कणकवली – कासार्डे येथील साने गुरुजी स्मारक अनुवाद सुविधा केंद्राचे संचालक तसेच स्मारकाचे माजी कार्याध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार सुरेश कराळे (६६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
कराळे कासार्डे गावी आणि मुंबई येथे राहून सामाजिक सांस्कृतिक कामात कार्यरत असत. सुमारे 45 वर्ष ते पत्रकार म्हणून त्यांनी विविध दैनिकांत काम केले. सध्या ते दैनिक गावकरीचे मुंबईचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. आपल्या पत्रकारितेच्या दीर्घ कालावधीमध्ये त्यांनी शोषित घटकांना सतत न्याय मिळवून दिला. सामाजिक प्रश्नांवर सडेतोडपणे लिहिणे आणि त्या प्रश्नांना वाचा फोडणे या दृष्टीने कराळे यांनी पत्रकारिता कायम केली. राष्ट्र सेवा दलाचे पहिल्या फळीतील ते कार्यकर्ते होते. राष्ट्र सेवा दलाची शिबिरे भरविणे, त्यासाठी संघटन उभे करणे आणि राष्ट्र सेवा दलामध्ये तरुणांना सहभागी करून घेणे यासाठी त्यांनी कायम अग्रेसर भूमिका घेतली.
कोकणात साने गुरुजींचे स्मारक व्हावे यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले आणि माणगाव वडघर येथे साने गुरुजींचे स्मारक जे उभे राहिले त्याच्या स्थापनेपासून ते त्यांच्या हयातीच्या शेवटपर्यंत ते स्मारकाशी एकनिष्ठ राहून परिश्रमपूर्वक त्यांनी काम केले. काही वर्ष ते साने गुरुजी स्मारकाचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होते तर सध्या ते साने गुरुजी स्मारक अनुवाद सुविधा केंद्राचे संचालक म्हणून काम पाहत होते. त्यांच्या निधनाने एक सेवाभावी बंधुतुल्य कार्यकर्ता आपण गमावला असल्याची प्रतिक्रिया साने गुरुजी स्मारक कमिटीतील त्यांच्या सहकाऱ्यानी व्यक्त केली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.