- झाडीपट्टी नाटकाचा संत्रानगरीत सन्मान.
गडचिरोली – नागपूर येथील साहित्य विहार या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांना उत्कृष्ट पुस्तक निर्मीतीसाठी पुरस्कृत करण्यात येते. पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना साहित्य विहारच्या वार्षिक साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट साहित्यिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. राष्ट्रीय स्तरावर अत्यंत मानाचा समजला जाणाऱ्या या पुरस्काराकरीता मराठी साहित्य प्रकारात झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘जत्रा घडली नागोबाची’ या नाटकास यंदाचे नाट्यलेखनाचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे, अशी माहिती साहित्य विहारच्या अध्यक्षा आशा पांडे व सचिव मंदाताई खंडारे यांनी दिली आहे.
नागपूर येथील श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या साहित्य संमेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मान वस्त्र, व सन्मानपत्र असे आहे.
विशेष म्हणजे चुडाराम बल्हारपुरे यांना यंदा मिळालेला हा तिसरा सन्मान आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कांगोणी येथील श्री संत किसन महाराज मुंडके जीवन गौरव पुरस्कारासह त्यांच्या ‘महापूजा ‘ या नाटकास नाट्यलेखनाचा प्रथम पुरस्कार मिळाला. तसेच साहित्य अर्चन मंच, नागपूर येथील मराठी व हिंदी साहित्य स्पर्धेत त्यांच्या ‘गोडवानाचा महायोध्दा क्रांतिवीर बाबूराव शेडमाके ‘ या महानाट्यास नाट्यलेखनाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत.
येत्या ८ नोव्हेंबरला हिंदी साहित्य संमेलन, मोरभवन, नागपूर येथे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. तर साहित्य विहार संस्था, नागपूर’ च्या वतीने घोषित करण्यात आलेला ‘जत्रा घडली नागोबाची’ या महानाट्यास द्वितीय क्रमाकाचा हा पुरस्कार देखील संत्रानगरी नागपूर येथे प्रदान केल्या जाणार आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
