांना आवडते. वर्तमानपत्रासारखी माध्यमे सत्यासाठी चालू आहेत की सत्तेसाठी हा प्रश्न त्यांना पडतो. आपल्या कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचल्यावर त्यांना खूप आनंद व समाधान वाटते. हे सर्व आजच्या वातावरणात विसंगत वाटेल. पण यातूनच त्यांचे वेगळेपण दिसून येते.
आपल्यावर ज्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत त्या काटेकोरपणे पार पाडण्याचा त्यांचा पिंड दिसून येतो. सामुदायिक कॉपी प्रथा, ती बंद करण्यासाठी कॉपीमुक्ती अभियान, शाळेसाठी आलेल्या पैशातून शाळेत सुधारणा करणे, मैदानांचा, रिकाम्या किंवा जुन्या खोल्यांचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेणे,गुड मॉर्निंग पथक चालू करणे, शाळेत सकाळी मुलांना व्यायामाची सवय लावणे, गावाची माहिती पुस्तिका तयार करणे, स्वतःच्या रजेच्या बाबतीत काटेकोर असणे यासारखे अनेक निर्णय घेताना त्यांना अनंत अडचणी आल्या आहेत. टिकेला तोंड द्यावे लागले आहे. पण त्याला न घाबरता त्यांनी आपल्या तत्वनिष्ठतेने सर्व समस्यांना तोंड देऊन त्यावर मात केली आहे. शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी कारभार व भ्रष्टाचार यांचे अनेक नमुने त्यांनी वाचकांसमोर ठेवले आहेत. ते वाचल्यावर आपल्या शिक्षण क्षेत्राची दुसरी बाजू लक्षात येते व आपण नक्की कशाचे शिक्षण देत आहोत हेच समजेनासे होते. शासनाची योजना वाईट नसते. त्यासाठी पारदर्शकता हवी म्हणजे अंमलबजावणी सोपी जाते असे त्यांनी स्वानुभवावरुन म्हटले आहे.
तालुक्याच्या ठिकाणी बंद पडलेल्या शाळेच्या ग्रंथालयातील हजारो पुस्तके भादे येथील शाळेत आणून त्यांनी ग्रंथालय सुरू केले. त्याला व्यवस्थित शिस्त लावून मुलांच्या मनात वाचनाची गोडी निर्माण केली. वाचनकट्टाही सुरु केला. मुलाखती कशा घ्यायच्या हे मुलांना समजावे म्हणून मुलांकडून गावातील विविध व्यक्तींच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली. ‘प्रेरणा’ नावाचा विद्यार्थ्यांचा हस्तलिखित विशेषांक काढला. नामवंतांची कविसंमेलने, कथाकथन, व्याख्याने आयोजित केली. चिठ्ठी खोला झटपट बोला, पाढे आमचे पेढे यासारखे उपक्रम सुरु केले. या सर्वांतून विद्यार्थांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास साधला गेला. त्याबरोबरच कवायत, मैदानी खेळ यांचीही शिस्तबद्ध अंमलबजावणी केली. रोजच्या परिपाठात बदल केले. या सर्व प्रयत्नांतून एकच दिसते ते म्हणजे मुले व शाळा यासाठी आपले जीवन वाहून घेणे. मनात तळमळ असल्याशिवाय हे शक्य होत नाही. हे सर्व वाचताना त्यांनी सांगितलेले स्वतःच्या स्वयंपाकाचे अनुभव मात्र खूप मजेशीर आहेत. त्यातही ते आनंद घेताना दिसतात. आयुष्य स्विकारण्याची ही प्रवृत्ती कौतुकास्पद आहे.
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करणे, त्यांच्या गणवेशासाठी अनुदान मिळवणे, कन्या प्रशालेत व्यावसायिक अभ्यासक्रम सुरु करणे, स्काऊट गाईड सुरु करणे या सर्व धडपडीमागे त्यांची विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी असलेली तळमळ दिसून येते. केवळ पुस्तकी ज्ञानात त्यांना अडकवून न ठेवता त्यांचा संपूर्ण विकास कसा होईल यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले आहेत. अनेक अडचणींवर मात करून त्यात यशही मिळवले आहे. विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणाची मूल्ये रुजवण्यासाठी त्यांनी शाळेत हरवले – सापडले हा विभाग सुरु केला. त्याचाही चांगला परिणाम झाला. दिवाळीच्या सुट्टीत गावात ठिकठिकाणी संदेशाच्या सुविचारांचे फलक लावणे, परंपरागत सण, उत्सवात मुलांना मनोरंजन व शिक्षण देणे, जत्रेत त्यांना मुक्तपणे बागडू देणे अशा अनेक उपायांमुळे विद्यार्थ्यांचे जीवन घडवण्याचे त्यांचे स्वप्न साकार होत गेले.
खरा शैक्षणिक पॅटर्न हा ग्रामीण भागात जिल्हा परिषद किंवा खाजगी शाळेच्या प्राथमिक शाळेत आहे हे त्यांनी अशा उपक्रमातून दाखवून दिले आहे. केवळ निकाल म्हणजे गुणवत्ता नसून विद्यार्थ्यांच्या पायाभूत ज्ञानाकडे लक्ष देणे आवश्यक आहे हे त्यांनी जाणले आहे व अंमलात आणले आहे. याबरोबरच मन प्रसन्न होईल असे वातावरण शाळेत ठेवणे, शाळा स्वच्छ, सुशोभित ठेवणे, बोर्डाचे निकाल चांगले लागतील यासाठी विशेष लक्ष पुरवणे, शाळेचे सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवणे, मुलांना खाते उघडून देऊन बचतीची सवय लावणे असे अनेक निर्णय त्यांनी अंमलात आणले आहेत. शाळा हाच आपला संसार मानून तो त्यांनी इमाने इतबारे केला हे त्यांच्या आत्मकथनातून दिसून येते.
हे आत्मकथन बारकाईने वाचल्यावर एकच लक्षात येते की आपली शाळा, तेथील मुले-मुली यांचे भवितव्य घडवायचे एवढे एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवले तर शिक्षक काय काय करु शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. त्यासाठी स्वतः स्वच्छ राहून कठोर परिश्रम करण्याची तयारी मात्र हवी. अनंत अडचणींना ,टीकेला,त्रासाला तोंड देण्याची हिम्मत असेल तरच हे शक्य होते.
एका सहकारी शिक्षिकेच्या कार्यपद्धती व वागणूकीसंबंधी त्यांनी उत्तरार्धात खूप सविस्तरपणे लिहीले आहे. हे लिखाण थोडेसे लांबल्यासारखे वाटते. पण सर्व गोष्टींचा व्यवस्थित उलगडा व्हावा या उद्देशानेही लेखन सविस्तरपणे केले असावे असे वाटते. काही ठिकाणी मुद्रणाच्या चुका दिसतात. तर काही क्रियापदे वेगळ्या पद्धतीने वापरलेली दिसतात. उदाहरणार्थ: स्वच्छ करतोत, सुंदर बनवतोत, छत टाकलो इत्यादी. साधारणपणे करतो, बनवतो, टाकतो असे क्रियापद वापरले जाते. पण हे त्या त्या प्रदेशातील बोलण्याच्या वेगळेपणाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. ते वेगळेपण जाणवले. म्हणून उल्लेख करावासा वाटला.
पुस्तक संपूर्ण वाचून झाल्यानंतरच पुस्तकाचे शिर्षक ‘जागरण ‘ हे कसे योग्य आहे याची खात्री पटते. निवृत्ती नंतरही अन्य सेवानिवृत्तांना एकत्र आणून शाळाबाह्य लेकरांसाठी काम करणे हे व्रत त्यांनी अंगीकारले आहे. स्वतः जागे राहून समाजाला जाग आणणारे हे कार्य म्हणजे एक जागरणच नव्हे काय ? डोळ्यात तेल घालून आयुष्यभर ज्ञानदीप तेवत ठेवायचा हे जागरणाशिवाय शक्य आहे काय ?, जागे असणाऱ्यांना क्रियाशील बनवणे व झोपलेल्याला जागे करणे यासाठी आधी स्वतःला जागरण करायला नको का ? या सगळ्या प्रश्नांचे उत्तर म्हणजे भारत सातपुते यांचे आत्मकथन ‘
‘जागरण’ हे आहे.
‘ उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत अर्थात उठ, जागा हो आणि ध्येयप्राप्तीपर्यंत थांबू नकोस हाच संदेश देणारे हे ‘ जागरण ‘ आहे !
पुस्तकाचे नाव : जागरण (आत्मचरित्र)
लेखक : भारत सातपुते 8087695000
प्रकाशक : मांजरा प्रकाशन, लातूर
किंमत : ६०० रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.