जगातील सर्वात मोठी संसदीय लोकशाही असलेल्या भारतात लोकसभा निवडणुकीच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आणि भाजपप्रणीत एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी अशा राजकीय युद्धाला तोंड फुटले. एनडीएचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. पण इंडियाचे नेतृत्व कोण करत आहे, हे अद्यापी गुलदस्त्यात आहे.
डॉ. सुकृत खांडेकर
एनडीएकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा हिमायलासारखा उत्तुंग लोकप्रियता संपादन केलेला नेता आहे. पण इंडियाचे नेतृत्व कोण करीत आहे, यावर सर्व विरोधी पक्ष अळीमिळी गुपचिळी बसले आहेत. भाजपने तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीची तयारी गेल्या वर्षीपासूनच सुरू केली होती, उमेदवारांची नावे जाहीर करण्यातही भाजपने आघाडी घेतली, इंडियामध्ये मित्र पक्षात जागा वाटप आणि उमेदवार यावरून अजून तणातणी चालू आहे. भाजपकडे कार्यकर्त्यांची फौज आहे.
शिस्तबद्ध केडर आहे. निष्ठावान संघ स्वयंसेवकांची साखळी आहे. पक्षाने बुथनिहाय पन्नास प्रमुख नेमले आहेत, तर दुसरीकडे इंडियातून रोज फाटाफूट चालूच आहे. जागा वाटपात प्रादेशिक पक्ष आपले वर्चस्व सातत्याने दाखवून देत आहेत. देशात १९ एप्रिलला मतदानाचा पहिला टप्पा आहे. तरीही लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत नरेंद्र मोदींच्या विरोधात नेमके कोण आहे, याचे उत्तर आजतागायत जनतेला मिळालेले नाही.
भारतीय जनता पक्षानेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:च ‘अब की बार ४०० पार’ अशी घोषणा दिली आहे. भाजपचे विजयाचे टार्गेट हे २०१९ पेक्षा जास्त म्हणजे ३७० असे ठरविण्यात आले आहे. गेली दोन महिने देशभर ‘अब की बार ४०० पार’ अशी घोषणा भाजपने मतदारांच्या मनात ठसवली आहे, त्याला उत्तर देणेही इंडियातील पक्षांना जमलेले नाही. आज घराघरात, चाळीत, फ्लॅटमध्ये किंवा झोपडपट्टीत लहान मुलेही ‘अब की बार ४०० पार’ अशा घोषणा सहज देताना दिसतात.
उबाठा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर झालेल्या इंडिया आघाडीच्या जाहीर सभेत ‘अब की बार, भाजप तडीपार’ अशी घोषणा दिली, याच मुंबईतून ब्रिटिशांना ‘चले जाव’ असे सांगण्यात आले होते, त्याची आठवण देऊन ठाकरे यांनी ‘हुकूमशाही चले जाव’ असा नारा दिला. त्या घोषणा ऐकायला लोकांची गर्दी तरी होती का ? इंडियाच्या पंचवीस पक्षांची सभा असूनही मुंबईतील मैदान भरले नव्हते. राहुल गांधी, प्रियंका वड्रा, शरद पवार, फारूख अब्दुल्ला, तेजस्वी यादव, एम. के. स्टॅलिन, अशोक गेहलोत, डी. के. शिवकुमार, मेहबुबा मुफ्ती, प्रकाश आंबेडकर, हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन, वायको, टी. आर. बालू असे विविध राज्यांतील तीन डझन नेते जमूनही मुंबईतील सभेला लाखभर लोक जमू शकले नाहीत.
राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या समारोपाच्या निमित्ताने मुंबईत इंडिया आघाडीने शक्तिप्रदर्शन करण्याचा केलेला प्रयत्न सपशेल फोल ठरला. इंडिया आघाडीतील विविध पक्षांचे नेते व पदाधिकारी अशा ४०० जणांची व्यासपीठावर उपस्थिती होती. त्यांच्यासाठी व्यासपीठावर ४५३ खुर्च्यांची व्यवस्था केली होती. शिवाजी पार्क मैदान व शिवसेना हे खरे तर वर्षानुवर्षे समीकरण आहे. पण उद्धव ठाकरे यांना भाषणासाठी केवळ ९ मिनिटे वेळ दिला होता. यापेक्षा त्यांची व त्यांच्या पक्षाची अवहेलना कोणती असू शकते. आता काँग्रेस पक्ष व राहुल गांधी जे ठरवतील ते उबाठा सेनेला मान्य करावे लागेल, हे त्याचे ताजे उदाहरण आहे. उलट राहुल गांधी यांनी ४४ मिनिटे भाषण केले व मल्लिकार्जुन खरगे यांनी ९ मिनिटे भाषण केले.
सनातन धर्माविषयी सतत तुच्छ वक्तव्य करणारे तामिळनाडूचे उदयनिधी यांचे वडील एम. के. स्टॅलिन हे सभेला हजर होते, तेव्हा हिंदुत्व आम्ही सोडलेले नाही, असे वारंवार सांगणारे उद्धव ठाकरे सनातन विषयी काही टिप्पणी करतील असे वाटले होते. प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. या सभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव कोणी घेतले, याचाही शोध घ्यावा लागेल. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा वारंवार अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकासमोरच भाषण करण्याची पाळी आली, हे त्यांना कोणी सांगितले नसावे.
शिवसेनेच्या प्रत्येक सभेत, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो अशी सुरुवात करणारे ठाकरे यावेळी हे वाक्य बोलायला विसरले की कचरले? राहुल गांधी, फारूख अब्दुल्ला, तेजस्वी यादव, मेहबुबा मुफ्ती, एम. के. स्टॅलिन यांच्या साक्षीने माझ्या समोर जमलेल्या, तमाम हिंदू बांधवांनो म्हणायचे तरी कसे, असा प्रश्न उबाठा सेनेच्या प्रमुखांना पडला असावा. शिवतीर्थावरील याच व्यासपीठावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसवर आक्रमक शब्दांत वर्षानुवर्षे टीकेची झोड उठवली. त्याच व्यासपीठावर त्यांचे पुत्र काँग्रेस नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले कोट्यवधी जनतेला टीव्हीच्या पडद्यावरून बघायला मिळाले. ज्या व्यासपीठावरून भाजपाबरोबर ज्यांनी केंद्रात व राज्यात सत्ता आणण्याच्या प्रतिज्ञा घेतल्या, त्याच व्यासपीठावरून ‘अब की बार, भाजपा तडीपार’, अशा घोषणा त्यांनी दिल्या. सत्ता गेल्यानंतर कशी सैरभैर अवस्था होते, ते जनतेला अनुभवायला मिळाले.
सभेला गर्दी नाही, याला जबाबदार तरी कोणाला धरायचे? आदल्या दिवशी धारावीत राहुल गांधी यांना बघायला लोक जमतात, मग ते लोक शिवाजी पार्क मैदानावर का आले नाहीत? काँग्रेसकडे मुंबईत व राज्य पातळीवर तडफदार व लोकप्रिय नेता नसल्याने काँग्रेस पक्षाकडे गर्दी खेचण्याची क्षमता कधीच संपली आहे. उबाठा सेनेकडे आता उत्साह राहिलेला नाही. शिवसैनिकांची काळजी घेणारे नेते व पदाधिकारी हे एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत शिवसेनेत गेल्यामुळे शिल्लक शिवसैनिक सुस्तावले आहेत.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत फारशी ताकदच नाही, मग सभेला गर्दी जमवणार तरी कोण ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंडिया आघाडीच्या मुंबईतील सभेचे वर्णन ‘फॅमिली गॅदरिंग’ अशा मार्मिक शब्दांत केले. शिवाजी पार्क मैदावरील सभेत व्यासपीठावर भाजपविरोधी विविध पक्षांचे मोठे नेते आपल्या मुलांसह हजर होते किंवा मोठ्या नेत्यांची मुले खुर्चीवर दिसत होती. ज्या प्रादेशिक पक्षांना व त्यांच्या नेत्यांना त्या त्या राज्यातील जनतेने नाकारले आहे किंवा ज्या नेत्यांना सत्ता गमवावी लागली आहे, त्यांचे कौटुंबिक संमेलन इंडिया आघाडीच्या व्यासपीठावर दिसत होते.
इंडिया आघाडीची मुंबईतील सभा म्हणजे शिवसैनिकांच्या दृष्टीने काळा दिवस, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली होती. या सभेत उद्धव ठाकरे हे ‘गर्व से कहो, हम हिंदू है’, हे कोणत्या तोंडाने म्हणणार ? असा प्रश्न त्यांनी आदल्या दिवशीच उपस्थित केला होता. एकनाथ शिंदे यांची भविष्यवाणी खरी ठरली, ठाकरे ‘गर्व से कहो’ असे म्हणू शकले नाहीत (किंवा म्हणायला विसरले). माझे दुकान बंद करीन पण काँग्रेसबरोबर कधीच जाणार नाही, असा मराठी करारी बाणा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बोलून दाखवला होता. उद्धव ठाकरे मात्र त्यांच्या पदाधिकाऱ्यांसह काँग्रेस नेत्यांबरोबर व्यासपीठावर मिरवताना दिसले, यात त्यांना कसले समाधान लाभले, हे त्यांनाच ठाऊक.
शिवाजी पार्क मैदानावरील इंडिया आघाडीच्या सभेत राहुल गांधी हेच हिरो होते. खरे तर इंडिया आघाडीचे ते कोणी अधिकृत नेते नाहीत, निमंत्रक नाहीत, संयोजकही नाहीत. पण इंडिया आघाडीची सूत्रे ही काँग्रेसने आपल्याकडे खेचून घेतली आहेत, हेच चित्र दिसले. देशात लोकशाही हवी की नको या मुद्द्यावर ही निवडणूक आहे, असा आव भाजप विरोधक आणत आहेत. मोदी हा मुखवटा आहे व त्यांच्याकडून आपली कामे वेगळीच शक्ती करून घेत आहे, असा प्रचार राहुल गांधींनी सुरू केला आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी, माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, मुख्यमंत्री नितीश कुमार हे नेते मोदींच्या विकसित भारत संकल्पेवर विश्वास व्यक्त करीत एनडीएमध्ये सामील झाले आहेत.
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, अजित पवार, हे तर भाजपला साथ देत आहेतच, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांसारखा मोठा नेताही भाजपमध्ये दाखल झालाय. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनीही पक्षाचा व राज्याच्या हिताचा विचार करून दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मोदींचे उत्तुंग नेतृत्व व विकासाचे व्हिजन यावर विश्वास प्रकट करीत सर्व रस्ते एनडीएकडे जाताना दिसत आहेत. मग लोकसभा निवडणुकीच्या युद्धात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला आव्हान देणारे इंडिया आघाडीकडे आहे कोण?
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.