रंग या काव्यसंग्रहाविषयी थोडेसे..
रोजच्या जगण्यात मनात भावभावनांचे विविध तरंग उठत असतात. कधी आपल्या अनुभवातून तर कधी आजुबाजुला घडणाऱ्या ऐकीव गोष्टींवरून सुध्दा. मग त्या भावनांना अलगद शब्दांची झालर लागते. माझी कविता ही निसर्गात किंवा बाहेरच्या जगात जास्त न रमता मानवी मनाच्या विविध भावभावनांमधे जास्त रमते. आनंद, दुःख, विरह, वेदना, आयुष्यातले चढ उतार, विविध वळणे, त्या प्रसंगात मनात उठणारे विविध विचार यावर भाष्य करते.मन अस्वस्थ होते आणि शब्द कागदावर उतरल्यावरच शांत होते. मी गजानन महाराजांना खूप मानते. माझ्या मनातली ही शब्दांची बाग त्यांच्या आशिर्वादाने बहरलेली असते असा माझा विश्वास आहे. रंग काव्यसंग्रहाला सुंदर मुखपृष्ठ दिले आहे शिरीष कुलकर्णी सरांनी.. तसेच या संग्रहाला योग्य नाव रंग हे सुचवले शिरीष सरांनीच. रंग वाचताना त्यात तुम्हाला तुमच्या सुध्दा विविध भावनांचे रंग नक्कीच आढळतील.
सौ. सुनेत्रा विजय जोशी
रोजच्या जगण्यात मनात भावभावनांचे विविध तरंग उठत असतात. कधी आपल्या अनुभवातून तर कधी आजूबाजूला घडणाऱ्या ऐकीव गोष्टीवरूनसुद्धा त्या भावनांना मग अलगद शब्दांची झालर लागते आणि त्याची कविता होते. असा अनुभव घेत विविध रंग छटांनी सुनेत्रा जोशी यांची कविता बोलते. गर्द निळा, कधी गूढ विचारांचा, तर कधी श्यामसावळा, तर कधी जलधारांचा असे आकाशी उधळलेले इंद्रधनुचे सारे रंग सुनेत्रा जोशी यांच्या कवितांनी टिपलेले आहेत.
इतकेच काय तर एकाकी वाटणारा कातर, उदास रंग सुद्धा तितक्याच तन्मयतेनं सुनेत्रा यांनी रेखाटला आहे. त्यांच्या या कविता निसर्गात किंवा बाहेरच्या जगात जास्त न रमता मानवी मनाच्या विविध भावभावनांमध्ये जास्त रमतात. आनंद, दुःख, विरह, वेदना, आयुष्यातले चढउतार, विविध वळणे, त्या प्रसंगात मनात उठणारे विविध विचार यावर त्या भाष्य करतात.
फुलात हा गंध राहतो ना
तशी राहावी मनात कविता
अशा सुनेत्रा जोशी यांच्या कविता आहेत. ह्या कवितेचे आर्जवसुद्धा खूप छान आहे. जगण्याचे इतके सुंदर तंत्र शिकवणारी ही कविता मनात रेंगाळत राहते.
धकाधकीच्या जीवनामुळे आणि वाढत्या लोकसंख्येमुळे मानवी जीवन आता अनेक समस्यांनी घेरले गेले आहे. मानवी हव्यासाचा परिणाम आता निसर्गावरही मोठ्या प्रमाणात होत आहे. निसर्गातील पशु-पक्षावरही याचा परिणाम होत आहे. अशा समस्येवर मनाचे प्रबोधन करण्याचाही प्रयत्न सुनेत्रा जोशी यांनी टकटक या कवितेतून केला आहे.
वाचकाला अंतर्मुख अन्आनंदी करणाऱ्या कविता - निलीमा नंदुरकर सुनेत्रा जोशी यांनी जीवनातील विविध रंग काव्यबद्ध केले आहेत. भावभावनांचे विविध रंग तरंग वाचताना आपण अंतर्मुख होत जातो. यात आहेत स्त्री मनाच्या व्यथा , माहेर पण विसरून सासरी रमलेली स्त्री,' माहेरपण' या कवितेत दिसते. महिलादिनी मनात आलेले विचार जेव्हा कवितेत उतरतात तेव्हा स्वतःच स्त्री ला या पुरुष प्रधान संस्कृतीच्या शृंखला तोडायच्या आहेत हे कविता बजावते. काव्यात पावसाचे विविध रंग दिसतात ! कधी तो प्रियकर होऊन बरसतो तर, कधी पावसाळा डोळ्यातून वाहतो, हृदयात राहतो, कधी विरह वेदनेने भाजूनही काढतो, पावसाळ्याचे हे विविध रंग आणि रूपे सुंदर शब्दबद्ध केलीयत ' पावसाळा' या कवितेत ! 'पुन्हा तोच पाऊस' येतो विविध रंगरूपात! रंग आहेत हे नवतारुण्याचे, रंग हे उदास सांजसमयीचे, रंग स्त्रीच्या अंतर्मानाचे विविध भावभावनांचे, समाजाने केलेल्या अन्यायाचे , मनोगत पक्षांचे , तुटलेल्या झाडांचे मोडलेल्या घरट्याचे, झुकलेल्या पापणीखालील गुपिताचे, अनंत काळच्या मातेचे क्षणाच्या प्रेयसीचे, स्वप्न रेखीते उद्याचे! आधुनिक 'हिरकणी'ला जाणून घ्यावे रंगकाव्यात रंगून! मागणे ही मागते कविता प्रभूपाशी! पावलापुरता प्रकाश, मदतीचा आधार, भुकेला भाकर आणि ताठ कणा याचबरोबर विषफणा मागताना सुमती सद्बुद्धी शुद्धमती कलियुगात वावरण्यासाठी दोन्ही मागण्या सुनेत्रांची कविता मागते. सोशल मीडिया बरोबर जगताना आयुष्य कसं बेघर आणि भावनाशून्य झालंय हे अगदी पटतच !, आणि आयुष्य ही भेटतं आपलंच आपल्याला ! एक हळवे अंतर्यामी समाजचिंतन करणारे मन, स्त्रीहृदय जाणणारे, निसर्गावर प्रेम करून त्याला जपणारे, उदासीतही आशावाद जपणारे, माहेरची सय येताना सासरची लय साधणारे, ईश्वरावर चराचरावर प्रेम करणारे अनेक विविध रंग आपल्याला ' रंग' या काव्यसंग्रहात दिसतात. वाचकाला अंतर्मुख करणाऱ्या आनंदी करणाऱ्या या कविता आहेत. लेखिका निलीमा नंदुरकर
पुस्तकाचे नाव – रंग..(काव्यसंग्रह)
लेखिका – सौ. सुनेत्रा विजय जोशी. रत्नागिरी मोबाईल 9860049826
प्रकाशन – लोकव्रत प्रकाशन पुणे
किंमत – 200 रुपये
पृष्ठसंख्या – 149
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.