सध्याची शिक्षणपद्धती गुणांना महत्त्व देते. त्यामुळे ज्ञानाने शुन्य असणारी माणसे आज उच्चपदावर बसून अकार्यक्षम असल्याचे पाहायला मिळत आहे. अशाने अनेकांचे व्यवसायही देशोधडीला लागले आहेत. हे विचारात घेणे तितकेच गरजेचे आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल 9011087406
किंबहुना मज । तुमचिया कृपा काज ।
तियेलागी व्याज । ग्रंथाचे केले ।। 332 ।। ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा
ओवीचा अर्थ – फार काय सांगावे ! मला तुमच्या कृपेशी काम आहे व त्या कृपेकरितां मी हे ग्रंथाचे निमित्त केले.
संत ज्ञानेश्वरांनी गुरुकृपेसाठी ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे लिखाण केले आहे. सद्गुरुंच्याकृपेतून त्यातील अक्षरे उमटली आहेत अन् त्यांच्याच कृपार्शिवादाने तिला अमरत्व प्राप्त झाले आहे. ही नुसती अक्षरे नाहीत तर ती ज्ञानाची भांडारे आहेत. मग अशा या ग्रंथाचे पारायण आपण का करू नये ?
पारायणातून कोठे आत्मज्ञानप्राप्ती होते का ? हा प्रश्न नव्या पिढीला पडणे स्वाभाविक आहे. कारण ज्ञानदानाची परंपरा आता बदलली आहे. गुरु शिकवतात आणि शिष्य शिकतो ही पद्धती आता नव्यापिढीत रुढ झाली आहे. त्यामुळे नव्यापिढीला हे ज्ञान असे मिळते यावर त्वरीत विश्वास बसणे कठीण आहे. यासाठी ज्ञानेश्वरीतील शिक्षणपद्धतीचा अभ्यास होणे गरजेचे आहे. पारायणातून मिळणाऱ्या अनुभुतीतून आत्मज्ञानप्राप्तीची ओढ मात्र निश्चितच लागते. यासाठी महाराष्ट्रात गावोगावी हरिनाम सप्ताह आजही होतात. घरोघरी पारायणे केली जातात. ही पद्धती त्यासाठी रुढ झाली आहे.
संत ज्ञानेश्वर यांना मराठीचिये नगरीत ब्रह्मविद्येचा सुकाळ करायचा आहे. या ब्रह्मज्ञानाच्या प्रसारासाठी, बोधासाठी ही पारायणाची परंपरा सुरु झाली. नुसते वाचावे तोंडपाठ करावे, यासाठी ज्ञानेश्वरी नाही. पाठांतर करून परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवता येतात. पण ज्ञानाचा अनुभव त्याला नसतो. पुस्तकाच्या बाहेरचे आडवे तिडवे प्रश्न त्याला सोडवता येत नाहीत. कारण त्याने ज्ञानापेक्षा गुणाला महत्त्व दिलेले असते. ज्ञान होणे तो विषय समजणे आत्मसात करणे हे अभ्यासाचे मुख्य उद्दिष्ट आहे. घोकमपट्टी करून नुसत्या ओव्या पाठ करून गुण मिळतील, पण ज्ञान मात्र शुन्य होते हे विचारात घेणे महत्त्वाचे आहे. सध्याची शिक्षणपद्धती गुणांना महत्त्व देते. त्यामुळे ज्ञानाने शुन्य असणारी माणसे आज उच्चपदावर बसून अकार्यक्षम असल्याचे पाहायला मिळत आहे. अशाने अनेकांचे व्यवसायही देशोधडीला लागले आहेत. हे विचारात घेणे तितकेच गरजेचे आहे.
अध्यात्माचा अभ्यास हा घोकमपट्टीचा नसून तो आत्मसात करण्याचा आहे. स्वतःच स्वतःचा अभ्यास येथे करायचा असतो. यासाठी ज्ञानेश्वरीही मार्गदर्शकाचे काम करते. ती मार्गदर्शिका आहे. त्यातील अध्याय हे अभ्यासमाला आहेत. पाठ्यपुस्तक वाचून गुरुंकडून समजावून घेतले जाते. पण सर्वच गोष्टी त्यात समजतात असे नाही. काही प्रश्नांची उत्तरे आपणास येत नाहीत. न येणाऱ्या प्रश्नांसाठी आपण मग गाईडचा आधार घेतो. गाईड म्हणजे आपली मार्गदर्शिका असते. त्यात सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात. ज्ञानेश्वरीही अशीच आहे. सर्वच प्रश्नांची उत्तरे त्यामध्ये मिळतात. अध्यात्म समजून घेण्यासाठी, येणाऱ्या अडचणी, पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी ते एक गाईडच आहे. यात प्रत्येक प्रश्नांचे उत्तर हमखास मिळते.
पावसला स्वामी स्वरुपानंद यांच्यामठामध्ये सभागृहात ज्ञानेश्वरीच्या काही प्रती ठेवल्या आहेत. त्याच ठिकाणी एक फलक आहे. त्यावर लिहिले आहे. आपणास पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी डोळे मिटून ज्ञानेश्वरी उघडा व आपल्या प्रश्नांचे उत्तर मिळण्यासाठी ओव्यांचे ते पान वाचा. आपणास निश्चितच आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळते. आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी ज्ञानेश्वरी हा आधार आहे. आता हा भाग थोडा श्रद्धा – अंधश्रद्धेचाही असू शकतो. असे कोठे असते का ? असे विचार आपल्या मनात येणे स्वाभाविक आहे. पण आपल्या प्रश्नांची उत्तरे ज्ञानेश्वरीतून मिळतात हे सुद्धा तितकेच खरे आहे. ज्ञानेश्वरीतील ओव्या ह्या आत्मज्ञान प्राप्तीसाठी मार्गदर्शन करणाऱ्या आहेत.
अध्यात्माचा अभ्यास करताना पडणारे प्रश्न व न सापडणारी उत्तरे ज्ञानेश्वरीतून मिळतात. यासाठी ज्ञानेश्वरीचे नित्य पारायण हे सांगितले आहे. ओवीचा अनुभव घ्यायला शिकले पाहीजे. अनुभवातून, अनुभुतीतून ज्ञानप्राप्ती होते. ज्ञानाच्या मार्गावर येणारे अडथळे ज्ञानेश्वरीच्या पारायणातून, ज्ञानेश्वरीच्या अभ्यासातून दूर होतात. अज्ञानाचे ढग दुर होऊन ज्ञानाचा प्रकाश निश्चितच पडतो. मनाच्या पडलावर यासाठी अवधान ठेऊन ज्ञानेश्वरीतील ओव्यांचे चिंतन मात्र करायला हवे. सद्गुरुंच्या कृपेसाठी ज्ञानेश्वरी पारायण आहे. ही परंपरा महाराष्ट्रात अखंड सुरु आहे. अनुभुतीतून ब्रह्मज्ञानाचा सुकाळ मऱ्हाठीनगरीत ज्ञानेश्वर माऊलींना झालेला पाहायचा आहे. यासाठी ज्ञानेश्वरी पारायणातून, अभ्यासातून गुरुंची कृपा मिळवून ज्ञानेश्वर माऊलींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मराठी माणसाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
