येत्या जून पासून अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त, नवीन शैक्षणिक धोरणानुसार आदर्श स्वरूपाची मराठी माध्यमाची शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर येथील भारतीय विद्या भवन या नामवंत शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेने येत्या जून पासून अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त, नवीन शैक्षणिक धोरणानुसार आदर्श स्वरूपाची मराठी माध्यमाची शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे केंद्राचे संचालक व मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
पूर्व प्राथमिक ची मराठी शाळा खेळ गट म्हणजे नर्सरी व बालवाडी छोटा गट म्हणजे ज्युनिअर केजी सुरू केली जात आहे. येत्या जून पासून पूर्व प्राथमिक शाळेचे खेळ गट ( नर्सरी) व बालवाडी (ज्युनिअर केजी) हे वर्ग दुपारच्या सत्रात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या जागेची उपलब्धता लक्षात घेऊन प्रारंभी केवळ एक वर्ग सुरू करणार असून त्यामध्ये कमाल तीस पटसंख्या राहील असे ठरवण्यात आले आहे. हे विद्यार्थी दोन वर्षानंतर पहिली इयत्तेमध्ये जातील. त्यावेळी सक्तीच्या मोफत कायद्यातील तरतुदीनुसार (आरटीई ) प्रवेशांसाठी आवश्यक जागांवरील प्रवेश नियमानुसार केले जातील.
भारतीय विद्या भवनच्या पुणे केंद्राची स्थापना १९८३ मध्ये पुण्यात झाली. शिवाजीनगर येथे छाब्रिया नर्सरी स्कूल व सुलोचना नातू विद्या मंदिर या दोन इंग्रजी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या. गेली तीन दशके या शाळांचा कारभार सुरू असून मोफत सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसारही 25 टक्के प्रवेश इंग्रजी शाळेमध्ये गेली नऊ वर्षे देण्यात आलेले आहेत. या दोन्ही शाळा सकाळ व दुपार अशा दोन सत्रात सुरू आहेत.
या पार्श्वभूमीवर, मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा आणि मराठी भाषा वृद्धिंगत व समृद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून मराठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रा. काकिर्डे यांनी कळवले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.