March 15, 2025
Book Review of Gandh Ola Mogaraycha by Suhas Pandit
Home » गंध ओला मोगऱ्याचा….एक गझलगुच्छ !
मुक्त संवाद

गंध ओला मोगऱ्याचा….एक गझलगुच्छ !

बदलत्या पिढीबरोबर विचारही बदलतात. विचारातील हा बदल माणसाच्या प्रगतीला पोषक असेल तर अवश्य स्वीकारावा. पण आज जुन्याकडे पाठ फिरवून फक्त ‘नवे ते सोने’ ही वृत्ती वाढीस लागली आहे. त्यामुळे संस्कार करणे, करुन घेणे, झालेले संस्कार टिकवणे हे कालबाह्य वाटू लागले आहे. याचा परिणाम म्हणूनच नीतीमत्तेचा ऱ्हास होत चालला आहे. सुसंस्कृत नसलेल्याला माणूस तरी कसे म्हणावे. राक्षसाच्या मनातील वासना आणि वृत्ती आता माणसात दिसू लागली आहे.

सुहास रघुनाथ पंडित, सांगली.
9421225491

सांगली येथील गझलकार कवी विनायक कुलकर्णी यांचा `गंध ओला मोगऱ्याचा’ हा गझल संग्रह मोगऱ्याच्या फुलाप्रमाणेच सर्वांगाने बहरून आला आहे. या संग्रहात एकूण अठ्ठावन गझला असून त्यात निसर्ग, प्रेम, नैराश्य, विरह अशा सर्व भावनांवरील गझला आहेत. पण गझल फक्त एवढ्या विषयांपुरतीच मर्यादित नसून तिने सामाजिक, राजकीय वास्तव देखील दुर्लक्षिलेले नाही हे दाखवून देणाऱ्या गझला या संग्रहात वाचायला मिळतात. त्यामुळे गझल म्हणजे फक्त प्रेम आणि विरह नव्हे तर सामाजिक भान व्यक्त करण्याचेही माध्यम आहे हे श्री कुलकर्णी यांच्या संग्रहातून स्पष्ट होते. त्यामुळे सर्वच गझलांचा किंवा गझल काव्य प्रकाराविषयी लिहिण्यापेक्षा श्री. कुलकर्णी यांच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे काही शेर या ठिकाणी समजून घ्यावेसे वाटतात.

स्वार्थ कसा साधावा हे शिकवावे लागत नाही. पण स्वार्थ साधत असताना तो किती टोकाचा असावा याचा विचार मात्र व्हायलाच हवा. पण आजची परिस्थिती काय आहे ? कालची भूमिका आज नाही, कालचे विचार आज नाहीत, कालचा मित्र आज मित्र नसेल अशीच अवस्था समाजात सर्वत्र दिसते आहे. त्याचे नेमके रुप कविने या शेरातून केले आहे.

“पहात असतो अवतीभवती माणुसकीचे रंग नवे
स्वार्थासाठी कसे बदलती रोजरोजचे ढंग नवे”

काळाबरोबर बदलले पाहिजे. पण हा बदल स्विकारताना आपण सभ्य समाजात राहतो हे ही विसरता कामा नये. आधुनिकतेचा स्विकार करताना योग्य अयोग्य काय याचाही विचार व्हायला हवा. या शेरामध्ये कवीने पोषाखातील होत जाणाऱ्या बदलाबद्दल सुनावले आहे. भोक पाडलेले कपडे ही फॅशन होऊ शकते का ? तंग कपडे आरोग्यासाठी तरी योग्य आहेत का ? आजच्या फॅशन व अंधानुकरणाच्या जमान्यात हे फारसे कुणाला पटणार नाही. पण स्वतःच्या मनाला जे पटत नाही ते बोलून दाखवणे हा कविचा बाणा आहे.

“झाकत होते देह आपले पुरुष असो वा ती नारी
पोषाखाची झाली चाळण आता कपडे तंग नवे “

स्वार्थ आणि फक्त व्यवहारवाद यामुळे आपली अशी समजूत झाली आहे की पैसा फेकला की काहीही विकत घेता येते. अगदी माणूससुद्धा ! त्यामुळे कविला असा प्रश्न पडतो की स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहून इमान राखणारा माणूस असेल तरी का ? म्हणजे बजबजपुरी एवढी माजली आहे की माणसाचा चांगुलपणावरचा विश्वासच उडायला लागला आहे. माणूस प्रामाणिक, तत्त्वनिष्ठ असू शकतो यावरचा विश्वास कमी होत चालला आहे.

“प्रसंग येतो पुढे आपल्या तसाच आपण विचार करतो
असतिल का हो अशी माणसे इमान ज्यांचे मळले नाही “

बदलत्या पिढीबरोबर विचारही बदलतात. विचारातील हा बदल माणसाच्या प्रगतीला पोषक असेल तर अवश्य स्वीकारावा. पण आज जुन्याकडे पाठ फिरवून फक्त ‘नवे ते सोने’ ही वृत्ती वाढीस लागली आहे. त्यामुळे संस्कार करणे, करुन घेणे, झालेले संस्कार टिकवणे हे कालबाह्य वाटू लागले आहे. याचा परिणाम म्हणूनच नीतीमत्तेचा ऱ्हास होत चालला आहे. सुसंस्कृत नसलेल्याला माणूस तरी कसे म्हणावे. राक्षसाच्या मनातील वासना आणि वृत्ती आता माणसात दिसू लागली आहे.

“संस्कार आणि नीती गेली निघून आता
ओळीत राक्षसांच्या बसतात लोक सारे “

बदलत्या सामाजिक आणि राजकीय वस्तुस्थितीवर कवीचे बारीक लक्ष आहे. निवडणुकीच्या आधीची आणि नंतरची गटबाजी आता संसर्गजन्य झाली आहे असे त्याला वाटते. कारण ती एका गटापुरती मर्यादित राहिलेली नाही. घोडेबाजार हा नित्याचाच होऊन बसला आहे. सत्ता आणि संपत्तीच्या मोहापायी तत्वशून्य तडजोडींनी कमाल केली आहे.

“गटबाजीच्या संसर्गाने कमाल भलती केली
काही इकडे आले घोडे काही तिकडे गेले “

क्रियेवीण वाचाळता हा आजच्या काळचा मंत्रच होऊन बसला आहे. समाजासाठी काय करावे, देशासाठी काय करावे हे सांगणे फार सोपे असते. समाजाचे कल्याण करण्याच्या गप्पा या निवडणूक होण्यापुरत्याच असतात. कारण गोड बोलून, आश्वासनांचा पाऊस पाडून निवडून येणे एवढेच त्यांचे ध्येय असते. त्यामुळे

“कोणी देतो भाषण फुसके कल्याणाचे
त्याचा तुमच्या मतदानावर डल्ला आहे “

असे कविचे निरीक्षण आहे.

समाजाच्या हितासाठी केलेली चळवळ ही किती वरवरची व दिखाऊ असते याचा समाचारही कविने घेतला आहे. त्यासाठी कवी पाणीप्रश्नाकडे लक्ष वेधत आहे. पाण्याचे नियोजन न करता होणारा पाण्याचा वापर हा पाणीप्रश्न गंभीर होण्याचे मुख्य कारण आहे. पण त्याकडे लक्ष न देता पाण्याची उधळपट्टी चालुच आहे आणि दुसरीकडे पाणी वाचवा म्हणून चळवळही चालू आहे. हा विरोधाभास कविने दाखवून दिला आहे.

“खर्चुन गेले जल सारे या जमिनी मधले
भाषणबाजी मधून नकली चळवळ आहे “

परंतू या प्रश्नांकडे, समस्यांकडे, समाजातील दोषांकडे एक कवी म्हणून कविला दुर्लक्ष करता येत नाही. कारण समाजात सुधारणा होऊन त्याची प्रगती होण्यासाठी कुणालातरी लढावे लागेल हे त्याला माहित आहे. म्हणून कवी म्हणतो

“नाते माझे अखंड आहे संघर्षाशी
धारिष्टाचे शस्त्र लढाया मीच बनवतो “

या सर्व गुणदोषांसकट कवी समाजावर प्रेम करतो. म्हणून तो म्हणतो

” झाली सकाळ आहे गाऊ नवीन गाणे
ती रात्र क्लेशदायी पुरती सरुन गेली. “

कविच्या इच्छेप्रमाणे लवकरच क्लेशदायी रात्र संपावी आणि नव्या युगाची गाणे गाण्यासाठी भाग्याची सकाळ उजाडावी एवढीच सदिच्छा !

पुस्तकाचे नाव : गंध ओला मोगऱ्याचा
कवी : विनायक कुलकर्णी, 8600081092
प्रकाशक: न्यू अथर्व पब्लिकेशन , इचलकरंजी
मूल्य : रु.१४०|-


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading