November 21, 2024
Balanced thinking needed for mind concentration article by Rajendra Ghorpade
Home » मनाच्या स्थिरतेसाठी समभावाचा प्रयत्न
विश्वाचे आर्त

मनाच्या स्थिरतेसाठी समभावाचा प्रयत्न

हा शत्रू, हा मित्र असा भेदभाव नसावा. शत्रूच्या मनातील शत्रुत्व दूर करण्यासाठी आपला प्रयत्न असायला हवा. हा बदल आपण करू शकलो तर आपण आपल्या मनाची स्थिरता सहज हस्तगत करू शकू.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

अरिमित्रीं तैसा । अर्जुना जया भावो ऐसा ।
मानापमानीं सरिसा । होतु जाय ।।201।। ज्ञानेश्वरी अध्याय 12 वा

ओवीचा अर्थ – अर्जुना, ज्या प्रमाणे शत्रूमित्रांच्या ठिकाणी ज्याचा असा भाव आहे व ज्याच्या मनाची स्थिती मानाच्या व अपमानाच्या वेळी सारखीच राहाते.

साधनेसाठी मनाची शांती गरजेची आहे. ती मिळवायची कशी ? त्यासाठी आपले आचरण कसे असायला हवे ? नेमके आपण काय करायला हवे ? याबाबत अनेक उदाहरणे देऊन संत ज्ञानेश्वरांनी मार्गदर्शन केले आहे. आपल्या स्वभावात कसा व कोणता बदल करायला हवा याचाही विचार त्यांनी सांगितला आहे. दिवा प्रकाश देताना आपला परका हा भेदभाव मानत नाही. तो सर्वांना सारखाच प्रकाश देतो. उसाची गोडी चरक्यात घालून रस काढणाऱ्यासाठी व लागवड करणाऱ्या शेतकऱ्यासाठी जशी सारखीच असते. तसा आपला स्वभावही सर्वांच्या ठिकाणी सारखाच असावा.

हा शत्रू, हा मित्र असा भेदभाव नसावा. शत्रूच्या मनातील शत्रुत्व दूर करण्यासाठी आपला प्रयत्न असायला हवा. हा बदल आपण करू शकलो तर आपण आपल्या मनाची स्थिरता सहज हस्तगत करू शकू. मान मिळाला म्हणून हरखून जायचे नाही. किंवा अपमान झाला म्हणून दुःख करत बसायचे नाही. जे काही घडले त्याचा मनावर कोणताही परिणाम होऊ द्यायचा नाही. मान आणि अपमानाच्या दोन्ही प्रसंगात आपल्या मनाचा तोल ढळता कामा नये. असे केले तरच मनाची स्थिरता आपण टिकवू शकू. तसे वागण्याचा आपण प्रयत्न करायला हवा.

सध्या बदलत्या युगात असे वागणे अशक्य वाटते. मित्रापेक्षा शत्रूच अधिक आहेत. या जगामध्ये अशा स्वभावाचा फायदा घेणारेच अनेकजण आहेत. फसवणारे ठग आता जागोजागी पाहायला मिळतात. अशा या ठगांच्या जगात वावरताना आपली फसवणूक होणार. पण आपण फसायचे नाही तर स्वभाव धर्माशी लढायचे हाच विचार घेऊन, तसे आचरण ठेवून प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. खंभीर मनाने परिस्थितीशी सामना करायचा. अशा आचरणाने आपली सहनशीलता वाढून अनेक गोष्टीवर आपण मात करू शकू. अशा आपल्या व्यवहाराने आपल्या आसपासचे मित्रांमध्येही फरक पडू शकतो.

आपल्या अशा वागण्याने त्यांच्यातही बदल घडू शकतो. त्यामुळे आपणास होणारा त्रास कमी होऊ शकतो. अन्याय सहन करण्याची ताकद आपल्यात असेल तर अन्याय करणाराही थकून जाऊ शकतो. मानसाचा स्वभाव बदलण्यासाठी स्वतःमध्ये तसा बदल करावा लागतो. हा बदल करता आला तर आपण मनावर विजय मिळवू शकू. ज्याला मन स्थिरता साधता आली त्याला आत्मज्ञानाची वाट सुकर झाली. यासाठी आपला स्वभाव हा बदलायला हवा. आपण बदललो की समोरचाही आपोआप बदलतो.


।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading