August 21, 2025
"लेखक महादेव मोरे यांच्या प्रथम स्मृतीदिनी त्यांचा साधेपणा, जिव्हाळा व 'पीठाक्षरं'सारखी साहित्यनिर्मिती यांना वाहिलेली भावपूर्ण आदरांजली."
Home » पीठाक्षरं गिरविताना…
मुक्त संवाद विशेष संपादकीय

पीठाक्षरं गिरविताना…

आज २१ ऑगस्ट हा जेष्ठ लेखक महादेव मोरे यांचा प्रथम स्मृतीदिन यानिमित्ताने…

रमेश साळुंखे.
संपर्क – 9403572527

अगदी आपसूकच काही माणसांची ओळखदेख होते आणि ती माणसं आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग कधी होऊन जातात; त्याचा थांगपत्ताच लागत नाही. महादेव मोरे यांच्याविषयी माझं नेमकं तसच झालं. विद्यार्थीदशेत असताना मोरेमामांविषयी पुसटसं, अगदी त्रोटक असं वाचलं होतं. निपाणी, त्यांची पिठाची गिरण, तंबाखूच्या वखारी, ड्रायव्हर, कंडक्टर, वारयोषिता असे एकामागून एक संदर्भ वाचनात आणि ऐकण्यातही येऊ लागले होते. या माणसाला एकदा तरी पाहिलं, भेटलं आणि ऐकलं पाहिजे; असं मनोमन वाटू लागलं. तो योग यायला फार दिवस वाटही पहायला लागली नाही. 1992 की 93 हे वर्ष असावं. सांगलीच्या दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मोरेमामांना मी पहिल्यांदा पाहिलं. प्रवेशद्वाराच्या शेजारी एकटेच उभे असलेल्या मोरेमामांकडे पहात कुणीतरी सांगितलं ‘हे निपाणीचे महादेव मोरे.’ पाचएक फुटाच्या आतबाहेर असेलेली उंची, हसरा चेहरा पण खूप काही पाहिले पचविलेल्याची स्पष्ट खूणगाठ असलेला, काळेभोर दाट केस मागे फिरवून बसवलेले, रूंद कपाळ, चष्म्याआडून दिसणाऱ्या डोळ्यांमध्ये विलक्षण चमक, उभ्या आडव्या जाड रेषा असलेला फुल्ल शर्ट-दंडापर्यंत घडी केलेला, ढगळ निळी पँट आणि पायात स्लिपर्स. एकटेच नाट्यगृहाच्या प्रवेशव्दाराजवळ बराच वेळ उभे होते ते. मीही लांबूनच त्यांना निरखून पहात होतो. ओळखदेख नसताना कुणाजवळ जाऊन बसावं, बडबड बोलावं असं माझ्याही स्वभावात नसल्यानं मीही त्यावेळी त्यांच्याशी तेव्हा बोललोच नाही. कुणाही लेखकाच्या संदर्भात प्रत्येकाच्या मनात एक इमेज ठरून गेलेली असते. त्या इमेजला त्यादिवशी तडा गेला. लेखक असाही असू दिसू शकतो-असू शकतो; हे मी प्रथमच पहात होतो.

मोरेमामांचे बहुचर्चित असलेलं एक पुस्तक ‘चेहऱ्यामागचे चेहरे’. या पुस्तकाला नुकताच पुरस्कारही मिळाला होता. मी त्यांच्या अभिनंदनाच्या संधीची वाटच पाहत होतो. खूप दिवसांपासून मला त्यांना भेटायचं होतं, बोलायचं होतं. बऱ्यायाचदा मी निपाणी नगरपालिकेच्या मागे असलेल्या त्यांच्या गिरणी समोरून गेलो आहे. कधी चालत तर कधी दुचाकीवरून. चालताना मी माझी चालण्याची गती मुद्दाम कमी करायचो. सावकाश चालत चालत मान किंचित तिरपी करून गिरणीत डोकावायचो, नव्हे चोरून पाहायचो. पण गिरणीत जाऊन त्यांच्याशी बोलण्याचं धाडस व्हायचं नाही. एकदा असेही वाटले, घरचा दळायचा डबा घेऊन सरळ मोरेमामांच्या गिरणीत जावं आणि बोलावं इकडचं तिकडचं. आणि बाहेर मित्रांमध्ये फुशारकी मारावी ‘कुणा साध्यासुध्या नव्हे; तर महादेव मोरे यांच्या गिरणीत दळलेल्या पिठाच्या भाकऱ्या खाल्या आहेत मी…’ पण गिरणीत येणाऱ्या कुणालाही बोलतं करणाऱ्या मोरेमामांनी मलाही प्रश्न विचारायला सुरूवात केली तर? कारण घराजवळच्या गिरणीला वळसा घालून तीन किलोमीटर लांब असलेल्या या गिरणीकडे हा माणूस आलाच कसा? हा विचार मोरेमामांच्या चाणाक्ष नजरेतून सुटला नसता. आणि मी रंगेहात पकडलो गेलो असतो. त्यामुळे हा विचारही राहूनच गेला. इच्छा असूनही उगाचच मोरेमामांकडे जावं, बसावं, बोलावं असं मला वाटत नव्हतं. बरं बोलणार काय? अशा प्रसंगी मला बोलताच येत नाही. वाचाच बसते. आता त्यांच्याकडे जायला मला कारण मिळाले होते. त्यांचं अभिनंदन करण्याकरिता म्हणून फुलांचा एक गुच्छ घेऊन सायंकाळी चारच्या सुमारास त्यांच्या गिरणीसमोर जाऊन उभा राहिलो. गिरणी तशी ऐसपैस घळघळीत होती. विशेष म्हणजे दळण्यासाठी म्हणून धान्य घेऊन आलेलं एकही गिऱ्हाईक गिरणीत नव्हतं. मोरेमामा बाकड्यावर काहीतरी लिहित बसलेले होते. कपड्यांवर नुकतीच गिरण बंद केल्याच्या खुणा. कपड्यांवर, केसांवर भुरूभुरू पीठ जमा झालेलं. डोळ्यांवर चष्मा, एक पाय खाली मोकळा सोडलेला, दुसरा गुडघ्यात दुमडून खाली वाकून शांतपणे ते कागदावर काहीतरी उतरवत होते. गिरणीबाहेच्या व्यवहारी जगाला जणूकाही त्यांनी पुसूनच टाकलेले होते. त्यांचे ते ध्यान पाहून मलाही शांत, प्रसन्न, आणि हलकं हलकं वाटू लागलं. माझी चाहूल लागताच त्यांनी वर पाहिलं. चेहऱ्यावरचे हसू तसेच ठेवत म्हणाले, ‘‘या! काय काम होतं?’’

कसाबसा म्हणालो, ‘‘तुमचं अभिनंदनही करायचे होतं. पुरस्कार मिळाला आहे तुम्हाला. हा गुच्छ आणलाय तुमच्यासाठी.’’ अर्थातच या अभिनंदनामुळे ते सुखावलेले दिसले. छान हसत बाकड्यावरच त्यांनी मला बसू दिलं. इकडची तिकडची चौकशी केली. ‘‘देवचंद कॉलेजवर नोकरीला आहात; तर याआधी का आला नाहीत?’’ असंही म्हणाले.

त्यांच्या गप्पिष्ट स्वभावामुळे मलाही हळूहळू कंठ फुटू लागला. या माणसाशी छान सूत जमेल आमचं असंही वाटू लागलं. नंतर तेच म्हणाले, ‘चला आता, चहा घेऊया.’ मग चहाबरोबर गरमागरम मिरची भजीही आली. निघताना ‘मग इथेच आहात नोकरीला तर येत चला अधूनमधून’, असंही म्हणाले. पण बराच काळ त्यांच्याकडं जाणच झालं नाही. त्यांच्याविषयीचा आदर मात्र उत्तरोत्तर दुणावतच गेला.

निपाणीत दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेने ग्रामीण साहित्य संमेलन भरवले होते. इथे पुन्हा एकदा त्यांची भेट झाली. सायंकाळचे सात साडेसात वाजले असतील. समारोपानंतर सगळ्यांची पांगापांग होऊ लागली होती. मोरेमामा जवळच उभे होते. तेही निघायच्या तयारीत होते. मी संधी साधली. म्हणालो, ‘चला मामा ! मी तुम्हाला घरी सोडून येतो.’ कामगार चौकात त्यांचं घर होतं. भाड्यानं ते तिथे आधी रहात असत. साधे कौलारू घर. एका मागे एक अशा तीनचार खोल्या असाव्यात. बाहेरच्या खोलीत एक लोखंडी कॉट. त्यासमोरून एकच माणूस कसाबसा जाऊ शकेल इतकीच जागा. मामा स्वत:च पाण्याचा ग्लास घेऊन आले. मग खूप दिवस माझ्या मनात असलेली एक गोष्ट धीर एकवटून मी त्यांना सांगितली. मला महादेव मोरे यांच्यावर एक माहितीपट करायचा होता. त्यांच्या परवानगीची आवश्यकता होती. माझ्या या कल्पनेवर त्यांची कोणती प्रतिक्रिया येतेय, याचा अंदाज मी घेत होतो. ते सहसा कुणाला जवळ करत नाहीत, फटकून वागतात ते लोकांशी असे काहीबाही त्यांच्याविषयी कानावर पडत होते. पण त्यांनाही माझी ही कल्पना आवडली. कोणतीही हरकत न घेता त्यांनी यासंदर्भात मला मोकळीक दिली. ‘करूयाकी, कवा भेटायचं ते ठरवा. आधी काय विचारणार ते प्रश्न द्या. म्हणजे मला तयारीला बरं पडेल.’ असं म्हणाले. आपली ही अशीही दखल कुणी घेतं आहे याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्यांनी लगेच मोठ्या आवाजात त्यांच्या पत्नीला-वत्सला वहिणींना ही बातमी लगेच सांगून टाकली.

‘‘अगं ऐकतीस नव्हं. हे माझ्यावर फिल्म तयार करणार आहेत बघ.’’ खरं तर हे असं काम करण्यासंदर्भात माझ्याकडे तसा कोणताही पूर्वानुभव नव्हता. पण मनापासून वाटत होतं; हा असा प्रयत्न करून पहायला काय हरकत आहे. चुकेल, पण काहीतरी हाताला लागेलच की. कसे का असेना आपण आपल्यापरीने या माणसाचे डॉक्युमेंटेशन करून ठेवले पाहिजे. असे खूप दिवसांपासून मनात होते. आता लेखकाची परवानगी तर मिळाली आहे. पुढच्या तयारीला लागले पाहिजे; असे मनाशी ठरवून त्यांचा निरोप घेतला.

या कामाच्या पूर्ततेसाठीही तसा खूपच वेळ गेला. माझी व्यक्तिगत सटरफटर कामं आणि आळस यामुळे हे काम बरेच दिवस तसेच राहून गेले. आता मोरेमामाही कदाचित ते विसरून गेले असतील; असे बऱ्याचदा वाटायचे. हे एक महत्त्वाचे काम आपल्या हातून राहून जात आहे; अशी खंतही वाटायची. एकदा नानासाहेब जामदार आणि अनंत घोळवे यांच्यासोबत निवृत्तीच्या टपरीवरचा चहा घेत असताना माझ्या मनातला हा विचार मी या दोघांना बोलून दाखवला. त्यांनाही ही कल्पना मनापासून आवडली. मोरेमामांची पुन्हा एकदा भेट घेऊन तारीख पक्की केली. काय विचारायचे ते जुजबी प्रश्नही त्यांना लिहून दिले. दोनतीनदा त्यांच्याकडे जाऊन आवश्यक ते सारे शुटिंगही करून ठेवले. मोरेमामांशी संबंधित असलेल्या काही निवडक लोकांच्या मुलाखतीही कॅमेऱ्यात बंदिस्त केल्या. त्या नंतरचे सारे सोपस्कार पूर्ण करून जवळपास एक तासांचा माहितीपट तयार केला.

महादेव मोरे हे अतिशय सज्जन गृहस्थ आयुष्यभर मोटार ड्रायव्हिंग, मोटार गॅरेज, डंकाची मशीन असे विविध उद्योग पोटापाण्यासाठी करता करता पीठाच्या गिरणीत स्थिरावले. तेच त्याच्या उपजीविकेचे साधन झाले. या गिरणीशी या माणसाचे जीवाभावाचे नाते निर्माण झाले. त्या गिरणीने त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न तर सोडवलाच पण सर्जनशीलतेचा पुरेपूर आनंदही या गिरणीच्या व्यवसायाने त्यांना दिला. दळायला येणाऱ्या बायाबापड्यांना या माणसाने बोलते केले. त्यांच्या मूक वेदनेला मुखर करण्याची संधी दिली. त्यामुळे मोरेमामांचे अवघे आयुष्य पीठाच्या गिरणीभोवती केंद्रित झाले आहे; असे वाटून माहितीपटाला आपसूकच शीर्षक लाभले ‘पीठाक्षरं…’ या नंतर मात्र मोरेमामांचा संपर्क सातत्याने वाढू लागला. माझाही त्यांच्याविषयीचा संकोच एव्हाना कमी व्हायला लागला होता.

पीठाक्षरंच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला मोरेमामा आवर्जून उपस्थित राहिले. त्यांचा यथोचित सत्कार करून भेटीदाखल त्यांना कोरीव काम केलेली नक्षीदार अशी आधाराची लाकडी काठीही भेट म्हणून दिली. कारण माहितीपटच्या शुटिंगच्या दरम्यान त्यांच्या हातात कुठल्यातरी वाळलेल्या झाडाची मोडून काढलेली एक वाकडीतिकडी, कधीही मोडून पडेल अशी तकलादू काठी होती. तेव्हाच मनाने ठरवले होते. त्यांना एक छानशी आधाराची काठी भेट द्यायची म्हणून. पण आम्ही भेट दिलेली ती काठी त्यांनी कधी वापरल्याचे दिसले नाही. नंतर काही दिवसांनी अनेकदा त्यांच्या हातात दवाखान्यात वापरतात तशी कमीजास्त उंची करता येण्यासारखी लोखंडी काठी मी अनेकदा पाहिली होती. आम्ही भेट म्हणून दिलेल्या त्या काठीचे काय झाले असेल? ती त्यांना आवडली नसेल का? का त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्त्वाला ती काठी विजोड झाली असेल? का घरातच ती काठी त्यांनी तशीच ठेऊन दिली असेल? असे प्रश्नही माझ्या मनात येत अधुनमधून येत रहायचे. त्यांनी ती काठी वापरावी असे सतत वाटत रहायचे. पण मग मीही नंतर त्या संदर्भात त्यांच्याशी कधी बोललो नाही. विचारले नाही.



पीठाक्षरंच्या प्रकाशनाचे नियोजनही आम्ही थोडेसे आगळेवेगळेच केले होते. महाविद्यालयाच्या पाच मुली साडीचोळी नेसून डोक्यावर गिरणीत दळायला जातात तसा डबा घेऊन व्यासपीठावर येतात व डब्यातून त्या माहितीपटाच्या सीडीज् काढतात. मग डॉ.अच्युत माने यांच्याहस्ते सीडीचे प्रकाशन होते. ही अभिनव कल्पना साऱ्यांनाच खूप आवडली. मोरेमामांनी तो माहितीपट आम्हा सर्वांसोबत पाहिला. चांगली दादही दिली. दहा मिनिटांचे भाषण करून कृतज्ञताही व्यक्त केली. प्रा. अशोक परीट यांनी या कार्यक्रमाची खूप चांगली प्रसिद्धीही दिली. खरेतर मोरेमामांनी आम्हाला हे सारे आनंदाने करू दिले. याबद्दल आम्हीच त्यांच्या ऋणात होतो.

या कार्यक्रमानंतरही मोरेमामांच्या गाठीभेटी अधूनमधून होत असत. कधी प्रत्यक्ष तर कधी फोनवरून. एकदा फोनवर बोलता बोलता म्हणाले, ‘त्या सीडी आतापर्यंत बऱ्याच खपल्या असतील की. का साराच उद्योग आतबट्यात?’ खरं तर वर्षभरात केवळ सात आठच सीडी विकल्या गेल्या होत्या. साठ सत्तर सीडीज् ओळखीच्या मित्रमंडळींना, मान्यवरांना मी तशाच देऊन टाकल्या होत्या. माहितीपटाच्या काही सीडीज् कुरीयरनेही सर्वदूर पोहोचत्या केल्या होत्या. पण अपवाद वगळता यासंदर्भात कुणीच काही लिहिलं बोललं नाही. ‘माहितीपट मिळाला. धन्यवाद. आभार.’ असं लिहिण्याचं, सांगण्याचं साधं सौजन्यही कुणी दाखवलं नाही. अर्थातच आम्हालाही त्याची काही फिकीर नव्हती. पैसा, प्रसिद्धी, यश असलं आम्हालाही काही नको होतं. अपेक्षाच नव्हती कशाची. मोरेमामांशी मात्र आम्ही यासंदर्भात काही बोललो नाही. ‘आयुष्यभर उपेक्षित राहिलेल्या माणसाचा एक उपेक्षित माहितीपट’ आम्ही तयार केला होता.

महादेव मोरे हा माणूस महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर एका टोकाला असलेल्या गावात राहतो. अठरा कादंबऱ्या आणि चौदा कथासंग्रह लिहितो. अनुवाद करतो, रसरशीत असं ललित लेखन करतो, तरीही प्रसिद्धीपासून, लोकप्रियतेपासून, आर्थिक लाभापासून अनेक योजने दूर राहतो. हे सारेच या अधिकाधिक सवंग होत चाललेल्या वातावरणात अपूर्व असं होतं. हा माणूस पीठाक्षरंच्या स्वरूपातही लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. केवळ याच भावनेतून पीठाक्षरंचा प्रपंच आम्ही मांडून बसलो होतो. हे काम तडीस गेल्याचा आनंद तर होताच. पण आणखी पंचवीस तीस वर्षानंतर एखाद्या रसिक वाचकाला, विद्यार्थ्याला, अभ्यासकाला निपाणीचे महादेव मोरे हे लेखक कसे होते? ते कसे बोलत चालत होते? त्यांची गिरण कशी होती? याचे अल्पसे उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो. त्यामुळे आर्थिक लाभहानीचा विचार मनातही नव्हता. पण मोरेमामांना याची काळजी वाटत होती. ‘निदान प्रॉडक्शन कॉस्ट तरी निघायला हवी होती. यापुढे सीडीचे पैसे घेतल्याशिवाय ती कुणालाही फुकट देऊ नका.’ असाही अनुभवजन्य सल्लाही द्यायला ते विसरले नाहीत. कारण व्यवहारी जगाचे खूप सारे उन्हाळे पावसाळे या माणसाने पाहिले होते. मी मनातल्या मनात हसून ते तसेच सोडून दिले. अजय कांडर यांनी या माहितीपटाची छोटीशीच पण महत्त्वाची दखल घेतली. राजन गवससर यांनी माहितीपट पाहून, ‘छान झालं आहे बरं का हे काम.’ असं म्हणत पाठ थोपटली. आम्हा धडपडणाऱ्या मुलांना यापेक्षा अधिक काय हवं होतं? यानंतर मात्र मोरेमामांविषयीचं नातं मग उत्तरोत्तर घट्ट होत गेलं.

सातारा येथील प्रमोद मनोहर कोपर्डे जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याचे कळल्यावर मी मोरेमामा यांना अभिनंदनाचा फोन केला. स्वारी अर्थातच आनंदात होती. मलाही ते ‘साताऱ्याला माझ्यासोबत चला’ असं म्हणाले. कोल्हापूला बस स्टँडवर एकत्र जमून दोघांनी एकत्र साताऱ्याला जायचं; असा त्यांनी बेत आखला होता. वय वाढू लागलं होतं पण उत्साह तरूणांना लाजवेल असा होता. बोलताना त्यांना त्रास होत असल्याचंही जाणवत होतं. चालतानाही धापही लागत होती. पाठीचा कणा वाकलेला होता, पण मन ताठ आणि स्वाभिमानी होते. आयुष्यभर तसेच राहिले होते. सायकलवरून बाजारहाटाच्या निमित्ताने ते वयाच्या ऐंशीतही अगदी ऐटीत फिरत होते. स्मरणशक्ती तल्लख आणि चेहऱ्यावरचे हास्य किंचितही मावळलेले नव्हते. त्यांना सोबत होईल आणि गप्पागोष्टीही होतील म्हणून माझ्या गाडीतूनच त्यांना सत्काराला न्यायचे असे ठरवून त्यांना फोन लावला. तेही ‘जाऊया की मिळून, पण तुमच्या गाडीतले डिझेल महादेव मोरे यांचे असेल.’ या अटीवर ते तयार झाले.

गिरणीतले काम आटोपून अंघोळपाणी उरकून दुपारी 12 वाजता नाष्टाही न करता कार्यक्रमाला उशीर होईल; म्हणून गडबडीने ते कोल्हापुरात आले होते. धावती भेट म्हणून मी त्यांना ‘पुरस्काराचा कार्यक्रम संध्याकाळी आहे. वेळ आहे थोडासा. आमच्या घरी जाऊन सरबत घेऊन जाऊया का?’ असं म्हणालो. त्यांनी लगेच होकार दिला. हा माणूस आपल्या घरीही एकदा आला पाहिजे; असं मनापासून वाटत होतं. ते आले. खूप उत्साही होते. विद्याला हसत हसत म्हणाले, ‘‘सूनबाई, सरांचं एक निवांत असतय बघा. कुणाचं एक नाही दोन नाही. सांगलीत राहून सांगलीतल्या ब्राह्मणांपासून हा गुण त्यांनी अगदी सहीसही उचलला आहे बघा…’’ असं बोलून त्यांनी साऱ्यानाच मनमुराद हसविले. साताऱ्याला जाताना त्यांना बावड्याची मिसळ खायची खूप इच्छा झाली होती. त्यांनी गाडी मुद्दाम तिकडे वळवायला सांगितली. विद्यार्थीदशेत कोल्हापुरात राहिल्यामुळे कोल्हापुरात कुठे कुठे आणि काय काय खायला मिळतं; हे त्यांना बरोब्बर ठाऊक असायचं. महाद्वार रोडवरील चोरगे यांची मिसळही त्यांनी चोरगे यांचे हॉटेल शोधून काढून मला खायला घातली होती. पैसे अर्थातच मला देऊ दिले नव्हते. बावड्याच्या त्या हॉटेलात गेल्यावर मी, नाना आणि अनंत या तिघांनाही ते टेबलासमोरील बाकड्यावर आत सरकवून बसवू लागले. आम्हाला काही समजेना. हे असं का करताहेत ते. विचारल्यावर खळखळून हसत म्हणाले, ‘‘खाऊन झाल्यावर बिल द्यायसाठी आपल्यात मॅरेथॉन स्पर्धा नको. पुरस्कार मला मिळाला आहे. बिल मीच देणार. तुम्ही फक्त खायचं.’’ कोल्हापुरी मिसळीचे बिल त्यांनी स्वत:च चुकते केले होते.

अरूण नाईक यांनी संपादित केलेल्या चौफेर समाचार या दिवाळी अंकात सी. रामचंद्र यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानावर आधारित मोरेमामांनी एक लेख लिहिला होता. त्या लेखाचा चेक आणि अंक अरूण यांनी माझ्याकडे दिला होता. तो द्यायला मामांकडे गेलो, तर तेव्हाही त्यांनी बेळगाव नाक्यावरील त्यांच्याच एका नातलगाच्या टपरीवजा हॉटेलात वडासांबर आणि चहा मला आग्रह करून खायला दिला होता. नातलगाचे हॉटेल असूनही ते बिल त्यांनी तिथेही चुकते केले होते. मामांच्याकडून हे असे चहापाणी घेताना अपराध्यासारखे वाटायचे पण त्यांच्या या अशा लेखक हट्टापुढे आम्ही आमचे हे असे अपराध आमच्याच पोटात घालायचो.

बेळगाव येथील सार्वजनीक वाचनालयाचा आचार्य अत्रे पुरस्कार त्यांना मिळाला होता. मग आमचे पुन्हा सगळे सुरू, चलो बेळगाव. कार्यक्रम आटोपून तिथून निघताना रात्र झाली. बेळगावातून बाहेर पडल्यापडल्या म्हणू लागले, ‘‘सर, डिझेलचा खर्च मी करणार आहे. तुम्ही याउप्पर काही बोलायचं नाही. तुम्ही डिझेलचे पैसे घेतले नाहीत; तर तो पुरस्कारच नको मला. परत करणार बघा पुरस्कारचे सगळे पैसे.’’ असा मामांचा सज्जड दम. शिवाय तेव्हा परतायला उशीर झाला, रात्रीचे जेवण राहूनच गेले. म्हणून अशोक परीटसर, नाना, कबीर वराळेसर आणि मला, ‘गुरूवारी निपाणीचा बाजार असतोय. मटण चांगलं मिळतय त्यादिवशी. बेत करूया आपण.’’ असं म्हणून पुरस्काराची छान पार्टी दिली होती त्यांनी. अशावेळी त्यांचा शब्द अंतिम असायचा. कुणाचं काही ऐकायचे नाहीत ते.

मामांची आणखी एक आठवण आवर्जून सांगितली पाहिजे. बाबा कदम आणि मोरेमामा यांचं अगदी जुनं आणि स्नेहाचं नातं होतं. बाबा कदम यांच्याबद्दल मोरेमामा भूतकाळात जात सांगू लागायचे, ‘‘बाबा कदम यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात असं लिहून ठेवलं आहे; की माझ्या निधनानंतर माझ्या नावाचा प्रथम पुरस्कार कोणताही गाजावाजा न करता निपाणीच्या महादेव मोरे यांना देण्यात यावा.’’ तो पुरस्कार त्यांना एका घरगुती समारंभात दिला गेला. त्यानंतर एकदा बाबा कदम यांच्या घरी मोरेमामा गेले होते. बाबा कदम यांच्या प्रतिमेला अर्पणकरण्याकरिता मोरेमामांनी सोबत एक पुष्पहार घेतला होता. पण फोटो मोठा आणि सोबत नेलेला हार मात्र छोटा असल्याचे मोरेमामांच्या लक्षात आले. काहीच इलाज नव्हता. मोरेमामांच्या मनाला ही गोष्ट खूप लागून राहिली. तेव्हा त्यांच्या फोटोला साजेसा होईल; असा फुलांचा हार घेऊन आपण जावं, शिवाय माईंना (बाबा कदम यांच्या पत्नीला) भेटून यावं, अशी मामांची इच्छा होती. साताऱ्याला जाताना आम्ही ती इच्छा पूर्ण केली. बाबा कदम यांच्या घरी जाऊन प्रतिमेला हार अर्पण केला. माईंनाही भेटलो. गेल्यावेळी हार अनवधानाने छोटा आणला होता. हे मनाला लागून राहिल्याबद्दलची खंत आणि दिलगिरीही मोरेमामांनी माईंसमोर मोठ्या मनानं व्यक्त केली.

‘‘अहो, त्यात एवढं काय मनाला लावून घ्यायचं! तुम्ही आलात, भेटलात खूप झालं.’’ असं माई म्हणाल्यादेखील. पण फोटोला साजेसा हार बसल्याचे पाहून मोरेमामांचा चेहरा तेव्हा समाधानानं अधिकच उजळून गेला होता. मग साताऱ्याच्या दिशेनं आमचा प्रवास सुरू झाला. आमची मॅरेथॉन शर्यत सुरूच राहिली. महामार्गावरील प्रत्येक टोलवर मोरेमामांना आवरता आवरता आम्हाला चांगलीच कसरत करावी लागली. ‘‘अहो, तुम्ही मला एखाद्या लहान मुलासारखे जपून घेऊन जात आहात. मला टोल तरी भरू द्या. तुम्हाला कशाला उगाच भुर्दंड’’ असे सारखे ते सांगत होते. आणि आम्ही अर्थातच त्यांचे काही ऐकत नव्हतो.

सातारा येथील कार्यक्रमानंतर राहण्याची आणि भोजनाची उत्तम व्यवस्था प्रमोद कोपर्डे यांनी केलेली होती. पण मामा मुक्कामाला थांबले नाहीत. ‘‘त्या प्रमोद कोपार्ड्यांना उगाच कशाला खर्चात पाडायचं. आणि बाहेरच्या अशा कार्यक्रमात कितीही वेळ झाला; तरी मी घरीच मुक्कामाला जातो. बाहेर नीट झोपच लागत नाही. कसाही असला तरी आमचा आपला गोठाच बरा. कितीही रात्र झाली तरी घरीच जाऊ मुक्कामाला. शांत झोप तरी लागेल.’’ असं स्वत: केलेल्या विनोदावर हसू लागले ते खूप मोठ्याने. डॉ.आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते मोरेमामांचा छान सत्कार करण्यात आला होता. मोजकेच लोक होते. मामांनी तिथे छोटेखानी पण अप्रतिम भाषण केले. अवघे जगणेच उलगडून दाखविले त्यांनी त्या आठ दहा मिनिटात. सत्कार केल्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली. शेवटच्या दोन चार वाक्यांनी तर सारे सभागृहच स्तब्ध झाले,‘‘तुम्हाला खरं सांगतो, हा पुरस्कार माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आयुष्यभर खूप कष्ट उपसले. माणसे वाचली. त्यांना शब्दरूप दिले. जी काही आर्थिक कमाई झाली, ती कुटुंबासाठी खर्च केली. बँक बॅलेन्स आजही शून्यच आहे. आता या पुरस्काराच्या निमित्ताने मिळालेली रक्कम मी जपून ठेवणार आहे. माझ्या मृत्यूनंतर माझ्या अंत्यसंस्कारासाठी कुणाला कुणापाशी हात पसरायला नको. आता मी निवांत झालो आहे.’’ मामांचे हे बोलणे खरेच होते. त्यांनी स्वत:साठी म्हणून काही उचलून बाजूला ठेवलेले नव्हते. बाजूला ठेवण्यासाठी काही उरतच नसे. एकदा सहज बोलता बोलता हसत हसत म्हणाले,‘‘मुंबईला जसे मलबार हिल आहे ना. अत्यंत श्रीमंत लोक राहतात तिथं. ती माणसं घरात जेवतच नाहीत. सारखं हॉटेलातच. त्यामुळं धान्य दळून आणण्याचा प्रश्नच येत नाही. आमची निपाणीतली ही जी गिरण आहे; तीही एका दृष्टीने निपाणीच्या मलबार हिलवर असल्यासारखीच आहे. इथेही तशी गुजर मारवाड्यांची-श्रीमंतांची घरच जास्त. त्यांचीही जेवणं बहुतेक बाहेरच असतात. त्यामुळे त्यांचाही गिरणीशी तसा संपर्क कमीच येतो. पश्चिमेला जी काही वस्ती आहे ती मोलमजूरी करून गुजराण करणाऱ्या लोकांची आहे. ती माणसं डबा घेऊन आली की आमची गिरण सुरू. आता बोला, मिळकत किती आणि कशी होणार… साठवून ठेवायचं काय आणि किती?’’ पुन्हा मामांचं अशा अवस्थेतही ओठांवरून जीभ फिरवत मनसोक्त हसणं. अशावेळी त्यांचा चेहरा एखाद्या निष्पाप मुलासारखा दिसायचा. नियती असलीच तर ती माणसांना खूप दु:ख देते आणि त्या दु:खांवर उतारा म्हणूनही प्रत्येकाला ती काहीबाही देत असावी. महादेवमामांच्या या अशा दु:खांवर उतारा म्हणून नियतीने हसण्याची ही अशी भरभक्कम थैली तर बहाल कलेली नसेल? मोरेमामा सातत्याने त्या थैलीतली ही दौलत अशी मुक्तहस्ते सतत उधळत रहायचे. एकदा ते कोल्हापूरला प्रकाशक अनिल मेहता यांना एका महत्त्वाच्या कामासाठी भेटायला गेले. त्यांच्या सोबत त्यांनी मलाही घेतले होते. प्रकाशक अनिल मेहता यांना ते कुमारभाई म्हणायचे. त्यांच्या पुस्तकांच्या दुकानात आम्ही चहा घेत बसलो होतो. आधाराच्या काठीवर दोन्ही हातांचे पंजे एकमेकांवर रेलून खोल गेलेल्या आवाजात मोरेमामा कुमारभाईंशी बोलत होते. क्वचित हसत हसत बोलत होते. पण त्या हसण्याआड आयुष्यभर पाचवीला पुजलेलं त्यांचं दु:ख लपता लपत नव्हतं. जुन्या आठवणी निघाल्या खूप. दोघांनाही मोकळेपणानं बोलता यावं; म्हणून मी उगाचच कपाटात मांडून ठेवलेली पुस्तकं न्याहाळत राहिलो. कान मात्र या दोघांच्या बोलण्याकडेच होते. मोरेमामांनी त्यांच्या सर्व पुस्तकांचे हक्क अनिल मेहता यांच्याकडे सुपूर्द केले होते. ‘‘कुमारभाई, मला इंग्रजी काही वाचता लिहिता येत नाही. कुठं सह्या करायच्या तेवढं सांगा. तुम्ही योग्य तेच कराल. फसविणार नाही. विश्वास आहे तुमच्यावर.’’ असं मोकळेपणानं ते सांगत होते. अनिल मेहता यांना ते जणूकाही निर्वाणीचं सांगत होते. कुणा एका प्रकाशकानं त्यांना न सांगतासवरता कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता त्यांची अनेक पुस्तकं इंटरनेटवर विक्रीकरिता ठेवली होती. मानधन म्हणून पाचही पैसे मोरेमामांच्या पदरात टाकले नव्हते. अशा लोकांना कोर्टातून नोटीस पाठवावी तर वकिलांची फी भरण्यासाठी पैसे आणि कोर्ट कचेऱ्यांच्या फेऱ्या या वयात त्यांना झेपणाऱ्या नव्हत्या. ‘माझी ती पुस्तकं तुमच्या मोबाईलवर दिसतात का बघा.’ असं दोनतीनदा म्हणाल्यावर आम्ही तो प्रयत्न केला. पुस्तकं मोबाईलवर स्पष्टच दिसत होती. इलाज नव्हता. मग पाचसात पानं समोर ठेऊन कुमारभाई कुठे सह्या करायच्या आहेत; ते बोटाने मोरेमामांना दाखवत होते. मोरेमामा त्यातील एकही अक्षर न पाहता सह्या करत होते. चहा घेऊन पुस्तकांच्या दुकानातून बाहेर पडता पडता ते म्हणाले, ‘‘कुमारभाई, कदाचित आपली ही भेट आता शेवटचीच असेल बरं का. वयाची ऐंशी वर्ष पार झाली. कधी काय होईल कुणी सांगावं?’’ ऐकून गलबलून आलं. क्षणभर आम्ही दोघेही गप्पच झालो. नंतर काहीबाही सारवासारवीचं कुमारभाई बोलले. मोरेमामांचा चेहरा आता थकल्यासारखा वाटत होता. पुस्तकाच्या दुकानातून बाहेर पडल्यावर वत्सला वहिणींच्या डोळ्यात घालावयाचे ड्रॉप्स् एका मेडिकलच्या दुकानातून त्यांनी घेतले. काही औषधंही घेतली. सावकाश आणि जपून त्यांनी ती जवळच्या एका कापडी पिशवीत ठेवली. मोरेमामा त्यांच्या पत्नीचा उल्लेख कधीच एकेरी करायचे नाहीत. या दोघांमधील नातेसंबंध खूप घट्ट होते. दोघेही मनापासून एकमेकांची काळजी घ्यायचे. मोरेमांमा आमच्या सोबत बाहेरगावी असले की हटकून तीन चारदा वहिणींचा फोन यायचा. ‘‘कुठं हायसा? काही खाल्लासा का न्हायी? कवा परत येणार हाईसा?’’ अशी विचारपूस व्हायची. लेखक आणि त्यांची पत्नी या दोघांमधील हे असे सावलीसारखी साथसोबत करणारे नातेही अपवादात्मकच म्हणावे लागेल. औषधांविषयी विचारल्यावर त्यांच्याकडून कळालं की, ‘स्टेरॉईडमुळे वहिणींचा एक डोळा कायमचा निकामी झाला आहे. एक डोळा सतत कोरडा रहात असतो. डोळ्यात ड्रॉप्स घातल्याशिवाय काही दिसतच नाही.’ लेखक प्रकाशक यांची ही अशी भेट झाल्यावर त्यांना दुचाकीवरून पुन्हा विद्यापीठासमोर आणून सोडलं. बस निघून गेल्यावर मीही घरी निघून आलो. कुणाशी काही बोलावसं वाटत नव्हतं.

मोरेमामांना हे असं भेटून तीन-चार महिने झाले असतील. नानांचा फोन आला अचानक. मोरेमामींचं निधन झालं होतं. आम्ही ज्या ज्यावेळी त्यांच्या घरी जायचो तेव्हा बैठकीच्या खोलीत एका छोट्या पलंगावर पाय लांब करून त्या बसलेल्या असायच्या. चाहूल लागताच सावरून बसायच्या, खांद्यावरचा पदर डोक्यावर सावरत हसून आमचं स्वागत करायच्या. कधी मामांना फोन केला तर पहिल्यांदा फोनवर वहिणीच बोलायच्या. मामा बहुतेक गिरणीत असायचे. नाहीतर बाजारात भाजीपाल्यासाठी. ‘‘थांबा हं देतो फोन.’’ असं म्हणून जागेवरूनच मामांना हाक द्यायच्या, ‘‘व्हय हाेऽऽऽ! फोन आलाय बघा साळुंखेसरांचा…’’ मामा येईपर्यंत मग दोघांच्याही तब्बेतीविषयी बोलणं व्हायचं. मग फोनवर मामांचा आवाज यायचा. आता मात्र मोरेवहिणींचा आवाज कधीच ऐकू येणार नव्हता. अस्वस्थ वाटू लागलं. भेटायला गेलो मग मामांना. आतल्या खोलीतून प्लॅस्टीकची खुर्ची सरकवत येऊन बसले समोर सोप्यावर. चेहऱ्यावर खिन्न उदास हसू. अशावेळी काय आणि कसं बोलावं हेच कळेनासं झालं होतं. मामाच मग बोलू लागले, ‘‘महाराष्ट्र कर्नाटकातले बहुतेक सारे डॉक्टर झाले. संधीवातच शेवटी त्यांना घेऊन गेला. कशानच गुण आला नाही बघा. जवळपास तीस पस्तीस वर्ष झाली औषधावरच होत्या. माझ्या हयातीत त्यांची सेवा झाली हेच समाधान मानायचं. माझ्या मागं त्यांचं काय झालं असतं कुणास ठाऊक. गिरणीतला आणि लेखनातला सारा पैसा त्यांच्यावरच खर्च केला. आपलं माणूसच धड तर सारं धड. काय करायचं पैसे ठेऊन. मुलांवर चांगले संस्कार आणि यांची काळजी यातच आयुष्य गेलं सारं. मुलं मात्र संस्कारित निघाली. कुठलच व्यसन नाही त्यांना. त्यांचं ती मिळवत्यात खात्यात. सगळं बरं आहे बघा. आता माझं तरी किती आयुष्य राहिलय. हा नातू बघा आमचा… नववीला आहे… तुम्ही आला खूप बरं वाटलं… चहा तरी घ्या…’’ मामा बोलत असताना आम्ही सारेच जण तसेच बसून होतो. जडशीळ वाटत होतं. बोलता बोलता मामांचा आवाज कातर होऊ लागला होता. चष्म्याच्या आडून त्यांचे भरलेले डोळे स्पष्ट दिसत होते. मग मात्र आम्हाला थांबण्याचा धीर होईनासा झाला. ‘काळजी घ्या स्वत:ची…’ असं उपचाराचं काहीबाही बोलून नमस्कार करून आम्हीही निघून आलो.

एकदा बाजाराला की कशाला तरी मोरेमामा नेहमीप्रमाणे सायकलीवरून घरातून बाहेर पडले. तोल न सावरता आल्याने रस्त्यावरच पडले. ते एक निमित्त झालं; आणि उजव्या पायाचा खुबा कायमचा मोडून बसले. गोळ्या-औषधं सारं काही झालं. पण फरक नाही. वर्ष होऊन गेलं पण हाड सांधलं नाही ते नाहीच. वाढलेल्या वयामुळं शस्त्रक्रिया शक्य नव्हती. विचारलं तर हसत हसत म्हणायचे, ‘‘आता डॉक्टरांनी टेबलावर घेतलं कि फाडायला आणि मारायलाच की. त्यापेक्षा आता असंच ढकलत न्यायचं.’’ बोलताना तोंडातला एकूलता एक हलणारा दात लयीत हेलकावत असायचा. खुर्चीचा आधार घेऊन एक पाय ओढत ओढत मामा घरभर चालत रहायचे.

वत्सला वहिणींचं निधन आणि सुनेचं आजारपण यामुळे बहुतेकदा मामा एकटेच घरी असायचे. बऱ्याचदा शेजारी कुठेतरी खानावळीत सांगून मामांच्या जेवणाचा डबा न चुकता यायचा. आठ पंधरा दिवसांनी डब्याचे पैसे मागायला आलेल्या शेजारीणबाईला लिहून ठेवलेला सगळा हिशेब मामा रीतसर सांगायचे आणि तिचा होकार आला की खुर्चीचा आधार घेत आतल्या खोलीत जाऊन पैसे घेऊन यायचे. ‘‘हे घ्या तुमच्या जेवणाच्या डब्याचा सगळा हिशेब. आज संध्याकाळच्याला डबा पाठवून द्या. सूनबाई माहेरातून येणार हाय परवा. उद्याचं काय ते सांगतो.’’ असं मामा म्हणाले की शेजारीणबाई पैसे घेऊन निघून जायची. मग घर, काही पुस्तकं, पेपर असं सकाळ पासून सायंकाळपर्यंत हाच त्यांचा ठरलेला दिनक्रम. काही आठवलं तर लिहिणं आणि वर्तमानपत्राकडं पाठवणं. मामांचं अवघं जगच आता हळूहळू आक्रसत चाललेलं. गिरणीची घरघर आता कायमची बंदच झालेली. बंद केलेल्या गिरणीच्या तांबरलेल्या पत्र्यावर भलं मोठं कुलूप. भोवताली तणकट माजलेलं.

मी धीर एकवटून एकदा त्यांना म्हणालो, ‘‘मामा, आता गिरणी देऊन टाका कुणालातरी चालवायला. तेवढेच घरबसल्या चार पैसे तरी मिळतील.’’ तर म्हणाले, ‘‘चालवायला घेत्यात आणि बंद पडल्यावर दुरूस्त करून द्या म्हणत्यात. म्हणजे मिळालेलं सगळं पैसं त्याच्या दुरूस्तीतच घालायला लागत्यात. आपण चालवणं निराळं आणि दुसऱ्यानं चालवणं निराळं. त्यापरीस गिरणी बंद पडल्यालीच बरी. एखादं चागलं गिऱ्याईक आलं की द्यायचं विकून कुणालातरी.’’ गिरणीविषयी बोलताना त्यांचा उदासवाणा आवाज लपून रहात नसे.

इतकं समृद्ध आयुष्य जगून झालेल्या मामांकडं निपाणीविषयी, त्यांच्या आयुष्यात आलेल्या माणसांविषयी, आप्त स्वकीयांविषयी सांगण्यासारखं अजूनही खूप सारं होतं. निपाणी आणि परिसराचा मोरेमामा चालता बोलता इतिहास होते. हे सारं आत्मचरित्राच्या रूपानं यावं असं फार दिवसांपासून वाटत होतं; म्हणून सहज विषय काढला तर म्हणाले, ‘‘सर, त्या आत्मचरित्रात सगळं खरं खरं सांगावं लागतं. त्याला फार मोठा तटस्थपणा लागतोय. हेरॉल्ड प्रिंटर एक नट होता. त्यानं लिहिलं तसं आत्मचरित्र लिहिता आलं पाहिजे माणसाला. मोठा माणूस. आपल्याकडं विश्राम बेडेकरांचं एक झाड दोन पक्षी, हंसा वाडकर यांचं सांगते ऐका, अशी चांगली आत्मचरित्र हाईत बघा. असं लिहिता आलं पाहिजे. माझ्याकडं सांगण्यासारखा इतका ऐवज न्हाईच. आणि आत्मचरित्राचं म्हटलं तर माझ्या जवळपास बऱ्याच पुस्तकांमधून, वृत्तपत्रीय लिखाणातून माझं चरित्र येतयच की. आणि आता वाचतय तरी कोण? वाचन संस्कृतीच सगळी लागलीया संपायला. आता लिहायचं तरी कुणासाठी हाच खरा प्रश्न हाय.’’ मामा म्हणत होते ते रास्तच होतं. त्यांचं लिखाण आणि त्यांचं व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक-साहित्यिक आयुष्याचे बरेचसे पडसाद त्यांच्या लिखाणातून सतत ऐकू येत राहतात. डॉ. रणधीर शिंदे आणि डॉ. नंदकुमार मोरे यांनी मामांची मुलाखत घेण्याची संधी पुन्हा एकदा दिली. अर्थातच मला त्यात आनंद होताच. कारण पीठाक्षरात राहून गेलेलं या निमित्तानं पूर्ण करता येईल असं वाटत होतं. निपाणीहून मोरेमामांना आणण्याची आणि पुन्हा घरी सोडण्याची जबाबदारी अर्थातच माझ्याकडे होती. सायकलवरून पडल्यामुळे आणि कोरोनाच्या पडझडीच्या वातावरणामुळे मामा वर्षभर घरीच अडकून पडले होते. इच्छा असूनही कुठे जाता येत नव्हते. विद्यापीठातील मुलाखतीला मामांनी कोणतेच आडेवेडे घेतले नाहीत. यानिमित्तानं घराबाहेर पडता येईल. गप्पा टप्पा होतील. कुमारभाईंना भेटता येईल. बोलता येईल. मनाला थोडं बरं वाटेल म्हणून ते मुलाखतीकरिता तयार झाले. मीही पूर्ण दिवस मामांच्यासाठी मोकळाच ठेवला होता. त्यांना सांगूनच ठेवले होते. ‘‘मामा, आजचा पूर्ण दिवस तुमचासाठी. तुम्ही फक्त हुकूम सोडायचा. तुम्हाला कुणा कुणाला भेटायचं आहे, कुठं कुठं जायचे आहे; तेवढं फक्त मला सांगायचं.’’ मामा दिलखुलास हसत तयार झाले होते. ‘‘तुमच्या घरी जाऊ. मोठी गाडी तिथेच ठेऊ. छोटी गाडी घेऊन विद्यापीठात जाऊ. मुलाखत झाली, जेवणं झाली की कुमारभाईंकडे जाऊन येऊ. तिथे दुकानासमोर खूप वर्दळ असते. म्हणून छोटी गाडीच घ्या. कुठेही लावता येईल.’’ असं सगळं नियोजन तपशीलवारपणानं मोरेमामांनी नेहमी केलेलं असायचं. मुलाखतीच्या दोन तीन दिवस आधी रात्री आठच्या सुमारास मोरेमामांचा फोन आला. कसे जायचे, दिवसभराचे काय काय नियोजन आहे; अशी काहीबाही बोलणी झाली. नंतर मामांनी थेट मुद्दालाच हात घातला. ‘‘न्हाई, म्हणजे आपल्याला ते मुलाखतीसाठी बोलवू लागले आहेत. बाकी सगळं खरं, पण मानधनाचं बिनधनाचं काही सांगितलय का त्यांनी? न्हाईतर फुकटचीच येरझार व्हायची.’’ गिरणी बंद, पैशाचा दुसरा कसलाच मार्ग नाही, त्यात आजारपण, म्हातारपण शिवाय अनेक ठिकाणी सन्मानानं बोलवून फुकटचा केलेला गौरव, कार्यक्रमाच्या ठिकाणी पदरमोड करून केलेला प्रवास, खाण्यापिण्याची आबाळ अशा अनेकप्रकारच्या अनुभवांमुळं मामांचं मन हे सार्वजनिक व्यवहारासंदर्भात कडवट होऊन गेलेलं होतं. कसल्याही पदाचा, प्रतिष्ठेचा हव्यास न बाळगता बोलावतील तिथं मामा प्रसंगी गिरण बंद ठेवून आवर्जून उपस्थित रहायचे. पण अनेकांनी त्यांची योग्य ती बडदास्त राखली नाही. मानधनाचा विषय काढताच मी त्यांना माझ्यापरीने समजावण्याचा प्रयत्न केला. हसत हसत म्हणालो, ‘‘मामा, विद्यापीठातील शिंदेसर, मोरेसर ही चांगली माणसं आहेत. ती तुम्हाला निराश करणार नाहीत. तुमच्या मानधनाचा ते निश्चितच विचार करतील. आणि समजा नाहीच दिलं त्यांनी मानधन तुम्हाला; तर काळजी करू नका. मी माझ्या खिशातले पैसे तुम्हाला देतो. पण काही झालं तरी आपण कोल्हापूरला जायचच.’’ मामाही मग हसत हसत म्हणाले, ‘‘न्हाई, जायाचं तर आहेच की. पण मी काय म्हणतोय, ते मानधन देऊद्यात न्हाईतर राहू द्यात. पण तुम्ही कशाला तुमच्या पगारातलं पैसं देतासा. राहू द्यात घ्या. देवूद्यात न्हाईतर राहूद्यात. नाही दिलं तर नाही दिलं. आपून एक काम करूया. मुलाखत झाली की फक्त त्यांची मिसळ आणि पाव खावूयात दोन दोन. रग्गड होतय दिवसभरासाठी.’’ आणि ते खूप खूप हसत राहिले बराच वेळ. ‘‘मामा, तुम्ही ती काळजी करू नका. तुम्ही फक्त गाडीत बसायचं. पुढचं सगळं मी बघतो. परवा सकाळी नऊ वाजता आवरून बसा म्हणजे झालं.’’ असं म्हणून तो विषय मी तिथच मिटवून टाकला. पण मुलाखतीच्या आधीच मोरेसरांनी रीतसर मानधनाचा आणि प्रवासाचा सगळा खर्च रोखच देऊन टाकला. दुपारचे जेवणही दिले. मामा पैशांसाठी अडणाऱ्यातले नव्हते. स्वत:च्या स्वार्थासाठी, मिरवण्यासाठी आपला कुणीतरी वापर करतं आहे; हे पाहून त्यांना राग यायचा. कसल्याशा महत्त्वाच्या कामासाठी डॉ. रणधीर शिंदे यांना मुंबईला जायचं होतं, ते मुलाखत ऐकायला उपस्थित राहणार नव्हते. मामांच्या घरातून निघताना शिंदेसरांचाच फोन आला. मामांशी ते फोनवरूनच बोलले. शुभेच्छाही दिल्या. निपाणीतून बाहेर पडेपर्यंत मामांची मग खरेदी सुरू झाली. मेडिकलमधील औषधं, पाव बिस्किटं, ब्रेड असे बेकरीतले पदार्थ, गाडी रस्त्याच्याकडेला कुठेतरी थांबवून खाण्यासाठी वडापाव, माईसाठी शुगर फ्री बिस्किटं, कुमारभाईंसाठी संत्री असे सारे काही त्यांनी साग्रसंगीत सोबत घेतले. चहाच्या टपरीवरचा वडापाव बांधून गाडीत आणून देणाऱ्या एका पोराचा हात मामांनी प्रेमाने हातात धरला होता. आणि ते त्याला म्हणत होते,‘‘व्हय रे दिलप्या, लग्न केलास म्हणं. सांगितलं न्हाईस ते. बरं हाय नव्हं तुझं. खानावळीतलं काम सोडलास म्हणं. असू दे असू दे. राबणाऱ्याला काय कुठं बी पैसं मिळत्यात. सांभाळून ऱ्हावा सगळी. कुठल्या गावातली बायको केलास रे? बरं झालं. मार्गाला लागलास. अजून कोरोना गेला न्हाई. मास्क बिस्क लावत जावा. कोल्हापूरला चाललोय. मुलाखत हाय विद्यापीठात. संध्याकाळी येणार हाय. जाऊ?’’ त्या पोरानेही हसत हसत मान हलविली. मग मामा म्हणाले, ‘‘चला सर आता. त्या निर्वाशाच्या दुकानासमोर थांबवा गाडी. एक काँटी घेऊ.’’

काँटी म्हणजे टोपी याचा मला नंतर उलगडा झाला. उन्हाची तिरीप लागू नये म्हणून बाहेर पडताना मामा टोपी वापरत असत. घराबाहेर पडताना त्यांच्याकडे तशी एक टोपी होती. पण ‘‘ही काळी काँटी आहे. आपण कार्यक्रमाला चाललो आहोत. कार्यक्रमात हे असलं काळं बरं दिसणार नाही. आपण तपकिरी किंवा शेवाळी रंगाची काँटी घेऊयात. म्हणजे बरं दिसेल’’ असं म्हणून त्यांनी एका दुकानासमोर गाडी थांबवायला सांगितली. मी दुकानातून पाच सहा टोप्या त्यांना गाडीतच आणून दाखवल्या. त्यातली एक निवडून ती त्यांनी तिथेच डोक्यावर घातली. अर्थातच या सगळ्या बाजाराचे पाचही पैसे त्यांनी मला देऊ दिले नाहीत.

गावातून बाहेर पडल्यावर मामांना म्हणालो,‘‘आता आपण थेट विद्यापीठात जाऊ, मुलाखत देऊ आणि मग जेवण करून कुमारभाईंना वगैरे भेटू. चालेल का?’’ ‘‘नको आधी तुमच्या घराकडं जाऊया.’’ मामा पटकन् म्हणाले, ‘‘सूनबाईला भेटू. पोरांना खायला घेतलं आहे. ते देऊ. मग तुमची बारकी गाडी घेऊया. माझा वॉकर पुढं आडवा ठेऊया. गावात जायचं आहे. ही गाडी पार्क करायला अडचण होईल. सुटं सुटं फिरता येईल कुठबी. आधी घराकडच जाऊ. तिकडच वळवा.’’ ‘‘मामा, वेळ होईल. नंतर घरी जाता येईल. आधी मुलाखतीचा कार्यक्रम करू. मोरेसरांनी सांगितलं आहे…’’ मी हे सारं सांगण्याच्या आधीच मला थांबवत हसत हसत मामा म्हणू लागले,‘‘आता त्या मोरेचं अजिबात ऐकायचं नाही. मीबी मोरेच आहे. त्या मोरेपेक्षा आता ह्यो मोरे सवाई समजा. विद्यापीठात गेल्यावरच त्यांचं काय ते ऐकायचं. आता फक्त पाव्हण्याचं ऐकायचं. काय? काळजी करू नका. गाडी घराकडच वळवा.’’ मी गप्पगार गाडी चालवू लागलो. मनातल्या मनात हसू फक्त होतं. वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालयात पहिल्या मजल्यावर मुलाखतींसाठी मराठी विभागाने आटोपशीर आणि देखणा स्टुडिओ उभा केला होता. कमरेपासून खाली एका पायाने कायमचेच अधू झाल्याने मामांना तो जिना चढून जाणं शक्य नव्हतं. मग विभागातील दोन धट्टयाकट्टया विद्यार्थ्यांनी मामांना एका खुर्चीत बसवले, आणि अलगद उचलून मुलाखतीच्या ठिकाणी नेऊन बसविले. याप्रसंगीही त्यांनी विद्यार्थ्यांना हसवलेच,‘‘अरे व्वा, चांगलीच आहे की ही दोघांनी उचललेली पालखी. चौघांनी उचलायच्या पालखीची पूर्वतयारीच की ही.’’ नंदकुमार मोरे यांनी या अशा पालखीचा एक सुरेख फोटो काढून जपून ठेवला आहे. त्या मुलाखतीकरिता एक तासाचा अवधी मिळाला होता. मोरेमामा भरभरून बोलत होते. मी घाई गडबडीने मामांना प्रश्न विचारत होतो. पण मोरेमामा दोन तास अखंड बोलत राहिले. बोलताना ‘मला अडवू नका, थांबवू नका, नंतर काय ते एडिटबिडिट करा.’ असं म्हणत होते. मुलाखतीच्या उत्तरार्धात वत्सला वहिणींच्या आठवणींने गहिवरून जात होते.

पाच सात महिने झाले असतील, इस्लामपूर येथे श्यामसुंदर मिरजकर आणि राजाभाऊ माळगी या मित्रांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली होती. ही त्यांची अखेरची मुलाखत. या मुलाखतीकरिता जातानाही ते बाबा कदम यांच्या घरी गेले. फोटोला हार घातला. माईंशी मनमोकळं बोलले. माईंसोबत त्यांनी फोटोही काढून घेतले. काठीच्या आधाराशिवाय दोघांनाही नीट उभं राहता येत नव्हतं. पण प्रेम, स्नेह, जिव्हाळा, आदर यांच्यापुढं ते शारीरिक अपंगत्व थिटं पडत होतं. नमस्कार करून मग आम्ही माईंचा निरोप घेतला. इस्लामपुरात खूप भरभरून बोलले मामा. साहित्यिक रंगराव बापू पाटील यांचे चिरंजीव आवर्जून आले होते कार्यक्रमाकरिता. तिथूनच ते रंगराव बापू पाटील या त्यांच्या समवयस्क मित्राशी फोनवरून दिलखुलास बोलले. ‘‘रंगराव नमस्कार, कसे आहात? इस्लामपुरात येऊन मटणाचं जेवण मागतोय महादेव मोरे म्हणून कार्यक्रमाला आला नाहीत की काय?’’ असा थट्टामस्करीचा सूर होता त्यांच्या बोलण्यात.

त्या मुलाखतीत ‘‘मराठी समीक्षकांनी तुमची पुरेशी दखल घेतली नाही, याची खंत वाटत नाही का तुम्हाला? असा प्रश्न विचारला गेला. त्यावर मोरेमामा मनमोकळं हसत म्हणाले, ‘‘ खरंतर मला समीक्षकांचीच खंत वाटू लागली आहे. त्यांच्याविषयी न बोललेलच बरं. लहानपणी क्रांतीसिंह नाना पाटील यांनी माझ्या हातावर एक रूपयाचं नाणं ठेवलं होतं; म्हणून मी त्या बंद्यारूपयासारखं खणखणीत बोलतो. कुणाला घाबरत नाही. वाचकच माझे खरे समीक्षक आहेत. मला इतर कुणाची गरजच वाटत नाही.’’ ही त्यांची बाणेदार मुलाखत पाहून साऱ्या सभागृहानं त्यांना मनापासून दाद दिली. मुलाखत संपल्यावर नव्या जुन्या चाहत्यांचा त्यांच्याभोवती चांगलाच गराडा पडला. पुस्तक भेट देणं, स्वाक्षरी घेणं, त्यांच्यासोबत फोटो काढून घेणं असं सारं खूपवेळ चाललं होतं. वाचकांनीच मोरेमामांना हे असं भरभरून प्रेम दिलं होतं. त्या दिवशी ते रसिक वाचकांचे हिरो ठरले होते.

या मुलाखतीनंतरही मोरेमामा क्वचित भेटत रहायचे. फोनवर बोलणंही व्हायचं. आजारी असताना, तब्बेत साथ देत नसतानाही ते माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर सांत्वन करण्यासाठी आवर्जून घरी आले होते. ‘मामा अशा अवस्थेत कशाला बाहेर पडलात, फोन केला असता तरी चाललं असतं.’ मी तसं म्हणालोही त्यांना. पण अशाप्रसंगी ऐकतात ते मोरेमामा कसले? निघताना विद्याला म्हणाले,‘‘सरांना जरा काळजी घ्यायला सांगा. खूपच रोडावलीय तब्बेत. गाडीवरनं पण कुठं पडल्यात जणू. आता बारकी गाडी देऊ नकोसा त्यांना. हायवेवर लई गर्दी असतीया. कशाबी गाड्या मारत्यात माणसं. दिवस काही सांगून येत न्हाइत. चला जातो आता, काळजी घ्या.’’

नानासाहेब जामदार यांच्याविषयीही मोरेमामांना खूप ममत्त्व होतं. फोनवर बोलताना त्यांचा विषय निघाला तर कळवळून म्हणायचे, ‘‘अहो, त्या नानांना जरा समजावून सांगा हो. कुठं जातील तिथून पुस्तकं विकत घेऊन येतात. सेवानिवृत्त झाले आहेत. त्यात पेन्शनबी नाही. लहान मुलं आहेत दोन. संसार आहे. आईच्या औषध पाण्याचा खर्च. कशाला घ्यायची इतकी पुस्तकं विकत. सांगा जरा त्यांना. ऐकतच न्हाईत.’’ एखादा लेख, कथा, बातमी असं काही आलं वर्तमानपत्रात छापून तर नाना मामांसाठी ते वर्तमानपत्र घेऊन जायचे घरी. पण विकत आणलेल्या वर्तमानपत्राचे पाचसात रूपयेही नानांच्या हातात ठेऊनच मामा ते वर्तमानपत्र ताब्यात घ्यायचे. एकदा मोरेमामांनी डॉक्टरांनी लिहून दिलेली काही औषधं ‘तुमच्या सवडीनं आणू द्या. तेवढ्यासाठी म्हणून काही गावात हेलपाटा घालू नका. बाजाराला आला की ही औषधं आणली तरी चालतील.’ असं नानांना सांगितलं. औषधांचे पैसेही त्यांच्याकडं दिले. नानांनी औषधं आणून दिली. शिवाय उरलेलं पैसेही परत दिले. दुसऱ्याच दिवशी नानांना फोन. ‘ गणित चुकले आहे तुमचे नाना. तुम्ही पदरचे काही पैसे घातले आहेत. अधिकचे पैसे मला दिलेले आहेत. गावात आलात की पैसे घ्या माझ्याकडून. वायले काढून ठेवले आहेत.’ दिलेले पैसे औषधांची पैसे हे सारे मोरेमामांनी ताडून पाहिले होते. किंमत जास्त भरत होती. नानांनी आपल्याकडचे अधिकचे पैसे मेडिकलवाल्याला दिले असतील म्हणून मामा अस्वस्थ होते. नंतर येऊन नानांनी खुलासा केल्यावर मामांना खात्री पटली. झाले होते असे की, औषधं सवलतीच्या किमतीत मिळाली होती. ती अशी मिळाली असणार हे मामांच्या ध्यानी आले नसावे. पण आपल्या औषधांकरिता जवळचा असो वा लांबचा कुणाला तोशीस पडू नये याचीही काळजी मामा ही अशी सतत घेत असत.

‘इगोड’ या नावाचा त्यांचा एक कथासंग्रह मार्च 2022 मध्ये प्रकाशित झाला. त्या कथासंग्रहाच्या अर्पणपत्रिकेत मोरेमामांनी लिहिलं होतं,‘‘आयुष्याच्या 82 वर्षाच्या दीर्घ वाटचालीत मी माझे दोन भाऊ गमावले. त्याची भरपाई म्हणून की काय, नियतीने तीन भाऊ मला दिले. रमेश साळुंखे, नानासाहेब जामदार, कबीर वराळे यांना कृतज्ञतापूर्वक… माझ्या आयुष्याच्या वैराण माळावर माझ्या शिरावर शीतल छायेचा गारवा देणारे हे तीन लिंबवृक्षच… आपुलकीच्या छायेतील अशा लोभस गारव्यामुळे ‘अजुनी चालतोची वाट, माळ हा सरेना’ या काव्यपंक्तींचा आठव होणाऱ्या या वाटचालीस नवे बळ येते’’ केवढा मोठा सन्मान केला होता मोरेमामांनी आमचा! हे सारं काही त्यांचं अंतिम दर्शन घेताना लख्ख लख्ख दिसत होतं. कोरोनाच्या सगळ्या विस्कटणावळीवर मी एका कादंबरीचं लिखाण केलं होतं. त्यांचा वेळही जाईल थोडासा आणि मलाही काही सांगता सुचवता आलं तर बरं म्हणून मी ते अप्रकाशित बाड मोरेमामांना वाचावयास दिलं. या वयात त्यांना हा असा त्रास द्यावा का? असाही विचार यायचा मनात पण त्यांचाही वेळ बरा जाईल आणि अनुभावाचे चार शब्द माझ्याही उपयोगी पडतील याचा विचार करून विलापयात्रा ही कादंबरी मोरेमामांकडे पाठवून दिली. चार आठ दिवसांना त्यांचा फोन. अस्पष्ट घोगऱ्या आवाजात पण उत्साहानं बोलत होते. म्हणाले,‘‘सर वाचली बरं का तुम्ही दिलेली कादंबरी. चांगलं लिहिलं आहे तुम्ही. आता लिहून पाठवायचं तर जास्त वेळ बसायला जमत नाही. म्हणून नानाला सांगितलं, रेकॉडिंगच करा मोबाईलवर, तेच पाठवून देऊ सरांना. पाठविलं असेल बघा त्यांनी, बघा जरा.’’ मग इकडचं तिकडचं बोलून त्यांनी फोन ठेऊन दिला. त्यांनी पाठवून दिलेलं रेकॉडिंग ऐकलं. मन लावून बोलत होते मोरेमामा. काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या होत्या त्यांनी. नंतर फोन केला तर मी तर म्हणाले, ‘‘आपलं साहित्य जास्तीत जास्त वाचकांनी वाचलं पाहिजे. नुसती ग्रंथालयांच्या कपाटात पडून राहिली तर ते साहित्य कसलं. तुम्ही छान बारकावे पकडले आहेत लेखनात. लवकर प्रकाशित करा.’’ आता आपल्या संध्याछाया हातपाय पसरू लागल्या आहेत; आवराआवर केली पाहिजे असं कदाचित त्यांना वाटू लागलं असावं. हळदी हे त्यांचं मूळ गाव. नोकरी धद्यांच्या निमित्तानं, पोटपाणी भरण्याच्या हेतूनं हे कुटुंब निपाणी या गावी आलं होतं. गावाकडं तसं कुणीच नव्हतं. असलं तरीही त्याची ओळखदेख किती हा प्रश्नच. मोरेमामांना मात्र त्यांचं हळदी हे गाव खुणावू लागलं होतं. गावाकडे आपण जावं, गावदेवीची दर्शन घ्यावं, ओळखीच्या काही खुणा दिसतात का ते पहावं. असं निश्चितच वाटत असावं. ते त्यांनी आपल्या धाकट्या भावाला-शिवाजीरावांना सांगितलं. हे दोघे आणि नाना असे तिघेही दिवस ठरवून हळदीला जाऊन आले. गावाकडं जायला निघताना. भल्या सकाळीच मोरेमामा आवरून बसले होते. जाताना चार उदबत्या, पाण्यानं भरलेले दोन नारळ काडेपेटी असे सारेकाही बरोबर घेतले होते. वाटेवर असणाऱ्या घोडेश्वरकरिता आणि गावदेवी चौडेश्वरीकरिता ते सश्रद्ध मनाने निघाले होते. गावात ज्या जुन्या नातेवाईकाची भेट घ्यायची होती. ते भेटलेच नाहीत. चौडेश्वरीचा पुजारीही कुठे परगावी गेले होते. पुजाऱ्याच्या कन्येने त्यांना देवीचे यथासांग दर्शन घडविले. मामा गावातल्या ग्रंथालयात गेले. तिथे त्यांनी सोबत घेतलेली दोन पुस्तके ग्रंथालयाला भेट म्हणून दिली. कृतार्थ मनानं ते घरी परतले. मामा एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी चौडेश्वरीच्या पुजाऱ्यांना एक पत्र लिहिले. आपली भेट झाली नाही याची चुटपूट लागून राहिल्याची खंत बोलून दाखविली आणि त्यांना पत्रात हेही लिहिले,‘आपली भेट झाली. पण तुमच्या अत्यंत सालस मुलीची भेट घडली. तिचे टपोरे सुंदर मोठ मोठ डोळे पाहून साक्षात चौडेश्वरीच मूर्तरूपात भेटल्याचं समाधान झालं.’ असे मन:पासून त्यांनी त्या पत्रात लिहिले होते. ‘गावाकडं जाऊन आलो बघा परवा.’ असं अधूनमधून ते आवर्जून सांगत असायचे. बोलण्या सांगण्यातून समाधान पाझरत असायचं. 22 जून 2024 रोजी आम्ही त्यांचा 85 वा छोटेखानी वाढदिवस साजरा केला. पेढे, केक, गुच्छ असा केवळ चौघांचा घरघुती कार्यक्रम. आनंद संकपाळ यांच्या एलआयसीच्या ऑफिसमध्ये ते आले होते. चार पायऱ्या चढून आल्यानंतर त्यांना खूप धाप लागल्याचे जाणवत होते. नानांनी हाताला घरून त्यांना खुर्चीवर बसवले. आढेवेढे घेत होते, पण तयार फेटा त्यांच्या डोक्यावर चढवला. आता जाताना त्रास होतो म्हणून त्यांना दिलेल्या भडंगातले सारे शेंगदाणे त्यांनी आमच्या प्लेटमध्ये ठेऊन दिले. ‘‘खावा तुम्ही’’ म्हणाले. आवाज कातर, थकलेला वाटत हता. हृदयाचा आजार बळावत चालला होता. मोरेमामांच्या चेहऱ्यावरील ठेवणीतले हसूही काळाने जणूकाही ओरबाडून घेतले होते. प्रचंड एकटे, एकाकी आणि मलूल दिसत होते मोरेमामा. त्यातच मोजक्याच मित्रांशी संपर्क साधण्यासाठी ते वापरत असलेला फोनही नादुरूस्त झाला होता. जुनी गाणी ऐकणे नाही की जुने चित्रपट पाहणे नाही. सगळच ठप्प ठप्प झालेलं. जगाशी त्यांचं बोलणच संपलं होतं, की त्यानी आपणहून ते संपवून टाकलं होतं कुणास ठाऊक.

मोरेमामांची सारी भावंडं, सूनबाई, मुलगा सारेच त्यांची काळजी घेत असत; पण दोनच महिन्यात मोरेमामा आपल्यात असणार नाहीत; असं स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. श्रावण संपला की मोरेमामा आमच्या सोबत निपाणी चिक्कोडी रस्त्यावरील त्यांना आवडलेल्या एका हॉटेलमध्ये बिर्याणी खायला येणार होते. ते सगळे तसेच राहून गेले. अखेर नानांचा 21 ऑगस्ट 2024 रोजी सकाळीच फोन आला. मनात शंकेची पाल चुकचुकलीच. पहाटे तीन वाजता मोरेमामा कायमचेच निघून गेल्याचं नानांनी सांगितलं. त्यांच्या घरी त्यांना अखेरचं भेटायला जात असता जवळपास बावीस वर्षांचा पट झरझर झरझर डोळ्यांपुढून सरकत होता.

मोरेमामांशी खूप जुना स्नेह असणारे सुभाष जोशी, राजन गवस, काकासाहेब पाटील, रणधीर शिंदे, अशोक परीट अशा अनेकांसोबतच महादेव मोरे यांना शेवटचं पाहण्यासाठी त्यांच्या कुलूपबंद असलेल्या पीठाच्या गिरणीसमोर कुमारभाईही शांतपणे उभे होते. मोरेमामांना या जगातून कायमचं जाऊन जवळपास आठ दहा तास होऊन गेले होते. तीनचार जणांनी त्यांना उचलून बाहेर आणलं. शेवटचे सारे सोपस्कार पूर्ण झाले. उचलून तिरडीवर त्यांना सावकाश ठेवण्यात आलं. खूप वेळ होऊन गेल्यामुळे त्यांचं सारं शरीर तारवटून गेलं होतं. मान ताठ सरळ असलेली दिसत होती. कुणीतरी त्यांच्या मानेखाली एक उशी आणून ठेवली. पाहून मनात येऊ नये ते येत गेलं. स्वत:शीच म्हणालो, ‘‘आयुष्यभर या माणसानं जगाकडं ताठ मानेनं पाहिलं; आणि शेवटीही हा माणूस अगदी ताठ मानेनं गेला.’’

( सौजन्य – मुराळी मासिक )


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading