आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष
भगरीला लोहाचा एक उत्तम पुरवठा करणारा धान्य प्रकार म्हणून बघितले जाते. 100 ग्रॅम भगरीत आपणास 18.6 ग्रॅम लोह प्राप्त होवू शकते. ॲनिमिया, कुपोषण आदींवर मात करण्यासाठी भगरीचे सेवन लाभदायक मानले जाते.
प्रशांत दैठणकर
आपल्या कोकणात मुबलक होणारे आणखी एक महत्वाचे भरडधान्य म्हणजे भगर होय. अर्थात भगर म्हणजे वरीचे तांदूळ होय. भरडधान्याचा हा प्रकार मुख्यत्वेकरुन उपवासाचा पदार्थ म्हणून आपणा सर्वांना याची ओळख असल्याने दैनंदिन आहारात याचा फारसा वापर होत नसला तरी उपवासाच्या निमिताने याचा हमखास वापर होतो.
आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त आपण विविध भरडधान्यांचा विचार करताना भगराचे महत्व देखील खूप आहे याची माहिती आपणास असली पाहिजे याचे शास्त्रीय वर्गीकरण करायचे तर याचे इंग्रजी नाव बानयार्ड मिलेट असे आहे.
ग्लुटेन मुक्त अन्नप्रकार हा ह्दयविकार आणि मधुमेह असणाऱ्यांना सर्वोत्तम आहार मानला जातो. भगर त्यापैकीच एक आहे. यात कॅलरीज कमी असून पचण्यास सोपा अन्नप्रकार असल्याने याचे सेवन करायला हरकत नाही पचनाचे विकार असणाऱ्यांना देखील हा उत्तम असा अन्नप्रकार आहे.
भातशेती सोबतच होणारे हे भरडधान्य आपल्याकडे विविध प्रांतात विविध नावांनी आपल्याकडे ओळखले जाते. बंगालीत याला श्यामा नाव असून गुजरातमध्ये याची ओळख मोरायिओ अशी तर हिंदीत याला सन्वा आणि कन्नड भाषेत उडालू म्हणतात. तमिळमध्ये याला कुथिलायवली असे नाव असून तेलगूत मात्र उडालूच म्हणतात. मराठीत भगर किंवा वरीचे तांदूळ अशी याची ओळख. साधारण तांदूळाच्या तुटलेल्या दाण्यासारखी ही भगर आकाराने याचे दाणे रवा आणि साबुदाण्यापेक्षाही लहान असतात.
भगरीमधील पोषण मूल्यांचा विचार करता साधारण 25 ग्रॅम भगर आपणास 75 कॅलरी ऊर्जा आणि 1.5 ग्रॅम प्रथिनांचा लाभ देते. फायबर अर्थात तंतुमय पदार्थात आवश्यक असलेल्या दोन्ही प्रकारांची मुबलकता यात आहे. सोल्युबल आणि इन्सोल्युबल फायबर आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. वर दिलेल्या प्रमाणातील भगरीत 2-4 ग्रॅम फायबर आपल्या शरीरात प्राप्त होता साधारण 12.6 टक्के फायबर पैकी 4.2 टक्के सोल्युबल (विरघळणारे) तर 8.4 टक्के इन्सोल्युबल (न विरघळणारे) फायबर यात आपणास मिळते यामुळे पोटदुखी, गॅस होणे आदी आरोग्याच्या समस्या दूर राहतात.
भगरीला लोहाचा एक उत्तम पुरवठा करणारा धान्य प्रकार म्हणून बघितले जाते. 100 ग्रॅम भगरीत आपणास 18.6 ग्रॅम लोह प्राप्त होवू शकते. ॲनिमिया, कुपोषण आदींवर मात करण्यासाठी भगरीचे सेवन लाभदायक मानले जाते. यातील पोषण मुल्यामुळे भगरीची खीर लहान (01 वर्षापर्यंतच्या) मुलांना दिल्यास त्यांच्या आरोग्यवृध्दीस मदत होते.
भगरीपासून खीर व्यतिरिक्त उपवासाचा डोसा, उपवासाची थालिपीठे देखील करता येतात. यातील पोषणमुल्यांचा विचार करता उपवासापुरता वापर मर्यादित न ठेवता आपण याचा आठवड्यातून एकदा वापर करावा हे उत्तम.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.