डॉ. गोमटेश्वर पाटील यांनी मध्ययुगीन कालखंडातील जैन साहित्यातील दुर्मिळ व अप्रकाशित १७ हस्तलिखीत ग्रंथांचे २४ खंडात संपादन केले असून त्या ग्रंथांचे प्रकाशन कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व शिवाजी विद्यापीठ तुकाराम अध्यासनाच्यावतीने करण्यात आले. या निमित्त या ग्रथांचा डॉ. गोमटेश्वर पाटील यांनी थोडक्यात मांडलेला इतिहास…
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्याकडून एकूण मराठीतील दुर्मिळ जैन हस्तलिखित ग्रंथांचे संपादन २४ खंडांमध्ये प्रकाशित करण्यात आले. मध्ययुगीन मराठी भाषेचा आणि साहित्याचा एक महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून या ग्रंथांकडे पाहता येईल. मध्ययुगीन साहित्य हे अनेक धर्मसंप्रदायांनी समृद्ध केले होते. वारकरी, महानुभाव, दत्त, समर्थ, वीरशैव, आनंद, सूफी इत्यादी संप्रदायांबरोबरच महाराष्ट्रात मराठी भाषा आणि साहित्य समृद्ध करण्यामध्ये जैन मराठी लेखकांनीही फार मोठा हातभार लावलेला आहे. संपादित केलेली ही पुस्तके म्हणजे मध्ययुगीन मराठीतील भाषेचा आणि साहित्याचा उत्कृष्ट नमुना आहेत.
मराठीला अभिजात दर्जा विषयी महत्त्वाचा पुरावा
मराठी साहित्याचा ग्रांथिक इतिहास बाराव्या शतकात सुरू होतो. मुळात हा इतिहासच जैन परंपरेतल्या अनेक ग्रंथांपासूनही सुरू होतो. याचवेळी मराठी भाषेची जननी म्हणून ज्या ग्रंथांकडे पाहिले जाते त्या महाराष्ट्री अपभ्रंश व महाराष्ट्री प्राकृत भाषेतील ग्रंथांचे विपुल लेखनही जैन लेखकांनी केले आहे. पुढे या महाराष्ट्री शब्दाचा संदर्भ आणि उल्लेख अनेक मराठीतील जैन कवी कित्येक शतकापर्यंत महाराष्टी किंवा मराष्ट्री असाच करतात. इसवी सनाच्या अठराव्या शतकापर्यंत अनेक जैन कवींनी मराठीतील आपल्या लेखनाला महाराष्ट्री अथवा मराष्ट्री या शब्दानेच उल्लेखितात. मराठी भाषेच्या अभिजात दर्जाच्या सातत्याविषयी हा एक महत्त्वाचा दुवा आणि पुरावा आहे.
विविध भाषांतील रचना मराठीत आणण्यात योगदान
आज जैन साहित्यातील लिखित मराठीतले ग्रंथ हे पंधराव्या शतकापासून उपलब्ध होतात. मात्र अनेक मठा-मंदिरामध्ये बंदिस्त असलेल्या हस्तलिखितांचा शोध घेतला गेला तर पंधराव्या शतकाच्या मागेही आणि नवव्या दहाव्या शतकापर्यंत मराठीतल्या जैन लेखकांच्या रचना उपलब्ध होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील विविध प्रांतात व प्रदेशात राहणाऱ्या मराठी जैन लेखकांनी मराठी भाषेला मोठी देणगी दिलेली आहे. मराठी भाषा आणि साहित्य यामध्ये असंख्य रचना, असंख्य रचना प्रकार, महाकाव्यांपासून चरित्रकाव्यांपर्यंत आणि तत्कालीन लोकगीते आणि लोककथांपर्यंत या कवी लेखकांनी आपले लेखन केले आहे. महाराष्ट्रासह गुजराती, राजस्थानी, कन्नड, तमिळ, तेलुगू या भाषेतील रचनेचे अनेक प्रकारही या जैन कविंनी मराठीत आणलेले आहेत. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम आदी संतांनी लिहिलेल्या मोठमोठ्या ग्रंथांइतकेच या कवी लेखकांनीही मोठे ग्रंथ लिहिले आहेत.
गुणकीर्ती लेखकाकडून रामायणाचे लिखाण
जैन रामायणाची एक स्वतंत्र परंपरा भारतभर सर्व भाषेत दिसते. मराठीतही जैन लेखकांनी लिहिलेली रामायणे आहेत. या प्रकल्पात गुणकीर्ती या लेखकाचे रामायण संपादित केलेले आहे. गुणकीतींच्या अनेक मराठी रचना आहेत. धर्मामृत, रुक्मिणी हरण, रामचंद्र फाग, गवळणी रस, नेमिनाथ विवाह, नेमिनाथ पाळणा, नेमिनाथ दीक्षा, धंदा गीत, रत्नकरंड श्रावकाचार मराठी टीका अशा रचना त्यांनी केल्या आहेत. यापैकी रामायण ही महत्त्वाची रचना त्यांनी केली आहे. १५००० ओवी संख्या असलेले हे रामायण तीनशे वर्षे लिहिले गेले आहे. एकूण ४४ अध्यायांपैकी २६ अध्याय गुणकीर्ती यांनी रचले. गुणकीर्ती यांच्या मृत्युनंतर त्यांच्या शिष्यांनी पुढे हे रामायण पूर्ण केले आहे. यापैकी एक अध्याय रत्नकीर्ती यांनी, आठ अध्याय ब्रह्म चिन्तामणी यांनी तर पुढचे आठ अध्याय ब्रह्म पुण्यसागर यांनी रचले आहेत. त्याचबरोबर मराठीतील महाभारत रचनाही जैन कवींनी स्वतंत्रपणे आपल्या पद्धतीने केल्या आहेत.
महाभारताच्या विविध कथांचे लिखाण
आज या प्रकल्पात तीन महाभारत कथा संपादित केलेल्या आहेत. यात जीनदासनामा यांचे हरिवंशपुराण, गिरिसुत या कवीचे हरिलीळाप्रकाश आणि आदिनाथ पंडित यांचे पंच पांडवांचे आदिमूलचरित्र या महाभारत कथेवरील तीन रचना आहेत. यापैकी नामाजीनदास कृत हरिवंश पुराण ६६ अध्यायाचे आणि ११००० ओवी संख्येचे आहे. विशेष म्हणजे ही महाभारत कथा एकनाथपूर्व आहे. जैन परंपरेतील ही महाभारत कथा व यातील कुंती, कर्ण, वसुदेव, नेमिनाथ, राजुल, द्रौपदी यांच्या कथा स्वतंत्र आहेत. जैन महाभारतात वसुदेवाचे एक स्वतंत्र आख्यान येते. गिरीसुत या कविने १८ व्या शतकाच्या अखेरीस हरिलीळाप्रकाश हे बृहद् महाभारत लिहिले आहे. नांदणी मठाचे भट्टारक जिनसेन यांचा हा शिष्य कवी कवठेमहांकाळ जवळील कोगनोळी/ भोसे गावचा आहे. मराठी भाषेच्या दृष्टीने हे महाभारत महत्त्वाचे आहे. या प्रकल्पातील तिसरी महाभारत कथा कोल्हापूरच्या आदिनाथ पंडित या कविने लिहिली आहे. यात फक्त पाच पांडवांची कथा आली असून ही छोटी पाण्डवकथा आहे.
ग्रंथात मराठी भाषेचा गौरव
या शिवाय अनेक चरित्रकाव्ये आणि आख्यानकाव्ये ही सुद्धा जैन कवींच्या लेखनाच्या आस्थेचा विषय दिसतात. गुणनंदीकृत यशोधर चरित्र, वीरदासकृत सुदर्शन चरित्र, दयासागरकृत हनुमंतपुराण ही आख्यानकाव्ये या प्रकल्पात संपादित केली आहेत. यातील यशोधर चरित्राची रचना १५८१ इ.स.ची आहे. गुणनंदी यांची ही एकमेव रचना असून जैन परंपरेतील यशोधर राजाची लोकप्रिय कथा यात आली आहे. ८ अध्याय आणि १३०६ ओवी संख्या या ग्रंथात आहे. सदर्शनचरित्र ही कथा वीरदास यांनी लिहिली आहे. वीरदास हे शिवकालातील कवी आहेत. १६७६ साली हे काव्य लिहिले गेल्याचे कवी सांगतो. या ग्रंथातील मराठी भाषेचा गौरव नोंद घेण्यासारखे आहे.
कानडी भाषेतील कथांचे मराठीत रुपांतरण
हनुमंतपुराण ही एक स्वतंत्र जैन हनुमंताची कथा जैन साहित्यात वारंवार पाहायला मिळते. दयासागर यांनी ही कथा लिहिली आहे. या ग्रंथाच्या अनेक हस्तलिखित प्रती महाराष्ट्रभर आढळतात. दयासागर या लेखकाच्या नावावर अनेक ग्रंथ आढळतात. सम्यक्त्व कौमुदी, भविष्यदत्त पुराण, धर्मामृत कथा असे अनेक ग्रंथ या कविने लिहिले आहेत. या शिवाय जम्बुस्वामी चरित्र ही रचनाही या कविने लिहिली असावी. हा कवी शिवकालानन्तरचा आहे. या कवीची धर्मामृत कथाही या प्रकल्पात संपादित केली आहे. जैन परंपरेत आठ अंगाच्या कथा प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहेत. मुळच्या कानडी भाषेतील या कथा अनेक भारतीय भाषेत फिरताना दिसतात. दयासागर यांनी त्या मराठीत लिहिल्या आहेत.
धर्मपरीक्षा ग्रंथ अनेक भाषांत
धर्मपरीक्षा हा आणखी एक ग्रंथ अनेक भारतीय भाषेमध्ये त्या त्या काळामध्ये अनेक कवी लेखकांनी लिहिल्या आहेत. सहाव्या शतकात हरिभद्रसूरी यांनी लिहिलेल्या धूर्ताख्यान या मूळ ग्रंथावरून हा ग्रंथ लिहिला गेला आहे. मराठीत या प्रकल्पात संपादित केलेल्या विशालकीर्ती यांचा हा ग्रंथ व कवी १९ व्या शतकात नेमाप्पा यांनी संपादित केलेला धर्मपरीक्षा याच शीर्षकाचा दुसरा ग्रंथ आढळतो. यापैकी नेमाप्पा यांचा ग्रंथ अधिक जहाल भाषेत लिहिलेला आहे. वैदिक आणि अवैदिकांचा वादविवाद या ग्रंथात येतो.
नेमाप्पा १८ व्या शतकातील कवी
नेमाप्पा हा एक महत्त्वाचा कवी १८ व्या शतकात झाला आहे. कर्णामृत कथा ही एक वेगळी कथा त्यांनी लिहिली आहे. प्रथमदर्शनी ही कथा कर्णाची वाटत असली तरी ही कथा कर्णाची नाही. या कथेचे कथानक आदिपुराण या पुराणाशी साम्य दाखवते. यात भगवान आदिनाथापासून श्रीयाळ राजापर्यंत कथा येते. श्रीयाळ राजाची ही सुंदर कथा पुढे अतिशय रम्य झाली आहे. नेमाप्पा हा कानडी कवी ही मराठी कथा लिहितो. नेमाप्पाने अनेक रचना केल्या आहेत. व्रतकथांपासून जम्बूस्वामी पुराणापर्यंत सुक्तिमुक्तावली, कर्णामृत्पुराण असे अनेक ग्रंथ लिहिले आहेत. नांदणी मठाचा हा शिष्य आहे.
भट्टारक रत्नकीर्तीची उपदेशरत्नमाला
भट्टारक रत्नकीर्ती यांनी लिहिलेली उपदेशरत्नमाला ही मोठी कथामालिका मराठीत पाहायला मिळते. रत्नकीर्ती रचित उपदेशरत्नामाला या ग्रंथाचा लेखनकाल इ. स. १८१२ असल्याचा उल्लेख स्वत: कविने केला आहे. या ग्रंथात एकूण ४० प्रसंग असून या हस्तलिखित ग्रंथातील ओवीसंख्या ४७८५ इतकी असल्याची नोंद आहे.
धर्मविषयक बोध देणारे ग्रंथ
सुक्तिमुक्तावली हा मूळचा संस्कृत भाषेतील अजीतदेव यांनी लिहिलेल्या ग्रंथावर मराठीत मधुकराया यांनी टीका केली आहे. जैनमत सांगण्यासाठी मराठीत लिहिलेला हा सुंदर ग्रंथ असून सदाचार, बोध, ज्ञान या विषयावर हा ग्रंथ आहे. धर्मचर्चा करणे, उपदेशपरसाहित्य लिहिणे, सुभाषितांची रेलचेल करणे आणि समाजाला सन्मार्गावर आणणे, बोध देणे हा मध्ययुगीन काळातील सर्वच धर्मसंप्रदायांच्या साहित्याचा हेतू दिसतो. हाच हेतू जैन कवींचाही या लेखनामध्ये दिसतो. सुक्तिमुक्तावली, धर्मामृत कथा, धर्मपरीक्षा हे ग्रंथ धर्मविषयक बोध देणारे ग्रंथ आहेत.
महाराष्ट्रातील बोली भाषांचाही लेखनावर प्रभाव
महाराष्ट्राच्या अनेक भागातील हे कवी लेखक आपापल्या बोली भाषांमध्ये लिहिताना दिसतात. या प्रकल्पातील कविंद्रसेवक हा विदर्भातला कवी आहे. त्याने लिहिलेला सुमतीप्रकाश हा ग्रंथ अहिराणी आणि वऱ्हाडी भाषेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. सुमतीप्रकाश हा ग्रंथ तत्कालीन समाजातील अंधश्रद्धा, पाखंडी, भोंदू बैरागी यांचा बुरखाफाड करणारा ग्रंथ आहे. एकनाथांच्या समकालीन हा कवी असून एकनाथाकालीन सामाजिक स्थिती काय होती याचा आणखी एक पुरावा देणारा हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ म्हणजे त्या काळातील ग्रामीण जीवन, परंपरा, जातिव्यवस्था आणि सामाजरचना यांचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे. या ग्रंथातील शब्दसंग्रह हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. मराठी भाषेतील मध्ययुगीन काळातील प्रचंड शब्दसंग्रह असणारे हे सर्वच ग्रंथ महत्त्वाचे आहेत. मध्ययुगीन महाराष्ट्रातील सर्वच प्रांतांमध्ये हे जैनकवी लिहिताना दिसतात. या प्रकल्पात पंचपांडवांचे चरित्र लिहिणारे कोल्हापूरचा कवी आहे. हरिलीळाप्रकाश ग्रंथ लिहिणारा कवी कवठेमहांकाळचा आहे. त्याच वेळी मराठवाड्यातील, विदर्भातील आणि उत्तर महाराष्ट्रातील कवीही लिहिताना दिसतात. सबंध महाराष्ट्रभर मध्ययुगीन काळात जैनकवी-लेखक मराठी भाषेत लिहित होते. ते स्वतःला महाराष्ट्री म्हणतात. मराठी भाषेचा अभिमान बाळगणारे हे सर्व कवी आहेत. या प्रकल्पातील सुदर्शन चरित्र हे काव्य लिहिणारे गुणनंदी या कवीने तर मराठी भाषेचा खूपच गौरव केला आहे. मराठीची वर्णव्यवस्था, शब्दरचना आणि व्याकरण यावर तो पानेच्या पाने लिहिताना दिसतो. हे सर्व कवी आपण मराठी भाषेत मुद्दाम लिहितो असे सांगतात. तिला गोड समजतात. किंबहुना महाराष्ट्रीय आणि मराष्ट्री असल्याचा अभिमानही ते वारंवार आपल्या ग्रंथांमध्ये व्यक्त करतात.
जैनकवींच्या मराठी प्रेमावर संशोधनाची गरज
जैनकवींचे हे मराठी प्रेम का आहे याबद्दल नवे संशोधन व्हायला हवे. महानुभाव आणि वारकरी संप्रदायाच्या साहित्यानंतर एकनाथांच्या पूर्व काळात मराठी साहित्याला अंधारयुग असे म्हटले गेले आहे; परंतु नेमके याच काळात मराठीतील अनेक मातब्बर जैनकवी आपल्या रचना करताना दिसतात. एकनाथांच्या समकालीनही हे कवी लिहितात. विशेषतः शिवकाळामध्ये जैन कवींची मोठी गर्दी झालेली दिसते. शिवकाळामध्ये मराठी साहित्य भरभराटीस आले. त्याच वेळेला जैन साहित्यही भरातच होते. याचे अनेक पुरावे महाराष्ट्रात सापडतात. सतराव्या शतकात शेकडो जैन कवी महाराष्ट्रात मराठी भाषेत लिहिताना दिसतात. शिवकाळातील जैन कवींच्या रचनांचा एक स्वतंत्र अभ्यास होईल इतक्या रचना अनेक हस्तलिखितग्रंथांमध्ये विखुरलेल्या आहेत.
स्वतंत्र अभ्यासाचा विषय
भाषा आणि साहित्य या अनुषंगानेही स्वतंत्र अभ्यासाचा हा विषय आहे. त्याच वेळी महाराष्ट्रातील मध्ययुगीन काळातील मराठी भाषा, तिचा शब्दसंग्रह, तिची व्याकरणव्यवस्था, लिपीव्यवस्था यांचाही अभ्यास या ग्रंथांद्वारे होऊ शकतो. या ग्रंथांमध्ये वापरलेली लिपी देवनागरी वळणाची आहे. भाषा तत्कालीन काळात वापरली जाणारी विविध प्रदेशातील प्रादेशिक मराठी आहे. महाराष्ट्रातील अनेक कृषी व्यवस्थेशी संबंधित शब्दसंग्रह यात आहेत. अनेक पारिभाषिक शब्दांचा संग्रह यात आहे. प्राचीन भारतातल्या अनेक लोककथा, लोककाव्ये आणि लोकपरंपरांचा उल्लेखही वारंवार यामध्ये येतो. मध्ययुगीन काळातील समाजरचना, व्यापारव्यवस्था, राज्यशासन, गुन्हेगारी आणि सामाजिक विषमता, जातीव्यवस्था या सर्वांची नोंद या ग्रंथांमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे मध्ययुगीन महाराष्ट्राच्या सामाजिक आणि ऐतिहासिक अभ्यासासाठीही हे ग्रंथ अत्यंत महत्त्वाचे आहेत.
मध्ययुगीन काळात महाराष्ट्रात अनेक धार्मिक आणि सांप्रदायिक परंपरा होत्या. त्या परंपरांमध्ये संघर्ष होता. या संघर्षाचे चित्रणही या ग्रंथांमध्ये आपणास पाहायला मिळते. भाषिकदृष्ट्या एक स्वतंत्र अभ्यासाचे दालन या ग्रंथांद्वारे आपणास उपलब्ध होणार आहे. मराठी साहित्याच्या इतिहासाबरोबर मराठी भाषेचा इतिहासही लिहिताना हे ग्रंथ उपयुक्त ठरणार आहेत. तसेच याकाळात महाराष्ट्राच्या विविध प्रांतात बोलल्या जाणाऱ्या मराठी बोलींचाही हा दस्तऐवज आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
