सुनील यावलीकर, बाळासाहेब लबडे, हरिश्चंद्र पाटील, धनाजी घोरपडे हे पुरस्कारांचे मानकरी
वर्धा – महाराष्ट्राच्या साहित्यक्षेत्रात नवनव्या उपक्रमांसाठी चर्चेचा विषय असलेल्या मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या सन २०२५ च्या मारोतराव नारायणे राज्यस्तरीय स्मृती पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.
मारोतराव नारायणे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार बाळासाहेब लबडे (गुहागर ) यांच्या ‘चिंबोरेयुद्ध’ या कांदबरीला जाहीर झाला आहे. मारोतराव नारायणे उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार हरिश्चंद्र पाटील (सोलापूर ) यांच्या ‘खरा वारस’ कथासंग्रहाला, उत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार धनाजी घोरपडे (सांगली) यांच्या ‘जामिनावर सुटलेला काळा घोडा’ या कवितासंग्रहाला जाहीर झाला असून उत्कृष्ट वैचारिक साहित्य पुरस्कार सुनील यावलीकर (अमरावती) यांच्या ‘सरतं काही सोडू नये’ या वैचारिक लेखसंग्रहाला जाहीर करण्यात आला आहे.
प्रत्येकी ७,००० रूपये रोख, मानपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारांसाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील साहित्यिकांकडून व प्रकाशकांकडून १६८ ग्रंथ प्राप्त झाले होते. पुरस्कार निवड समितीचे परीक्षक म्हणून चंद्रपूरच्या सरदार पटेल महाविद्यालयाचे माजी मराठी विभागप्रमुख व प्रसिद्ध साहित्यिक डॉ. विद्याधर बन्सोड, भंडारा येथील प्रसिद्ध लेखक व चित्रकार प्रमोदकुमार अणेराव तसेच नागपूर येथील शांती विद्या भवनचे प्राचार्य व समीक्षक डॉ. प्रकाश राठोड यांनी उत्कृष्ट ग्रंथांची पुरस्कारांसाठी निवड केली.
मारोतराव नारायणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी २७ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता स्थानिक सार्वजनिक बजाज वाचनालयाच्या सभागृहात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ८४ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक उत्तम कांबळे व मान्यवर साहित्यिकांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल, असे मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. प्रमोद नारायणे, सचिव हेमलता नारायणे, पुरस्कार संयोजन समिती सदस्य श्रीकांत पेटकर, डॉ. संदीप भेले, किशोर पेटकर व सूर्यकांत पाटील यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.