September 7, 2024
Prashant Satpurte article on evening movements
Home » एक मंतरलेली सांजवेळ..
मुक्त संवाद

एक मंतरलेली सांजवेळ..

मघाशी असणारी रम्य सांजवेळ काळ्याकुट्ट काजळ रात्रीच्या घट्ट मिठीत आता गुरफटून गेली होती. शीतल हवा सुटलेली. रानपिंगळ्यांच्या आवाजाने खिडकीबाहेरील आंबा-लिंब बोलता झाला होता. तोही अगदी क्षणभर ! वाऱ्याने गती घेतली तशी, पक्षांचा आवाज थांबला अन् झाडांची खसफस सांगून गेली.
कुसुमानंद (प्रशांत सातपुते)

‘पडू की नको..’अशा द्विधा अवस्थेत काळवंडलेला..जलबिंदूंचा ढिगारा पदराच्या ओटीत घेवून, ढगांचा मांडव आकाशात पसरत होता. ‘म्हातारीचे केस’ हवेवर भूर्कन उडून जावेत, तसा हा पदर पुढे पसरत होता. जलकणांचे गाठोडे मात्र, घट्ट बांधून घेवूनच.! त्याच्या पसरण्याने, पुढे पळण्याने मांडवाचे छत फाटून त्याला सुरुवातीला सांदर, झरोका अन् पुढे भगदाड पडत होते. निळे-पांढरे आकाश भगदाडातून पृथ्वीला भुलावत होते. आमचा सूर्याबा या झरोक्यातून मधूनच मिचकावून जात होता. जणू मार लागून झालेल्या काळ्या-निळ्या ढगात लालसर सुजेची झाक देत एकदम गडप होत होता. काही क्षण तो गायब तर, त्याचे दूत किरणं कवडस्यातून ढगांना फाकत समोर ठाकलेली. हे मनोहारी दृश्य होते.

अशा या रम्य सांजवेळेची साक्ष होत, मी आणि सौ. पक्षांच्या ओढीने पुढे निघालो. पक्षांच्या विणीचा हंगाम असल्याने, कंठ फुटलेला काळाकुट्ट लाल डोळ्यांचा #कोकीळ #asiankoel जोडीदाराला जागोजागी साद घालताना ऐकू येत होता. या झाडावरुन त्या झाडावर उडताना दिसत होता. कावळ्याशी मध्येच भांडत होता. त्याला आपल्या मागे यायला लावून बेरकीपणाने मादीला अंडी घालण्यासाठी संधी निर्माण करुन देत होता.

पुढच्या हंगामासाठी शेतकऱ्यांनी रानं स्वच्छ करुन, मशागत करुन तयार ठेवली होती. प्लास्टिक अंथरुण ‘गिलकी’ घोसाळे लागवडीसाठी सऱ्या सोडल्या होत्या. त्याच्या स्पष्ट खाणाखुणा दिसत होत्या. #वाळवी #termite लागून मरणासन्न अवस्थेत अखेरची घटिका मोजणाऱ्या झाडावर #पोपटांचा #parrot थवा स्थिरावला होता. त्यातील एखादा बिलंदर नर शीळ वाजवून थव्यातील युवतींवर छाप टाकत होता. डोके, मान, पंख काळसर आणि मधूनच पांढऱ्या रेघोट्या ओढलेला लांब शेपटीचा #दयाळ #indianrobin शीळ वाजवत विविध मंजूळ स्वर काढून, मादीला आकर्षित करत बसून होता. ढगांच्या दाटीने अंधारलेल्या मांडवात मोबाईलमध्ये ते सगळे काळवंडलेले दिसत होते.

भर दुपारी गादी पिंजण्यासाठी येणाऱ्या #पिंजाऱ्याने #carder #cotton-comber आपल्या साधनाची तार छेडून गल्लीत आल्याची वर्दी द्यावी, तसा आवाज आला. तसे, आम्ही दोघेही येणाऱ्या आवाजाच्या रोखाने पहातच राहिलो. आंब्याच्या झाडावर #नीलपंखी #indianroller ची एक जोडी बसलेली दिसली. सावधपणे त्यांना टिपताना, माझी चाहूल लागून, त्यातील एक निळे पट्टेदार पंख पसरत उडाला आणि लांबवर असणाऱ्या संरक्षण भिंतीवर विसावला. तर, दुसरा नजिकच्या आंब्याच्या शेंड्यावर..!

एव्हाना #रानपिंगळ्यांची #forestowlet फडफडाट झाली. आपले अस्तित्व दाखवत दोन-चारजण या फांदीवरुन त्या फांदीवर उगीचच विसावले. मान पुढे काढून, आम्हा दोघांना न्याहाळू लागले. इटुकली पण, सरावाने धिटुकली बनलेली #खार #squirrel फांदीवरुन पळत होती. एव्हाना परिसरात ‘टी..टीव्ह..टीव..’ चा #टिटवी #redwattledlapwing चा आवाज परिसराला भेदत होता. हा हंगामच असल्याने, घरटी, अंडी, उबवण आणि पिलांचे संगोपन हा त्यांचा दिनक्रम, त्यांच्या त्या आवाजात भरुन राहिलेला. दोन-चार टिटवी उघड्या-बोडक्या रानाशी एकरुप होत पळत होत्या.

‘तुला टिटवीचे घरटे वा पिले पहायचित का..?’ असे हलक्या आवाजात सौ. ला विचारुन सावध पावलांनी माझ्या मागे येण्यास तिला खुणावले. थोड्या अंतरावर आई-वडील आणि दोन गोड-गोजिरी सुंदर पिले असा निसर्गाचा अतिशय अद्भूत आणि सुंदर नजारा मला दिसला. काटकीसारख्या पायाने दुडू-दुडू पळत, आई-बाबांसारखे उगीचच मातीच्या भेगाळलेल्या ढेकळात आपली इवलिसी चोच मारत, ते त्यांना काॕपी करत होती. पळताना कधी पडत होती. अजू-बाजूच्या परिसराशी एकरुप झाल्याने, ती पिले लवकर ओळखून येत नव्हती. कितीही दबक्या पावलांनी आम्ही तिथे गेलो असलो तरीही, टिटवीच्या जोडीला आमच्या दोघांचीही चाहूल लागली होती. दोघांनीही जोर-जोरात ओरडून दंगा चालवला होता. एकजण तर अंगावर येत, चेतावनी देत होता. हे सगळं मनमोहक, भावूक, भुरळ घालणारं अन् आक्रमक दृश्य टिपून आम्ही दोघेही तेथून पुढे सटकलो..आणि त्यांचा जीव भांड्यात पडला. कारण, आमच्यापासून त्यांना कोणताही धोका नाही, हे जाणवल्याने त्यांचा दंगा आता शांत झाला होता.

पंखांची दोन-चारवेळा सलग फडफड करत आणि मध्येच काहीवेळ स्थिरावत अशा उडण्याच्या स्टाईलने डोक्यावरुन #राखीधनेशाची #indiangreyhornbill एक जोडी विहारत दूरवरच्या झाडावर विसावली. धनेशाच्या आणखीही एक-दोन जोड्या आवाज काढत, शेपट्या हलवत, इतस्तः पहात झाडावर बसून होत्या. गुलाबाच्या ताटव्यात आलो. शेतकऱ्यांने बागेची बऱ्यापैकी छाटणी केलेली दिसत होती. #शेवंती वर्गातील स्थानिक #बिजली’ #chrysanthemum नाव असलेल्या फुलांचा एक राखीव ताटवा ठेवलेला दिसला. त्यात #मधमाशी #honeybee आपले मकरंद शोषणाचे काम बिनचूक करत होती.

काश्मिर #kashmir सफरीत #शंकराचार्यांच्या मंदिराकडे #shankaracharyatemple जाताना अशीच गुलाबातील मकरंद गोळा करताना मधमाशी दिसली होती. पुढे ती मुघल गार्डनमधील #टुलीप वर्गीय #tulip फुलातील मकरंद शोषतानाही आढळली होती. अगदी तसेच, ती येथे मनमुराद मधुकण वेचत होती. कधी या तर, कधी त्या फुलात बसून, उडताना तिचा नाद वातावरणात विरुन जात होता. तिच्यासाठी सर्व रंगाची, सर्व वर्गातील फुले सारखी होती.

“ज्यावेळी मधमाशी या जगातून संपेल त्यानंतर अवघ्या चार वर्षानंतर मनुष्य जातीचे अस्तित्वच संपुष्टात येईल.” असे #अल्बर्टआइनस्टीन #alberteinstein म्हणतो. सपुष्प वनस्पतींना मधमाशीचा होणारा स्पर्श हा परिस स्पर्शापेक्षा कमी नसतो. फल धारणेसाठी पर परागीकरणात महत्वाची भूमिका मधमाशी पार पाडत असते. त्या विलोभनीय प्रसंगाला चित्रबध्द करुन तलावाशेजारी आलो. तर पुन्हा, पिंजाऱ्याने तार छेडावी, तसा आवाज काढत, विजेच्या खांबावर #नीलपंखी ची जोडी विसावलेली. त्यांना चित्रित करुन तलावाच्या काठावर आलो. फेब्रुवारीत भरलेल्या तलावात #बदक #duck , #पाणकावळे , #indiancormorant , #पाणकोंबड्या , #commonmoorhen पांढऱ्या #बगळ्यांना #egret पोहताना पहायला मिळालेले चित्र आज नव्हते. तलाव पूर्णपणे आटलेला दिसत होता. एक-दोन ठिकाणी डबके म्हणावे इतपतच पाणी होते. त्यातही #करकोचे आणि #बगळे चोचा मारत उडत होते. हा विणीचा हंगाम असल्याने नेहमी पांढराशुभ्र दिसणाऱ्या गायबगळ्यावर विटकरी, लालसर-मातकट रंग चढला होता.

पाणकोंबडी ओरडून इकडून तिकडे धावत झुडुपात गडप झालेली. खारींचा समुह झाडावरुन खाली, शेतातून झाडावर लगीनघाईसारखा वावरत होता. परतीच्या वाटेवर #भारद्वाज #greatercoucal अर्थात #कुंभारकावळ्यांच्या जोड्या झाडावर उड्या मारताना दिसल्या. ‘हूपूपूप’ आवाज काढून आपल्या ‘पार्टनर’ला साद घालताना ऐकायला मिळाले. जोडीदारणीचा मिळालेला प्रतिसाद आपलासा करीत या जोड्या नजरेआड झाल्या.

‘पुक..पुक’ आवाज काढत #पुकपुक्या अर्थात #तांबट #CoppersmithBarbet मादीला साद घालत, झाडाच्या अगदी शेंड्यावर बसून होता. त्याच्या ‘पुकपुकण्याला’ तात्काळ प्रतिसाद देत ‘ती’ त्याच्या नजिकच्या झाडावर स्थिरावताना दिसली. मात्र, आणखी एक प्रतिस्पर्धी त्याच्याच जवळ येवून बसला. त्या दोघांच्या शाब्दिक द्वंद्वात एकजण तेथून उडाला. तशी ‘ती’ देखील..!

टिटवी ची ‘टीव टीव’ ऐकतच पुढे आलो. विजेत्या पैलवानाने डोईवर कोल्हापुरी फेटा मिरवावा तसा, लालसर तुऱ्याचा #सोनपाठीसुतार #lessergoldenbackedwoodpecker वाळलेल्या फांदीला वळसा घालत, घालत शेंड्यावर चढला. चोचीची उगीचच टकटक करत, बसून राहिला. त्याचा साथीदारही लगेचच त्याच्या बाजूला आला. चोचीची उघडछाप करत, इकडे तिकडे पहात ‘त्याने’ ‘चूकू..चूकू…च्रू…’ अशी लांबलचक किलकारी देत ‘तिला’ साद घातली. बहुधा तिचा फारसा प्रतिसाद न मिळाल्याने, तो मग पुढच्या शोधात उडाला.

कधी जमिनीवर कॅटवॉक करणारी #साळुंखी #commonmyna ची जोडी, तर झाडाच्या शेंड्यावर बसून, लयीत तर, कधी कर्कश्श ओरडणाऱ्या जोड्या, #भांगपाडीमैना, #brahminystarling भुरकावणाऱ्या #बुलबुल #bulbul च्या जोड्या, दुभंगलेली शेपूट घेवून, जोडीदारणी भोवती घुटमळणारा #कोतवाल , #asianblackdrongo #जांभळाफुलचुक्या अर्थात #सूर्यपक्षी #purplerumpedsunbird सायंकाळ वाढली तशी घाईने घरट्याकडे परतलीत.

ढगाळलेल्या जलबिंदूंना फाडून आमचा तांबडा-केशरी सूर्याबा घरी परतत होता. त्याची छबी टिपत आम्ही दोघेही माघारी परतलो. रानाच्या काठावर रस्त्याला समांतर गेलेल्या विजेच्या तारेवर लालबुंद, खलनायकी भेदक डोळ्यांची पांढरीशुभ्र, काळपट पंखांची #कापशीघार #BlackwingedKite बसून होती. या शिकारी पक्ष्याच्या धाकाने परिसरात शांतता दाटलेली. त्याच्या एकटेपणाने ती अधिक दृढ झालेली. ती आपल्याच नादात कित्येक वेळ बसून होती. तिला मोबाईलमध्ये बंदिस्त करुन आम्ही घरी परतलो.

मघाशी असणारी रम्य सांजवेळ काळ्याकुट्ट काजळ रात्रीच्या घट्ट मिठीत आता गुरफटून गेली होती. शीतल हवा सुटलेली. रानपिंगळ्यांच्या आवाजाने खिडकीबाहेरील आंबा-लिंब बोलता झाला होता. तोही अगदी क्षणभर ! वाऱ्याने गती घेतली तशी, पक्षांचा आवाज थांबला अन् झाडांची खसफस सांगून गेली. आपल्या अदाकारीने जोडीदारणीचे हृदय जिंकणाऱ्या अन् स्वतःचे बहाल करणाऱ्या या मंतरलेल्या जोड्या एकमेकांच्या अलिंगनात, सहवासात, प्रणयाराधनेत विसावल्या असाव्यात..जीवनातील नव्या कोऱ्या दिवसात, नव्या पिढीच्या ब्रह्मांडातील नव्या विहारासाठीच. ! अगदी मंत्रमुग्धपणे..! आता त्याचे द्वंद्व संपले होते. ओटी सांडल्याने पसरलेल्या पदरातून जलकण एका पाठोपाठ एक घरंगळून खाली येत होते. पानांवरुन ओघळणारा जलकणांचा आवाज त्याची प्रचिती देत होता.

कुसुमानंद (प्रशांत सातपुते)


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Saloni Art : असे रेखाटा लेडीबग…

डॉक्युमेंटरी फोटोग्राफी, शॉर्ट फिल्म मेकिंगचा शिवाजी विद्यापीठात अभ्यासक्रम

मुंबईत रंगलेल्या मुशायऱ्यात गझलकारांनी भरले रंग

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading