विषमतेचे गगन भेदत घेतलेली उंच झेप : आणि असा मी घडत गेलो
आयुष्याला वळण देण्यासाठी परिस्थिती महत्वाची भूमिका बजावत असते . त्यात जन्मतः वाट्याला आलेली स्थिती ; मग त्यातून भरारी मारण्याचे अचाट बळ जीवनाचे सार्थक घडवते. तर कधी नातेसंबंधानी पेरलेली नैतिक मूल्ये आयुष्याला कर्तृत्वाची झळाळी चढवत जाते. सुख दुःखाच्या अनोख्या मिश्रणातून स्वतःला कर्तबगार सिद्ध करीत नितीमत्तेची पायाभरणी करणाऱ्या व्यक्तिमत्वाची संघर्ष कहाणी म्हणजे आणि असा मी घडत गेलो हे आत्मचरित्र.
🌹लक्ष्मण खोब्रागडे🌹 जुनासुर्ला , ता . मूल , जि. चंद्रपूर
९८३४९०३५५१
अस्पृश्यतेची सल उरात मुंग्याप्रमाणे चावत असताना, काळजातून समभावाची स्त्रवणारी चेतना रुजण्यासाठी पदोपदी अनुभवास आलेल्या प्रत्येक घटनांचा सुरेख संगम साधत गत आयुष्याची केलेली मिमांसात्मक मांडणी म्हणून या आत्मचरित्राकडे पाहता येईल. आयुष्याच्या घडणीत प्रभाव दाखवणाऱ्या प्रत्येक चरित्राचा योग्य न्याय देताना वाचकांना प्रेरणा देत पुढे जाणारी ही चरित्रकथा आहे.
हृदयातून उठणारी प्रत्येक संवेदना आपल्या लेखणीच्या सर्जनशीलतेने फुलवताना यवनाश्व गेडकर वास्तवतेला फाटा न देता लेखणीतून नवा आयाम देताना दिसून येतो. घडले, अनुभवले त्याव्यतिरिक्त हातचे न घालता प्रामाणिकपणे व्यक्त होणारा पोलीस प्रशासनातील अधिकारी म्हणून तितकाच उठावदार व्यक्तिमत्वाला चमक देत चरित्राची मांडणी करतो, हे जीवनात भोगलेल्या स्थिगतीचे यथार्थ दर्शन घडवायला पुरेसे आहे.
आपल्या घराण्याचा इतिहास पुढील पिढीला देता यावा ही उदात्त भावना असली तरी चरित्रातून मार्गदर्शक मूल्ये रुजण्यासाठी लेखकाने भावनात्मक गुंता सोडवण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला दिसतो . साहित्यकृतीचे निकष लावण्याच्या भानगडीत न पडता, अनेक पातळीवरील लेखकाचा संघर्ष वेगळे वलय निर्माण करीत प्रेरकतेची पायाभरणी करीत जाते. यवनाश्व गेडकरांचे चरित्र वाचताना जगल्याची अनुभूती प्रत्येक प्रसंगातून डोकावली नाही तर नवलच. प्रत्येकाच्या जीवनभोगाचे चित्रच या चरित्रातून अनुभवयास येते. यासाठी चरित्रकाराच्या शब्दरचनेची लीला वाचकाला खिळवून ठेवण्यात यशस्वी झाली आहे.
मनातील हळवेपणा जोपासत पोटतिडकीने स्वकियांना स्थैर्य प्राप्त करून देणारा यवनाश्व गेडकर संघाचा अद्भुत रसायन म्हणावा लागेल. या संघर्षाच्या धगीतही विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणुकीमुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडताना बिनधास्तपणे पोलीस विभागातील घटनांवर प्रखर ताशेरे ओढतो, हे लेखकाची आंतरिक घडण नक्कीच विचारांची पाईक आहे.
आत्मचरित्राचा विषय स्वतःभोवती फिरणारा असला तरी यवनाश्व गेडकर यांनी चरित्रातून वैचारिक संकेतांची पेरणी केलेली दिसून येते. केवळ आपल्या पिढीची ओळख न देता विचारांची ठेव जी ध्येय घेऊन जगणाऱ्याला दिशा देईल, याची समर्पक मांडणी म्हणून या चरित्राकडे बघता येईल. असा यवनाश्व गेडकर यांचा संघर्षमय तितकाच उद्बोधक जीवनप्रवास अनुभवण्यासाठी प्रत्येकांनी वाचावे असा आत्मचरित्र आणि असा मी घडत गेलो
वाट्याला अस्पृश्यता आली म्हणून तिचा बाऊ न करता, काटेरी वाटेतून मखमली भविष्य घडवणारा अवलिया वाचायला शब्दगणिक सातत्याने उर्मी भरणारा चरित्र दुर्मिळ. अशा दुर्मिळ चरित्रकाराने घेतलेली भरारी सामाजिक प्रेरणा नक्कीच ठरेल.
पुस्तकाचे नाव – आणि असा मी घडत गेलो (आत्मचरित्र )
लेखक :- यवनाश्व गेडकर
किंमत : २५० रुपये
ग्रंथाकरीता संपर्क – ९५११८९०८८५
प्रकाशन:- अक्षरवन प्रकाशन, लाखनी
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.