कोल्हापूर – जनवादी सांस्कृतिक चळवळीच्यावतीने दुसरे साहित्य संस्कृती संमेलन २० व २१ जानेवारी २०२४ ला येथील शाहू स्मारक भवनमध्ये घेण्यात येणार आहे, अशी माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार दशरथ पारेकर यांनी दिली.
८ व ९ मे २०२२ रोजी सावंतवाडी येथे पहिले जनवादी साहित्य संस्कृती संमेलन जेष्ठ पत्रकार आणि लेखिका संध्या नरे पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते. चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्याचे उद्घाटन केले होते. साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात दलित, आदिवासी, बहुजन कष्टकरी, भटके विमुक्त, अल्पसंख्याक आणि स्त्रिया यांच्या बाजूने प्रभावी हस्तक्षेप करावा या हेतूने ही चळवळ उभी राहत आहे. जनवादी चळवळीने केवळ साहित्य संमेलन घेऊन न थांबता वर्षभर सातत्याने साहित्य संस्कृतीला पुढे नेणारे सांस्कृतिक कार्यशाळा, चर्चा, चिंतन शिबिरे, चर्चासत्रे, पुस्तक प्रकाशने इत्यादी उपक्रम राबवित आहे.
कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि गोवा येथील साहित्य सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी एकत्र येत जनवादी सांस्कृतिक चळवळ सुरु केली आहे. सावंतवाडी येथे झालेल्या पहिल्या संमेलनानंतर हे दुसरे साहित्य संस्कृती संमेलन कोल्हापूर येथे होत आहे. कोल्हापूरात होणाऱ्या या संमेलनाच्या तयारीसाठी गेले दोन महिने बैठका होत आहेत. बैठकीला संयोजन समितीचे अध्यक्ष दशरथ पारेकर, कार्याध्यक्ष संपत देसाई, उपाध्यक्ष मेघा पानसरे, मंजुश्री पवार, सचिव अरुण शिंदे, सहसचिव सत्यजित जाधव, पियुषा पाटील, वसंतराव मुळीक, चंद्रकांत यादव, अविनाश भाले, कृष्णात स्वाती, रुपेश पाटील, शैला कुरणे, युवराज जाधव, कृष्णा पाटीलं, सुधीर नलवडे उपस्थित होते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.