जिथं विदेशी पक्षी स्थलांतर करून यायचे, आनंदाने राहायचे, तिथं दूषित पाण्याशिवाय काहीच नाही. त्यांनी उतरायचं कुठं? ही गोष्ट फक्त यमुना नदीची नाही. भारतातल्या अनेक नद्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्या आहेत. कोरोनाच्या काळात काही दिवस का होईना पण त्यांची या प्रदूषित विळख्यातून सुटका झाली होती. पण आज पूर्ववत झाले आहे.
माणिक पुरी, परभणी
मो.9881967346
पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी लिहिलेलं ‘बखर पर्यावरणाची आणि विवेकी पर्यावरणवाद्याची’ हे पुस्तक वाचण्यात आलं. या पुस्तकात जीवशास्त्रज्ञ रॅशेल कार्सन यांच्या ‘सायलेंट स्प्रिंग’ या ग्रंथातील आरंभीचा परिच्छेद म्हणजे पर्यावरण विनाशाचा आरंभ झाल्याचा इशाराच! तो परिच्छेद इथे मुद्दाम लिहीत आहे.
“निसर्गानं मुक्त हस्ते सर्व काही बहाल केलं आहे असं नयनमनोहर गाव होतं. सारं काही ठीक ठाक चाललं होतं. अचानक घडी बिघडली. विचित्र आजारानं त्या भागाला घेरलं. एकाएकी अनेक पक्षी मरून पडू लागले. कित्येक पक्ष्यांना उडताच येईना. अनेक पक्ष्यांचे कूजन थांबले. त्या वसंत ऋतूत सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट नष्ट झाला. वसंत तसाच होता. नव्हता तो केवळ पक्ष्यांचा आवाज! स्मशानशांततेचा, वाणी हरवलेल्या केविलवाण्या पक्ष्यांच्या सानिध्यात मूक, जीवघेणा वसंत!”
किटकनाशकाच्या वापरामुळे पहिला बळी गेला तो पक्ष्यांचाच ! काही कळायच्या आत अशा अनेक घटना घडून गेल्या आहेत. आज रोजी किटकनाशकाच्या अतिवापरामुळे माणसांच्या घराघरात कॅन्सरने हात-पाय पसरविले आहेत. विसाव्या शतकाच्या मध्यावर पक्ष्यांच्या बळी जाण्याच्या घटनेपासून एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच ही संकटाची मालिका तीव्रपणे फोफावताना दिसून येते. त्यातून पर्यावरणाचा ऱ्हास होताना दिसतोय. तरीसुद्धा माणसाचं वर्तन हे आपल्याला काही धोका नाही असंच सुरू आहे याचाच नवल वाटतंय.
केवळ किटकनाशकामुळे पक्ष्यांचे अतोनात नुकसान झालेले नाही. हवामान बदलाचा धोका पक्ष्यांच्या विविध प्रजातीवर झालेला दिसून येतो. अनेक प्रजाती मृत्यूच्या उंबरठ्यावर दिसताहेत. जणू शेवटच्या घटका मोजत बसलेल्या. माळढोक, तणमोर, अबलक धनेश, क्रोंच, सुवर्णगरुड, जेरडॉनचा बाज, रानपिंगळा अशा कितीतरी प्रजाती संकटाच्या तावडीत सापडल्या आहेत.
पक्षीतज्ज्ञ डॉ. सालिम अली म्हणाले होते की, “पृथ्वीतलावर मनुष्यप्राणी नसला ; तर पशुपक्षी, वृक्ष व वनस्पती सुखाने जगतील. परंतु पशुपक्षी, वृक्ष व वनस्पती नसतील; तर मनुष्यप्राण्याला जगता येणार नाही.” याची प्रचिती यायला वेळ लागणार नाही असं वातावरण तयार होताना दिसतय.
भर उन्हाळ्यात गारपिटीनं सपाटा लावलाय. टिटवी, माळटिटवी, बुलबुल, होले, नदीसुरय अशी कितीतरी पाखरं बेघर झालेली पाहिली आहेत. खरं तर या दिवसात त्यांचा विणीचा काळ सुरू झालेला. घरटं बनवून अंडी घालायची लगीन घाई झालेली. टिटवीचं घरटं उघड्यावरच उभारलेलं दिसतं. काही लहान आकाराचे खडे आजूबाजूला अस्ताव्यस्तपणे पडलेले दिसतात. त्यात अंडी दिलेली. खड्याच्या रंगासोबत एकरूप झालेली. किती जीव लावला तिनं घरट्यातल्या जीवाला!
माळटिटवीचं यापेक्षा फार वेगळं असं नाहीच. 44 अंश सेल्सिअस तापमान असताना तापलेल्या जमिनीवर अंड्याला उब पुरवायचे. दूरवरच्या तलावात शरीराच्या पोटाचा भाग ओला करून अंड्यावर झाकायचा. अंडी उबवायची. पिल्लांना वाढवायचं. पण हे टिटवी आणि माळटिटवीच्या नशिबी नव्हतच. अचानक गारपीट झाली आणि सगळ्या घरट्यातली अंडी फुटून गेली. होत्याचं नव्हतं झालं.
पाखरांनी किती टाहो फोडला ! सगळा आवाज गारगुंडीत विरून गेला. अंड्यातून बाहेर येण्यापूर्वी जीव मरून पडलेले. जिथं टिटवी बसायची तिथं मुंग्यांनी ताबा मिळविलेला. एका घरट्यात फार विदारक चित्र पाहायला मिळालं.
अंड्यांना इजा होऊ नये म्हणून एक टिटवी तशीच अंड्यावर बसून होती. गारा पडत राहिल्या. त्या माऱ्यापुढं टिटवीचा निभाव लागणं शक्यच नव्हतं. गारा पडत राहिल्या. ती अंगावर झेलत राहिली. शेवटी काळानं तिच्या अंगावर झडप घातली.
मी जेव्हा टिटवीच्या घरट्याजवळ जाऊन पाहिलं तेव्हा तिची ज्योत विझली होती. टिटवीला उचलून बाजूला केलं तेव्हा तिच्या पोटाखाली दोन अंडी शाबूत पाहायला मिळाली. पिलांसाठी आईनं स्वतःचा जीव गमावला होता.
ही घटना केवळ टिटवीपूरतीच मर्यादित नाही. ती माणसालाही लागू पडते. आई शेवटी आईच असते. ती पाखराची असो की बाळाची तिची जागा कुणालाच घेता येत नाही. अंधार वाढत गेल्यामुळे माळरानावरून काढता पाय घेतला. ज्या खोपीत आसरा घेतला होता ती खोपी मागं पडली. त्या माळरानावर टिटवीच्या घरट्यांची झालेली दुर्दशा पुन्हा – पुन्हा डोळ्यासमोर येऊ लागली. तिथं अशा दृश्यांची मालिका असू शकते असं वाटत राहिलं.
दुसऱ्या दिवशी त्या घरट्यातली टिटवी दिशेनाशी झाली. एखाद्या कोल्ह्याने किंवा खोकडाने डाव साधला असावा. घरट्यात अंडीही नव्हती. खोलगट आकाराचं घरटं एकाकी पडलेलं. काही दिवसांनी इथं असं एखादं घरटं होतं याचा पुरावा सुद्धा सापडणार नाही.
त्यापुढील अनेक दिवस त्या माळरानावर भटकंती केली. टिटवी, माळटिटवीचा आवाज औषधालाही ऐकू येत नव्हता तेव्हा तेथील परिस्थिती लक्षात येऊ लागली. गारपिटीनं माळरानावरील पाखरांच्या अधिवासात किती खोल जखम झाली हे कळू लागलं. सगळ्या परिसरातील गारपिटीचा अंदाज घेतल्यावर या पाखरांचं नेमकं किती नुकसान झालय ते कळू लागलं. ही गोष्ट फक्त टिटवीची नाही. वाऱ्यावावधानानं होल्यांची अनेक घरटी मोडून पडलेली दिसली. रातवा, धाविक, चंडोल या पाखरांविषयी तर काहीच माहिती नव्हती. सगळीकडून अंधारून आल्यासारखं वाटू लागलं.
दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून मी थक्कच झालो. गावालगतच्या झाडाखाली पोपटांचा खच पडलेला. कितीतरी सेवाभावी संस्थांनी या पोपटांना मूठमाती दिलेली. त्यानंतर अनेक गावोगावी या चर्चेला उधाण आलेले. काही दिवसांनी ही घटना विसरूनही जातील पण ही घटना विसरून कसे चालेल? ती एक धोक्याची घंटा होती.
जीवशास्त्रज्ञ रॅशेल कार्सन यांनी अनुभवलेला वसंत आणि हवामान बदलामुळे हजारो पक्ष्यांचा गेलेला बळी या घटनांतून आपण काय शिकले पाहिजे? याला जबाबदार कोण ? याचे उत्तर माणूस असंच देता येईल.
निसर्गाला विनाशाच्या दरीत ढकलून द्यायला माणूस उतावीळ झालाय. स्वतःच्या हव्यासापोटी प्रचंड वृक्षतोड, शहरीकरणाचा विस्तार, रस्त्याच्या कडेची कापलेली झाडं, विकासाच्या नावाखाली निसर्गाला पायी तुडविलं जातय. हे सगळं पाहिल्यावर रिचर्ड बेकर यांनी जगाला सांगितलेला संदेश आठवतो.
“माणूस इथूनतिथून एकच आहे, यावर माझा विश्वास आहे. सर्व सजीव परस्परावलंबी आहेत, परस्परपूरक आहेत. पृथ्वीबाबत आपण न्याय वर्तन केलं नाही, तर या ग्रहावर आपण टिकून राहणं अशक्य आहे. कोणताही विकास पूर्ण समजुतीनंच व्हायला हवा. सर्व प्रकारच्या सजीवांचा त्यात विचार व्हायला हवा. निसर्गातील संतुलन राखलं गेलं पाहिजे. खनिज, वनस्पती, प्राणी माणूस… सर्वांमध्ये!”
निसर्गाची हानी करणाऱ्या अनेक घटना इतिहासजमा झाल्या आहेत. पण त्यांची आठवण आजही येते. अणुभट्टीच्या अपघातानंतर बाहेर पडणारे किरणोत्सारी समस्थानिके त्या भागातील वनस्पतीवर परिणाम करतात. तेथील कितीतरी झाडं अकालीच मृत्यूला कवटाळतात. तिथं पुन्हा नव्याने झाडं उगवण्याची शक्यता तशी कमीच राहते.
जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी येथील घटनेने माणसाला शहाणपण दिलय. पण तेथील वनस्पती नष्ट झाल्या त्या कायमच्या. त्या पुन्हा कधी उगवल्या नाहीत. ॲमेझॉन जंगलाला लागलेल्या किंवा लावलेल्या आगीमुळे वृक्षांच्या हजारो प्रजाती नष्ट झाल्यात. एकविसाव्या शतकात पृथ्वीचे फुफ्फुसे कमकुवत होताना दिसतायेत. काही वर्षांनी ती बंद पडतील.
या जंगलातील फक्त झाडं तेवढीच जळाली नाहीत. तेथील पक्ष्यांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्यात. झाडं जळाली किंवा तोडली की कुलिंग गणातील पक्ष्यांचा आसरा नष्ट होतो. झाडावर राहणारे पक्षी जमिनीवर अंडी घालत नाहीत. त्यांच्या पुढील पिढीला धोका उद्भवतो. साद घालणारी ही पाखरं स्वतःचं गाणं विसरून जातात. उद्याच्या सुंदर दिवसांसाठी त्यांचं गाणं जिवंत ठेवायचं असेल तर पुन्हा एकदा चिपको आंदोलनाची गरज निर्माण झाली आहे असं मला वाटतं.
भारतासारख्या देशातही जंगलाला आगी लागतात. त्यांना आटोक्यात आणलं जातं. पण निसर्गाची हानी भरून यायला अनेक वर्ष लागतात. प्रसिद्ध कवी अरुण कोलटकर यांच्या ‘भिजकी वही’ या कवितासंग्रहातील सर्पसत्र या विभागात निसर्गाच्या संहाराविषयी वाचायला मिळते. पक्षी, प्राणी, वनस्पती, आदिवासी अजून बरंच काही नष्ट केल्याच्या खाणाखुणा या कवितेतूतून वाचकांसमोर येतात. खांडव वन फक्त कथेपुरतं उरलेलं. आज खांडव वनाचा अंश सुद्धा सापडत नाही.
उत्तर भारतातील यमुना नदीच्या पात्रात कितीतरी प्रकारचे बदकं हिवाळ्यात उतरायची. राजहंस, रोहित, क्रौंच पक्ष्यांनी परिसर गजबजून जायचा. काही पाखरं भरतपूरच्या दिशेनं निघून जायची. पण आज यमुना नदीनं प्रदूषणाची धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. नदीचे पाणी काळ्या रंगाचं झालय. त्या पाण्याला दुर्गंधी सुटलेली. पाण्यावर पांढराशुभ्र फेस पसरलेला. गोकुळ सारख्या पवित्र ठिकाणी पाण्याला स्पर्श सुद्धा करावासा वाटत नाही. दिल्लीच्या परिसराविषयी, प्रदूषणासंदर्भात न बोललेलं बरं.
जिथं विदेशी पक्षी स्थलांतर करून यायचे, आनंदाने राहायचे, तिथं दूषित पाण्याशिवाय काहीच नाही. त्यांनी उतरायचं कुठं? ही गोष्ट फक्त यमुना नदीची नाही. भारतातल्या अनेक नद्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्या आहेत. कोरोनाच्या काळात काही दिवस का होईना पण त्यांची या प्रदूषित विळख्यातून सुटका झाली होती. पण आज पूर्ववत झाले आहे. पाणपक्ष्यांना मासे, इतर जीव मिळेनासे झाले. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. काही बदके माळढोकसारखेच दुर्मिळ झालेत.
जी गोष्ट नदीची तीच गोष्ट समुद्राची होताना दिसून येते. काळशीर केगो सारख्या पक्ष्यांना समुद्रकिनाऱ्यावरील प्रदूषणाचा फटका बसलाय. हॉटेलमधील फेकून दिलेल्या अन्नावर त्यांना उपजीविका भागवावी लागते. पाणपक्ष्यांना खरकटं अन्न खावं लागतय ही एक धोक्याची घंटाच म्हणावी लागेल. या घटनेतून समुद्राच्या स्वच्छतेसंदर्भातील बाब पुढे येते. समुद्रकिनारे दुषित झाली की, कांदळवनाला झळ पोहचते. तेथील पाणपक्षी स्थलांतर करताहेत. सगळीकडे अशीच परिस्थिती राहिल्यावर या समुद्र पऱ्यांनी आसरा कुठं घ्यायचा?
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
