श्रीमंतांच्या यादीत
आले पुनः तेच ते
त्यांच्या संपत्तीत बघा
किती वाढ झाली
अब्जाधीशांच्याही
यादीत बघा कशी भर पडली
पण समृद्धी त्याने
नेमकी कोणाची वाढली?
कधी तरी तर
सांगा ना
माझ्या संपत्तीत भर
कधीच का नाही पडली?
माझ्याच देशातल्या
संपत्तीतला माझा वाटा
माझ्यापर्यंत का पोहचत नाही?
कोणाकडे
वळता होतो तो
कोण कसा, कुठे
वळता करतो तो?
का थांबले
देणे साधे पेन्शनही
तेही थांबवण्याचा निर्णय
कोणासाठी काढला?
व्याजाचा दर माझ्याच निवृत्तीनंतरच्या
पैशांवरचा का
नाही वाढला?
रोजगारही का
कंत्राटी झाला
तो द्यायलाही मध्ये
हा दलाल कसा आला?
कुठे गेल्या
सामूहिक मालकीच्या
माझ्या जमिनी
कुठे गेला
माझा त्यातला वाटा
मला का उचलाव्या लागतात
रूग्ण अजूनही तिकडे
टाकून त्यांच्यासाठी खाटा?
कुठे गेली औषधे माझी
कोणी ती लंपास केली
वाढणाऱ्यांची
संपत्ती काय आपोआप
स्वतःचा घाम गाळून वाढली?
त्यांचे तर
रोजच मला सांगत असता
त्यांच्याच जाहिराती घेऊन
माझेही
रोज सांगत चला ना त्यांना
माझ्याकडून
काहीच नाही ते घेऊन…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.