December 3, 2024
chhatrapati-shivaji-maharaj museum Mumbai completed 100 years
Home » छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे शतक
काय चाललयं अवतीभवती

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे शतक

मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयास 10 जानेवारी 22 रोजी 100 वर्षे पूर्ण झाली. ही फक्त वस्तुसंग्रहालयाच्या इतिहासातीलच नव्हे तर देशाच्या सांस्कृतिक चळवळीच्या दृष्टीने महत्वाची घटना आहे. या सर्व कालावधीत वस्तुसंग्रहालयाने देशाच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन करण्याची जबाबदारी पार पाडण्यासंदर्भात प्रमुख भुमिका निभावली. अशा या संग्रहालयाबद्दल…

वस्तुसंग्रहालयाची निर्मिती ही जनतेची कल्पना

10 जानेवारी 1922 रोजी या वस्तुसंग्रहालाची दारे जनतेसाठी खुली झाली. या कल्पनेची रुजवात काही उत्साही नागरिकांनी केली ज्यांना त्यावेळच्या आर्थिक आघाडीवरील मुंबईला सांस्कृतिक ठेव्याचा नजराणा देण्याची इच्छा होती.

1904 या वर्षी मुंबई प्रांताच्या सरकारने अश्या तऱ्हेचा ठराव मंजूर केला  आणि मुंबईमध्ये सार्वजनिक वस्तुसंग्रहालय उभारण्याच्या दृष्टीने चाचपणी करण्यासाठी समिती स्थापन झाली.  सर फिरोजशा मेहता, सर इब्राहिम रहिमतुल्ला, आणि सर विठ्ठलदास ठाकरसी  या मुंबईतील मान्यवरांचा या समितीमध्ये समावेश होता.

कला आणि पुरातत्वशास्त्राचे वस्तुसंग्रहालय आणि विज्ञान तसेच निसर्गविज्ञान यांचे एकत्रित वस्तुसंग्रहालय असावे असा प्रस्ताव होता. हे वस्तुसंग्रहालय, त्याला भेट देणाऱ्यांसाठी विशेषतः मुले व युवकांना स्फुर्ती देणारे साधन ठरावे असा मानस समितीतील सदस्यांचा होता, म्हणूनच वस्तुसंग्रहालयाचे मुख्य उद्दिष्ट शैक्षणिक असावे असा उद्देश त्यांनी बाळगला.

पुराणवस्तु, चित्रांचा संग्रह

ख्यातनाम पुरातत्वशास्त्रज्ञ हेन्री क्युझेन्स यांनी 1909 मध्ये उत्खनन केलेल्या मिरपुर्खस या बुद्धधर्माशी संबधित स्थळावरील मौल्यवान कलावस्तु या संग्रहालयातील महत्वाच्या संग्रहाचा भाग आहेत. शेठ पुरुषोत्तमदास मावजी यांचा पुराणवस्तुंचा व  चित्रांचा संग्रह विश्वस्तांनी 1915 साली खरेदी केला, याशिवाय भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेने मिळवलेल्या पुराणवस्तुंनी या संग्रहालयांच्या संग्रहाचे मोल वाढवले आहे. 1922 हे वर्ष सर रतन टाटा याच्या मृत्यूपत्राद्वारे मिळालेल्या संग्रहाने संस्मरणीय झाले. सर रतन टाटा यांनी केलेल्या विश्वकोषांचा संग्रह त्यांच्या यॉर्क, लंडन येथील घरामध्ये होता तो त्यांच्या मृत्यूपत्रातील इच्छेनुसार संग्रहालयाला प्रदान करण्यात आला. त्यानंतर 1933मध्ये दोराब टाटा यांचा संग्रहसुद्धा त्यांच्या मृत्यूपत्रानुसार संग्रहालयाला देण्यात आला. वस्त्रेप्रावरणे, शस्त्रे, पुतळे, चित्रे अश्या बेहतरीन भारतीय पुराणवस्तुंसोबतच युरोपियन, इस्टइंडियन आणि आग्नेय आशियाई कलांसंबधित वस्तुसुद्धा या अनमोल ठेव्याचा भाग होत्या.

गेल्या शतकात, संग्रहालयाच्या विस्तृत संग्रहात सुमारे 70,000 वस्तूंचा समावेश झाला आहे, ज्यात विशेषत: भारतीय उपखंडातील, अगदी प्रागैतिहासिक काळापासून ते वर्तमानापर्यंतच्या मानवी कथा सांगितल्या आहेत. खासगी संग्राहकांद्वारे संग्रहालयाला दिलेल्या अनेक संग्रहांनी संग्रहालयाचे भांडार मोठ्या प्रमाणात समृद्ध केले आहे. या संग्रहामध्ये सर अकबर हैदरी, अल्मा लतीफी, अमरावती गुप्ता, कार्ल खंडालावाला, वीणा श्रॉफ, डॉ. फेरोजा गोदरेज आणि पॉलीन रोहतगी, अर्न्स्ट आणि मिशा जेनकेल आणि कुलदीप सिंग यांच्याकडून मिळालेल्या सुंदर भेटवस्तूंचा समावेश आहे. समकालीन कलाप्रेमींच्या गरजा पूर्ण करत, जहांगीर निकोल्सन यांचा भारतातील आधुनिक आणि समकालीन कलांचा संग्रह देखील संग्रहालय परिसरात ठेवण्यात आला आहे. हा संग्रह सध्या संग्रहालयाकडे  15 वर्षांच्या कर्जावर आहे आणि त्याने संग्रहालयाच्या संग्रहात आधुनिक आणि समकालीन मिलाफ घडवून आणला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय (CSMVS) हे एक सांस्कृतिक, तसेच एक सामाजिक स्थान आहे आणि लोकांमध्ये संवाद आणि विचारांची देवाणघेवाण करण्याचे एक ठिकाण आहे. ज्या समाजामध्ये तो टिकून आहे त्याचे जतन आणि समृद्ध करण्यात संग्रहालय थेट भूमिका बजावते. संग्रहालयाचा जसजसा विकास होत आहे आणि लोकप्रियता वाढत आहे, तसतसे ते शहरात राहणाऱ्या विविध समुदायांना अधिक उत्तरदायी बनत आहे.

सब्यसाची मुखर्जी

महासंचालक,
छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय

1923 मध्ये, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि संग्रहालयाच्या विश्वस्तांनी संयुक्तपणे नैसर्गिक इतिहास विभागाची स्थापना केली. श्री जेमे रिबेरो यांनी गोळा केलेला बॉम्बे बेटावरील खनिजांचा आकर्षक संग्रहही संग्रहालयाला दान करण्यात आला. या विभागाचे पहिले मार्गदर्शक व्याख्याते म्हणून प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ डॉ.सलीम अली हे होते. रॉयल एशियाटिक सोसायटीच्या बॉम्बे शाखेने पुरातन वस्तूंचा महत्त्वपूर्ण संग्रह संग्रहालयाला दिला होता. सन 1928 मध्ये विश्वस्तांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्ट कडून सजावटीच्या कलांचा संग्रह मिळवला. 

छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयाने वस्तू गोळा करणे सुरूच ठेवले आहे आणि संग्रहालय प्रशासक या संग्रहांचे संशोधन करण्यात सक्रियपणे गुंतलेले आहेत. जगभरातील कला इतिहासकारांनी संशोधन कार्यासाठी संग्रहालयाला भेट दिली आहे. कला इतिहास आणि पुरातत्व क्षेत्रातील ज्येष्ठ आणि तरुण विद्वानांमध्ये मूळ संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी संग्रहालय दरवर्षी एक संशोधन जर्नल प्रकाशित करते. 2019 मध्ये, संग्रहालयाने मुंबईतील पहिले बालसंग्रहालय उघडले. संग्रहालयाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम म्हणजे – म्युझियम ऑन व्हील्स, अर्थात फिरते संग्रहालय जे महाराष्ट्र आणि गुजरातमधील शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये बसमधून प्रदर्शन घेऊन जाते.

सौजन्य – पीआयबी


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading