December 2, 2023
Backing off is defeat
Home » पाठ दाखवणे म्हणजे पराभव पत्करणे
विश्वाचे आर्त

पाठ दाखवणे म्हणजे पराभव पत्करणे

शत्रूला आपण पाठ दाखवतो तेंव्हा आपल्यातील कमजोरी, कमकूवतपणा शत्रूच्या समोर उघड होतो. याचाच फायदा घेत शत्रू आपल्यावर वार करतो. आपल्या कमकूवतपणामुळे त्याचा आत्मविश्वास अधिकच बळावतो. तो बळावल्यास आपला युद्धात पराभव होण्याचा धोका अधिक असतो. यासाठी शत्रूला कधीही पाठ दाखवू नये.

राजेंद्र कृष्णऱाव घोरपडे, मोबाईल – 9011087406

माहेवणी प्रयत्नेंसी । चुकविजे सेजे जैसी ।
रिपू पाटी नेदिजे तैसी । समरांगणी ।। ८६६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – ज्याप्रमाणे गरोदर स्त्री पतीला आपल्या अंथरुणावर येऊ देण्याचे हरप्रयत्न करून टाळते. त्याप्रमाणे युद्ध भूमीवर असताना आपली पाठ शत्रूस दाखविण्याचे टाळावे.

गरोदरपणामध्ये स्त्रियांना स्वतःची खूप काळजी घ्यावी लागते. अशा काळात तिची मानसिकता कशी आहे यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. याचा परिणाम पोटातील मुलाच्या मानसिकतेवरही होतो. पुरुषांना पत्नीशी लगट करायची सवय असते. गरोदरपणात असे चाळेही दूर ठेवावे लागतात. एकंदरीत या काळात दोघांतील संवादही बदलावा लागतो. भाषातज्ज्ञ गणेशदेवी यांच्यामते भाषा हे शस्त्र आहे. या शस्त्राचा वापर करून योग्य ती काळजी स्त्रिया घेत असतात. परिस्थिती पाहून योग्य संवादातून स्त्रियांना हे शस्त्र वापरत असतात आणि स्वतःचे संरक्षण करत असतात. म्हणजेच परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी त्यांना ठेवावी लागते.

देवाकडे पाठ करून बसू नये असे म्हणतात. डोळे समोर असल्याने समोरचे तेवढे आपणास दिसते. पाठीमागचे दिसण्यासाठी आपणाला मागे पाहावे लागते. कारण पाठीमागे डोळे नाहीत. पाठ करून बसल्यानंतर देवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आहोत अशी मानसिकता निर्माण होते. मागे डोळे नसल्यामुळे मागून कोणी वार केला तर त्याला प्रत्युत्तर देण्यात आपण कमी पडतो. म्हणजेच देवाकडे पाठ केल्यानंतर आपले लक्ष पाठीमागे नसते. हे टाळण्यासाठीच देवाकडे पाठ न करता, तोंड करून बसावे असे सांगितले जाते.

पाठीत खंजीर खूपसला. हे केंव्हा शक्य होते ? आपले लक्ष पाठीमागे नसल्यामुळेच हे शक्य होते. युद्ध कलेत पारंगत असणारा योद्धा समोरचे सर्व वार क्षणात परतवून लावत असतो. त्याचे पाठीमागे लक्ष नाही असे पाहून त्याच्यावर पाठीमागून वार करून ठार मारण्यात येते. यासाठीच शत्रूला पाठ दाखवण्याचे टाळावे. सूर्यफुलाचे झाड जसे सूर्याकडे सदैव तोंड करून उभे असते तसे आपण शत्रू समोर उभे राहायला हवे. आपल्या अशा वागण्यामुळे, कृतीमुळे आपल्या मनात काय चालले आहे हे स्पष्ट होते. आपल्या अशा कृतीतून आपली भूमिका काय आहे किंवा काय राहील याची जाणिव समोरच्या व्यक्तीला येत असते. आपण ताठ मानने शत्रू समोर उभे राहील्यास शत्रूचा सुद्धा आत्मविश्वास ठळू शकतो.

ज्यावेळी शत्रूला आपण पाठ दाखवतो तेंव्हा आपल्यातील कमजोरी, कमकूवतपणा शत्रूच्या समोर उघड होतो. याचाच फायदा घेत शत्रू आपल्यावर वार करतो. आपल्या कमकूवतपणामुळे त्याचा आत्मविश्वास अधिकच बळावतो. तो बळावल्यास आपला युद्धात पराभव होण्याचा धोका अधिक असतो. यासाठी शत्रूला कधीही पाठ दाखवू नये. त्याच्या हल्ल्याला सामोरे जाऊन हल्ला परतवून लावायचा असतो.

साधना करताना अनेक विकार, विषय हे आपल्यावर हल्ला चढवत असतात. त्याच्या हल्ल्याला सामोरे जाऊन त्यावर मात करायची असते. त्यांना भिऊन पाठ दाखवली तर ते विकार आपल्यावर हल्ला करतात. विकार, विषयावर विजय मिळवायचा असेल तर त्यांच्याशी पाठ करून विजय मिळवता येणे शक्य नाही. पाठ दाखवणे म्हणजे पराभव पत्करणे असे आहे.

Related posts

कोरफड (ओळख औषधी वनस्पतीची)

परिवर्तनवादी चळवळीचा वसा जपणाऱ्या सुवर्णसंध्या

अमरत्वाची अनुभुती देणारे अक्षर

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More