एकीकडे महात्मा गांधी यांना अभिवादन करायचे आणि ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ५१ वर्षे राष्ट्रध्वज फडकविला नाही, राष्ट्रध्वजाला अभिवादन केले नाही. त्यांचा गौरव करायचा. हा विरोधाभास सारे जग पाहत आहे.
जो निडर थे, वो जंग मे गये. जो कायर थे, वो संघ मे गये..
असे एक सुंदर आणि स्पष्टपणे लिहिलेल्या दोन ओळी ऐकल्या. अर्थातच दिवस होता दोन ऑक्टोबर, महात्मा गांधी यांची १५७वी जयंती. भारतीय कृषी संस्कृतीचा आविष्कार असलेला दसऱ्याचा सण आणि राजकीय क्षेत्रात साजरी होत असलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी…!
वसंत भोसले, ज्येष्ठ संपादक
भारतीय परंपरा जपण्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना तिथीप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी झाली. तारीख होती,२७ सप्टेंबर १९२५. हे वर्ष २०२५ आहे. म्हणून या दसऱ्याला तिथीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी साजरी करीत आहे. तारखेनुसार २७ सप्टेंबर रोजीच ती साजरी करायला हवी होती.
हा सारा योगायोग नाही तर घडून गेलेल्या आणि घडत असलेल्या गोष्टी आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महात्मा गांधी, भारतीय स्वातंत्र्य लढा आणि स्वातंत्र्योत्तर भारत याविषयीची भूमिका सर्वांना माहीतच आहे. लोकमान्य टिळक यांच्या निधनानंतर काँग्रेस मधील हिंदुत्वादी विचारसरणीकडे झुकलेल्या नेतृत्वाची पीछेहाट झाली आणि दक्षिण आफ्रिकेतून वर्ण भेदाविरुद्ध लढून भारतात आलेले बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी यांच्याकडे स्वातंत्र्याचे नेतृत्व आले होते. अशा पार्श्वभूमीवर स्वतंत्र होणाऱ्या भारताचे स्वरूप काय असेल याची काळजी ज्यांना वाटत होती, त्यामध्ये काँग्रेसजण होते. कम्युनिस्ट होते, समाजवादी विचारसरणीचे नेते पण होते आणि हिंदुत्ववादी विचार करणारा प्रवाह देखील होता.याच हिंदुत्ववादी प्रवाहाने डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.
थेट आत्ताच्या परिस्थितीवर आपण बोलू या. कारण संघ संघाची वाटचाल, त्यावरील बंदी आदि सर्व गोष्टी सार्वजनिक जीवनातील सर्वांनाच माहित आहेत. वास्तविक संघ हा देशाभिमानी, खूप शिस्तबद्ध आणि देशासाठी समर्पण करणाऱ्यांची संघटना आहे, असे सांगितले जाते. त्यांच्या देशभक्तीबद्दल आणि शिस्तीविषयी फारच कौतुक केले जाते. पण हा संघ स्थापन झाल्यानंतर पहिली पंचवीस वर्षे काय करीत होता? असा प्रश्न उपस्थित केला तर त्यांचे पितळ उघडे पडते. कारण १९२५ ते १९४७ पर्यंत भारतीय स्वातंत्र्याचा अखेरचा टप्पा चालू होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तीन वर्षे देशाची राज्यघटना तयार करण्याचे महत्त्वाचे काम चालू होते. भारत आणि पाकिस्तान अशी देशाची फाळणी झाली होती. अखंड भारताच्या बंगाल प्रांतामध्ये संघ विचाराच्या हिंदुवत्वादी नेत्यांनी मुस्लिम लीग बरोबर आघाडी करून १९३७ मध्ये प्रांतिक सरकार स्थापन केले होते.
अशी सर्व पार्श्वभूमी या संघाच्या इतिहासाला आहे. संघाची राजकीय शाखा म्हणजे अखिल भारतीय जनसंघ पक्ष होय. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर देशातील काँग्रेस विरोधकांनी एकत्र येऊन जन आंदोलन उभे केले. त्या जनआंदोलनातून निर्माण झालेल्या जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले. त्या पक्षामध्येच जनसंघाचे अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय शाखा देखील विलीन झाली होती. त्यांच्याबरोबरच संघटना काँग्रेसचे नेते आणि समाजवादी चळवळीचे नेते देखील जनता पक्षात सामील झाले होते. अशा अनेक वेळा तडजोडी जनसंघाने करत सत्तेवर जाण्याचा प्रयत्न केला.
संघ प्रचारक असलेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे भारतीय जनता पक्षाला (पंधरा सार्वत्रिक निवडणुकानंतर )२०१४ मध्ये प्रथम बहुमत मिळाले. २०१९ आणि २०२४ मध्ये देखील भाजपचा विजय झाला. मागील निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले नसल्यामुळे आघाडीचे सरकार स्थापन करावे लागले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वातंत्र्य लढ्यामध्ये कोणताही सहभाग नव्हता. हे आता झाकून राहिलेले नाही. मात्र ही संघटना आणि त्यांचा राजकीय पक्ष खरे देशभक्त असल्याचा दावा करीत आहेत. अनेकांना ते देशभक्त ठरवतात आणि देशद्रोही देखील ठरवत आहेत. इंग्रजांना मदत करणारे असे कायर लोक या संघटनेत होते. त्यांनी कधीही इंग्रजांना विरोध केला नाही देशांमध्ये हिंदूंचे वर्चस्व राहिले पाहिजे. हिंदूंच्यावर होणाऱ्या आक्रमणांना तोंड दिले पाहिजे, असा बागुलबुवा निर्माण करण्यात आला. वास्तविक हिंदू धर्मातील जातीव्यवस्थेमुळेच परकीय आक्रमणे भारतावर होत राहिली आणि ती हिंदू समाज एक संघ नसल्यामुळे परतवून लावता आली नाहीत. हिंदू समाजातील मोठा घटक येथील शोषकांच्या शोषणाला बळी पडला होता. मग ते आर्थिक शोषण असो, सामाजिक. सांस्कृतिक, धार्मिक. शैक्षणिक अशा सर्व प्रकारच्या शोषणामुळे जो समाज बाजूला पडला होता. त्या समाजाने परकीयांचे स्वागतच केले.
इंग्रजांची सत्ता आल्यानंतर महार बटालियन सारखी सैन्याची तुकडी उभी राहिली. त्यामुळे अशा उपेक्षित वर्गाला प्रथमच उभे राहण्यास बळ मिळाले. त्यातूनच पुढची पिढी तयार झाली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी या लष्करात होते. त्यांना ती संधी मिळाल्यामुळे आणि ठिकठिकाणी काम केल्याने शिक्षणाचे महत्त्व त्यांच्या लक्षात आले. ते अल्पशिक्षितच होते. पण या सर्व प्रवासामुळे त्यांना ती दिशा मिळाली आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण झाले पाहिजे. यासाठी त्यांनी खूप खस्ता खाल्ल्या. हिंदू धर्मातील अभिजन वर्गाने कधीही अशा उपेक्षित समाजाला जवळ केले नाही. याउलट महात्मा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आदींच्या सुधारणावादी प्रयत्नांना विरोधच केला. ही सनातनी वृत्ती जोपासण्यामध्ये धन्यता म्हणणारी विचारसरणी बळकट होत गेली. काँग्रेसने देखील अनेक चुका केल्या. त्या चुकांच्या परिणामी अनेक समाज घटकांना पूर्ण न्याय मिळाला नाही, हे जरी खरे असले तरी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी करत असताना स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. ते मात्र पूर्णतः विरोधाभासी आहे. कारण त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नव्हता. भाषिक प्रांतरचनेबाबत भूमिका स्पष्ट भूमिका नव्हती. हिंदू समाजातील जातीव्यवस्थेविरोधात त्यांची भूमिका नाही. मनुस्मृती जाळून बाबासाहेब आंबेडकर यांनी नव चैतन्य जागे केले. त्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधी भूमिका घेतली नाही. आजही अनेक जण संघाला आव्हान देत आहेत की, मनुस्मृती जाळून आपण संविधान स्वीकारलेले आहे, असे जाहीरपणे संघाने सांगावे.
देशातील सर्वच धर्माच्या, जातीच्या आणि पंथाच्या लोकांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. सार्वजनिक जीवनात भाग घेतला. शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विविध पातळीवर स्थापन केलेल्या भारती नावाच्या संघटनांनीच काम केले आहे. हा दावा देखील खोटा आहे. त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये ठराविक वर्गाची मक्तेदारी आहे. राजकीय कारणाने आणि दलित, आदिवासी, उपेक्षित वर्गाला राज्यघटनेने राजकीय ताकद दिल्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये या समाजाला प्रतिनिधीत्व दिले जाते. त्यात देखील आता बदल झाला आहे. भारतीय जनता पक्षाला स्वबळावर राजकीय सत्ता मिळाल्यानंतर या वर्गातून येणाऱ्यांना दुय्यम स्थान दिले जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या दोघांच्या हातातच देशाची सारी सत्ता एकवटलेली आहे. या दोघांच्या विरोधात पक्षातच असंतोष खदखदतो आहे. मात्र त्याला वाट सापडत नाही म्हणून तो ज्वालामुखी शांत आहे. २०२४ ची लोकसभा निवडणूक झाल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राजीनामा दिला. त्यांची मुदतही संपली होती. मात्र गेली दीड वर्षे झाली पक्षाध्यक्ष निवडणे शक्य झालेले नाही. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यामध्ये नवा अध्यक्ष निवडण्यावरून मत एक होत नाही. खटके उडत आहेत. अशा वारंवार बातम्या येत आहेत
अलीकडच्या काळामध्ये लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी संघ परिवाराच्या विरोधात मोठी आघाडी उघडली आहे. संघ हा शिस्त आणि प्रामाणिक असल्याचा दावा केला जात आहे. पण विरोधी पक्षाने ज्या प्रकारच्या टीका टिपण्या केल्या आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. अंबानी – अदानी परिवाराला शंभर गुन्हे माफ केले जातात. त्यावेळी हा शिस्तबद्ध काम करणारा संघ आणि प्रामाणिक असल्याचा दावा करणारा संघ गप्प का बसतो? कारण त्यांचे राजकारणच दुटप्पी आहे. मुस्लिम द्वेष आणि हिंदू प्रेम देखील केवळ राजकीय कारणासाठी आहे. ज्या ज्या प्रांतामध्ये भाजपची सत्ता आलेली आहे तेथे भ्रष्टाचाराची प्रकरण थांबलेली नाहीत. भ्रष्ट व्यवस्थेमध्ये कोणताही बदल झालेला नाही. भ्रष्ट राजकीय नेत्यांना अभय दिले. महाराष्ट्रात तर कहर केला आहे.
भ्रष्टाचार वाढतोच आहे. अगदी नोकरदारांच्या बदल्या करण्यापासून ते ठेके देण्यापर्यंत दर ठरलेले आहेत. अशा बाबतीत संघ कोणतीच भूमिका घेत नाही. कारण वाद घातला तर प्रतिवाद होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये आपले हात पोळू शकतात, याची जाणीव त्यांना आहे. संघ आज ज्या पद्धतीने पैसा आणि सत्तेचा वापर आपल्या कामासाठी करीत आहे. तो पैसा आणि सत्ता सरळ मार्गी मिळत असेल यावर कोणी विश्वास ठेवेल का..? देशाचे संविधान ज्यांना मान्य नाही, असे लोक सत्तेवर येतात आणि त्या संविधानाला बगल देणारे अनेक निर्णय घेतले जातात. राज्यपालांनी विधानसभेचे निर्णय मान्य करायचे नाहीत. निवडणूक आयोगाने मतदार याद्या नीट करायच्या नाहीत. त्यासंबंधी आलेल्या तक्रारींना केराची टोपली दाखवणे, अशा अनेक लोकशाही व्यवस्थेला मारक ठरणाऱ्या गोष्टी घडत असताना संघ परिवार शांतपणे हे सगळं पाहत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले त्याच्या आदल्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्षे झाल्याबद्दल शंभर रुपयाच्या खास टपाल तिकिटाचे अनावरण देखील केले. एकीकडे महात्मा गांधींना अभिवादन करायचे ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ५१ वर्ष राष्ट्रध्वज फडकविला नाही किंबहुना राष्ट्रध्वजाला अभिवादन केले नाही. त्यांचा गौरव करायचा. ते आता सोनम वांगचुक यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून भारतीय स्वातंत्र्याच्या, समतेच्या आणि लोकशाहीचे धिंडवडे काढले जात आहेत. हे सर्व नवी पिढी पाहते आहे. त्याचबरोबर संपूर्ण जग देखील या गोष्टीकडे पाहत आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या मुशीतून तयार झालेली लोकशाही, समतावादी, धर्मनिरपेक्ष मूल्यांना नष्ट करण्याची कटकारस्थाने कशी केली जात आहेत, हे सारे जग पाहत आहे. त्यामुळेच एका शायरने म्हटल्याप्रमाणे
जो निडर थे, वो जंग मे गये, जो कायर थे, वो संघ मे गये..!
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
