November 30, 2023
Jackfruit success story Harishchandra Desai zhapde Lanja
Home » फणसाचा ‘गर’ ठरतोय शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा ‘झरा’
फोटो फिचर

फणसाचा ‘गर’ ठरतोय शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा ‘झरा’

कुटुंबवत्सल इथे फणस हा
कटी खांद्यावर घेऊनी बाळे

मराठी व्याकरणात चेतनगुणोक्ती अलंकारासाठी उदाहरण असणारा हा फणस आकाराने जितका मोठा तितकाच त्याचा फायदा देखील शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा असल्याचे प्रत्यक्षात उदाहरण ठरला आहे. फणसाचा ‘गर’ शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा ‘झरा’ ठरत आहे. लांजा तालुक्यातील झापडे गावच्या फणसकिंग हरिश्चंद्र देसाई आणि मुलगा मिथिलेश यांनी आपल्या प्रकल्पातून हे सिद्ध करून दाखवले आहे.

कोकण म्हटलं की आपसूक आंबा, फणस, काजू ही नावे समोर येतात. परंतु आंबा आणि काजूप्रमाणे फणसाची लागवड अशी करुन कोणीही बाग करत नाही. नेमके हेच हेरत हरिश्चंद्र देसाई यांनी जवळपास 10 वर्षापूर्वी फणस लागवडीचा विचार करुन तो प्रत्यक्षात आणला आहे. सुरुवातीला आवड म्हणून केलेली फणसाची लागवड ही मुख्य उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून लागवडीखाली आली. जगभरातील जातींमधील 86 प्रकारच्या जातीची सुमारे 1500 फणसाची झाडे लावली आहेत. सर्वसाधारणपणे मे आणि जूनला फणस होतो. जूनमध्ये होणारा फणस वाया जातो. मे पूर्वी होणाऱ्या बऱ्याचश्या जातींचे फणस यामध्ये आहे. भगवा, लाल, गुलाबी, पांढरा अशा रंगातील गरे असणारे फणसांच्या व्हरायटी यात आहेत. आंबा, काजू यांच्या लागवडीसाठी, फवारणीवर तसेच देखभालीवर होणारा खर्च शिवाय रोगराई याचा खर्च शेतकऱ्याला उत्पन्नाच्या तुलनेत न परवडणारा आहे.

याउलट फणसाला कसलीच रोगराई नाही, देखभाल नाही, लागवडीचा खर्च कमी आणि ‘उत्पन्नाची हमीच हमी’ असल्याने आंबा, काजूच्या तुलनेत फणस शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. झाड लावल्यानंतर दोन वर्षे पाणी द्यायचे आणि त्यानंतर शंभर ते तीनशे वर्षे फळे काढत रहायचं. भविष्यातील जगाचे अन्न म्हणून फणसाकडे पाहिले जाते, असंही श्री. देसाई सांगतात.

युपीएससी करण्यासाठी म्हणून राहुरी विद्यापीठात प्रवेश घेतला. बीटेक झाल्यानंतर वडिलांनी सुरु केलेल्या फणसाच्या वेगळ्या प्रयोगावर करिअर करण्यासाठी त्यामध्ये स्वत:ला झोकून दिले. असं सांगत मिथिलेश म्हणाला, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत ‘स्मार्ट’अंतर्गत प्रक्रिया प्रकल्प सध्या उभारला जात आहे. महाराष्ट्रातील एकमेव फणसाची रोपवाटिका चालवत आहे. सुरुवातीला रत्नागिरी, सिंधुदूर्ग मर्यादित असणाऱ्या या रोपवाटीकेतून महाराष्ट्रभर रोपे पाठविण्यात आली. आता महाराष्ट्राबाहेर आणि भारताबाहेर गेली.

फणस हा देखील कल्पवृक्ष

फणसाच्या झाडापासून सर्व प्रकारचा उपयोग होतो. फणसाचा गरा खाण्यासाठी विविध प्रक्रियांसाठी उपयुक्त तर आहेच, फणसाची बी देखील उपयुक्त आहे. चार बदामांमध्ये जेवढे पोषणतत्व आहे, तेवढे एका फणस बी मध्ये आहे. फणस हे ‘वेगन मीट’ अर्थात शाकाहारी मांस म्हणून गणले गेले आहे. त्यादृष्टीकोणातून केरळ, गोवा येथे उद्योग सुरु झाले आहेत. फणसाची साल ही पशुखाद्य म्हणून तसेच उत्तम खत म्हणून उपयुक्त आहे. फणसाच्या पानांच्या रसाचा वापर हा औषध निर्मितीमध्ये होतो.

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात 25 हजार तर मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटक मध्ये रोपे पाठविण्यात आली आहेत. शेतकऱ्यांच्या जीवनात उत्पन्न डबल करण्याच्या दृष्टीने फणस लागवडीचा प्रचार आणि प्रसार सध्या जॅकफ्रुट किंग ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून देसाई पिता पुत्र करत आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही अर्थिक फायदा देणारी भविष्यातीलनांदी ठरेल.

हरिश्चंद्र देसाई संपर्क क्रमांक – 9373773262, मिथिलेश देसाई संपर्क क्रमांक – 8275455176

Related posts

गुलाबाचं फुल दे…

गुळ उत्पादनातील त्रृटीवर उपाय सांगणारे पुस्तक

ही झाडे पांढऱ्या कापडाने झाकली आहेत कारण…

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More