तामिळनाडू मधून गोल बुबुळाच्या पालींच्या दोन नव्या प्रजातींचा शोध
कोल्हापूर – तामिळनाडू राज्यात पसरलेल्या पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावरुन पालींच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लावण्यात ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या संशोधकांना यश आलेले आहे. या संशोधनामधे अक्षय खांडेकर, तेजस ठाकरे आणि ईशान अगरवाल यांचा सहभाग सहभाग आहे.
ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनकडून सुरु असलेल्या भारतीय द्वीपकल्पामधील पालींच्या सर्व्हेक्षणादरम्यान या पाली प्रथमतः आढळून आल्या. नव्याने शोधलेल्या दोन्ही पालींचा समावेश निमास्पिस कुळात करण्यात आलेला आहे. गोल बुबुळे हे निमास्पिस कुळातील पालींचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे . रंग, आकार, मांडीवरील ग्रंथींची संख्या, पाठीवरील ट्युबरकलची रचना आणि जनुकीय संचाच्या वेगळेपणावरुन दोन्ही पाली कुळातील इतरांपासून आणि एकमेकांपासून वेगळ्या ठरतात.
नव्याने शोधलेली ‘निमास्पिस व्हॅनगॉगी’ ही प्रजात तामिळनाडू राज्यातील श्रीविल्लीपुथूर-मेघमलाई व्याघ्र प्रकल्पामधे आढळून आली. निमास्पिस व्हॅनगॉगी या प्रजातीचे नामकरण प्रसिद्ध चित्रकार वॅन गॉग यांच्या नावावरुन केलेले आहे. या पालीच्या अंगावरील रंगसंगती वॅन गॉग यांच्या ‘ द स्टारी नाईट’ या चित्राशी मिळतीजुळती आहे.
‘निमास्पिस सथुरागिरीएन्सिस’ ही प्रजात तामिळनाडूच्या विरुदुनगर जिल्ह्यातील साथुरागिरी पर्वतावर आढळून आली. तिच्या आढळक्षेत्रावरुन तिचे नामकरण निमास्पिस सथुरागिरीएन्सिस असे केले आहे. नव्याने शोध लागलेल्या दोन्ही पाली दिनचर आहेत. छोटे किटक हे त्यांचे प्रमुख खाद्य आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.