भाषा सुधारणा चळवळ
शिवराय आणि मावळ्यांनी ज्या सफाईने तलवार चालविली त्याबरोबरच त्यांनी भाषेचा विकास घडवून आणला. त्यांच्यामुळे मराठी भाषेचे नवे युग सुरू झाले. मराठी भाषेच्या जीवनात परिवर्तन झाले. शिवरायांनी पत्रव्यवहार केला. त्या पत्रव्यवहारांमधूनदेखील भाषेचा विकास झालेला दिसतो. पत्रव्यवहारामधून भावना विचार आणि लेखकाचे व्यक्तिमत्त्व व्यक्त झाले आहे. तसेच त्या भाषेचे स्वरूप आणि व्याप्तीदेखील स्पष्ट झाली आहे.
प्रकाश पवार
शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे भाषाविषयक कार्य नोंदवता येईल. कारण, सतराव्या शतकात भाषा सुधारणा चळवळ उदयास आली होती. संत नामदेव, संत एकनाथ, शहाजी महाराज, संत तुकाराम, जिजाऊ, शिवराय, संभाजी महाराज, बहिर्जी नाईक, रघुनाथपंत हनुमंते, ढुंढिराज व्यास अशी अनेक व्यक्तिमत्त्वे भाषा सुधारणा चळवळीला गती देत होती. भक्ती चळवळ आणि स्वराज्य चळवळ या दोन चळवळींचा आधार घेऊन भाषा सुधारणा चळवळ विकसित झाली होती. भाषा स्वराज्याची संकल्पना भक्ती चळवळीने आणि राजकीय चळवळीने गंभीरपणे घेतली होती.
राजकीयदृष्ट्या शिवरायांनी भाषा सुधारणा चळवळीत धोरणकर्ते म्हणून सहभाग घेतला. त्यांनी राजकीय क्षेत्रात भाषा सुधारणा चळवळीचे नेतृत्व केले. त्यांनी भाषा, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्राला विशेष महत्त्व दिले होते. शिवरायांच्या घराण्यामध्ये भाषा या घटकाला महत्त्व देण्याची परंपरा जुनी होती. शिवरायांचे वडील शहाजी महाराज यांनी देखील भाषेच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले होते (राजवाडे वि. का., १९२२ : १२-३३). जिजाऊ यांनी देखील भाषा घटकाला महत्त्व दिले होते (पवार प्रकाश, २०२३ : ७३-८६ ). त्यांच्या कार्याचे वर्णन सार्वजनिकदृष्ट्या भाषेचे प्रमाणिकरण करणे असे करता येईल. थोडक्यात, शिवरायांच्या घरीदारी भाषा संस्करण आणि भाषा सुधारक ही परंपरा होती. तो वारसा शिवरायांनी पुढे विकसित केला. म्हणजेच शिवरांयानी संकरोती या क्रियेचा चांगले करणे असा अर्थ घेतला. भाषेतील दोष काढून टाकले. भाषेतील गुणांचा विकास केला. याबरोबरच त्यांनी मराठमोळी भाषा तिच्या साधेपणासह व्यवहारात वापरली.
मराठमोळी भाषा
शिवरायांच्या साध्या भाषेबद्दलचे एक निरीक्षण शेजवळकर यांनी नोंदविले आहे. त्यांनी हे निरीक्षण विस्ताराने लिहिले आहे (शेजवळकर, १९६४ : ६६ ). शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाचे हे खास वैशिष्ट्य होते. साधी भाषा (लाभदायक व सत्यशील) हीच शिवरायांची ताकद झाली होती. या संदर्भातील काही निवडक उदाहरणे शेजवळकरांनी नोंदविलेले महत्त्वाचे आहेत.
- शिवरायांची भाषा साधी आणि सरळ स्वरूपाची होती. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधील, सातपुड्याच्या डोंगर रांगांमधील, कोकणातील किनारपट्टीवरील, सपाट प्रदेशातील भाषा शिवरायांनी आत्मसात केलेली होती. हीच भाषा मावळ्यांचीदेखील होती. शिवरायांची दौड शंभर मैलांपासून आठशे मैलांपर्यंत होत होती. दर मैलाला भाषा बदलते. त्यामुळे त्यांचे भाषा शैलीचे कौशल्य सरळ आणि साध्या भाषेपासून विविध अंगाने विकसित होत गेले.
- शिवरायांची शब्दरचना रोखठोक स्वरूपाची होती. स्पष्ट अर्थाची आणि अगदी जशीच्या तशीच समजण्याची होती. त्या भाषाशैलीवर त्यांची जरब अवलंबून असे. निरर्थक स्तुती शिवराय करत नव्हते. परंतु, शिवरायांनी प्रवासाच्या दरम्यान त्या त्या प्रदेशातील भाषेची कौशल्ये आणि हेतू समजून घेतले होते.
- शिवरायांची भाषा दिल्ली दरबाराला पसंत नव्हती. दिल्ली दरबाराची बोलण्याची भाषा एक आणि प्रत्यक्ष कृतीची भाषा दुसरी अशी दोन कंगोऱ्यांची भाषा होती. त्यामुळे बोलण्याची भाषा स्तुतिदर्शक स्वरूपाची होती. अशी स्तुतिदर्शक भाषा शिवरायांनी सर्रासपणे कधी वापरली नाही. शिवरायांचा दिल्लीच्या दरबारातील संवाद देखील सरळ आणि साध्या भाषेत झाला. त्या भाषेत रोखठोकपणा होता.
- शिवरायांची बोलण्याची आणि कृतीची भाषा एकच होती. त्यामुळे शिवरायांची शब्दरचना, रोखठोकपणा दिल्ली दरबाराच्या नावडीचा विषय होता. त्यामुळे मावळ्यांची भाषा दिल्ली दरबारतील लोकांना नैसर्गिक वाटत होती.
- फारसी आणि उर्दू या दोन भाषांनी स्तुतिदर्शक शब्दरचना विकसित केली होती. शिवरायांनी आणि मावळ्यांनी स्तुतिदर्शक शब्दरचना मराठीत खूप काळजीपूर्वक विकसित केली नव्हती. मावळ्यांची भाषा स्तुतिदर्शक नसल्यामुळे दिल्ली दरबाराला ती भाषा अप्रगत वाटत होती. तर दिल्ली दरबाराची भाषा सुसंस्कृत त्यांना वाटत होती.
- शिवरायांना दिल्ली दरबाराची भाषा द्विअर्थीक वाटत होती. दिल्ली दरबाराची भाषा स्वसंरक्षणाला जास्त महत्त्व देत होती. या गोष्टी शिवरायांच्या नजरेतून सुटल्या नाहीत. शिवरायांना भाषेचे महत्त्व या अर्थानेदेखील लक्षात आले होते.
- श्रीपाद अमृत डांगे यांनी शिवरायांची भाषा लोकांची भाषा होती, असे मत नोंदविले आहे. लोकांच्या जीवनातील भाषा शिवरायांनी स्वीकारली होती. त्यांनी लोकांच्या जीवनातील भाषेला पाठिंबा दिला होता (डांगे, १९७६ : १११).
- शिवरायांची भाषा ही राजकीय असंतोषाची भाषा होती. परकीय राजकीय वर्चस्वाच्या विरोधातील असंतोष शिवरायांच्या भाषेतून व्यक्त झाला. शिवरायांचे सांगाती आणि लोकदेखील राजकीय असंतोषाची भाषा बोलत होते. उदाहरणार्थ, वतनावर पाणी सोडले. ही त्यागाची भाषा आहे. त्याबरोबरच ही भाषा राजकीय असंतोषाची भाषा आहे. शिवराय आणि मावळ्यांनी ज्या सफाईने तलवार चालविली त्याबरोबरच त्यांनी भाषेचा विकास घडवून आणला. त्यांच्यामुळे मराठी भाषेचे नवे युग सुरू झाले. मराठी भाषेच्या जीवनात परिवर्तन झाले (पोवार, १९७८ : २) जेधे करीना ‘ त्याच काळात लिहिली गेली. शिवरायांनी पत्रव्यवहार केला. त्या पत्रव्यवहारांमधूनदेखील भाषेचा विकास झालेला दिसतो. पत्रव्यवहारामधून भावना विचार आणि लेखकाचे व्यक्तिमत्त्व व्यक्त झाले आहे. तसेच त्या भाषेचे स्वरूप आणि व्याप्तीदेखील स्पष्ट झाले आहे. उदाहरणार्थ, घर व अळंगा सजवज नको पावसाने अजार न पावे. किंवा भाजीच्या एका देठास तेहि मन नको इत्यादी. ही भाषा रयतेच्या कल्याणाची म्हणून त्यांनी विकसित केली.
- शिवरायांनी हेर खात्याच्यामार्फत सांकेतिक भाषेचा विकास घडवून आणला. सांकेतिक भाषा हा स्वराज्याच्या माहितीचा मुख्य स्रोत होता. शिवराय व त्यांच्या गुप्तहेर खात्याने ध्वनिशास्त्र विकसित केले होते. त्यामुळे सांकेतिक भाषा ही राजकारण घडवणारी आणि स्वराज्याच्या ध्येयाची परिपूर्ती करणारी भाषा होती.
भाषा तज्ज्ञ
शिवरायांच्या काळातील ‘राज्यव्यवहार कोशा’ची प्रत त्रिंबकराव बापूजी मायदेव नागावकर यांच्या पुस्तक संग्रहात (मुंबई) मिळाली. काशिनाथ गंगाधरजी यांनी ही प्रत छापून प्रसिद्ध केली होती. याबरोबरच इतर दोन प्रतींचा आधार घेऊन सुधारित कोशाची आवृत्ती १८८० मध्ये प्रकाशित केली होती. पुणे, विटा व कोल्हापूर या ठिकाणी या कोशाची प्रत्येकी एक एक प्रत उपलब्ध झाली होती. कोल्हापूरची कोशाची प्रत फार जुनी व चांगली होती. त्या प्रतीचे वैशिष्ट्य म्हणजे या प्रतीत कोशाची सुरुवात करण्यापूर्वी ८४ संस्कृत श्लोकांचा उपोद्घात आणि कोशाच्या शेवटी पाच श्लोकांचा उपसंहार लिहिलेला होता (साने, १९२५ : १७७). शिवरायांनी भाषेच्या क्षेत्रातील तज्ज्ञांना राजाश्रय दिला होता. शिवरायांनी भाषिक तज्ज्ञांना राजाश्रय देऊन राज्यसंस्थेची ताकद भाषेच्या पाठीमागे उभा केली होती. या संदर्भातील महत्त्वाची उदाहरणे इतिहासात नोंदविली गेली आहेत (काटे रा. गो. १९५६ : १२, साने, १९२५: १७६ – १७७).
१) राज्यव्यवहार कोशात भाषेच्या क्षेत्रातील तज्ज्ञांना राजाश्रय दिलेली उदाहरणे नोंदविली गेली आहेत. हा एक महत्त्वाचा पुरावा त्यांनी भाषा तज्ज्ञांना महत्त्व दिले या संदर्भातील आहे.
२) शिवराय आणि रघुनाथपंत हनुमते यांचे संबंध सलोख्याचे होते. शिवरायांच्या संपर्कात रघुनाथपंत हनुमंते १६७६ – १६७७ मध्ये आले. विशेषतः रघुनाथपंत हनुमंते हे अमात्य होते. याबरोबरच हनुमंते हे भाषेच्या क्षेत्रातील तज्ज्ञ होते. १६७७ नंतर दक्षिण विजयाच्या धामधुमीत रघुनाथपंत गुंतलेले होते. रघुनाथपंत हनुमंते राजकारण धुरंधर असूनही ते भाषेच्या क्षेत्रातील तज्ज्ञ होते.
३) ढुंढिराज व्यास हे भाषेच्या क्षेत्रातील विद्वान होते. रघुनाथपंत हनुमंते यांना राजकीय क्षेत्रातील उलाढालीमुळे वेळ उपलब्ध नव्हता. या कारणामुळे ‘राजव्यवहार कोशा’चे कामकाज ढुंढिराज व्यास यांच्याकडे सोपविण्यात आले. त्यांनी ‘राजव्यवहार कोश’ लिहिला (साने, १९२५ : १७६).
४) ढुंढिराज व्यास हे लक्ष्मण व्यास यांचे चिरंजीव होते. ढुंढिराज व्यास भाषेच्या क्षेत्रातील तज्ज्ञ होते. म्हणजेच शिवरायांनी भाषा या घटकाचे महत्त्व समजून घेतले आणि त्यांनी भाषेच्या क्षेत्रातील तज्ज्ञांना राजाश्रय दिला. या घडामोडींमुळे असे दिसते की शिवरायांना भाषाविषयक दृष्टी होती.
५) शिवरायांना भाषा या घटकाचा विकास करणारी ऐतिहासिक परंपरादेखील माहीत होती. कारण, भाषा या घटकाचा विकास संत ज्ञानेश्वरांपासून होत आला होता. शिवरायांच्या काळातील संत तुकाराम महाराजांनी मराठी भाषेला विकसित केले. ही परंपरा भक्ती चळवळीतून विकसित झालेली होती. याचे भान शिवरायांना होते.
६) शिवरायांनी मराठी भाषेच्या प्रमाणीकरण व विकासाची परंपरा राजकीय क्षेत्रामधून विकसित केली होती. या कोशात फारशी व अरबी शब्दांना पर्याय दिले आहेत. तथापि, काही देशी व हिंदी शब्दही या कोशात गुंफलेले आढळतील (साने, १९२५ : १७६). मथितार्थ, देशी भाषा, हिंदी भाषेतील शब्दांमधून कोशात नवीन शब्द निवडलेले दिसतात. शब्दांच्या देवाणघेवाणीला पुरेसा पैस ठेवलेला दिसतो. इतर भाषेतील शब्दांमधून शब्द घेऊन भाषेचा विकास होतो हे सूत्र या कोशामध्येदेखील स्पष्टपणे दिसते.
७) त्यांच्या काळात वसाहतवाद सुरू झाला होता. वसाहतवाद ही केवळ राजकीय व्यवस्था नव्हती. ती ज्ञानरचनावादी प्रणालीदेखील होती. हे समजून घेऊन मराठी भाषेची चळवळ त्यांनी स्वराज्य चळवळीच्या बरोबर विकसित केली. या त्यांच्या भूमिकेमुळे मराठी भाषिक चळवळीतून ज्ञानरचना सुरू झाली. मराठी भाषेच्या विकासाची एक पदरी परंपरा बहुपदरी करण्याचे कार्य आरंभी शहाजी महाराजांनी केले. त्या परंपरेचा विकास शिवरायांनी केला. म्हणजेच शिवरायांनी भाषिक स्वराज्याची चळवळ ज्ञानव्यवहार म्हणून विकसित केली होती. भाषेच्या क्षेत्रातील तज्ज्ञांना त्यांनी ज्ञाननिर्मितीसाठी पाठिंबा दिला. वेळप्रसंगी मदत केली. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.
भाषिक स्वराज्याची चळवळ
शिवरायांनी भाषिक स्वराज्याची चळवळ विकसित केली होती. शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये हा एक महत्त्वाचा घटक आहे. शिवरायांनी भाषिक स्वराज्याची चळवळ विकसित केली होती या संदर्भातील महत्त्वाची उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
१. शिवरायांच्या जन्माच्या वेळी फारशी शब्द ऐंशी टक्के वापरात होते (१६३०). असे मत ईटन रिचर्ड एम. यांनी नोंदविले आहे (२००५). विशेष म्हणजे अहमदनगर सुल्तनत आणि विजापूरच्या आदिलशहाने प्रशासन आणि रेकॉर्ड ठेवण्यासाठी मराठीचा वापर चालू ठेवला होता. यामुळे केवळ वीस टक्के मराठी शब्द सतराव्या शतकाच्या सुरुवातीला आढळतात. बाराव्या व तेराव्या शतकाच्या तुलनेत ही मराठी भाषेची मोठी घसरण बदललेल्या सत्ता संबंधांमुळे झाली होती. शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. यामुळे पुन्हा भाषा आणि सत्ता यांच्यातील सत्ता संबंधात बदल झाला. त्यानंतर शिवरायांचा मराठी भाषेला पाठिंबा मिळत गेला. यामुळे १६३० च्या तुलनेत १६७७ मध्ये मराठी भाषिक शब्दांच्या संदर्भात क्रांती घडवून आली होती. हा मराठी भाषिक स्वराज्याचा टप्पा होता. हा मुद्दा आकडेवारीच्या संदर्भात स्पष्ट झालेला आहे. १६७७ मध्ये फारशी शब्द वापरण्याचे प्रमाण ऐंशी टक्क्यांवरून घसरून सदोतीस टक्क्यांपर्यंत खाली आले. असे मत ईटन रिचर्ड एम. यांनी नोंदविले आहे (२००५).
२. थोडक्यात स्वभाषेवर परभाषेचे आक्रमण झाले होते. त्यामुळे तिची दैन्यावस्था झाली होती (अत्यर्थ यवनवचनै लुप्तसरणिम्). हे शिवाजी महाराजाच्या निदर्शनास आले, म्हणून त्यांनी स्वभाषेच्या संरक्षणासाठी ‘राज्य व्यवहार’ नावाचा कोश तयार करून घेतला. विशेषतः त्यांनी ‘राज्यव्यवहार कोश’ लिहून घेतला होता ( माढेकर, १९५६ : १३).
३. राज्य व्यवहारातील जुने गीर्वाण भाषेतील शब्द लुप्त होऊन त्याच्या जागी अरबी व फारशी शब्द राज्य व्यवहारात प्रचलित झाले. त्यांचे निष्कासन होऊन पूर्वीचे गीर्वाण शब्द पुन्हा व्यवहारात यावे असा हा कोश रचनाचा हेतू होता. ही ढुंढिराज व्यास यांची भूमिका होती (साने, १९२५ : १७६).
४. शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भाषाविषयक ज्ञान त्यांनी हस्तलिखित स्वरूपात जतन केले होते. कारण, एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी ‘राज्यव्यवहार कोशा’ची हस्तलिखित प्रत उपलब्ध झाली होती (१८०३). त्या प्रतीवर आधारित एकोणिसाव्या शतकात दोन वेळा ‘राज्यव्यवहार कोशा’ची छपाई करण्यात आली. १८८० मध्ये पुण्याच्या शिवाजी छापखान्यात या कोशाची छपाई झाली होती. ‘शिवचरित्र प्रदीप’ या ग्रंथामध्ये या कोशाचा समावेश करण्यात आला होता. भारत इतिहास संशोधक मंडळाने ‘राज्यव्यवहार कोश’ प्रकाशित केला होता. यामुळे एकोणिसाव्या शतकामध्ये शिवरायांचे भाषाविषयक कार्य हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे हे अधोरेखित झाले होते.
५. ‘राज्यव्यवहार कोश’ हा कोश दुर्मीळ झाला. त्यामुळे मराठवाडा साहित्य परिषदेने पुन्हा विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात हा कोश छापून घेतला (१९५६). तेव्हा स्थानिक भाषांना महत्त्वाचे स्थान मिळाल्यामुळे परिभाषेला व पारिभाषिक शब्दकोशांना एक आगळेवेगळे महत्त्व प्राप्त झाले होते. हा मुद्दा रा. ब. माढेकर यांनी नोंदविला होता. म्हणजेच संयुक्त महाराष्ट्रासाठीची चळवळ सुरू असताना ‘राज्यव्यवहार कोश’ मराठी भाषिक लोकांना उपलब्ध झाला होता. त्यांना शिवरायांनी मराठी भाषेसाठी केलेले कार्य माहीत झाले होते. थोडक्यात, शिवरायांनी स्वराज्याबरोबर मराठी भाषिक चळवळ सुरू केली. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात शिवरायांनी सुरू केलेल्या मराठी भाषिक चळवळीचा विकास झाला होता. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातील विचक्षण अभ्यासकांवरती शिवरायांच्या मराठी भाषिक स्वराज्य चळवळीचा प्रभाव पडला होता.
राजव्यवहार कोशाचे स्वरूप
‘राज्यव्यवहार कोशा’त प्रचलित राजकारण आणि व्यवहार यांना उपयोगी पडण्यासारख्या दीड हजार संस्कृत शब्दांचा हा संग्रह आहे. या कोशात अनुष्टुभ वृत्ताचे ३८४ श्लोक असून प्रत्येक श्लोकांत चार चार शब्द रचिले आहेत. शब्द सत्वर सांपडण्याच्या सोयीसाठी खालीलप्रमाणे दहा वर्ग कल्पिले आहेत (काटे रा. गो. १९५६ : २). विशेषतः संस्कृत ज्ञानाचा विकास त्यांनी केला. अठराव्या शतकात संस्कृत ज्ञानाला आहोटी लागली. शेन्डन पो लॉक व सुदीप्त कवीराज यांनी अठराव्या शतकातील संस्कृत ज्ञानाच्या ऱ्हासाचा मुद्दा नोंदविला आहे. (सुदीप्त कवीराज : २००५ : ११९- १४२; पो लॉक : २००४ ३९२-४२६). यावरून देखील शिवरायांच्या काळातील संस्कृत ज्ञानाचे महत्त्व लक्षात येते.
वर्ग श्लोक संख्या
१ राजवर्ग. ३३
२ कार्यस्थानवर्ग. ४६
३ भोग्यवर्ग. ३४
४ शस्त्रवर्ग. २०
५ चतुरंगवर्ग. ४३
६ सामन्तवर्ग. १३
७ दुर्गवर्ग. २६
८ लेखनवर्ग. १११
९. जनपदवर्ग. ४०
१० पण्यवर्ग.१८
एकूण – ३८४
१) लेखन वर्गात एकूण लोकांच्या संख्येच्या चतुर्थांशाहून अधिक शब्द आहेत. दंड, व्यवहार, माल, हिशेब आदि निरनिराळ्या शाखांसाठी या वर्गातून शब्दयोजना केलेली दिसते. सरकारी दप्तरी कामासाठी याच वर्गांतील शब्द अधिक उपयोगांत येण्याजोगे आहेत ( काटे रा. गो. १९५६ : २).
२) राजवर्गात प्रशासकीय क्षेत्रातील शब्द सुचविलेले होते. तत्कालीन राजदरबारांत वावरणारे भालदार- चोपदारापासून अमात्य, सचिव, पेशवे इत्यादी वरच्या वर्गातील अधिकाऱ्यांकरिता दिलेली नावे दिसून येतात ( काटे रा. गो. १९५६ : ३).
३) कार्यस्थानवर्गांत सोनाराकडून घडल्या जाणाऱ्या सोन्या-चांदीच्या निरनिराळ्या दागिन्यांची नावे तसेच शिंप्याकडून शिवले जाणारे कपडे याकरिता शब्द दिले होते (काटे रा. गो. १९५६ : ३).
४) भोग्यवर्गांत खाद्यपेयांच्या निरनिराळ्या पदार्थांची नावे असून सुगंधी द्रव्ये, चंपा, चमेली इत्यादी तेले अर्गजा, अबीर, केशर, कस्तुरी यांचेकरिता शब्दयोजना केलेली होती. विशेषतः सांगावयाचे म्हणजे आजकालच्या सर्वमान्य पेयांकरिता (कॉफी, चहा इत्यादिकांकरितां ) ‘विश्राम कषाय’ हा सार्थ शब्द दिला होता, अशी पेये घेण्याची ठिकाणे (ज्यांत पानकादि रसस्थान, सुधास्थान शरबतखाना असे म्हटले आहे) त्या काळी अस्तित्वात होती असे दिसून येते (काटे रा. गो. १९५६ : ३).
५) शस्त्र, चतुरंग, सामंत आणि दुर्गवर्ग या चारही वर्गांचा तत्कालीन युद्धखात्याशी संबंध होता. त्या वेळी उपयोगांत येणाऱ्या शस्त्रास्त्रांची नावे, चतुरंग सैन्य, त्यास युद्धांत उपयोगी पडणारी सामग्री, सैन्यांतील निरनिराळे लहान मोठे अधिकारी यांची नावे अनुक्रमे शस्त्र, चतुरंग, सामन्तवर्गात दिसून येतात ( काटे रा. गो. १९५६ : ३).
६) दुर्ग – वर्गांत किल्ल्यांच्या अंगोपांगांची नावे असून त्यांच्या बांधणीस लागणारी सामग्री, बांधकामास लागणारे शिल्पकार, मजूर, तसेच किल्ल्यांचे संरक्षण करणारे लहान मोठे अधिकारी यांच्याकरिता दिलेल्या नावांची शब्दरचना दिसून येते. जनपद-वर्गांत, नगरसमितीकरिता उपयुक्त अशी शब्दयोजना असून काही शब्द ‘तहसील कचेरीतील कामासंबंधी दिसून येतील (काटे रा. गो. १९५६ : ४).
७) पण्यवर्गात धंदेवाल्यांची सुमारें बहात्तर नावे आहेत. याप्रमाणे ह्या कोशाची रूपरेषा आहे (काटे रा. गो. १९५६ : ४ ).
या ‘राजव्यवहार कोशात फारसी शब्दांकरिता योजलेले संस्कृत प्रतिशद्व शक्य तितके लहान दिलेले आहेत. म्हणजे दोन-तीन, अधिकांत अधिक चार अक्षरी शब्द दिले. हे शब्द उच्चारास सुलभ आहेत. सत्वर जिव्हाग्रावर रुळण्यासारखे आहेत. तीनशे वर्षांपूर्वी योजलेले हे शब्द सांप्रतच्या प्रतिष्ठित मराठी भाषेलाच काय इतर प्रादेशिक भाषांनाही उपयोगी पडणारे आहेत.
प्राकृत व संस्कृत भाषांमधील देवाण-घेवाण
शिवरायांनी प्राकृत, संस्कृत आणि इतर या भाषांचा समन्वय घडवून आणला होता. या सर्व भाषांना त्यांनी ज्ञानोपासनेची भाषा म्हणून स्थन दिले. या संदर्भातील काही महत्त्वाची उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
- संस्कृत भाषा प्राकृतपासून तयार झाली. ती हळूहळू तयार झाली ( केतकर, १९३५ : ४३०). राज्य व्यवहार कशावरून देखील हे सूत्र विकसित झालेले दिसते. प्राकृतपासून संस्कृतचा विकास शिवकाळात घडत गेला.
- शिवरायांची भाषा व त्यांच्या काळातील लोकांचे भाषा प्राकृत होती. राज्यव्यवहारात शब्दांचे व भाषेचे प्रामाणिककरण करण्यासाठी संस्कृत शब्द देण्यात आले. दुसऱ्या शब्दांत एकल भाषेच्या अधिपत्याला आव्हान दिलेले आहे. अरबी प्रवाशांनी लिहून ठेवलेले आहे की हिंदुस्तानच्या इतिहासाच्या मध्ययुगीन काळात हिंदुस्थानच्या निरनिराळ्या प्रदेशातून निरनिराळ्या बऱ्याच भाषा प्रचलित होत्या. महाराष्ट्री, शौरसेनी, मागधी व पैशाची या भाषा प्रचलित होत्या. या भाषांपासून मराठी, हिंदी इत्यादी भाषा तयार झाल्या आहेत (वैद्य, १९२३ : २७१). यानंतर संस्कृत भाषेच्या पुनरुज्जीवनाचा कालखंड सुरू झाला. यामुळे लोकांच्या व्यवहारातील भाषेवर परिणाम झाला. लोक मात्र प्राकृत भाषेचा वापर करत (वैद्य, १९२३ : २७३ – ७५ ). शिवरायांनी राज्य व्यवहार कोषामध्ये भाषेचे प्रमाणीकरण केले परंतु त्याबरोबरच त्यांनी लोकभाषादेखील स्वीकारली होती.
- स्वराज्याचा उद्देश सुस्पष्ट व्यक्त होण्यासाठी फारसी शब्द टाकून त्याच्या ऐवजी संस्कृत व महाराष्ट्री शब्दांचा उपयोग करण्याचा परिपाठ घातला ( जोशी, १९६७ : १७१). तरीही राज्यभिषेकानंतरच्या पत्रांपैकी निम्मी पत्रे राज्यभिषेक शक नसलेली पत्रे आहेत. त्यात फारशी शब्दांचे प्रमाण बरेच असावे यात आश्चर्य नाही. कारण, फारशी भाषा बाजारहाटाकडे वळली व सर्वसामान्य जनतेच्याही मराठीवर ती परिणाम करत होती. यामुळे शिवरायांना फारसी शब्द पूर्णपणे वर्ज्य करून चालण्यासारखे नव्हते. मुख्य मुद्दा म्हणजे मुसलमानी राजवटीपेक्षा शिवरायांच्या राजवटीत फारसीचे वर्चस्व कमी झाले. फारसी शब्दांचे प्रमाण कमी झाले. ही त्यांची फार मोठी कामगिरी होती (पवार, १९७८ : ४०-४१). सतराव्या शतकात संस्कृत ज्ञानाचा विकास शिवरायांच्या नंतर अठराव्या शतकात संस्कृत झाला. ज्ञानाचा अंत झाला.
- अज्ञानदास यांना लिहिलेला पोवाडा लोकभाषेतील आहे. तसेच तानाजी मालुसरे यांच्यावर लिहिलेला पोवाडादेखील लोकभाषेतील आहे.
- शिवरायांच्या कार्य आणि कर्तृत्वामुळे लोकभाषेत नवीन प्रकारच्या म्हणी आणि वाक्यप्रचार रूढ झाले. उदाहरणार्थ, होता जीवा म्हणून वाचला शिवा इत्यादी.
- शिवरायांनी प्रादेशिक पातळीवरील बोलीभाषांनादेखील आत्मसात केले होते. मावळची भाषा, दख्खनची भाषा, कोळी भाषा, कोकणी भाषा, कोल्हापुरी – पन्हाळा भाषा, गोमांतक भाषा, इत्यादी भाषांमधील शब्द आणि रूढी-परंपरा त्यांनी स्वीकारल्या होत्या.
- शिवरायांचा प्राकृत भाषा, दख्खनी भाषा, स्थानिक भाषा हिंदी भाषा, संस्कृत भाषा इत्यादी भाषांच्या बरोबर पोर्तुगीज भाषा व इंग्रजी भाषांबरोबरदेखील संपर्क आला होता. त्यांनी पोर्तुगीज भाषा आणि इंग्रजी भाषांमध्ये संवादाची शैली विकसित केली होती. शिवरायांच्या पुढे भाषा हा अडथळा कधीच आला नाही. त्यांनी भाषेवर मात केली. त्यांचे व्यक्तिमत्त्व स्थानिक भाषांपासून त्या काळातील जागतिक भाषांपर्यंत विकसित होत गेले. संभाजीराजे यांना स्थानिक भाषांपासून ते पोर्तुगीज इंग्रजांच्या भाषांपर्यंतचे ज्ञान होते. शिवरायांनी पोर्तुगीज आणि इंग्रज यांच्याबरोबरच्या वाटाघाटींचा अधिकार संभाजी महाराजांना दिला होता. त्यामुळे त्यांना हे भाषेचे ज्ञान व्यापक पातळीवरील होते. या दोन्ही भाषांची ज्ञानरचना व राजकारण शिवराय व महाराज यांना अवगत होते.
शब्दांचा विकास
शिवरायांचे लक्ष ऐतदेशीय संस्कृतीचे यावनी संस्कृतीपासून रक्षण व्हावे हे होते (आपटे-ओतूरकर, १९६३ : २८). शिवरायांच्या पत्रव्यवहारामधून समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दांचा विकास घडून आला होता. समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दात भिन्न अर्थछटा व्यक्त झाल्या होत्या. तसेच त्यांच्या पत्रव्यवहारांमध्ये अनेकार्थी शब्दही वापरण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, राजकारण हा शब्द राज्यकारभार, राजकीय हालचाल, चातुर्य अशा एकापेक्षा अधिक अर्थाने वापरला आहे (पवार, १९७८ : ९८ ) . थोडक्यात, भाषेसंबंधीच्या नव्या कल्पनांची सुरुवात झाली होती. भाषा ही वसाहतवादाचे साधन आहे, याचे आत्मभान त्यांना आले होते.
समानार्थी शब्दांची यादी
शिवरायांच्या पत्रव्यवहारातील समानार्थी व विरुद्धार्थी शब्दांचे मोजमाप सुधाकर पवार यांनी केले होते ( पवार, १९७८ : ९८-९९). त्या शब्दांची यादी पुढीलप्रमाणे आहे.
१. पत्र, कागद, पत्रिका, रोखा, किताबती, बखेर
२. भांडण, गरगसा, कथला, कलागती, कल्हावती, करकर, कचाट, कलह-वाद, दावा, घसघस
३. विदितः मालूम: श्रुत: गोशगुंजार
४. गलबला, धामधुम
५.तसदी: जलल: बदसलूख उपद्रव तसवीस उपस्वर्ग, तोशिस
६. खलेल, अडथळा, दखल
७. हुकूमः आज्ञा: बंदी: कलम,
८. गोमटे, भले, बरे
९. अवलाद, अफलादः लेकराचे लेकरी: वंशपरंपरा: पुत्रपौत्री, संतती लेकरेबाळे
१० तकसीम वाटणी
११. हेजीब: हशम: चाकर: नफर: सिपाही, प्यादे, माणूस
१२. ठराव, निर्णय, तह, मुनसफी निवाडा तहकीकःमोईन:
१३. तकिर ( तक्रिर), कैफियत, फिर्याद, हकिकत, खबर
१४. हुजूर : साहेब: खासा स्वारी: राजे,
१५. सदरहू, दबाब, याजबद्दल, दरींवले.
१६. रयेत विलायत: जमेत ( जमाव ) प्रजा: लोक.
:
१७. तसरूफाती, दस्त हक, यख्तियार, अधिकार.
१८. देशक: अधिकारी.
१९. खजाना, पोते.
२०. सिताब, बेगी.
२१. दस्त, बंदी, कैद.
२२. सांप्रत : वर्तमान :
२३. नामोश : इज्जत.
२४. मजमू, वसुली, उगवण.
२५. मजबूर, जोरावरी : बळकट : सबल :
२६. निसबत, तर्फ.
२७. गनिम तुर्क, तांब्र.
२८. जमिन, पांढरी: काळी: सेत.
२९. बिदानद : जाणावे,
३०. एकतारी, सलासा, सलूख, तह,
३१. एकाग्र एकसान एकनिष्ठा.
विरुद्धार्थी शब्दाची यादी
शिवरायांच्या पत्रव्यवहारात समानार्थी शब्दांबरोबर विरुद्धार्थी शब्दही वापरले गेले. यामुळे भाषेचा विकास झाला. त्यांच्या पत्रव्यवहारातील काही निवडक परंतु
महत्त्वाचे विरुद्धार्थी शब्द पुढीलप्रमाणे आहेत.
१. इमान – बेइमान
२. बदअमल-अमल
३. हुजूर- नफर
४. हुदेदार (घनी ) – चाकर.
५. खोटा खरा.
६. एकतारी (बिलाकुसुर ) – कुसुर.
७. बरेपणा – वाकुडपणा.
८. गुरु- विद्यार्थी, शिष्य.
९. वडिलपणा – धाकुटेपणा. ( वडिल- धाकटा ).
१० घरोबा – दावा.
११. मजबूत – सजवंज – कमकुवत.
१२. पाप-पुण्य.
१३. गैरमिरासी – मिरासी.
१४. गैरमिरासदार – मिरासदार
१५. मेहेरबानी – गैरमेहेरबानी (नामेहेरबानी . )
१६. बदनामी इज्जत.
१७. बेकैद – कैद.
१८. कमनिखें – निखें.
१९. शक- वेशक.
२०. धर्म- अधर्म.
२१. सुख – दुःख (सुखी कस्टी)
२२. हरामखोरी – एकसान.
२३. सांप्रत, वर्तमान- मागा. (पेशजी) (कदीम)
२४. निर्मळ – दुस्ट
२५. बदनाम – नामोश, कीर्तीस्कर.
२६. जोरावरी (सबल) – कमकुवत
२७. निर्मळपणा – दुस्ट बुधी.
२८. पुरातन – नवे.
२९. सबल – कमजोर.
वारसा
शहाजी महाराजांनी हिंदुस्तानी भाषांचे धोरण स्वीकारले होते. शिवरायांनी देखील हे धोरण सातत्याने राबवलेले दिसते. शिवरायांचा भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रातील वारसा संभाजी महाराजांनी विकसित केला. संभाजी महाराजांच्या लेखनामधून देखील त्यांनी शहाजी महाराज आणि शिवरायांचे भाषा भगिनीभावाचे धोरण प्रत्यक्ष कृतीत उतरवलेले दिसते. या संदर्भातील उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
१) संभाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व साहित्याच्या क्षेत्रामध्ये विकसित झालेले व्यक्तिमत्त्व होते. संभाजी महाराजांच्या व्यक्तित्वातील साहित्यिक पैलू राजकीय विचारांचा वारसा म्हणून खूप महत्त्वाचा आहे. कृष्ण दिवाकर यांनी या पैलूला अधोरेखित केले होते (पवार जयसिंगराव, २०१८ : १३४). विशेषतः संभाजी महाराजांनी चार ग्रंथ लिहिले.
२) त्यापैकी ‘बुधभूषण’ हा ग्रंथ राजनीतीवर विषयाची सांगोपांग चर्चा करणारा आहे. ‘बुधभूषण’ हा ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिलेला आहे. मध्ययुगीन राजकीय विचारांमध्ये हा ग्रंथ भर घालतो.
३) ‘नायिकाभेद’ आणि ‘नखशिख’ हे ग्रंथ शृंगारशास्त्रावरील आहेत. असा एक समज आहे. परंतु याबरोबरच ‘नायिकाभेद’ या ग्रंथात राजकीय विचारदेखील व्यक्त झाले आहेत. या ग्रंथामध्ये संभाजी महाराजांनी हिंदी भाषा शैलीचा वापर केलेला आढळतो.
४) ‘नखशिख’ या ग्रंथात संभाजी महाराजांनी प्रौढ ब्रज भाषेचा वापर केलेला आहे.
५) चौथा ग्रंथ ‘सातसतक’ हा आध्यात्म क्षेत्रातील चर्चा करणारा आहे. या चार ग्रंथांच्या माध्यमातून राजनीतिज्ञ, रसिक, आध्यात्मवादी असे त्यांचे व्यक्तित्व भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रातील दिसते. या अर्थाने संभाजी महाराजांचे व्यक्तित्व बहुपेडी स्वरूपाचे विकसित झाले होते. राजकारण, प्रशासन, अध्यात्म अशा क्षेत्रातील भाषा, साहित्य आणि संस्कृतीला त्यांनी मैलाचा दगड ठरणारे योगदान केले.
साहित्य
शिवरायांनी ग्रंथ (पुस्तकी विद्या) विद्या आणि प्रत्यक्ष अनुभवी विद्या या दोन्ही प्रकारच्या विद्यांना समान महत्त्व दिले होते. त्यांनी केवळ एकाच प्रकारच्या विद्येचा पुरस्कार केला नव्हता. दोन्हीही विद्यांचा पुरस्कार करण्याची परंपरा आई, वडील, आजी, आजोबा आणि पंजोबा यांच्यापासून होती. त्यांच्या वडिलांकडे ज्ञान कमीत कमी शब्दात व्यक्त करण्याचे कौशल्य होते. उदाहरणार्थ, राजमुद्रा. हा शिवरायांचा साहित्याच्या क्षेत्रातील वारसा होता. शिवराय हे साहित्य प्रेमी होते. त्यांच्याकडे बहुश्रुतपणा होता. संस्कृत साहित्य, प्राकृत साहित्य, धार्मिक साहित्य, सामाजिक साहित्य, राजकीय साहित्य इत्यादी साहित्यांचे समाजातील महत्त्व त्यांना उत्तम पद्धतीने समजले होते. शिवरायांनी राजकीय साहित्य बरोबर धार्मिक आणि सामाजिक साहित्याला मदत केली होती. भूषणभट्ट, पोवाडे रचणारे शाहीर आणि कवी यांना पुष्कळ मदत केली. ही परंपरा शिवरायांच्या घरामध्ये जुनीच होती. मालोजीराजे भोसले, शहाजी महाराज आणि जिजाऊ यांनी साहित्य क्षेत्राला मदत केली होती. ही परंपरा शिवरायांनी जपली होती. या साहित्यातून राज्यव्यवहारशास्त्र आणि लोकव्यवहारशास्त्राचा विकास होत गेला. हा राज्यव्यवहारशास्त्राच्या उत्क्रांतीचा एक टप्पा आहे. राज्यव्यवहारशास्त्राच्या विकासाला त्यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे राज्यव्यवहारशास्त्राची त्यांनी सुप्त क्रांती (si- lent revolution) घडवून आणली. कारण, या साहित्यामध्ये धर्म सुधारणा, सामाजिक सुधारणा, राजकीय सुधारणा यांचा पुरस्कार केला गेला होता. हिंदू मुस्लिम ऐक्य भावना, राष्ट्रभावना, विविध भाषांमध्ये ऐक्य भावना उच्चजाती व ब्राह्मणेतरांमधील ऐक्य भावना अशा नवीन संकल्पनांचा आणि जाणिवांचा विकास केला गेला.
- शेख महंमद हे श्रीगोंदा येथील मुसलमान साधू होते. कबीराचा त्यांच्यावर प्रभाव होता. ते रामभजनी होते. त्यांचे अनुयायी हिंदू प्रमाणे वागत. त्यांचे ग्रंथ वेदान्तविषयक आहेत (सरदेसाई, १९१५ : ५४ ). हिंदू मुस्लिम ऐक्य भावना हा या साहित्याचा विषय होता. भौतिक जीवनातील हिंदू मुस्लिम ऐक्य भावना हा त्यांच्या अध्यात्माचा नवीन आविष्कार होता.
- बोधलेबावा, संतोबा पवार मराठा जातीतील संत होते. हे संत शिवरायांच्या काळातील होते. त्यांनी पदे व अभंग यांचे रचना केली ( सरदेसाई, १९१५: ५४).
- शिवरायांनी राजकीय हालचालींना सुरुवात १६३८ पासून केली. तेव्हा प्रथमच शिवरायांचा संबंध दादोजी कोंडदेव यांच्याशी आला. तेव्हा शिवरायांचे वय आठ वर्षांचे होते. येथून पुढे दहा-बारा वर्ष शिवरायांचा संबंध दादोजी कोंडदेव यांच्याशी आला. या दहा वर्षात शहाजी महाराजांनी दादोजी कोंडदेव यांना राष्ट्रभावनेचा पुरस्कार करण्याचा सल्ला दिला होता. शिवराय स्वराज्य स्थापनेचा विचार कृतीत आणत होते. ऐतिहासिक साहित्यामध्ये कोंडदेव यांची दोन प्रकारची वैशिष्ट्ये नोंदविली गेली आहेत. एक, ते न्यायप्रिय आणि प्रशासकीय शिस्त असलेले व्यक्तिमत्व होते. दोन, त्यांची परंपरागतनिष्ठा आदिलशाहीवर होती. साहजिकच त्यांची कोंडी झाली. यामुळे शिवरायांची कल्पना त्यांना आवडली नाही ( सरदेसाई, १६१५: १७९). परंतु, न्याय निवाड्यातील तपशिलावरून त्यांना ऐतिहासिक साहित्यविद्येचे अंग होते, असे दिसते (देशमुख ). दहा-बारा वर्षातील संपर्कामुळे शिवरायांना त्यांच्याकडील साहित्यविद्या या क्षेत्रातील पारंगतपणा माहीत होता.
शिवकाळातील मराठा कवी व लेखक होते. त्यांनी ‘द्रौपदीस्वयंवर’ हा ग्रंथ लिहिला. त्यांनी स्वकुलेतिहास लिहिला. त्यामध्ये त्यांनी उत्कट स्वदेशाभिमान व स्वधर्म प्रेम अशा दोन विचारांची मांडणी केली (सरदेसाई, १९१५ : ५४, १६३). विशेषतः सतराव्या शतकात त्यांनी राष्ट्रभावना केंद्रित विचार मांडला होता. धर्मभावनेचा प्रभाव होता परंतु, राष्ट्रभावना हा विचार सुरू झाला होता. याचे हे उत्तम उदाहरण आहे.
- वामन पंडित (१६३६ – १६९६ ) हे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मण होते. हे शिवरायांच्या काळातील लेखक आणि कवी होते. त्यांची विचारसरणी प्रागतिक होती. त्यांनी संस्कृत भाषेचा व्यासंग सोडून महाराष्ट्र भाषेत कविता केली. त्यांनी वेदपठणाचा अधिकार ब्राह्मणेतरास आहे अशी भूमिका घेतली होती. त्यांनी भगवद्गीतेवर ‘भावार्थदीपिका’ नावाची टीका, ब्रह्मस्तुतीवर टीका, कृष्णलीलांची निरनिराळे वर्णने, भारत रामायणातील अनेक भाग हे लेखन केले होते. विशेष म्हणजे त्यांनी संत तुकाराम आणि समर्थ रामदास यांची भेट घेतली होती ( सरदेसाई, १९१५ : ५४). वामन पंडित यांचे साहित्य समावेशनाचा आणि उच्चवर्णीय आणि ब्राह्मणेतर यांच्यातील ऐक्य भावनेचा पुरस्कार करणारे होते.
- आनंदतनय हे कर्नाटकमधील अरणी गावचे होते. शहाजी महाराजाशी आनंदतनय यांचा संबंध घनिष्ठ आला होता. शिवराय यांच्याशी आला होता. हे शिवोपासक होते. त्यांनी भागवत रामायण पुराने ग्रंथातून अनेक आख्यानांवर मराठीत सुरस कविता केली. त्याच्या कवितेत आरबी फारसी आणि मराठी शब्द एकत्रित आले आहेत. मराठी भाषेचा विकास करण्यात त्यांनी योगदान केले (सरदेसाई, १९१५ : ५५). या साहित्यात आरबी, फारशी आणि मराठी भाषिक ऐक्य भावनेचा पुरस्कार केला गेला होता.
- मुदल कवी होता. त्याने रामायण लिहिले होते. त्याचे रामायण शिवरायांच्या प्रत्येक किल्ल्यावर वाचले
- अवचित सुतकाशी सोळंखी (१६६२) हे एक जात होते. या कवीने मुसलमान व मराठे यांची कित्येक चित्रे काढली आहेत (सरदेसाई, १९१५ : १०२). हिंदू मुस्लिम ऐक्य आणि वीर रसाची कथा अशा दोन गुणांचे संस्कार मुदल कवी यांच्या साहित्यातून केले जात होते.
- समर्थ रामदास हे शिवरायांच्या समकालीन काळातील होते (१६०८-१६८२ ). १६४४ मध्ये रामदास कृष्णा तीरावर आले. शिवराय आणि रामदास यांची भेट १६५९ पूर्वी किंवा पुढेही पुष्कळ दिवस झालेली नसावी. रामदासापासून शिवरायांनी स्वराज्याचा मंत्रोपदेश घेतला नसावा (सरदेसाई, १९१५ : १११). शिवरायांचा स्वराज्य उद्योग आणि कर्तबदारी पाहून त्याचा परिणाम रामदास यांच्यावर झाला. प्रथम रामदासांच्या मनात राजकीय उन्नतीचा विषय नव्हता. १६५९ मध्ये ‘दासबोध’ ग्रंथ अर्धा अधिक लिहून पूर्ण झाला होता. त्यामध्ये देखील राजकीय उन्नतीचा विषय नव्हता. १६६० नंतरच्या लिखाणात रामदासांनी राजकीय उन्नतीचा विषय समाविष्ट केला. अर्थात दासबोधातील राष्ट्रीय विचारांची स्फूर्ती रामदासास शिवरायांच्या उद्योगांनी झाली (सरदेसाई, १९१५ : ११२). स्वराज्याच्या उद्योगाचे सर्व जबाबदारी शिवरायांचे होती. रामदासांचे त्यात अंग नाही. परंतु रामदासांच्या लेखनामुळे सुशिक्षित जनसमूह शिवरायांकडे वळला असा निष्कर्ष सरदेसाई यांचा आहे (सरदेसाई, १९१५ : ११४).
समारोप
शिवरायांनी स्वराज्याचे भाषा धोरण निश्चित केले होते. त्यांनी बहुविध भाषेच्या धोरणाचा पुरस्कार केला होता. त्यांनी सर्वच भाषांना समान महत्त्व दिले होते. भाषेमध्ये संस्कृती उतरते. शिवरायांची संस्कृती भाषेमध्ये उतरली होती असे दिसते. मथितार्थ, शिवरायांचे भाषा धोरण प्रशासकीय पातळीवर प्रमाणीकरण करणारे होते. परंतु, याबरोबरच प्राकृत भाषा आणि संस्कृत भाषा यांना समान महत्त्व देणारेदेखील होते. भाषा हे लोकस्थितीमापक यंत्र आहे. शिवरायांनी विद्या व व्यवहार यांच्यात लोकांची प्रगती केली हे यावरून दिसते. शिवरायांच्या काळात लोकांचा व्याप वाढला हे भाषेवरून दिसते. स्वराज्याच्या स्थापनेमुळे लोकांच्या जीवनात भाषेसंदर्भातील पडसाद उमटले. उदाहरणार्थ, स्वाभिमान भाषेतून लोक जीवनात मूळ धरत गेला व विस्तारत गेला. वाक्यप्रचार आणि म्हणींचा विकास स्वाभिमानी वृत्तीच्या अंगाने झाला.
संदर्भ
१. साने, काशिनाथ नारायण (१९२५) अथ राज व्यवहार कोश, शिवप्रदीप, भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे.
२. काटे रा. गो. १९५६, राज्यव्यवहार कोश, मराठवाडा साहित्य परिषद, हैदराबाद.
३. पवार जयसिंगराव, २०१८, छत्रपती संभाजी एक चिकित्सा, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे.
४. शेजवळकर, १९६४, श्री शिवछत्रपती: संकल्पित शिवचरित्राची प्रस्तावना, आराखडा व साधने, मराठा मंदिर प्रकाशन मुंबई.
५. वैद्य, १९२३, मध्ययुगीन भारत, चिंतामण विनायक वैद्य प्रकाशन मुंबई.
६. जोशी लक्ष्मण शास्त्री (संपादक), (१९६७), राजवाडे लेखसंग्रह पापुलर प्रकाशन मुंबई, दुसरी आवृत्ती.
७. पवार सुधाकर, १९७८, मराठेशाहीतील पत्ररूप गद्य, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
८. डांगे श्रीपाद अमृत बारा भाषणे,
९. आपटे द. वि., ओतूरकर रा. वि. (१९६३), (संपा.) महाराष्ट्राचा पत्ररूप इतिहास, अनाथ विश्रामगृह प्रकाशन, पुणे.
१०. पानसे मुरलीधर, १९६३, यादवकालीन महाराष्ट्र, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मुंबई.
११. Pollock, Sheldon (2001) The Dath Of Sanskrit, University of Sikago.
१२. Kaviraj Sudipta, 2005, The Sudden Death of Sanskrit Knowledge, Jour- nal of Indian Philosophy, Vol. 33, No. 1, Springer Nature
( सौजन्य – मुराळी मासिक )
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.