माणसाचा स्वभाव असाच आहे. काम झाले तर जय हो, काम नाही झाले तर नावे ठेवायची. जे घडते ते सर्व देवाच्या इच्छेने घडते. मग ते चांगले असो वा वाईट. हे सर्व देवाला अभिप्रेत असते तेच घडते. पण चांगले घडवायचे का वाईट घडवायचे. चांगले वागायचे की वाईट वागायचे हे सर्व आपल्याच हातात आहे ना !
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
आणि भजिन्नलियासवें । तो विषो जरी न पवे ।
तरी सांडी म्हणे आघवे । टवाळ हें ।। ८१० ।। ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा
ओवीचा अर्थ – आणि मला भजल्याबरोबर तो इच्छित विषय जर मिळाला नाही. तर तो हे भजन टाकतो व सर्व खोटे आहे. असे तो म्हणतो.
देवाचा प्रसाद मिळाला तर देव चांगला, अन्यथा देव वाईट. सद्गुरूंच्या दर्शनाने काम झाले, तर सद्गुरू चांगले. अन्यथा सद्गुरूंची ताकद, प्रभाव आता कमी झाली आहे. पूर्वीसारखे त्यांच्याकडे शक्ती नाही. अशी टवाळी पिटायची. देव दर्शन करून यायचे. ते केल्यानंतर लगेच काम झाले तर देवाचा प्रभाव म्हणायचे. अन्यथा देवामध्ये आता काय राम राहिला नाही, असे म्हणायचे.
माणसाचा स्वभाव असाच आहे. काम झाले तर जय हो, काम नाही झाले तर नावे ठेवायची. जे घडते ते सर्व देवाच्या इच्छेने घडते. मग ते चांगले असो वा वाईट. हे सर्व देवाला अभिप्रेत असते तेच घडते. पण चांगले घडवायचे का वाईट घडवायचे. चांगले वागायचे की वाईट वागायचे हे सर्व आपल्याच हातात आहे ना ! चांगले वागाल तर चांगले फळ निश्चितच मिळेल. झाड येरंडाचे लावल्यावर त्याला येरंडाचीच फळे येणार. त्याला आंबे लागणार नाहीत. जे पेराल तेच उगवते. यासाठी पेरणी कशाची करायची, हे ठरवायला हवे. चांगले पेरला तर निश्चितच चांगले उगवणार.
कोकणामध्ये तुळस या गावी कृष्ण म्हणून वरवंटा पुजला जातो. मानला तर देव, नाही तर तो दगड. या गावात ही प्रथा कशी पडली. याचा इतिहास रंजक आहे. दरवर्षी गोकुळाष्टमीला तेथे कृष्णाचा पाळणा बांधला जात असे. त्यामध्ये कृष्णाची मूर्ती पुजली जायची. दरवर्षी प्रमाणे कृष्णाची मूर्ती खरेदी करण्यासाठी या गावातील परब कुटुंबीय गेले. पण दुपारी जोराचा पाऊस सुरू झाला. यामुळे गावात परतण्यास अडचणी आल्या. पूर ओसरलाच नाही. गावातील मंडळींनी त्यांची वाट पाहिली. अखेर शेवटी पाळण्यात वरवंटा ठेवला आणि पाळणा म्हटला. तेव्हापासून येथे वरवंटा पुजण्याची प्रथा आहे.
मानला तर दगडात देव आहे. मानलेच नाही तर त्या दगडाला देवपण येणार नाही. देवाचा प्रभाव कधी कमी होत नाही. चुकत आपणच असतो. त्या दुरुस्त नाही केल्या तर, चुका वाढतच जाणार. गाडी खराब झाली आहे याकडे दुर्लक्ष केले तर गाडी अधिकच खराब होत जाणार. अपघात झाल्यावर मग आपले डोळे उघडणार. त्यावेळी देवाला दोष देऊन काय कामाचे. गाडी खराब होती म्हणून अपघात घडला. काही वेळेला वेळ खराब असते. पण खराब प्रसंग ओढवू नये यासाठी आपणच जागरूक राहायचे असते.
चांगल्या संगतीत राहिल्यावर विचारसुद्धा चांगलेच सुचणार. वाईटांच्या संगतीत वाईट विचाराचा प्रभाव अधिक असतो. यासाठी देवाला नावे ठेवण्यात काहीच अर्थ नाही. भक्ती मनात उत्पन्न व्हावी लागते. तो विचार उत्पन्न झाला नाही तर देव कसा भेटणार आणि पावणार. सोहम वर लक्ष केंद्रीत केले तरच आत्मदर्शन होईल. अन्यथा साधना रोज करूनही ती फुकट आहे. यात देवाला, सद्गुरुंना नाव ठेवण्यात काहीच अर्थ नाही.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.