- अजय कांडर लिखित – रघुनाथ कदम दिग्दर्शित ‘युगानुयुगे तूच’ नाटकाच्या चर्चेत ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. राजेद्र चव्हाण यांचा विश्वास
- देवगड येथील पहिल्याच प्रयोगाला रसिकांचा प्रतिसाद
कणकवली – कवी अजय कांडर लिखित युगानुयुगे तूच हा नाट्य दीर्घांक कांडर यांच्या कळत्या न कळत्या वयात या नाटकाचा पुढचा भाग आहे. अभिनेता सचिन वळंजू हे हा दीर्घांक अतिशय प्रभावीपणे सादर करतात. या नाट्य दीर्घांकाचे दिग्दर्शक रघुनाथ कदम यांनी अतिशय परिश्रमपूर्वक हे नाटक रंगमंचावर आणले आहे. सचिन यांनी ते सादर करताना या नाटकाच्या संधीच सोनं केलं असून युगानुयुगे तूच हे नाटक अभिनेता सचिन वळंजू खूप पुढे घेऊन जाईल, असा विश्वास ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.राजेंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचे हा विचार केंद्रस्थानी ठेवून कवी अजय कांडर यांनी युगानुयुगे तूच ही दीर्घ कविता लिहिली. त्याचे नाटक मुंबई दूरदर्शनने यापूर्वी प्रसारित केले होते. त्यानंतर मुंबई कांचन आर्टतर्फे ते आता पुन्हा रंगमंचावर सादर करण्यात येत असून त्याचा शुभारंभाचा प्रयोग देवगड येथे सादर करण्यात आला. या प्रयोगानंतर झालेल्या चर्चेत डॉ.चव्हाण यांनी हे नाटक सादर करणारे अभिनेते सचिन वळंजू यांचे या नाटकाच्या सादरीकरणाबद्दल फार आपलेपणाने कौतुक केले.
प्रा. श्रीकांत सिरसाठे म्हणाले, कवी अजय कांडर यांची युगानुयुगे तूच ही कविता बहुचर्चित आहे. या कवितेतून बाबासाहेबांचे एकूण समाजासाठीचे विचार अभ्यासपूर्ण मांडण्यात आले आहेत. अशा कवितेचे नाट्यरूप पाहणे हा आनंददायी भाग असतो. परंतु यातून स्वतःलाही तपासून घेत राहता येते. अभिनेते सचिन वळंजू यांनी खूप ताकतीने हा प्रयोग सादर केला. फक्त आंबेडकर चळवळी पुरताच हा नाट्यप्रयोग सीमित न राहता तो समाजाच्या सर्व स्तरात पोहोचायला हवा. युगानुयुगे तूच या कवितेचा हिंदी अनुवाद बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या हिंदी विभागाच्या एम ए च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर या नाटकाचा प्रयोग या विद्यापीठात करण्यासाठी आपले प्रयत्न असतील.
नाटकाचे लेखक अजय कांडर म्हणाले युगानुयुगे तूच ही डॉ. बाबासाहेब यांच्यावरील दीर्घ कविता अमाप लोकप्रिय झाली. या कवितेच्या तीन आवृत्ती प्रसिद्ध झाल्या. ती हिंदीत अनुवादी झाली. कवितेचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला. या कवितेचे जाहीर अभिवाचन करण्यात आले. मात्र असे असले तरी या कवितेचे हे नाट्यरूप निव्वळ या नाटकाचे दिग्दर्शक रघुनाथ कदम यांच्यामुळेच सादर होत आहे. यापूर्वी या नाटकाची निर्मिती करण्यात आली दूरदर्शनने ते प्रसारितही केले मात्र आता या नाटकाचे अभिनेते सचिन वळंजू हे आजच्या टीव्ही मालिकांमधील एक यशस्वी अभिनेते असून त्यांनी युगानूयुगे तूचचे हे नाट्यरूप अप्रतिम सादर केले. त्यामुळे हे नाटक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या नाटकाचे दिग्दर्शक आणि अभिनेते करतील असं मला विश्वास वाटतो.
अभिनेते सचिन वळंजू म्हणाले, युगानुयुगे तूच या दीर्घ कवितेची लोकप्रियता मी ऐकून होतो. त्यामुळे मला या कवितेचा नाट्यविष्कार सादरच करायचा होता. मात्र या नाटकाचा पहिलाच प्रयोग उपस्थित रसिकांच्या पसंतीस उतरला याचा आनंद होत आहे.या नाटकाचे जास्तीत जास्त प्रयोग करण्याचा माझा प्रयत्न राहील.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.