March 15, 2025
life-after-age-60-article-by-gangadhar-mute-aarvikar
Home » तर तुम्ही आजच मेला आहात….!
मुक्त संवाद

तर तुम्ही आजच मेला आहात….!

मनाला सतत काहीतरी नवे आणि नाविन्यपूर्ण हवे असते. जुन्यात कधीही मन रमत नसते. वयाची साठ वर्ष ज्या कामात मनाला गुंतवलं त्याच कामात वयाच्या 61 व्या वर्षी आपण गुंतवायचे ठरवले तर शरीर तर जिवंत राहील परंतु मन मात्र हळूहळू म्हातारे होत जाईल आणि कदाचित एक दिवस मरुनही जाईल. शरीर जिवंत पण मन मेलेले…. ही मानवी जीवनातील सर्वात वाईट अवस्था आहे.

गंगाधर मुटे आर्वीकर

मी लहानपणी एक कथा ऐकली होती. त्या कथेतला तपस्वी तपश्चर्या करताना इतका अविचल आणि निश्चल बसतो की कालांतराने त्याच्या अंगावर मुंग्या वारूळ घालायला लागतात आणि एक दिवस तो तपस्वी पूर्णतः वारुळाखाली दबून जातो. आपल्या मराठी भाषेमध्ये सुद्धा एक म्हण आहे “कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला” आणि कविवर्य केशवसूत सुद्धा लिहून गेलेत की…. “सडत न एक्या ठायी ठाका, सावध! ऐका पुढल्या हाका!” अर्थात सतत उद्यमशील व कर्तव्यशील असणे हेच जिवंतपणाचे लक्षण आहे. ही उदाहरणे शरीरात संबंधातील असली तरी मनालासद्धा हीच समीकरणे लागू पडतात.

वास्तविक पाहता शरीरशास्त्र आणि मनशास्त्र बऱ्याच अंशी परस्परभिन्न आहेत. दोन्हीच्या कार्यशैली परस्परांच्या उलट आहेत. शरीराचा कल सहसा “जुने ते सोने” अशा स्वरूपाचा असतो, शरीर सहजासहजी “नवे ते हवे” असे म्हणत नाही उलट रुळलेल्या वाटेवरून चालणे, यापूर्वी जी कार्ये ज्या पद्धतीने केली आहेत अशाच पद्धतीने कार्य करण्याचा प्रयत्न करणे हा शरीराचा मुख्य गूण आहे. जसे अंगवळणी पडले तसेच पुन्हा पुन्हा करणे शरीराला आवडते, ज्याला आपण सवय असं म्हणतोय. शिवाय शरीराला जुनी पद्धत सोडून नवीन पद्धत शिकवायची असेल किंवा शरीराकडून वेगळ्या स्वरूपाचे कार्य करून घ्यायचे असेल तर शरीराला राजी करायला बरेच कष्ट घ्यावे लागतात. सवय आणि सवयीनुसारच कार्य करणे शरीराची आवडती कार्यपद्धती आहे.

एखाद्या लहान बाळाला सुरुवातीला आईचे दूध सोडून अन्य काहीही पचत नाही. साधे पाणी किंवा गायीचे दूध त्याला पाजले तर त्या बाळाचे शरीर सुरुवातीला पाणी अथवा गायीचे दूध उलटून फेकत असते. एखादा वयस्क व्यक्ती सुद्धा तंबाखू किंवा अन्य तत्सम पदार्थ खायला गेला, अगदी एक किंचितसे पान जरी खाल्ले तरी त्याचे शरीर तो पदार्थ पचवून न घेता उलटून फेकत असते, शरीर नव्या जिन्नसाचा सहजासहजी स्वीकार करत नाही. पण बाळाला गायीचे दूध, पाणी किंवा वयस्क माणसाला तंबाखू किंवा अन्य खाण्याचे पदार्थ जर वारंवार दिले तर मात्र पुढे पुढे त्याला काल नकोनकोसे असलेले पदार्थ कालांतराने हळूहळू आवडायला लागतात. नशिले पदार्थ वारंवार दिले तर त्याची सवय व्हायला लागते इतकेच नव्हे तर हीच सवय कालांतराने व्यसनाची जागा घेते. सुरुवातीला नाशिले पदार्थ उलटून फेकणारे शरीर नंतर मात्र इतके व्यसनाधीन होते की नंतर मग शरीर त्याशिवाय जगू शकत नाही.

मनाचे शास्त्र मात्र अगदीच शरीरशास्त्राच्या उलटे आहे. पूर्णतः वेगळे आहे. मनाला जुने ते काहीच नको असते. मनाला सतत “नवे ते हवे” असते. लहान मुल खुळखुळा हवा म्हणून रडते पण एकदा त्याच्या हाती खुळखुळा दिला की काही तासानंतर त्याला तो खुळखुळा नको असतो ज्यासाठी काही तासापूर्वी ते मूल रडत होतं. आता त्याला आणखीन दुसरेच काहीतरी हवे असते. दुसरे मिळाले की काही काळानंतर तेही नको असते, तिसरेच पाहिजे असते. मन नेहमी नाविन्याच्या शोधात असते. जे कधीच बघितले नाही ते बघण्याची सतत उर्मी मनाला आकर्षित करत असते. अगदी पिकनिकला किंवा पर्यटनाला जायचे असेल तरी जे स्थळ त्यापूर्वी बघून झाले तिकडे न जाता नवीन स्थळी जाण्याचा मनाचा कल असतो.

सतत एकच काम सलगपणे करण्याचा मनाला कंटाळा येतो. आहे तेच काम पुढे सुरु ठेवायचे असेल तर मग काही काळासाठी तरी विरंगुळा हवा असतो. मनोरंजन हवे असते, हवापालट हवा असतो. अगदी शाळेत सुद्धा विशिष्ट वेळानंतर विषय बदलले जातात. विद्यार्थ्यांचे जसे विषय बदलले जातात तसेच शिकवणाऱ्याचा विषय एकच असला तरी वर्ग बदलले जातात. दिवसभर एकच विषय शिकणे जसे विद्यार्थ्याला अवघड असते तसेच एकाच वर्गाला दिवसभर शिकवणे शिक्षकालाही अशक्यप्राय असते. हे सर्व मनाचे खेळ आहेत. मनाला कंटाळवाणे होऊ न देता त्याला वेगवेगळ्या तऱ्हेने गुंतवण्यासाठी नाना तऱ्हेच्या क्लुप्त्या योजाव्याच लागतात.

इतके सगळे लक्षात घेतले की एक गोष्ट अगदी सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होऊन जाते की, मनाला सतत काहीतरी नवे आणि नाविन्यपूर्ण हवे असते. जुन्यात कधीही मन रमत नसते. वयाची साठ वर्ष ज्या कामात मनाला गुंतवलं त्याच कामात वयाच्या 61 व्या वर्षी आपण गुंतवायचे ठरवले तर शरीर तर जिवंत राहील परंतु मन मात्र हळूहळू म्हातारे होत जाईल आणि कदाचित एक दिवस मरुनही जाईल. शरीर जिवंत पण मन मेलेले…. ही मानवी जीवनातील सर्वात वाईट अवस्था आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading