‘उत्तर भारतातील मंदिरे’ या पुस्तकाचे ओघवत्या शैलीत डॉ. भावना पाटोळे यांनी केलेले भाषांतर हे मंदिर स्थापत्य – जिज्ञासू व अभ्यासकांनाही उपयुक्त ठरेल, हे निश्चित.
मंदिरं ही भारतीय स्थापत्यातील अत्यंत मौल्यवान वास्तू असून भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये त्यातून प्रतित होतात. मंदिरांच्या विस्ताराबरोबरच मूर्तिपूजा दृढ होत गेली. तसेच काळाच्या ओघात धार्मिक विधीही प्रचलित झाले. उत्तर भारतातील मंदिरे या पुस्तकात उत्तर भारतातील मंदिर-शैलीचा उदय व विकासाचा वेध घेण्यात आला असून, वैविध्यपूर्ण शैलींच्या वैशिष्ट्यांची चर्चा करण्यात आली आहे. सर्वसामान्य वाचकाला मंदिरांचे शिल्पसौंदर्य गुंतवून ठेवेलच, तसेच त्याचे मोलही जाणवल्याशिवाय राहणार नाही.
डॉ. कृष्णदेव हे भारतीय कला व स्थापत्यातील प्रतिभासंपन्न असून, ते भारतीय सर्वेक्षण खात्याचे संचालक होते. तसेच नंतरच्या काळात कलकत्ता येथील ‘बिर्ला अकॅडेमी ऑफ आर्ट’चे संचालकपदही त्यांनी भूषविले. मागच्या तीन दशकांमध्ये त्यांनी स्वतंत्रपणे तसेच सर ऑरल स्टोन, डॉ. मार्टिमर व्होलर आणि ना. गो. मुजुमदार यांच्यासमवेत महत्त्वपूर्ण पुरातत्त्वीय शोधकार्य हाती घेतले. त्यांनी भारतीय पुरातत्त्वीय सर्वेक्षणाच्या अंतर्गत उत्तर भारतीय मंदिरांचे सर्वेक्षण केले. खजुराहो येथील मंदिरांचा स्थापत्यदृष्ट्या सविस्तर अभ्यास प्रथमच पुढे आणला.
प्रा. डॉ. भावना पाटोळे यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे. त्या डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, मुंबई येथील एलफिन्स्टन महाविद्यालयात इतिहास विभागप्रमुख म्हणून प्रदीर्घ काळ कार्यरत असून, अध्यापन, संशोधन, लेखन इत्यादी क्षेत्रांत त्या सातत्याने कार्यरत आहेत. तसेच त्या राज्य प्रशासकीय शिक्षण संस्था, मुंबई येथे प्र. संचालक म्हणून काम पाहत आहेत. नॅशनल बुक ट्रस्टमार्फत प्रकाशित झालेल्या ‘यशवंतराव चव्हाण’ या विविध पुरस्कारप्राप्त चरित्रग्रंथाच्या त्या लेखिका आहेत. ‘उत्तर भारतातील मंदिरे’ या पुस्तकाचे ओघवत्या शैलीत त्यांनी केलेले भाषांतर हे मंदिर स्थापत्य – जिज्ञासू व अभ्यासकांनाही उपयुक्त ठरेल, हे निश्चित.
पुस्तकाचे नाव – उत्तर भारतातील मंदिरे
लेखक – डॉ. कृष्णदेव ( मराठी अनुवाद – डॉ. भावना पाटोळे )
प्रकाशक – नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया
किंमत – २०५ रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.