जातीच्या आधारावर निर्माण केलेली संघटना फार काळ टिकत नाही. जातीजातीत वाद निर्माण होतात अन् त्यातून फाटाफुट होते. हे त्रिकालाबाधीत सत्य आहे. यामुळे ब्राह्मणेत्तर चळवळीमध्ये फाटाफूट झालेली पाहायला मिळते.
डॉ. अशोक चौसाळकर
ब्राह्मणेतर चळवळीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर व्यापक प्रभाव: डॉ. अशोक चौसाळकर
कोल्हापूर: राजर्षी शाहू महाराज यांनी सत्यशोधक चळवळीला मोठे बळ दिले. तिच्या व्यापक आधारावरच पुढे ब्राह्मणेतर चळवळ गतीने फोफावली आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर तिने मोठा प्रभाव टाकला, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग आणि शाहू संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राजर्षी शाहू स्मृती शताब्दी परिषदेमध्ये आज दुसऱ्या दिवशी ‘शाहू महाराज आणि ब्राह्मणेतर चळवळ’ या विषयावर ते बोलत होते. खासदार भालचंद्र मुणगेकर, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार प्रमुख उपस्थित होते.
डॉ. चौसाळकर म्हणाले, राजर्षी शाहू महाराज मधुकर वृत्तीचे होते. चांगल्या बाबी समजून घेऊन त्यांना पाठिंबा देण्यात ते अग्रेसर असत. त्यातूनच त्यांनी फुले यांच्या माघारी काहीशा थंडावलेल्या सत्यशोधक चळवळीस पाठिंबा देऊन तिचे पुनरुज्जीवन केले. जेव्हा एखाद्या चळवळीला बळ मिळते, तेव्हा स्वभावतःच ती राजकीय वळण घेते, याची जाणीव महाराजांना होती. म्हणून तत्कालीन घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराजांनीही राजकारणात मोठी चळवळ आरंभली. १९१७ साली ते त्यासाठी भारतमंत्री माँटेग्यू यांना भेटले. मराठा समाजासाठी त्यांनी दहा वर्षांसाठी स्वतंत्र मतदारसंघांची मागणी केली. शाहू महाराजांनी मराठा हा शब्द अत्यंत व्यापक अर्थाने वापरला. त्यामध्ये त्यांना मराठ्यांसह अस्पृश्य-मागासवर्गीय समाज तसेच इतर मागासवर्गीय समाजही अभिप्रेत होता. त्यांच्या सामाजिक-राजकीय विकासासाठी विशेष सवलती देण्याची आग्रही मागणी शाहू महाराजांनी मुंबईचे गव्हर्नर सिडनेहॅम यांच्याकडेही केली होती. ब्राह्मणेतर पक्षाला सर्वोतोपरी मदतीचे धोरण त्यांनी स्वीकारले होते. ब्राह्मणेतर वृत्तपत्रे, सत्यशोधक जलसे यांना सातत्याने सामाजिक प्रबोधनाच्या कार्यासाठी महाराजांनी प्रेरित केले. ब्राह्मणेतर पक्षामध्ये उमद्या नेतृत्वाच्या विकासालाही त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यातूनच भास्करराव जाधव, आण्णासाहेब लठ्ठे असे नेते उदयास आले. एवढेच नव्हे, तर महाराजांच्या अकाली निधनामुळे पोरक्या झालेल्या ब्राह्मणेतर चळवळीला आपल्या नेतृत्वाने सावरण्याचे काम करणाऱ्या जेधे-जवळकरांनाही शाहू महाराजांचीच प्रेरणा होती. त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीच्या वृद्धीसाठी आवश्यक असणारी व्यापक सामाजिक व राजकीय पार्श्वभूमी निर्माण करण्याचे महत्कार्य शाहू महाराजांनी केले.
डॉ. चौसाळकर पुढे म्हणाले, सन १९२०मध्ये गांधीजींनी पुकारलेल्या असहकार चळवळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई प्रांतिक निवडणुकीत ब्राह्मणेतर पक्षाने काँग्रेसच्या अनुपस्थितीत १११ पैकी १६ जागा जिंकल्या. १९२३मध्येही त्यांनी १३ जागा जिंकल्या. मात्र, शाहू महाराजांच्या माघारी ब्राह्मणेतर पक्षात मराठा व मराठेतर असा भेद सुरू झाल्याने सत्यशोधक त्यापासून दुरावले. त्यामुळे प्रत्येक सत्यशोधक ब्राह्मणेतर पक्षाचा, मात्र, ब्राह्मणेतर पक्षाचा प्रत्येक सभासद सत्यशोधक असेलच, असे नाही, असे चित्र निर्माण झाले. तथापि, जेधे-जवळकरांनी ब्राह्मणेतर पक्षाची प्रागतिक प्रतिमा उचलून धरल्याने चळवळ पुढे जात राहिली. त्या काळात डाव्या चळवळीचे अस्तित्व नव्हते, मात्र ब्राह्मणेतर पक्षाने डाव्यांची भूमिका नेटाने निभावली आणि शेतकरी, कामगारांचे प्रश्न हिरीरीने मांडले व धसास लावले. १९३२मध्ये जवळकरांनी इंग्लंड दौरा केला. तेथून परतल्यानंतर त्यांनी ‘क्रांतीचे रणशिंग’ हे पुस्तक लिहीले. त्यामध्ये त्यांनी लेनिनवादी समाजवादाचा पुरस्कार केल्याचे दिसते. हे एक वेगळे वळण दिसते. त्यामुळे सत्यशोधक चळवळीचा समाजवादाकडे प्रवास तेथून सुरू झाला. पुढे १९४८मध्ये स्थान झालेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या तत्त्वांमध्ये सत्यशोधक, ब्राह्मणेतर पक्षाचाच गाभा दिसून येतो. हे प्रवाह पाहात असलेल्या काँग्रेसनेही १९३६च्या फैजपूर अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. एकूणात आजही महाराष्ट्र आणि देशाच्या राजकीय पटलावर अशा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरुपामध्ये सत्यशोधक-ब्राह्मणेतर चळवळीचे अस्तित्व असल्याचे दिसून येते, असेही चौसाळकर म्हणाले.
यावेळी डॉ. प्रकाश पवार यांनी परिचय करून दिला व आभार मानले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
1 comment
विहिंप, भाजपा, रास्वस या संघटना अशा टिकल्या? यांना मोडीत काढण्यासाठी काय करावे लागेल?