July 16, 2024
Discovery of four new species of Pali in the genus Nimaspis
Home » निमास्पिस कुळातील पालींच्या चार नव्या प्रजातींचा शोध
काय चाललयं अवतीभवती

निमास्पिस कुळातील पालींच्या चार नव्या प्रजातींचा शोध

  • निमास्पिस कुळातील पालींच्या चार नव्या प्रजातींचा शोध
  • शिवाजी विद्यापीठात संशोधन
  • आंतरराष्ट्रीय आघाडीच्या झूटॅक्सा शोधपत्रिकेकडून दखल

कोल्हापूर : महाराष्ट्रातील वायव्येकडील घाटामधून निमास्पिस कुळातील पालींच्या चार नव्या प्रजातींचा शोध लावण्यात शिवाजी विद्यापीठ आणि ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनमध्ये कार्यरत संशोधकांना यश आलेले आहे. या संशोधनाची दखल प्राणीशास्त्राच्या क्षेत्रातील आघाडीच्या झूटॅक्सा या शोधपत्रिकेकडून घेण्यात आली असून ऑकलंड (न्यूझिलंड) येथील या शोधपत्रिकेने केवळ या संशोधनाला वाहिलेला ११४ पृष्ठांचा विशेषांक प्रकाशित केला आहे. हा शिवाजी विद्यापीठासह महाराष्ट्रातील युवा संशोधकांचा एक प्रकारे बहुमानच आहे.

हे संशोधन अक्षय खांडेकर या विद्यार्थ्याच्या शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र अधिविभागांतर्गत सुरु असलेल्या पीएचडी संशोधनाचा भाग आहे. डॉ. सुनील गायकवाड त्याचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या बरोबर या संशोधनामध्ये ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनचे संशोधक तेजस ठाकरे, सत्पाल गंगलमाले आणि डॉ. ईशान अगरवाल यांचाही महत्त्वाचा सहभाग आहे. या पाच संशोधकांनी मिळून अ प्रिलिमिनरी टॅक्सॉनॉमिक रिव्हिजन ऑफ दि गिरी क्लेड ऑफ साऊथ एशियन निमास्पिस स्ट्रॉऊच, १८८७ (स्क्वामाटा: गेक्कोनीडे) विथ दि डिस्क्रिप्शन ऑफ फोर न्यू स्पेसीज फ्रॉम साऊथ महाराष्ट्र, इंडिया ((A preliminary taxonomic revision of the girii clade of South Asian Cnemaspis Strauch, 1887 (Squamata: Gekkonidae) with the description of four new species from southern Maharashtra, India) हा ११४ पानांचा प्रदीर्घ शोधनिबंध सादर केला. या संशोधनामध्ये निमास्पिस गिरी गटातील इतर नऊ प्रजातींचे नव्याने वर्णन करून जुन्या शोधनिबंधांमधील विसंगतीही दूर केल्या आहेत.

या संदर्भात डॉ. गायकवाड व खांडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्याने शोध लागलेल्या पालींच्या वैशिष्ट्यपूर्ण गोल बुबुळांवरुन त्यांचा समावेश निमास्पिस या कुळात केलेला आहे. या सर्व प्रजातींचे नामकरण त्या त्या आढळक्षेत्रावरुन केले आहे. ‘निमास्पिस बर्कीएन्सिस’ या प्रजातीचा शोध कोल्हापूरमधील बर्की (शाहूवाडी), वाशी (पन्हाळा) आणि तळये बुद्रुक (गगनबावडा) या ठिकाणी लागला आहे. बर्की राखीव वनक्षेत्रामधील आढळक्षेत्रावरुन तिचे नामकरण ‘निमास्पिस बर्कीएन्सिस’ असे करण्यात आले. ‘निमास्पिस चांदोलीएन्सिस’ ही प्रजाती चांदोली राष्ट्रीय उद्यानामधील चांदेल रेंजमध्ये आढळून आली. चांदोली ‘निमास्पिस महाराष्ट्राएन्सिस’ ही प्रजाती चांदोली राष्ट्रीय उद्यानामधील रुंदीव रेंजमध्ये आढळली, तर ‘निमास्पिस सह्याद्रीएन्सिस’ ही प्रजाती चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या वेत्ती रेंजमध्ये आढळली.

डॉ. सुनील गायकवाड यांनी सांगितले की, निमास्पिस कुळातील पाली त्यांच्या प्रदेशनिष्ठतेसाठी ओळखल्या जातात. त्यांचे आढळक्षेत्र छोट्या भूप्रदेशावर विस्तारलेले असते. थंडाव्याच्या जागांशिवाय त्या तग धरू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचे आढळक्षेत्र मर्यादित अनुकूल जागांपुरतेच सीमित असते. या संशोधन मोहीमांमध्ये नव्याने शोधलेल्या पाली त्यांचे आढळक्षेत्र सोडून अन्यत्र कुठेही आढळल्या नाहीत. शिवाय चांदोली राष्ट्रीय उद्यानामधून शोधलेल्या तीन प्रजाती एकमेकांपासून केवळ ८ ते १२ किलोमीटर अंतरावर आढळल्या. गर्द झाडीच्या जंगलांच्या मध्ये पसरलेल्या उघड्या माळसदृश्य सड्यांनी या प्रजातींचा वावर सीमित केला असावा. अशी टोकाची प्रदेशनिष्ठता हे निमास्पिस कुळातील पालींचे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच या पालींचे आढळक्षेत्र असणारी जंगले संवर्धनाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाची ठरतात. या संशोधनामध्ये महाराष्ट्र वन विभागाने आवश्यक ते परवाने देऊन सहकार्य केले. तसेच, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधील (चांदोली राष्ट्रीय उद्यान) वन अधिकारी आणि कर्मचार्‍यांचीही सर्वेक्षणादरम्यान मोलाची मदत झाली.

अन्नसाखळीत महत्त्वाची भूमिका

मांडीवरील ग्रंथींची संख्या, पाठीवरील ट्युबरकलच्या रांगांची संख्या, शेपटीच्या खालच्या बाजूला असणार्‍या खवल्यांच्या रचना आणि विशिष्ट जनुकीय संचांवरुन या पाली एकमेकांपासून आणि कुळातील इतरांपासून वेगळ्या प्रजातीच्या आहेत, हे स्पष्ट करण्यात यश आले. या चारही पाली दिनचर आहेत. झाडांचे बुंधे आणि दगडांच्या आडोशाने त्या वावरतात. छोटे किटक त्यांचे प्रमुख खाद्य आहे. त्यामुळे या पाली अन्नसाखळीत समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, असे डॉ. गायकवाड यांनी सांगितले.

निमास्पिस गिरी गटाच्या वैशिष्ट्यांची नव्याने मांडणी

संशोधक अक्षय खांडेकर यांनी सांगितले की, यापूर्वी झालेल्या संशोधनांमधून निमास्पिस गिरी गटात महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातून एकूण दहा प्रजाती नोंदवलेल्या होत्या. यापैकी बहुतांश प्रजातींच्या वर्गीकरणामधील विसंगती आणि चुकांमुळे निमास्पिस गिरी गटातील पालींवर नव्याने अभ्यास करणे आव्हानात्मक बनले होते. वेगवेगळ्या प्रजातींमधील बाह्य वैशिष्ट्ये नोंदवण्यासाठी यापूर्वीच्या संशोधकांनी निवडलेल्या अनेक पद्धतींमध्ये सुसूत्रता नसल्याचे आढळून आले. जनुकीय संचामधील वेगळेपणाच्या पुष्टीनंतर संशोधकांकडून बाह्य वैशिष्ट्यांकडे दुर्लक्ष होणे, ही चिंतेची बाब आहे. या विसंगती दूर करण्यासाठी, या संशोधनांतर्गत जुने नमुने तपासण्यात आले; तसेच पूर्वीपासून ज्ञात असलेल्या प्रजातींच्या आढळक्षेत्रामधून नव्याने नमुने गोळा करुन त्यांच्यात स्थिर राहणारी बाह्य वैशिष्ट्ये नव्याने मांडण्यात आली, हे या संशोधनाचे महत्त्वाचे वेगळेपण ठरले.

Cnemaspis barkiensis (निमास्पिस बर्कीएन्सिस)
Cnemaspis barkiensis (निमास्पिस बर्कीएन्सिस)
Cnemaspis chandoliensis (निमास्पिस चांदोलीएन्सिस)
Cnemaspis chandoliensis (निमास्पिस चांदोलीएन्सिस)
Cnemaspis maharashtraensis (निमास्पिस महाराष्ट्राएन्सिस)
Cnemaspis maharashtraensis (निमास्पिस महाराष्ट्राएन्सिस)
Cnemaspis sahyadriensis (निमास्पिस सह्याद्रीएन्सिस)
Cnemaspis sahyadriensis (निमास्पिस सह्याद्रीएन्सिस)

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

World Environment Day : गाडगीळ समिती अहवाल अन् आजच कोकण

डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ रजनीश कामत

कानोसा

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading