महाराष्ट्र आणि गुजरात मधील लोककलांचे आदान प्रदान
मुंबई – महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग अंतर्गत महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमी द्वारा लोकायन सांस्कृतिक संस्था, मुंबई यांच्या सहकार्याने ‘गप्पा लोककलेच्या, महाराष्ट्र आणि गुजरातच्या’ (वातो लोककलानी, महाराष्ट्र अने गुजरातनी) हा लोककलांचा अभ्यासात्मक आणि सांगीतिक कार्यक्रम समाज कल्याण हॉल, दहिसर (पूर्व) येथे उत्साहात झाला.
या कार्यक्रमात भागवत परिवाराचे वीरेंद्रजी याज्ञिक, करुणाशंकरजी ओझा, भागवत कथाकार मीनाबेन जोशी, प्रा. सुरेंद्र तन्ना, महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष स्नेहल मुजुमदार तसेच लोकायन संस्थेचे योगेश्वर लोळगे उपस्थित होते.
सोबत डॉ. मोनिका ठक्कर लिखित ‘भुलजा भुलाबाई के लोकगीतों का उद्देश और अर्थ’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. महाराष्ट्रातील तसेच गुजरातमधील लोककला प्रकारांविषयी डॉ. मोनिका ठक्कर यांनी अभ्यासात्मक मार्गदर्शन केले. महाराष्ट्र आणि गुजरात मधील भाषा, संस्कृती, कला या कशा बहिणी आहेत, यांचा किती जवळचा संबंध आहे; याविषयीची माहिती अनेक अंगांनी स्पष्ट केली. गुजरातमधील काही लोकगीतांमागे कशा करुण लोककथा आहेत याबद्दल माहिती दिली तसेच महाराष्ट्रातील लोककला या कशा पद्धतीने कार्य करतात, कोणकोणते प्रकार यात आहे याबद्दल विस्तृत माहिती देत लोककला, लोकसंस्कृती आणि लोकसाहित्य या विषयांवरील विविध पैलूंना प्रकाशित केले.
मान्यवरांनी या कार्यक्रमाला विशेष शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात व्हावा व आपल्या लोककला व लोकसंस्कृती बद्दल जागृती निर्माण व्हावी, याचा प्रचार-प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून शासनाने पुढाकार घ्यावा असे मत व्यक्त केले. महाराष्ट्रातील लोकगीतांचे सादरीकरण डॉ. शिवाजी वाघमारे आणि वृंद तर गुजरातच्या लोकगीतांचे सादरीकरण कु. धानी चारण यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना डॉ. मोनिका ठक्कर यांची होती. या कार्यक्रमास मा. जगदिशभाई ओझा यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.