विजय जावळे यांच्या “लेकमात” कादंबरीला पुरस्कार
इचलकरंजी – येथील इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा 2022 सालचा लक्ष्मण कांबळे स्मृती संस्कृती कांदबरी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. बीड येथील कादंबरीकार विजय जावळे यांच्या हर्मिस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या “लेकमात” या कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पाच हजार रुपये, स्मृतीचिन्ह शाल आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार योजनेसाठी आलेल्या कादंबरींचे परीक्षक नामवंत समीक्षक प्रा. रणधीर शिंदे, प्रा. बालाजी घारुळे यांनी केले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष महावीर कांबळे यांनी दिली.
इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठान अलीकडली काही वर्ष सातत्याने परिवर्तनाचा विचार केंद्रस्थानी ठेवून विविध उपक्रम राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून दरवर्षी एका साहित्य प्रकाराला संस्कृती पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. गेल्या वर्षी उत्कृष्ट काव्यसंग्रहाला पुरस्कार देण्यात आला होता. यावर्षी उत्कृष्ट कादंबरीसाठी लक्ष्मण कांबळे स्मृती संस्कृती पुरस्कार देण्यात आला असून या पुरस्कारासाठी परीक्षकांच्या एकमताने कादंबरीकार विजय जावळे यांच्या मराठी साहित्यात लक्षवेधी ठरलेल्या “लेकमात” या कादंबरीची निवड करण्यात आली. संस्कृती प्रतिष्ठानने इचलकरंजी येथे ११ डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या साहित्य संमेलनात साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष कवी – समीक्षक प्राचार्य डॉ गोविंद काजरेकर यांच्या हस्ते सदर पुरस्काराने श्री जावळे यांना गौरविण्यात येणार आहे.
“लेकमात” म्हणजे लग्नाची मुलगी. जे शेतमजूर ऊस कामगार म्हणून दरवर्षी स्थलांतर करतात त्यांच्या जीवन कलहाचे जिवंत चित्रण म्हणजे ही कादंबरी. एका परीने शेतकरी, शेतमजूर यांचे जीवन म्हणजे अभावग्रस्त हतबलता. पण स्थलांतरित शेतमजुरांना एक शहाणपण येतं. तरी त्या शहाणपणातही जगण्याचा जो संघर्ष करावा लागतो त्यातून पूर्ण आयुष्यच होरपळून जाते. पण या होरपळलेल्या आयुष्यातही तग धरून ठामपणे ही माणसं उभी राहतात आणि त्यातून मुलाबाळांचे शिक्षण, लग्न याचीही स्वप्न बघतात, सत्त्यात उतरतात. लेकमात मध्ये समांतर अर्थव्यवस्था, समांतर समाज व्यवस्था, समांतर राजकीय व्यवस्था येते.प्रचलित समाज व्यवस्थेला हे सारे अनुसरून नसल्याने शेतमजुरांच्या दुःखाची वेदना या कादंबरीत तीव्र आहे.या सगळ्याचा विचार करून “लेकमात” या कादंबरीची संस्कृती पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचा अभिप्राय परीक्षकांनी नोंदवला आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.