राज्यातील 80 टक्के पेक्षा जास्त वनसंपदा तसेच निसर्ग संपदा ही विदर्भाच्या पर्यटन क्षेत्राची ताकद – केंद्रीय रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी
नागपूर – राज्यातील 80 टक्के पेक्षा जास्त वनसंपदा तसेच निसर्गसंपदा ही विदर्भाच्या पर्यटन क्षेत्राची ताकद आहे. विदर्भात खाण पर्यटन , जल पर्यटनास प्रोत्साहन देण्याचीही गरज केंद्रीय रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरात व्यक्त केली. मध्य भारतातील वैदर्भीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी विदर्भ डेव्हलपमेंट कौन्सिल अर्थात वेदतर्फे आज लक्ष्मीनगरातील हॉटेल अशोकामध्ये ‘अमेझिंग विदर्भ-सेंट्रल इंडिया टूरिझम’ चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
मिहानमध्ये 68 हजार युवकांना रोजगार मिळाला असून, विकास वेगाने सुरू आहे. संत्री आणि वाघ ही विदर्भाची जगभरातील ओळख आधीपासूनच आहे. पायाभूत सुविधा निर्माण करताना दूरदृष्टी आणि सर्वसमावेशकता ठेवायला हवी. विदर्भाच्या पर्यटन क्षेत्रात माेठी गुंतवणूक करण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावे, असं आवाहन गडकरी यांनी यावेळी केले.
या चर्चासत्रात विदर्भ व मध्य भारतातील पर्यावरणाच्या संधींवर चर्चा झाली . याप्रसंगी महाराष्ट्र पर्यटन विभागाचे प्रादेशिक उपसंचालक प्रशांत सवाई, यांनी महाराष्ट्र पर्यटन धोरण – 2024 ची माहिती उपस्थितांना दिली. वेदच्या अध्यक्षा रिना सिन्हा यांनी वेद सारख्या संस्थांना पर्यटन धोरणात सहभागी करून घेण्यासाठी तसेच पर्यटनाच्या वाढीसाठी प्रसारमाध्यमांद्वारे प्रोत्साहन द्यावे अशा सुचना यावेळी मांडल्या.
या कार्यक्रमादरम्यान वेद व आनंद राठी यांच्या वतीने तयार करण्यात आलेला ‘प्रमोशन ऑफ विदर्भ टूरिझम’ या अभ्यासपूर्ण अहवालाचे प्रकाशन गडकरींच्या हस्ते करण्यात आले . या चर्चासत्रात पर्यटन क्षेत्रातील भागधारक उद्योजक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.