सांगली : दुर्ग प्रतिष्ठान सांगलीच्यावतीने किल्ले यशवंतगड (रेडी, जि. सिंधुदुर्ग ) मोहीम नुकतीच पार पडली. यावेळी यशवंतगडावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. या मोहिमेत मुलांसह त्यांचे पालकही सहभागी झाले होते.
दुर्ग प्रतिष्ठानची ही ९ वी दुर्गभ्रमंती मोहीम असून आत्तापर्यंत रांगणा, पारगड, भरतगड, रसाळगड अशा अनेक किल्ल्यांवर दीपोत्सव साजरा केला आहे. लहान मुलांना किल्ल्यांची माहिती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा विस्तार व किल्ल्यांचे संवर्धन करण्याची जाणीव अशा सामजिक हेतुला समोर ठेवून प्रत्येकवर्षी उन्हाळ्यात व दिवाळीच्या सुट्टीत मोहीम आखली जाते.
यंदाच्या दिवाळीनंतर झालेल्या प्रतिष्ठानच्यावतीने तेरेखोलचा किल्ला, रेडीचा गणपती, यशवंतगड, डच वखार, वेंगुर्ला येथील दीपस्तंभ या ठिकाणी मोहीम पार पडली. यावेळी मुलांना गड किल्ल्याची माहिती देण्यात आली तसेच यशवंतगडावर दीपोत्सव साजरा झाल्यावर इतिहास अभ्यासक रणजित हिर्लेकर यांचे व्याख्यान झाले. यावेळी दुर्गप्रेमी भूषण मांजरेकर उपस्थित होते. प्रतिष्ठानचे विनायक कुष्टे, सचिन खुरपे, राहुल वारद, गणेश होसुर, वसुंधरा कुष्टे यांनी या मोहिमेचे आयोजन केले होते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.