October 10, 2024
Manifesto of Peasants Independence
Home » Privacy Policy » शेतकरी स्वातंत्र्याचा जाहीरनामा
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकरी स्वातंत्र्याचा जाहीरनामा

शेतकरी आत्महत्या व यांच्या पाठीमागची नेमकी कारणे कोणती, हे सांगण्याचे काम या लहानशा पुस्तिकेने अत्यंत स्पष्टपणे केलेले आहे. “शेतकऱ्यांचे मरण त्याला कायदेच कारण” असे या पुस्तिकेने सिद्ध केलेले आहे.

नितीन राठोड, पुणे

‘शेतकरीविरोधी कायदे’ ही पुस्तिका शेतकऱ्यांच्या तमाम मुलामुलींनी वाचणे अत्यंत गरजेचे आहे. कारण आपला जन्म या मातीत झालेला आहे. या मातीत आपण वाढलो आहोत. शेतकऱ्याच्या वेदनांची आपल्याला ओळख आहे. या मातीचे आपण देणे देखील लागतो. ही जबाबदारी आपण विसरत चालेलो आहोत. ही पुस्तिका त्याचे भान देते.

दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. महाराष्ट्रात उच्चांक झाला आहे. लाखो शेतकरी आत्महत्या करीत असताना सुद्धा या त्याबद्दल कोणतीही जबाबदार व्यक्ती, राजकीय पुढारी बोलताना दिसत नाही. शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती त्यांना वाटत नाही. शेतकऱ्याचा मुलगा-मुलगी म्हणून आपले हे नैतिक काम आहे की, आपण आपल्या बापाच्या प्रश्नांबद्दल बोलले पाहिजे. आवाज उठवला पाहिजे. मला असे वाटते की, प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलांने ही पुस्तिका वाचलीच पाहिजे, समजून घेतली पाहिजे आणि शेतकरी आत्महत्या, शेतकरी दुरावस्था, शेतकरी आर्थिक विवंचना आणि शेतकरी स्वातंत्र्य या बाबत समजून घेतले पाहिजे. यासाठी ही पुस्तिका एक मार्गदर्शक म्हणून काम करेल असा मला विश्वास वाटतो. शेतकरी आत्महत्या थांबाव्यात, शेतीची लुटालूट थांबावी, रक्तपात थांबावा, त्यासाठी कोणते उपाय आहेत ? हे जाणून घेण्याची उत्सुकता असणाऱ्या लोकाना ही पुस्तिका उपयुक्त ठरेल. ही पुस्तिका शेतकरी प्रश्नाचे अचूक निदान करून देते, योग्य मार्गदर्शन करू करते.

या लहानशा पुस्तिकेने शेतकऱ्यांच्या मूळ समस्येला हात घातला आहे. शेतकऱ्याचे जीवन-मरणाचे प्रश्न यात सांगितले आहेत. आजपर्यंत अनेक विद्वानांनी वेगवेगळे उपाय सुचविले आहेत. ते सगळे उपाय फसले आहेत. या पुस्तिकेत कालबाह्य व निरर्थक उपाय बाजूला ठेवून शेतकऱ्यांची दुरावस्था आणि आर्थिक हतबलतेची योग्य कारणमिमांसा केली आहे. शेतकरी आत्महत्या व यांच्या पाठीमागची नेमकी कारणे कोणती, हे सांगण्याचे काम या लहानशा पुस्तिकेने अत्यंत स्पष्टपणे केलेले आहे. “शेतकऱ्यांचे मरण त्याला कायदेच कारण” असे या पुस्तिकेने सिद्ध केलेले आहे.

शेतकऱ्यांच्या या दुरावस्थेला महत्त्वाचे तीन प्रमुख कायदे कारणीभूत आहेत. ते कायदे या पुस्तिकेत सविस्तर सांगितले आहेत. अगदी उदाहरणासह. कोणताही माणूस सहजपणे या गोष्टी समजून घेऊ शकतो की, कशा प्रकारे शेतकरीविरोधी नरभक्षी कायदे जबाबदार आहेत.

१) कमाल शेतजमीन धारणा कायदा (सीलिंग कायदा)
२) आवश्यक वस्तू कायदा आणि
३) जमीन अधिग्रहण कायदा

या तीन कायद्या द्वारे शेतीच्या लुटीची एक दीर्घ काल चालू शकेल अशी व्यवस्था निर्माण केलेली आहे. या तीन कायद्यांचा एकत्रित परिणाम आपणाला अभ्यासावा लागणार आहे.

या पुस्तिकेने शेतकऱ्यांच्या मूळ समस्येवर उपाय सांगितलेला आहे. तो म्हणजे शेतकरी विरोधी नरभक्षी कायदे रद्द करणे आणि शेतकरी इतर उद्योजकांप्रमाणे काम करू शकेल अशी परिस्थिती निर्माण करणे. शेतकऱ्यांचे हात-पाय ज्या कायद्यानी बांधले गेलेले आहेत, ते सुटणे महत्त्वाचे आहे. भारतीय संविधानात नागरिकांचे मूलभूत अधिकार लिहिलेले आहेत. ते शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत. शेतकऱ्यांना सुद्धा इतर नागरिकांप्रमाणे त्यांचे स्वातंत्र्य त्यांना उपभोगता आले पाहिजेत, असे या पुस्तिकेचे सूत्र आहे.

या पुस्तिकेत आपणाला भेडसावणारे 37 प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची उत्तरे अत्यंत साध्या-सोप्या व सर्वसामान्य माणसाला समजेल अशा पद्धतीने दिलेली आहेत. ही प्रश्नोत्तर पद्धत मला अतिशय योग्य वाटते. यामुळे वाचकाला नेमक्या प्रश्नाचे नेमके उत्तर मिळते.

या पुस्तिकेत कायदा काय आहे ? कायदा काय करू शकतो ? व त्याचे दुष्परिणाम कोणते झाले ? त्यावर कोणता उपाय आहे ? याबद्दल अत्यंत स्पष्टपणे माहिती दिली आहे. यात तीनही कायद्यांची पार्श्वभूमी सांगितली आहे, त्यामुळे कोणत्या परिस्थितीत हा कायदा आला, हे कळू शकते. वेळोवेळी झालेल्या घटनादुरुस्त्या कशा झाल्या. त्यांचा शेतकऱ्यांशी कसा संबंध आहे हेही याच पुस्तिकेत स्पष्ट केले आहे. कोणता कायदा कशा पद्धतीने शेतीसाठी अडथळा निर्माण करतो, हे सांगून कायद्यांच्या दुष्परिणामामुळे आज शेतकऱ्यांचे कसे हाल झाले आहेत, त्याचा देशावर काय परिणाम झाला आहे, आपल्या अर्थव्यवस्थेला कसा धोका झाला, रोजगाराच्या संधी कशा मारल्या गेल्या, याची लेखक चर्चा करतात.

या पुस्तिकेच्या शेवटच्या भागात किसानपुत्र आंदोलनाची भूमिका व कार्यपद्धती याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. किसानपुत्र आंदोलन ही संघटना नसून आंदोलन आहे. शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी काय करावे लागेल हेही स्पष्ट केले आहे.

या पुस्तिकेला मी ‘शेतकरी स्वातंत्र्याचा जाहीरनामा’ असे म्हणतो आणि जगभरामध्ये मानव मुक्तीसाठी अनेक लोकांनी काम केलेले आहे, त्या कामाला पूरक होईल, अशी ही पुस्तिका आहे.
या पुस्तिकेचे लेखक आहेत किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी आपली संपूर्ण हयात शेतकरी स्वातंत्र्यासाठी लढण्यामध्ये लावली आहे. जयप्रकाश नारायण, शरद जोशी अशा स्वतंत्रतावादी महान व्यक्तीं सोबत त्यांनी काम केले आहे. ही व्यक्ती शेतकऱ्यांचा प्रश्न गरिबीचा नसून गुलामीचा आहे, असे ठामपणे सांगत आली आहे. शेतकरी आणि स्त्री हे सर्जक आहेत, त्यांना फक्त स्वातंत्र्य हवे आहे. वर्ग-संघर्ष खोटा, तसेच वर्ण-संघर्षही खोटा आहे, खरा संघर्ष सर्जकांच्या स्वातंत्र्याचा आहे, अशी त्यांची वैचारिक भूमिका आहे. ते पत्रकार व लेखक असल्यामुळे अत्यंत समर्पक लिहिले आहे. अनेक चळवळीतून तावून सुलाखून निघाल्यामुळे ते हे पुस्तक समर्थपणे लिहू शकले आहेत. शेतकऱ्यांच्या मुला मुलींनी तसेच अभ्यासकांनी व कार्यकर्त्यांनी ही च्तेखानी पुस्तिका जरूर वाचली पाहिजे.

पुस्तकाचे नाव – शेतकरीविरोधी कायदे
लेखक – अमर हबीब
प्रकाशक – परिसर प्रकाशन, आंबाजोगाई- ४३१५१७
किंमत – ८० रुपये, संपर्क – 9422931986


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading