स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य सैनिक कविवर्य लोकनेते गुरुवर्य स्व. बापूसाहेब ढाकरे यांना भावपूर्ण वंदन. या निमित्ताने लोककवी कविवर्य डॉ. विठ्ठल वाघ यांची कविता…
समई मानवतेची
सातपुड्याच्या कुशीत आहे.
दरवळणारा चंदनखोरा..
त्याचा अवघा गंध लेऊनी
बापू घडले दानापुरा…
वाण नदीचे झुळझूळ पाणी
सुचवून गेले मंजुळ गाणी
जीवन तैसे शुभ्र वसनही
अमृत ल्याली मधुर वाणी
काळ्या मातीत बीजे पेरता
मळा बहरला साहित्याचा
स्वच्छ राहुनी राजकारणी
ध्यास ठेवला लोकहिताचा
शाळेपुढल्या प्रांगणातुनी
किती कळ्यांना फुलविले
तम साराया युगायुगाचा
विद्येचे नव दीप लाविले
दीनदलितांची मूक आसवे
तव डोळ्यातुनी ओघळली
आणि समई मानवतेची
घराघरातुनी पाजळली
पावन मंगल शब्दालागी
आचरणातुनी अर्थ दिला
सरस्वतीला साधनेतुनी
कवितेचा नव हार दिला
श्याम सावळ्या माथ्यावरती
कुकाजीच्या टिळा लावला
कुणबिकीचा हिरवा झेंडा
निळ्या नभातुनी उंच रोवला
– लोककवी कविवर्य डाॅ. विठ्ठल वाघ
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.