कोल्हापूर जिल्ह्यातील नव्या पिढीतील निवडक कवींच्या कवितांचा प्रतिनिधिक कवितासंग्रह कलानगरीची कविता याचे प्रकाशन रविवारी ( १३ जुलै ) कॉमर्स कॉलेज येथे सायंकाळी चार वाजता होत आहे. त्या निमित्ताने….
कोल्हापूर जिल्ह्याला कलेची सशक्त परंपरा आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांसारख्या दूरदृष्टीच्या जाणत्या आणि कलासक्त राजाने ती या मातीत प्रयत्नपूर्वक रुजवली आहे. चित्र, शिल्प, संगीत, नाटक आणि साहित्य अशा विविध कलांनी ती समृद्ध केली आहे. तिला कोल्हापूरच्या अस्सल मातीचा गंध आहे. पंचगंगेच्या पाण्यावर ती पोसली आहे. त्यामुळेच कोल्हापूरला ‘कलानगरी’ असेही मानले जाते. इथल्या लेखक कवींनी या कलानगरीच्या वैभवात मोठी भर घातली आहे. कसोटीच्या वेळप्रसंगी त्यांनी समाजहिताची भूमिकाही निभावली आहे. त्या परंपरेच बोट पकडूनच इथले आजचे कवी स्वतःची स्वतंत्र वाट शोधताना दिसतात.
एकनाथ पाटील, इस्लामपूर
कविमित्र गोविंद पाटील एक हाडाचा शिक्षक. आपल्या तेहतीस वर्षांच्या नोकरीत शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांसाठी त्याने अनेक उपक्रम राबवले. कोवळे कोंब फुलून यावेत, ते बहरावेत, त्यांना चांगली पालवी फुटावी, जितका विस्तार व्हावा तितकीच त्यांची मूळं खोलवर रुजावीत आणि तितकेच ते उंचही जावेत यासाठी नेहमी तो प्रयत्नशील राहिला. सतत नवनवे प्रयोग करीत राहिला. शाळा बदलत राहिल्या पण त्याच्या नवनिर्माणाचा ध्यास काही संपला नाही. ज्या शाळेतून बदलून गेला, तिथे आपल्या कामाचा ठसा मागे ठेवून, तिथून सोबत नवे काही घेऊन तो पुढे निघाला. नव्या ठिकाणी नवी ‘रुजवण’ केली. तिचा विस्तार होईल असे पाहिले. मात्र मागचे पाश कधी त्याने तोडले नाहीत. विद्यार्थी-शिक्षक सहसंबंधाची एक सुंदर वीण तो गुंफत आला, त्याचा विस्तार करीत आला. या विस्ताराशी लेखक, कवी, कलावंत, कार्यकर्ते अशा अनेकांना त्याने जोडून घेतले आणि त्यामुळेच एक ‘विद्यार्थिप्रिय शिक्षक’ अशी सर्वदूर त्याची ख्याती आहे.
‘शिक्षण ही केवळ एक चाकोरीबद्ध प्रक्रिया नसून तिचा अवकाश खुला असला पाहिजे. मुलांना मुक्त वातावरणात शिकता आले पाहिजे’, यासाठी कायम तो धडपडत राहिला. मुलांना त्याने वर्गाबाहेरचे, अभ्यासक्रमापलीकडचे जग दाखवले. दिवाळी सुट्टीत जाणीव जागृती शिबिरे, बालकुमारांची साहित्य संमेलने, कौशल्य विकास कार्यशाळा, लेखन कार्यशाळा, पुस्तकांशी मैत्री आणि वाचनकट्टा, जंगल भ्रमंतीसह निसर्गवाचनाचे कृतिशील धडे, अंधश्रद्धा निर्मूलनाची प्रात्यक्षिके, दर महिन्यागणीक वेगवेगळ्या चित्रपटांची ओळख, कथाकथन भाषण मुलाखत चित्रशिल्प प्रात्यक्षिके असे अनेक प्रयोग त्याने राबवले. जे मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे होते. आपल्या विद्यार्थ्यांना सर्वोत्तम जे जे देता येईल, ते ते देण्याचा त्याने कसोशीने प्रयत्न केला. त्यातून मुलांच्या जाणिवा समृद्ध केल्या. प्रसंगी त्यासाठी झीज आणि पदरमोड दोन्ही सोसले आणि म्हणूनच तो हाडाचा शिक्षक आहे.
‘थ्री इडीयट’ चित्रपटातल्या फुनसुक वांगडूचा तो जणू धाकटा भाऊ आहे. एखाद्या दुर्गम भागातल्या शाळेत मुलामुलींच्या टॉयलेटची अडचण असेल, तर लोकवर्गणीतून त्याने ते उभा केले. स्वतःच्या मालकीच्या नव्या वास्तुप्रवेशावेळी मित्रमंडळी आणि नातेवाईकांकडून आहेरापोटी जमा झालेली सगळी रक्कम त्याने या लोकवर्गणीत जमा केली आणि तरीही टॉयलेट उभारणीसाठी कमी पडणारी जी रक्कम होती, ती स्वतःच्या खिशातून घातली. त्याच्या व्यक्तिमत्वात नवीन काही निर्माण करण्याची आस असलेला जसा एक काळजीवाहू शिक्षक, तसाच सतत अस्वस्थ असलेला एक सजग कार्यकर्ताही दडला आहे.
तो शिक्षक आहे खरे, पण कवीहृदयाचा शिक्षक आहे. मुळातच तो कमालीचा संवेदनशील आहे. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणारा आहे. कुणी काहीही म्हणो सतत नवे काही करीत राहण्याची, नवे चांगले शोधत राहण्याची त्याची वृत्ती आहे. त्यामुळे नेहमी मुलांत मुल होऊन तो वावरला. मुलांचे जग, त्यांचे भावविश्व त्याने नीटसे समजून घेतले. त्याच्याशी तो समरस झाला. आवडता शिक्षक म्हणून अशा अनेक मुलांच्या हृदयात आजही त्याला मोठे आत्मियतेचे स्थान आहे. ‘मुळात कवी, शिवाय शिक्षक’ त्यामुळे त्याच्या हाताखाली शिकलेला विद्यार्थी त्याला आयुष्यभर लक्षात ठेवील; इतके या मुलांशी त्याचे दृढ नाते आहे. ‘गावकिर्तन’ या शेतीमाती आणि गावखेड्याचे वर्तमान अधोरेखित करणाऱ्या त्याच्या कवितासंग्रहाची मराठीच्या वाङ्मयविश्वात चर्चा झाली.
या कवितासंग्रहाला राज्यस्तरावरचे प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले. पाठोपाठ ‘उद्ध्वस्त ऋतुंच्या कविता’, ‘धूळधाण’ हे कवितासंग्रहही प्रकाशित झाले. या कवितासंग्रहांबरोबरच ज्या लहान मुलांमध्ये साने गुरुजींचे धडपडणारे मुल होऊन तो रमला त्या मुलांसाठीही त्याने ‘थुई थुई आभाळ’ या शीर्षकाने बालकवितांचा संग्रह प्रकाशित केला. पारंपरिक बालकवितेपेक्षा या संग्रहातील बालकविता सर्वस्वी वेगळी आहे. या बालकवितासंग्रहातले जग अनोखे आहे. मुलांच्या सर्जनशीलतेला आवाहन करणारे हे विज्ञानाधिष्ठित जग आहे. त्यामुळे या संग्रहाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. शिवाजी विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात या संग्रहाचा समावेश झाला. या संग्रहातल्या अनुभवांचा सगळा ऐवज त्याला त्याच्या विद्यार्थ्यांकडून मिळाला आहे.
विद्यार्थ्यांना घडवता घडवता स्वतः घडत गेलेला हा शिक्षक आज तेहतीस वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाला आहे. त्याच्या निवृत्तीनिमित्त त्याचा गौरवांक प्रकाशित करण्याची कल्पना मित्रांमधून पुढे आली. त्याला त्याचा विरोध होता. मित्र ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. मग त्यांना काय करायचे ते करू द्यावे आणि आपण वेगळे काही करावे, असा एक विचार काही निवडक मित्रांमधून पुढे आला. पण नेमके काय करावे, सुचत नव्हते. मग गोविंदनेच मार्ग सांगितला. ‘आपण कवी आहोत. ज्या प्रदेशातले प्रश्न आपण कवितेतून मांडले, त्या प्रदेशातल्या नव्या पिढीची आजची कविता नेमकी कशाविषयी बोलते याचा या निमित्ताने शोध घेऊया’, असा प्रस्ताव मग त्यानेच मांडला. कल्पना चांगली होती. सर्वांनीच ती उचलून धरली. गोविंद पाटील यांची जडणघडण कोल्हापूर जिल्ह्यात झाली आहे. नोकरीचा सुमारे नव्वद टक्के काळ त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातच घालवला. . त्यामुळेच त्याच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने प्रकाशित करावयाच्या या पुस्तकाला कोल्हापूर जिल्ह्याची मर्यादा घालून घेण्यात आली आहे.
यापूर्वी सुहास एकसंबेकर यांनी ‘कोल्हापूरची कविता’ या शीर्षकाने असा प्रयोग केला आहे. फेब्रुवारी २००८ मध्ये लोकवाङ्मयगृहाने तो कवितासंग्रह प्रकाशित केला होता. त्याला आज पंधरा वर्षांपेक्षाही अधिक काळ उलटून गेला आहे. वर्षागणीक माणसांच्या जगण्याचे संदर्भ झपाट्याने बदलत असतात. आता तर या बदलाचा वेग प्रचंड आहे. जगण्याचे संदर्भ बदलले की कवी/ लेखकांच्या लेखनाचे विषयही बदलत जातात. मग सुमारे पंधरा / सोळा वर्षांनंतर इथले कवी नेमके कोणत्या प्रश्नांविषयी बोलतात. इथल्या वास्तवाला ते कसे भिडतात ? अभिव्यक्तीच्या कोणकोणत्या वाटा शोधतात? आजूबाजूचा काळ त्यांच्या कवितेत कसा दिसतो ? या प्रश्नांची उत्तरे समजून घेण्याच्या उद्देशाने प्रातिनिधिक कवितासंग्रह प्रकाशित करण्याचे निश्चित केले गेले. कवींशी संपर्क करण्यात आला आणि अगदी अनपेक्षितपणे या संग्रहाच्या संपादनाची जबाबदारी माझ्यावर आली.
गोविंद हा माझा अत्यंत जवळचा मित्र आहे. तो शिकायला असल्यापासून आजतागायत गेली चौतीस / पस्तीस वर्ष त्याचे माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सुखदुःखाच्या अनेक प्रसंगात जिवाभावाचे मित्र म्हणून एकमेकांच्या आम्ही सोबत आहोत. अनेक चढउतार आले. समज / गैरसमजाचे प्रसंग आले, तरी त्यावर मात करून आजही हे संबंध अधिक घट्ट आहेत आणि त्यामुळेच प्रकृतीची अडचण असतानाही मोठ्या आनंदाने या पुस्तकाच्या संपादनाची जबाबदारी मी स्वीकारली. या संग्रहात समाविष्ट केलेले सर्वच कवी गोविंदच्या सुरवातीच्या काळातल्या विद्यार्थ्यांच्या वयाचे आहेत. हे इथं जाणीवपूर्वक नमूद करायला हवे.
॥२॥
कोल्हापूर जिल्ह्याला कलेची सशक्त परंपरा आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांसारख्या दूरदृष्टीच्या जाणत्या आणि कलासक्त राजाने ती या मातीत प्रयत्नपूर्वक रुजवली आहे. चित्र, शिल्प, संगीत, नाटक आणि साहित्य अशा विविध कलांनी ती समृद्ध केली आहे. तिला कोल्हापूरच्या अस्सल मातीचा गंध आहे. पंचगंगेच्या पाण्यावर ती पोसली आहे. त्यामुळेच कोल्हापूरला ‘कलानगरी’ असेही मानले जाते. इथल्या लेखक कवींनी या कलानगरीच्या वैभवात मोठी भर घातली आहे. कसोटीच्या वेळप्रसंगी त्यांनी समाजहिताची भूमिकाही निभावली आहे. त्या परंपरेच बोट पकडूनच इथले आजचे कवी स्वतःची स्वतंत्र वाट शोधताना दिसतात. पिंडानं कवी आणि कार्यकर्ता असलेल्या गोविंद पाटील या शिक्षक मित्राच्या सेवानिवृत्तीनिमित्त ‘कलानगरीची कविता’ या शीर्षकाने प्रकाशित होत असलेल्या या प्रातिनिधिक कवितासंग्रहात कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध भागातल्या वेगवेगळ्या जाणिवेच्या निवडक कवींचा समावेश आहे. एका मनस्वी कवीच्या सेवानिवृत्तीनिमित्त नव्या पिढीतील कवींच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन हा वेगळा प्रयोग वाचकांना निश्चितच आवडेल, असा विश्वास वाटतो.
कोल्हापूरची कलानगरी अशी ओळख शाहू महाराजांनी जाणीवपूर्वक घडवली. हे सगळे कलावंत कोल्हापूरनगरी आणि संस्थांनातील आसपासच्या खेडेगावांमधून शाहू महाराजांच्या आश्रयाला आले. यापैकी काही महाराजांनी हेतुपूर्वक शोधून आणले. त्या सर्वांनी मिळून प्रयत्नपूर्वक कोल्हापूरला ‘कलानगरी’ अशी ओळख मिळवून दिली. त्यामुळे या संग्रहाच्या शीर्षकातील ‘कलानगरी’ ही संकल्पना एकट्या कोल्हापूर शहरापुरती मर्यादित नसून ती कोल्हापूर जिल्हा आणि परिसर अशा व्यापक अर्थाने वापरली आहे.
विविध कलांच्या परंपरेबरोबरच कोल्हापूरची वाङ्मयीन परंपरा तितकीच सकस आहे. तुलनेने कविता सगळीकडेच अधिक प्रमाणात लिहिली जाते, तशी ती कोल्हापूर जिल्ह्यातही लिहिली गेली आहे. उपलब्ध माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्याच्या कवितेला सुमारे चारशे वर्षांची दीर्घ परंपरा आहे. अभंग, ओवी, पोवाडा आणि लावणी हे काव्यप्रकार या कवितेचे अविभाज्य भाग आहेत. सोळाव्या शतकात होऊन गेलेल्या वामनपंडित (इ. स. १६०८ ते इ. स. १६९५) या पंडिती परंपरेतल्या कवीने करवीरनगरीच्या मुक्कामात श्रीजगदंबेच्या देवळात ‘नामसुधे’ सारखे श्रीकृष्णभक्तीपर प्रकरण रचल्याचे संदर्भ मध्ययुगीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासात सापडतात. वामनपंडित हे पंडिती संप्रदायाचे प्रातिनिधिक कवी होते.
‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ हा वारकरी संप्रदायाचा समग्र इतिहास केवळ एका अभंगात सांगणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या विविध भागात भ्रमंती करून कोल्हापूरला स्थायिक झालेल्या तुकारामशिष्या सुप्रसिद्ध संतकवयित्री बहिणाबाई (इ. स. १६२८ ते इ. स. १७००) यांचे कवित्व याच परिसरात फुलले. कोल्हापूरचे संतपुरुष जयरामस्वामी यांचे व्यक्तिचित्र अत्यंत आदरपूर्वक त्यांनी आपल्या अभंगातून उभा केले आहे. जयरामस्वामी यांचेकडूनच तुकोबांची कीर्ती त्यांना समजली आणि त्या तुकोबांच्या शिष्या बनल्या. बहिणाबाईंनी आपल्या अभंगवाणीत संत कबीर, संत मीराबाई आणि संत रोहिदास या हिंदी भाषिक संत कवींचा मोठा गौरवपूर्वक उल्लेख केला आहे. शिवाय स्वतः हिंदी भाषेत काही अभंगही रचले आहेत. भारतभ्रमण करणाऱ्या आणि उत्तर भारतीय कवितेशी थेट नाते जोडणाऱ्या संत नामदेवांची बहुभाषिक कवितेची परंपरा त्यांनी उजागर केली आहे.
पंडिती परंपरेतल्या कवी मोरोपंत (इ. स. १७२९ ते इ. स. १७९४) यांचा जन्म तर पन्हाळगडावर झाला होता. वयाच्या चोवीसाव्या वर्षापर्यंत (इ.स. १७५३ पर्यंत) पन्हाळगडावर त्यांचे वास्तव्य होते. कविता करणे, हा त्यांचा आवडता छंद होता. काळाच्या दृष्टीने पंडिती परंपरेतले ते शेवटचे कवी ठरतात.
संस्थानिक काळात छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या दरबारात राजकवी म्हणून कवी सुमंत (अप्पाराव धुंडीराम मुरतुले) यांची नेमणूक होती. रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार मिळाला तेव्हा खास त्यांच्या अभिनंदनासाठी शाहू महाराजांनी राजकवी सुमंत यांना कलकत्याला पाठवले होते. कोल्हापूरच्या कलापरंपरेत कवितालेखनाला विशेष प्रतिष्ठा होती ; याचेच हे द्योतक आहे. पुढे रविकिरण मंडळाचे सदस्य असलेल्या आणि सौंदर्यवादी भावकवितेचा प्रवाह मराठीत आणणाऱ्या माधव जूलियन यांचेही वास्तव्य काही काळ कोल्हापुरात होते.
‘अजुनी चालतोची वाट’ सारखी प्रसिद्ध कविता लिहिणारे कविवर्य एकनाथ पांडुरंग रेंदाळकर, ‘युगायुगाचे सहप्रवासी’ (१९४६) सारखी अतिवास्तववादी दीर्घकविता लिहिणारे कवी मनमोहन आणि मराठी आधुनिक कवितेला खरे आधुनिक रुप देणारे ‘भिजकी वही’ कवितासंग्रहाचे कवी अरुण कोलटकर कोल्हापूरचेच. याबरोबरच मराठी भाषेला ज्यांच्या कवितेने तिसरे ज्ञानपीठ मिळवून दिले ते कविवर्य विंदा करंदीकर यांचे काही काळ कागलमध्ये तर विलास सारंग यांचे काही काळ कोल्हापूरमध्ये वास्तव्य होते. या सर्वच कवींनी कोल्हापूरची कविता समृद्ध केली आहे. त्यामध्ये पिराजीराव सरनाईक आणि कुंतिनाथ करके या शाहिरांनी तिला लोकपरंपरेचा
साज चढवला.
कोल्हापूरच्या कवितेचा हा समृद्ध वारसा नंतरच्या काळातल्या प्रसन्नकुमार पाटील, राजन गवस, मोहन पाटील, श्यामकांत जाधव, चंद्रकांत कल्लोळी, दिलीप धोंडो कुलकर्णी, बाबा मोहम्मद अत्तार, विजय पोवार, अनिल द्रविड, रवींद्र ठाकुर, सुहास एकसंबेकर, ज्ञानेश्वर मुळे, मंदा कदम, रविप्रकाश करंबळीकर, राजा शिरगुप्पे, जयसिंग पाटील, श्रीधर तिळवे, धम्मपाल रत्नाकर, संजय कृष्णाजी पाटील, रफीक सूरज, सतीश सोळांकुरकर, विजय चोरमारे, गोविंद पाटील, श्यामसुंदर मिरजकर, श्रीराम पचिंद्रे, माधव बावडेकर, राजकुमार यादव, दीपक बोरगावे, पाटलोबा पाटील, अशोक भोईटे, जीवन साळोखे, वि. मा. सुरंगे, बी. जी. चव्हाण, राजन कोनवडेकर, बाळ पोतदार, दिलीप निंबाळकर, मानसी दिवेकर, महंमद नाईकवाडे, चंद्रकांत पोतदार, विलास माळी, राजेंद्र पाटील, सुनंदा शेळके, गौरी भोगले, श्रीकृष्ण महाजन, हिमांशु स्मार्त, मधुकर जांभळे, प्रसन्न जोशी, कुंडलिक मोरे, श्रीकांत पाटील, गौतम कांबळे, नारायण पाटील अशा विविध वृत्तीप्रवृत्तींच्या अनेक कवींनी अधिक विस्तारला. त्यामध्ये चंद्रशेखर कांबळे, साहील कबीर, विनायक होगाडे, जयप्रभु कांबळे या नव्या पिढीतल्या कवींनी भर टाकली आहे.
ही नामावली अजूनही वाढू शकते. ही नावे केवळ वानगीदाखल आहेत. ही सगळीच कविता गंभीर स्वरुपाची होती असे नव्हे. यापैकी बरेच हौशी कवी होते. एका विशिष्ट काळानंतर ते लिहायचे थांबले. अनेकजण अगदी एका एका संग्रहात संपून गेले. कांहींजण इथल्या वाङ्मयीन अनास्थेचे बळी ठरले. त्यांचे तर संग्रहही निघाले नाहीत. मात्र यापैकी काहीजण निष्ठेने लिहीत राहिले. त्यांची संख्या कमी होती. मात्र मराठीच्या वाङ्मयीन पर्यावरणाला त्यांच्या लेखनाची नोंद घ्यावी लागली. अशा प्रसन्नकुमार पाटील, मोहन पाटील, श्रीधर तिळवे, धम्मपाल रत्नाकर, संजय कृष्णाजी पाटील, रफीक सूरज, सतीश सोळांकुरकर, विजय चोरमारे, गोविंद पाटील, श्यामसुंदर मिरजकर या कवींनी एकूण मराठी कवितेत कोल्हापूरच्या कवितेचे स्थान अधोरेखित केले आहे.
इतर वाङ्मय प्रकारांच्या तुलनेत सर्वत्र लिहिल्या जाणाऱ्या कवितेसारखेच या नंतरच्या पिढीत इथेही कवितालेखनाचे प्रमाण अधिक आहे. कवितेचे विविध प्रकार हाताळणारे कवी नव्या पिढीत सापडतात. मात्र यापैकी मोजक्या जणांकडे कवितालेखनाची गंभीर दृष्टी दिसते. अशी दृष्टी असलेली कविता कोल्हापूरच्या कवितेचा उद्याचा चेहरा असेल. प्रस्तुत संग्रहात समाविष्ट करण्यात आलेले कवी हे प्रतिनिधी आहेत. उद्याच्या काळातील कोल्हापूर परिसरातील कविता कोणत्या प्रश्नांची मांडणी करते, याचे काही एक सूतोवाच या प्रातिनिधिक कवितासंग्रहातून होते. काही एक निकष लावून या कवींची निवड केली आहे. कोल्हापूरच्या कवितेची परंपरा हे कवी अधिक समृद्ध करतील, अशी आशा आहे. तशा खुणा यापैकी काहीजणांच्या लेखनामध्ये सापडतात.
॥३॥
‘कविता दुवाय जीवघेण्या जगण्याच्या सहित उगवून आलेलं हंगामी फुल.’ अशा एका आशादायी दृष्टिने साहिल कबीर हा कवी आपल्या कवितेकडे पाहतो. जगण्यातली निराशा, वैफल्य, तुटलेपण यामागची कारणमीमांसा करणारा हा कवी भोवतालातल्या दुःखाचा शोध घेतो. कवितेकडे एका स्पष्ट भूमिकेतून पाहाणारा हा कवी आहे. आपल्या भोवतालाचा सजगपणे तो अन्वयार्थ लावतो. मराठी संत कवितेचा कळस असलेल्या संत तुकारामांचं कवित्व आणि व्यक्तित्व केंद्रस्थानी ठेवून ‘डियर तुकोबा’ सारखे काव्यात्म मुक्तचिंतन लिहिणारा विनायक होगाडे हा कवी आपल्या कवितेतही तुकारामालाच केंद्रस्थानी ठेवतो आणि आजच्या वर्तमानासह व्यवस्थेची चिकित्सा करतो. महाकाव्य आणि भक्ती परंपरेतल्या प्रतीकांचा आज सोयीनुसार राजकारणासाठी होत असलेला वापर हा मोठा चिंतेचा विषय आहे. कवीला तो अस्वस्थ करतो.
या पार्श्वभूमीवर ‘कबिराच्या घरी आहे कोण ?
आतमध्ये बसलेला नामा, एका, तुका आणि कबिराचे मित्र दोन. ‘
या सांस्कृतिक समन्वयाच्या परंपरेची तो आठवण करुन देतो आणि ‘गांधींच्या स्वप्नातील रामराज्यामध्ये, मिटो काळजी अगदी ‘चिमणीच्या पोटाचीही’ असे पसायदान मागतो.
माणसांचं जगणं व्यापून टाकणाऱ्या आजच्या राजकारणाच्या घसरलेल्या स्तराबद्दल आणि लोकशाहीच्या भवितव्याबद्दल शरद आजगेकर या कवीची कविता चिंता व्यक्त करते.
‘मोकळ्या श्वासांचीही भलीमोठी किंमत
मोजावी लागेल सगळ्यांना…’
असा इशारा ही कविता देते आणि वेळीच आपण सावध झालो नाही, तर भविष्यात येऊ घातलेल्या अराजकाच्या भयाचे सूचन करते. कवितालेखनामागच्या भूमिकेचं स्पष्ट आकलन असलेला हा कवी आहे. इथल्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक संघर्षाच्या चिकित्सेचं तीव्र भान त्याची कविता प्रकट करते. कोल्हापूरच्या वाङ्मयीन पर्यावरणापासून अलक्षित राहिलेला हा महत्त्वाचा कवी आहे.
नोकरीच्या निमित्ताने ‘गाव पाठीवर घेऊन’ महानगरात आयुष्य घडवायला गेलेल्या पिढीचं मनोगत बाळासाहेब पाटील या कवीच्या कवितेत दिसते.
गावखेड्याच्या संस्कारात वाढलेल्या आणि पोटापाण्यासाठी शहर जवळ कराव्या लागलेल्या पिढीची घुसमट बाळासाहेबच्या कवितेत दिसते. गावाची जन्मजात ओढ आणि शहराने लादलेली स्थलांतराची अपरिहार्यता या दोन मूल्यव्यवस्थांमधला ताण ही कविता अधोरेखित करते. आजच्या खेड्यापाड्यातल्या बदलत्या राजकारणावर ही कविता भाष्य करते. आजचा काळ जात, धर्म, पंथ, प्रदेश यांच्या अतिरेकी अस्मितांच्या अतितीव्र कल्लोळांचा काळ आहे आणि या काळात माणूसपण जपण्याचे भान उमेश सुतार यांची कविता व्यक्त करते. हाच धागा विक्रम वागरे या कवीच्या कवितेत अधिक विस्तारताना दिसतो. तो म्हणतो,
‘मंदिरातल्या नंदीची
विटंबना झाली म्हणून बैलांनी केलेली जाळपोळ
ऐकिवात नाही अजून तरी
नि कुठल्याच म्हशीने केलेला नाही
वर्णभेदाचा आरोप आजतागायत
एकाही म्हशीला. ‘
माणसामाणसांत भेदाच्या भिंती उभा करणाऱ्या विषमतेला नकार देऊन सर्व धर्मातल्या माणूसपण उजागर करणाऱ्या रचनात्मक तत्त्वज्ञानाच्या समन्वयाचे स्वप्न हा कवी पाहातो. आजच्या पिढीचं कवितेविषयीचं आकलन किती स्पष्ट आणि निर्मळ आहे, याचं प्रत्यंतर दत्तात्रय गुरव यांची कविता वाचताना येते. ‘मी लिहीत राहिलो नसतो, तर एव्हाना मरुन गेलो असतो’ ही त्याची ओळ लेखनकृतीबद्दल अंतर्मुख होऊन विचार करायला लावते. कवीच्या जगण्यातील लेखनकृतीचं महत्त्व ती अधोरेखित करते. या पिढीची प्रेमकविताही खूप धीट आहे. काळानुरुप तिची परिभाषा बदलली आहे.
‘अपेक्षांचे, जातियतेचे
निष्प्राण कलेवर फेकून देऊ माणूस म्हणून पुन्हा नव्याने
भेटू आपण पुढल्या जन्मी. ‘
असा आशावाद गुरव यांची कविता जागवते. तर परंपरांच्या आणि जबाबदारयांच्या ओझ्यानं दबलेल्या बाईच्या जगण्याची चुंबळ आणि पोटात असंख्य जखमा घेऊन उभ्या असलेल्या शहराच्या जगण्यातली वेदना अतिशय प्रभावी शब्दात रोहित शिंगे यांनी टिपली आहे.
काळीज करप्ट करणारा ‘व्हायरस’ मानवी नात्यात घुसू नये, अशी प्रार्थना सुनिल पाटील हा कवी करतो. अतिशय भावनाप्रधान कविता लिहिणारा हा कवी दुसरीकडे आजच्या कार्पोरेट काळाची भाषा बोलतो. मानवी मेंदूला सोशलमिडियाचा विळखा पडल्याच्या काळात माणूसपण हरवल्याची खंत नोंदवतो. चांगली कविता लिहिण्याची क्षमता असलेला हा कवी ऐन तारुण्यात अकाली काळाच्या पडद्याआड गेला. चारोळी सदृश्य कविता लिहिणाऱ्या विद्या खामकर यांची कविता अल्पाक्षरी आहे. जगण्यातल्या छोट्या छोट्या अनुभवांना भाषेच्या चिमटीत पकडून त्यांना शब्दरूप देण्याचा त्या प्रयत्न करतात. ‘जगण्यातून कविता निसटून नये म्हणून’ चिंताग्रस्त असलेला बबलू वडर हा कवी मुक्तछंदाबरोबरच ओवीतूनही व्यक्त होताना दिसतो.
माय मातीचं काळीज
मऊ चिखलाचं लोणी
खोल कातळाचा ऊर
माय पाझराचं पाणी.
अशा मनाला चटका लावणाऱ्या ओळी हा कवी लिहून जातो. पसाभर दाणं खळ्याबाहेर सांडण्याचा काळ संपल्याने आज चिमण्या गायब झाल्याची खंतही व्यक्त करतो.
लोकपरंपरेतल्या लोककवितेची तीव्रतेने आठवण यावी आणि तालासुरात गाता यावी अशी मंदार पाटील यांची कविता आहे. संवादी शैली हे त्यांच्या या कवितांचे वैशिष्ट्य आहे. ‘पृथ्वी सोडून आपण कुठे जाणार आहोत?’ असा थेट प्रश्न कवितेतून उपस्थित करणाऱ्या महानंदा मोहिते या कवयित्रीची कविता अतिशय तरल आणि भावनाप्रधान कविता आहे. त्यांची कविता वाचताना तीव्रतेने कवी ग्रेस आणि ना. धों. महानोर यांच्या कवितेची आठवण येते. मोहक भावावस्था आणि निसर्गचित्रे यांचा मिलाफ त्यांच्या कवितांतून अनुभवास येतो. आपल्याच नादात वाहत जाणारी ही कविता लक्षवेधी आहे.
‘या श्यामल संध्याकाळी पाण्यात गुंतले मौन
किरणांचा धुसर पसारा
गात्रांत वाहते कोण ?’
असे तरल प्रश्न ही कविता उपस्थित करते. अज्ञाताच्या शोधात निघालेली ही कविता भावमधूर आहे. तिला तिचे असे स्वतःचे व्यक्तिमत्त्व आहे.
शिवाजी देसाई, आनंद रंगराज, रवींद्र गुरव आणि संजय खोचारे या कवींची कविता गावशिवाराची कोंडी आणि गोतावळ्या विषयीचे प्रेम यामधून उगवून आली आहे. आजी, आई, बाप, जिवाभावाचा गोतावळा, शेतशिवार आणि गावगाडा हे त्यांच्या कवितेचे आस्थाविषय आहेत. शेतीवरची आक्रमणं आणि त्यातून उद्ध्वस्त होत निघालेल्या गावगाड्यातले प्रश्न हे कवी आपल्या कवितेतू मांडतात. ‘आई वजा जाता’ या कवितेत कवी शिवाजी देसाई म्हणतो,
‘आई वजा जाता
भकास होईल मळादळा
जित्राबाला मरणकळा
जात्याची होईल शिळा
नातरुंडांचा आटेल लळा. ‘
महापुरानंतर घरदार आणि शिवार उद्ध्वस्त झालेल्या माणसांची व्यथा कवी आनंद रंगराज प्रकट करतो. तर कोरोना आपत्तीकाळात माणसांच्या जगण्यात निर्माण झालेली अस्थिरता आणि अशाश्वतता रवींद्र गुरवच्या कवितेतून व्यक्त होते. अत्यंत साध्या सोप्या भाषेत संजय खोचारे या कवीची कविता शेतकऱ्याचे कृषिकर्म वाचकाच्या नजरेसमोर उभा करते. अतिवृष्टीने भूमीपुत्रांची झालेल्या असाहाय्य अवस्थेबरोबरच ‘पाणी अडवा पाणी जिरवा’, ‘लेक वाचवा’ असे साधेसोपे विषय खोचारेंच्या कवितेचे विषय बनतात.
आई, वडील, पत्नी या कौटुंबिक परिघावर विक्रम राजवर्धन या कवीची कविता फोकस करते. धर्मनिरपेक्षता, लोकशाही अशा विषयांवर ही कविता वरच्या आवाजात बोलते. मात्र ती तपशिलात अडकून पडते. तर नदी, शेतमालाचा भाव, जातीय विषमता, धार्मिक अस्मिता आणि लोकशाही हे संदीप भुयेकर या कवीच्या कवितेचे विषय आहेत. गेयता हा त्यांच्या नदी कवितेचा विशेष आहे. ‘झाड’, ‘मामाचा गाव’ असे विषय रमीजा जमादार या कवयित्रीच्या कवितेत येतात. शाळकरी वयात लिहिलेल्या तिच्या या कविता आहेत. त्यावेळच्या तिच्या वयाचा विचार करता तिच्या बालसुलभ भावना या कवितेतून प्रकट झाल्या आहेत. वाडीवस्तीवर डोंगरदऱ्यात वाढलेल्या या मुलीचे अनुभवविश्व समृद्ध आहे. उद्याच्या काळात तिच्याकडून अधिक चांगल्या कवितेची अपेक्षा आहे. तर गझल आणि मुक्तछंदात व्यक्त होणारा विश्वास पाटील हा कवी आपल्या भोवतालातले प्रश्न मांडताना दिसतो.
आपल्या लेखनाकडे गंभीरपणे पाहणारे कवी जसे या कवितासंग्रहात दिसतील, तसेच भविष्यात अधिक चांगली कविता लिहिण्याची क्षमता असलेले कवीही भेटतील. त्यामुळे या संग्रहातली सगळीच कविता अस्सल आहे, असा दावा मुळीच नाही. या संग्रहातून कोल्हापूर जिल्हा आणि परिसरात आज लिहिल्या जाणाऱ्या कवितेचा तोंडवळा ढोबळमानाने समोर यावा, हा या प्रयोगामागचा हेतू आहे. प्रत्येक कवीने पाच कविता पाठवाव्यात अशी सूचना करण्यात आली होती. मात्र काहींनी पाचपेक्षा अधिक तर काहींनी पाचपेक्षा कमी कविता पाठवल्या. पाठवलेल्या कवितांमध्ये ज्यांच्या अगदीच सुमार कविता होत्या, त्या या संग्रहातून वगळण्यात आल्या. त्यामुळे सर्व कवींच्या कवितांच्या संख्येत एकवाक्यता ठेवता आलेली नाही.
अपवाद वगळता यापैकी एखाद्या कवीची एक कविता चांगली वाटेल, तर आशयसूत्र चांगले असूनही दुसरी कविता कवीला सापडलेलीच नाही असा अनुभव वाचकांना येईल. तर एखाद्या कवितेतल्या चार / दोन ओळी मनाची पकड घेणाऱ्या आहेत आणि तरीही कविता हरवलेली आहे, असाही अनुभव येईल. काही कविता तपशिलाच्या भोवऱ्यात अडकलेल्या दिसतील. अशा कविता जाणीवपूर्वक या संग्रहात ठेवल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कवींच्या आधीच्या पिढीप्रमाणेच या पिढीतही तुलनेने कवितालेखनाचे प्रमाण जास्त आहे. त्यामध्ये मुक्तछंद, गझल, ओवी, चारोळी असे काव्यप्रकार हाताळलेले दिसतात. विशेष म्हणजे काळानुरुप या कवींच्या कवितेची भाषा बदललेली दिसेल. आज सोशलमिडियाने लोकांच्या जगण्याला विळखा घातला आहे, त्याचे प्रतिबिंब या कवितेच्या भाषेत दिसते. आपल्या काळाची भाषा घडवण्याचा या कवींचा हा प्रयत्न मुळातूनच समजून घेण्याजोगा आहे. समकाळाचे व्यापक भानही या कवितांमध्ये दिसते.
मराठीतल्या आधीच्या कवितेचा थेट प्रभावही यापैकी अनेकांच्या कवितेवर दिसतो. वानगीदाखल उमेश सुतारच्या ‘संविधान’ कवितेवरचा कुसुमाग्रजांच्या ‘पुतळे’ कवितेचा प्रभाव दाखवता येईल. राधानगरीचा कवी चंद्रशेखर कांबळे याच्या कवितेतल्या ‘शेणाला गेलेल्या पोरी’ विक्रम वागरेच्या कवितेत ‘पाण्याला जाताना दिसतात आणि विशेष म्हणजे एकाच काळात लेखन करणारे हे दोन्ही कवी एकाच भौगोलिक प्रदेशातले आहेत. संतोष नारायणगावकरच्या कवितेतील ‘नारळाचं पाणी’ असलेली आई बबलू वडरच्या कवितेत ‘पाझराचं पाणी’ होऊन भेटते. तर वीरधवल परब यांच्या कवितेतील ‘कवीची बायको’ विक्रम वागरे आणि विक्रम राजवर्धन यांच्याही कवितेत भेटते.
कवी ग्रेस आणि ना. धों. महानोर यांच्या कवितेतल्या प्रतिमा आणि प्रतीकं सुनिल पाटील आणि महानंदा मोहिते यांच्या कवितेत भेटतात. अशा आणखीही खूप काही जागा या संग्रहात दाखवता येणे शक्य आहे. प्रारंभीच्या लेखनकाळात नव्या लेखक कवींवर असा प्रभाव असतो. एका विशिष्ट काळानंतर तो ओलांडून पुढे जाता आले पाहिजे. पूर्वसूरींचा हा प्रभाव पचवून आपली स्वतंत्र वाट निर्माण करण्याचे आव्हान या कवींसमोर आहे. मंचीय कवितेचा सोसही यापैकी अनेकांना खुणावताना दिसतो. ‘गेय कविता’ आणि ‘टाळ्यांची मंचीय कविता’ यामध्ये मूलभूत फरक आहे. मराठी कवितेची ओवी आणि अभंगाची मूळ परंपरा ही गेयच आहे, पण ती अस्सल आहे. मराठी कवितेची ही अस्सल परंपरा या कवींनी नीट समजून घ्यायला हवी आणि टाळ्यांचा मोह टाळला पाहिजे.
व्यक्त व्हायला अधिक जवळचा आणि खात्रीचा वाङ्मयप्रकार म्हणून कदाचित मोठ्या प्रमाणावर कविता लिहिली जात असावी. ती अल्पावधीत लिहिता येते, असाही एक गैरसमज त्यामागे आहे. मात्र लिहायला ती खूप कठीण आहे. अपवादात्मक स्थितीत कवितेचा प्रत्यक्षातला लेखनकाळ कमी दिसत असला, तरी कवितेची निर्मिती ही खूप दीर्घकालीन आणि कवीला दमवणारी प्रोसेस आहे याचे भान यापैकी कमी जणांकडे दिसते. प्रत्येक काळात ते तसे कमीच असते. कमीअधिक प्रमाणात ज्यांच्याकडे हे भान दिसते, ते साहिल कबीर, विनायक होगाडे, शरद आजगेकर, बाळासाहेब पाटील, रोहित शिंगे, महानंदा मोहिते, विक्रम वागरे, रमिजा जमादार हे कवी कोल्हापूरच्या कवितेची परंपरा उद्याच्या काळात अधिक विस्तारत नेतील अशी काही एक चिन्हे त्यांच्या कवितेत दिसतात.
उद्याच्या काळातला हा ‘कोल्हापूरच्या कवितेचा ‘चेहरा’ असेल, असे म्हणण्याइतपतची क्षमता या कवींकडे आजमितीस तरी दिसते. तर अधिक सखोल कविता लिहिण्याची क्षमता असलेल्या दत्तात्रय गुरव, बबलू वडर, रवींद्र गुरव, आनंद रंगराज, उमेश सुतार, संजय खोचारे, संदीप भुयेकर, शिवाजी देसाई, विक्रम राजवर्धन, मंदार पाटील, विश्वास पाटील, विद्या खामकर या कवींना आपले अनुभवविश्व अधिक विस्तारण्याला संधी आहे. या प्रातिनिधिक कवितासंग्रहातून यापैकी अनेक कवींना आपल्या उणीवांवर मात करुन अधिक सकस आणि सरस लिहिण्याची प्रेरणा मिळेल. कोवळी पालवी फुटलेली ही झाडं उद्या विस्तारतील, बहरतील अशी या निमित्ताने आशा करुया. मराठी कवितेच्या मुख्य धारेत कोल्हापूरची ही कविता उद्याच्या काळात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करेल असा विश्वास वाटतो.
पुस्तकाचे नाव – कलानगरीची कविता
संपादक – एकनाथ पाटील
प्रकाशक – नालंदा प्रकाशन (कोल्हापूर)
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.