थोर व्यक्तींचे चरण स्वतःच्या घराला लागावेत, अशी प्रत्येकाचीच मनोकामना असते. थोरांच्या चरणांनी, थोरांच्या येण्याने घरातील आनंद द्विगुणित होतो. अनेक समस्या सुटतात. त्यांच्या येण्यासाठीच आपण घरात काही कार्यक्रमांचे आयोजन करतो.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
श्री गुरुचे पाय । जैं हृदय गिंवसूनि ठाय ।
तें येवढें भाग्य होय । उन्मेषासी ।। ५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा
ओवीचा अर्थ – जेव्हा हृदय श्रीगुरुंचे पाय धरून राहाते, तेव्हा ज्ञानाला एवढें दैव प्राप्त होते.
अध्यात्मात गुरुंच्या चरण सेवेला महत्त्व आहे. पण पायांनाच का महत्त्व? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. सद्गुरू दिसायला सुंदर नाहीत का? त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या आहेत का? तर असे काहीही नाही, मग चरणांनाच महत्त्व का? वडीलधाऱ्यांना नमस्कार करताना चरणांना स्पर्श करावा. वाकून नमस्कार करावा. अशी रीत, असे संस्कार भारतीय संस्कृतीत आहेत. वीणा वाजविणाऱ्या किंवा वीणा सेवा देणाऱ्या व्यक्तीकडून वीणा घेताना त्याला नम्रपणे वाकून नमस्कार करून त्याच्याकडून वीणा घ्यावयाचा असतो. मग वीणा घेतलेली व्यक्ती लहान जरी असली तरीही ही पद्धत आहे.
पण चरणच का? काहींना तर वाकून नमस्कार करण्यात कमीपणा वाटतो. दुसऱ्यासमोर वाकणे म्हणजे त्याची लाचारी पत्करणे असे वाटते. हा त्या व्यक्तींचा अहंकार असतो. मीपणा असतो. मुळात वाकून नमस्कार करणे म्हणजे दुसऱ्यासमोर नम्रता प्रकट करणे असे असते. दुसऱ्याला नम्रपणे वागायला शिकवणे असते. स्वतः नम्रपणे वागाल, तर दुसराही नम्रपणे तुमच्याशी व्यवहार करेल. समोरची व्यक्ती उद्धटपणे वागत असेल, तर त्याच्यामध्येही ही नम्रता यावी. यासाठी आपण आपला संस्कार सोडता कामा नये.
दुसऱ्याने दगड मारला, म्हणून आपण दगड मारणे ही माकडाची वृत्ती आहे. माणसाची नाही. याचे भान आपण ठेवायला हवे. भारतीय संस्कृती नम्र होण्यास शिकवते. चरण पकडल्याने कमीपणा प्रकट होतो. असा भाव, असा विचार येथे कदापि नाही. सद्गुरूंना वाकून नमस्कार केल्यानंतर सद्गुरूही मनातून तुम्हाला वाकून नमस्कार करतात. हे आपण नित्य स्मरणात ठेवावे. व्यक्तीतील अहंकार, मीपणा घालवणारी ही संस्कृती आहे.
थोर व्यक्तींचे चरण स्वतःच्या घराला लागावेत, अशी प्रत्येकाचीच मनोकामना असते. थोरांच्या चरणांनी, थोरांच्या येण्याने घरातील आनंद द्विगुणित होतो. अनेक समस्या सुटतात. त्यांच्या येण्यासाठीच आपण घरात काही कार्यक्रमांचे आयोजन करतो. सद्गुरू ही एक व्यक्तीच आहे. व्यक्ती ही शेवटी पायांनीच चालत येणार. यासाठीच त्यांचे चरण घरी पडावेत. त्यांच्या चरणस्पर्शाने ही भूमी पावन व्हावी. संपन्न व्हावी. असा विचार यामध्ये आहे. यासाठीच त्यांच्या पाद्यपूजेला महत्त्व आहे.
सद्गुरू हृदयात यावेत. त्यांची चरणकमले हृदयात उमटावीत. त्यांचा सोहम भाव हृदयात प्रकटावा. आत्मज्ञानाचा लाभ व्हावा. येवढे थोर भाग्य आपणास प्राप्त व्हावे, अशी प्रार्थना ही याचसाठी आहे. याचसाठी चरणसेवक होऊन नम्रपणे सद्गुरूंची सेवा करावी. यामुळे अहंकार, मीपणा जाऊन आत्मज्ञानाचा ठेवा प्राप्त होईल.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.