पुणेः निगडी प्राधिकरण येथील मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्या ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्यावतीने संत वाड्.मयविषयक पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन संस्थेचे कार्यवाह य. ल. लिमये व सु. मा. कुलकर्णी यांनी केले आहे.
शालेय मातृमंदिर विश्वस्त संस्था प्रतिवर्षी संत वाड्.मय अभ्यासावर आधारित स्पर्धा घेत असते. विद्यार्थी आणि अध्यापक यांना संत वाड्.मयाचा अभ्यास करण्यासाठी विपुल साहित्य उपलब्ध व्हावे या उद्देशाने संत वाड्.मयविषयक पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. तसेच असें वाड्.मय विविध शाळांना सुचवता यावे, वाड्.मय वाचकांसमोर ठेवणारे लेखक आणि प्रकाशक यांना प्रोत्साहन देता यावे, त्यासाठी पुरस्कार देण्याच्या निमित्ताने लेखक आणि प्रकाशक वाचकांसमोर यावेत या हेतूने असे पुरस्कार देण्याचे संस्थेने ठरवले आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा प्रतिवर्षी मातृमंदिर वर्धापनदिनी म्हणजे सौर १ मार्गशीर्ष ( २२ नोव्हेंबर ) या दिवशी ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय , निगडी या ठिकाणी आयोजित केला जातो. तरी या योजनेसाठी पुस्तके पाठवून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
पुरस्काराच्या योजनेसाठी पूर्वीच्या दोन सौर वर्षात प्रकाशित झालेल्या संतविषयक मराठी साहित्य विचार घेतले जाते. तसेच संत साहित्याचे परीक्षण ( टीका विवेचन ) संतचरित्रे, संताच्या कार्यावरील विवेचनात्मक लेखन, संत जीवनावर आधारित ललित साहित्य ( कथा, कादंबरी, काव्यकोश इत्यादी सर्व प्रकारचे साहित्य ) पुरस्कारासाठी दोन प्रतीत पाठवावे.
१०० पेक्षा अधिक पृष्ठांच्या मोठ्या सर्वोत्कृष्ट दोन पुस्तकांच्या लेखकांना अनुक्रमे १०,००० रुपये आणि त्याशिवाय ८००० रुपयांचे दोन पुरस्कार (६० % रक्कम लेखकांस आणि ४० % रक्कम प्रकाशकांस ) दिले जाणार आहेत. संतचरित्र संतवचनसंग्रह अशा स्वरूपातील दोन बालवाड्.मयातील ( १०० पृष्ठांच्या आतील ) संतकथा पुस्तकांना प्रत्येकी २५०० रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे.
संतसाहित्याचे समीक्षक किंवा लेखक अशा तीन ख्यातनाम तज्ञाच्या समितीकडून परीक्षण करून पुरस्कार पात्रतेचा निर्णय घेतला जातो. पुरस्कारासाठी पाठविण्याच्या प्रत्येक पुस्तकाच्या दोन प्रती सौर ९ भाद्रपद (३१ ऑगस्ट ) पर्यंत मातृमंदिर विश्वस्त संस्था, ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, पेठ क्र. २५, निगडी प्राधिकरण, पुणे ४११०४४ दूरभाष क्र. २७१६८००० / ९२७७६३३००० या पत्त्यावर पाठवावीत. असे संस्थेच्यावतीने कळविण्यात आले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.