July 26, 2025
मराठी चित्रपट व संस्कृतीचा प्रचार करणाऱ्या 'नाफा २०२५' महोत्सवाची अमेरिकन संसदेत दखल, सॅन होजे येथे भव्य आयोजन.
Home » अमेरिकन संसदेने घेतली ‘नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म फेस्टिव्ह (नाफा) २०२५ ची दखल
मनोरंजन

अमेरिकन संसदेने घेतली ‘नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म फेस्टिव्ह (नाफा) २०२५ ची दखल

सॅन होजे : नॉर्थ अमेरिकेत मराठी चित्रपटांना लोकप्रियता मिळावी आणि आपल्या समृद्ध मराठी संस्कृतीची महती संपूर्ण अमेरिकेतील लोकांना परिचित व्हावी याहेतून प्रसिद्ध उद्योजक आणि ‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ या चित्रपटांचे निर्माते, सुवर्ण-कमळ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित अभिजीत घोलप यांनी ‘नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोशिएशन’ची (नाफा) स्थापना गेल्यावर्षी केली आहे. मराठी चित्रपट, कला संस्कृतीच्या माध्यमातून दर वर्षी अमेरिकेत मराठी चित्रपटांचा भव्य सोहळा अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सॅन होजे येथे आयोजित करण्यात येतो. या महोत्सवाची दखल अमेरिकेच्या संसदेने घेतली आहे. अमेरिकेतील मराठी खासदार ठाणेदार यांनी अमेरिकन संसदेतील सभागृहात या महोत्सवाची आणि आयोजक अभिजीत घोलप यांची माहिती दिली.

श्री. ठाणेदार संसदेत नाफा महोत्सवाबद्दल म्हणाले, “‘नाफा’ या संस्थेचा उगम मराठी चित्रपटांसाठी झाला आहे. नॉर्थ अमेरिकेत या संस्थेच्या कार्यातून मराठी चित्रपट, कला आणि महाराष्ट्रातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या मराठी संस्कृती, परंपरांचे जतन आणि संवर्धन करण्याचे महान काम होत आहे. ‘नाफा’च्या माध्यमातून अभिजित घोलप ‘महाराष्ट्र’ आणि ‘नॉर्थ अमेरिके’साठी सांस्कृतिक दुवा ठरत आहेत, ‘नाफा’साठी या मराठी खासदाराकडून खूप खूप शुभेच्छा.”

हॉलिवूडच्या धर्तीवर मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक वैभव मिळवून देण्यासाठी अभिजित घोलप यांच्या दूरदर्शी संकल्पनेतून उदयास आलेल्या ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’ अर्थात ‘नाफा’द्वारे मराठी चित्रपटांना अमेरिका-कॅनडामध्ये भव्य कॅनव्हास प्राप्त झाला आहे. हॉलिवूडच्या बेव्हर्ली हिल्सपासून अवघ्या काही मैलांवर असलेल्या ‘सॅन होजे’ येथे ‘नाफा’चा यावर्षी तीन दिवसांचा अनोखा दैदिप्यमान सोहळा संपन्न होणार आहे. मराठी तारे-तारकांसोबत हॉलिवूडमधील दिग्गजांचीही उपस्थिती या महोत्सवात असणार आहे. ‘स्नोफ्लॉवर’, ‘ संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’, ‘छबीला’ प्रेमाची गोष्ट २ आणि ‘रावसाहेब’ या चित्रपटांचे नाफा महोत्सवात वर्ल्ड प्रीमियर होणार आहेत.

“नाफा फिल्म फेस्टिवल २०२५” च्या निमित्ताने येथील मराठी खासदार ठाणेदार यांनी आमचे कार्य अमेरिकन संसदेच्या मार्फत प्रकाशमान केले आहे. आम्ही त्यांचे विशेष आभारी असून, त्यामुळे आमचा हुरूप अधिक वाढला आहे. कॅलिफोर्निया राज्यातील सॅन होजेचे महापौर मॅट महन, महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, अमेरिकेतील मराठी खासदार ठाणेदार आणि महाराष्ट्रातून या सोहळ्यासाठी खास येणाऱ्या सर्व कलावंतांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा विशेष ठरेल.” असे नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजित घोलप म्हणाले.

‘नाफा’मध्ये यावर्षी २५ ते २७ जुलै रोजी सॅन होजे येथील ‘द कॅलिफोर्निया थिएटर’मध्ये या भव्य मराठी चित्रपट महोत्सवाची सुरुवात होईल. २५ जुलैला ‘फिल्म अ‍ॅवॉर्ड्स नाईट’ रंगणार असून २६ व २७ जुलैला महोत्सवासाठी निवडलेल्या पाच मराठी चित्रपटांचे ‘वर्ल्ड प्रीमियर शोज’, त्यासोबत १६ शॉर्ट फिल्म्सचे प्रीमियर, ‘स्टुडंट्स सेक्शन’, ‘मास्टर क्लासेस’, ‘मीट अ‍ॅण्ड ग्रीट’, ‘लाईव्ह परफॉर्मन्सेस’ आणि बरंच काही या महोत्सवात असणार आहे.

अभिनेते डॉ. मोहन आगाशे, अमोल पालेकर, सचिन खेडेकर, महेश कोठारे, अश्विनी भावे, संध्या गोखले, सोनाली कुलकर्णी, गजेंद्र अहिरे, स्वप्नील जोशी, अवधूत गुप्ते, आदिनाथ कोठारे, वैदेही परशुरामी आणि मधुर भांडारकर या प्रमुख सेलिब्रिटींची उपस्थिती असणार आहे. ‘नाफा’ महोत्सवासाठी अमेरिकेतील ‘बीएमएम’च्या ५७ महाराष्ट्र मंडळांचे सहकार्य लाभले आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading