समाजातील विविध घटनांतून साकारलेला हा कथासंग्रह निश्चितच बालमनावर संस्कार करणारा आहे. आकर्षक मुखपृष्ठ, उत्कृष्ट बांधणी याबरोबर नित्यमान घडामोडीतून घडणाऱ्या प्रसंगांना यथायोग्य शब्दरूप देऊन साकारलेल्या मक्याच्या कणसांचा यथेच्छ मनमुराद घ्याल अशी आशा आहे.
बा. स. जठार, गारगोटी
मोबाईल – 9850393996
इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकातील कठिण समय येता या पाठाद्वारे अख्ख्या महाराष्ट्रभर नावाजलेले लेखक मनोहर भोसले यांचा मक्याची कणसं हा बालकथासंग्रह वाचनात आला. तेरा कथांच्या माध्यमातून बालमनावर सुसंस्कार घडवणाऱ्या या कथासंग्रहातील प्रत्येक कथा नाविन्यपूर्ण आहे. मुले आणि शिक्षक यांच्या नात्यातील कठोरपणा आणि मृदूत्व कथन करणारी आश्चर्यचकीत करणारी कथा दमदार वाक्याने सुरुवात करणारी असली तरी बालसमावेशक प्रसंगाने शेवट करणारी ठरते. मुलांच्या चौकस बुद्धीला खुराक देणारी आणि त्यांच्या वर्तनातून त्यांचे भविष्य घडवायला लावणारी खच्याsssक कथा पालकांच्या विकसित मेंदूला विचार करायला लावणारी निश्चितच ठरते.
सुनिता आणि वनिता कथा तर नैसर्गिकरित्या घडणारं आणि बळजबरीने घडवले जाणारे मुलांचे भवितव्य यातला फरक पालकांसमोर सहजरित्या मांडते. पहिल्या बटनावरच सर्व बटनांचा व्यवस्थितपणा अवलंबून असतो या एकाच वाक्याने शिक्षकांच्या प्रेमळ शिक्षेचं महत्व या कथेनं अधोरेखित केले आहे. शालेय वर्तनात शिक्षा असावी की नसावी या विचारांचा चेंडू पालकांच्याच वैचारिक न्यायालयात टोलवून, त्यांच्या न्यायी बुद्धीला विचार करायला लावून लेखक स्वतः मात्र नामानिराळाच राहतो.
चार भिंतींच्या आतील आणि बाहेरील जगाच्या वास्तवतेची मोहर बालमनावर उमटवणारी दौलूकाकाची मुलाखत ही कथा मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासातील यशस्वी पायरी मोजक्या शब्दात व्यक्त करून लेखकांने बालमनातील छुप्या पैलूंना सहजपणे उलगडून दाखवले आहे. अनावर हुंदक्यांना आवर न घालणारी माफ केलेले अपराध ही कथा बालवयातील अनेक कृत्यांची सत्याअसत्यता मुलांनाच पडताळायला लावणारी आहे. गुरूंचा अनुभव आणि मुलांच्या फाजिल आत्मविश्वासाला ही कथा खतपाणी न घालता वाचकाचे मन हेलावून टाकण्यात यातील लेखकाची शब्दगुंफण यशस्वी ठरते.
मुलांना त्यांच्या भावविश्वात मनसोक्तपणे गुंतू दिल्यास त्यांच्यातील अनेक सुप्त गुण विकसित होतात. तसेच माणसं पेरा माणुसकी उगवेल या विधानाची साक्ष मक्याची कणसं या कथेतून पटते.
कपड्यांच्या जुळलेल्या धाग्यांना एकत्र बांधून ठेवणारी पिको फॉल ही कथा आयुष्यातील मित्रांचे महत्त्व अधोरेखित करते. ध्येय चांगले असेल तर मदतीचे हजारो हात कळत नकळत आपल्या पाठीशी असतात हे सत्य नाकारता येत नाही. प्रतिकुल परिस्थितीतही काहीजणांच्या डोळेझाकपणाचा आधारही फार मोलाचा ठरतो हे ध्येय चांगले असेल तर या कथेतून दिसून येते. क्षणिक सुखाच्या आहारी जाऊन जन्मदात्यांवर आरोप करणारी मुले नंतरच्या काळात आईवडिलांच्या न्यायी बुद्धीच्या अनुभवातून पश्चात्तापाला सामोरी जातात हे सत्यही शब्दबद्ध करण्यात मनुदाचे साहित्यप्रेम सार्थकी ठरते.
समाजातील विविध घटनांतून साकारलेला हा कथासंग्रह निश्चितच बालमनावर संस्कार करणारा आहे. आकर्षक मुखपृष्ठ, उत्कृष्ट बांधणी याबरोबर नित्यमान घडामोडीतून घडणाऱ्या प्रसंगांना यथायोग्य शब्दरूप देऊन साकारलेल्या मक्याच्या कणसांचा यथेच्छ मनमुराद घ्याल अशी आशा व्यक्त करुन मनुदाच्या साहित्य प्रवासास शुभेच्छा देतो.
पुस्तकाचे नाव – मक्याची कणसं
लेखक – मनोहर भोसले
प्रकाशक – हृदय प्रकाशन, कोल्हापूर
एकूण पृष्ठे – 72
किंमत – 125 रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.