November 21, 2024
Ice Capital Greenland International Tourism spot
Home » हिमनगांची जागतिक राजधानी ग्रीनलँड…(व्हिडिओ)
पर्यटन

हिमनगांची जागतिक राजधानी ग्रीनलँड…(व्हिडिओ)

ज्या बेटावर 81 टक्के बर्फाचे साम्राज्य आहे. त्याच नाव चक्क ग्रीन लँड कसं पडलं..? ग्रीनलँडमध्ये फिरण्यासाठी रस्ते नाहीत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश व जयंती प्रधान यांनी तब्बल 12 दिवसांची क्रुझसफर केली. सारेच विस्मयजनक …जाणून घ्या या व्हिडिओमधून…

असे पडले ग्रीनलँड हे नाव

पहिले ग्रीनलॅंडवासी हे सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी उत्तर कॅनडातल्या इलेसमेर बेटावरून उन्हाळ्यात स्थलांतरित झाले असावेत असा एक समज आहे. युरोपवासियांना ग्रीनलॅंडचा पहिला शोध सन ९०० मध्ये लागल्याचं सांगण्यात येतं. ग्रीनलॅंडमध्ये वसाहत कशी तयार झाली याची कहाणी मोठी गमतीदार आहे. एरिक द रेड या नॉर्वेजियन माणसाला व त्याच्या वडिलांना हत्येच्या आरोपावरून हद्दपार करण्यात आलं होतं. एरिक हा उन्हाळ्यात आइसलॅंडच्या वायव्येकडच्या एका फिओर्डच्या ठिकाणी येऊन राहिला व तिथं त्यानं शेती सुरू केली. सन ९८६ मध्ये एरिक आइसलॅंडला आला आणि तो राहत असलेल्या नवीन प्रदेशाची माहिती त्यानं स्थानिक लोकांना दिली. हा प्रदेश अत्यंत श्रीमंत, सुपीक व शेतीच्या उत्पादनासाठी चांगला असल्याचं त्यानं सांगितलं. तो भाग बर्फाळ असला तरी हिरवागार आहे अशी माहिती त्यानं इतरांना सांगायला सुरवात केली. त्यानंतर लोक बोटीतून इथं येऊन राहू लागले. अशा रीतीनं या प्रदेशाचं नाव ‘ग्रीनलॅंड’ असं पडलं.

येथे आहे ग्रीनलँड

ग्रीनलॅंड हे उत्तर अमेरिका व युरोप यांच्यामध्ये असून त्यानं उत्तर अटलांटिक व आर्क्‍टिक महासागराचा बराच भाग व्यापला आहे. हा डेन्मार्क या देशाचा स्वायत्त भाग म्हणून ओळखला जातो. त्याचा कारभार स्वतंत्रपणे चालतो. त्या देशाची स्वतःची संसद आहे. संसदेचे ३१ सदस्य असून, मंत्रिमंडळाचा प्रमुख हा पंतप्रधान असतो. डेन्मार्क हे शेंजेन राष्ट्रात मोडतं; पण ग्रीनलॅंड हे मात्र शेंजेन राष्ट्र नाही. सन १९८५ मध्ये ते युरोपीय आर्थिक समूहातून बाहेर पडलं. सुमारे १६ हजार लोकसंख्येचं ‘नूक’ हे राजधानीचं शहर आहे.

रस्ते नसणारा प्रदेश

त्याखालोखाल ‘सिसिमुट’ या दुसऱ्या क्रमांकाच्या गावात ५२००, तर इल्युलिसाटमध्ये या गावात पाच हजारांची वस्ती आहे. डॅनिश क्रॉना हे स्थानिक चलन असून, साधारणतः एक युरोला ७.५ ते ८ क्रोना असं प्रमाण धरायला हरकत नाही. ग्रीनलॅंडमध्ये फिरण्यासाठी रस्ते नाहीत. काही भागांत विमानानं जाता येतं; पण जास्तीत जास्त ग्रीनलॅंड बघायचं असेल तर क्रूझ हाच एकमेव मार्ग आहे. जगातल्या काही नामांकित कंपन्यांच्या क्रूझ-सफारी इथं असतात. आम्ही ‘हुर्टिग्रुटेन’ (Hurtigruten) कंपनीच्या ‘एमएस फ्रॅम’ या क्रूझमधून ग्रीनलॅंडच्या दक्षिण, वायव्य भागांतून सुमारे २१०० नॉटिकल मैल्स म्हणजे ३८०० किलोमीटरचा प्रवास केला. आमचा पहिला प्रवास ग्रीनलॅंडच्या वायव्येकडच्या सिसिमुट, इल्युलिसाट, इटिलेक या आर्क्‍टिक प्रदेशांतल्या गावांमधून होता. हा भाग मध्यरात्रीचा सूर्य, बर्फावरून गाड्या ओढणाऱ्या कुत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे. जुलै महिन्यातही इथलं तापमान ४-५ डिग्री सेंटिग्रेडपर्यंत असतं व हिवाळ्यात ते सतत उणे ८ ते उणे १० डिग्रीच्या टप्प्यात असतं. ही सगळी गावं खूप विखुरलेली असून वस्ती अगदी कमी आहे. डोंगर-उतारांवर छोटी छोटी रंगीबेरंगी घरं आणि समोर रानटी; पण लक्ष वेधून घेणारी पांढरी, पिवळी फुलं हे इथलं मुख्य आकर्षण. गावांची, घरांची रचना जवळजवळ एकसारखीच. जी निरनिराळ्या रंगांची घरं दिसतात त्यामागं इतिहास आहे. वसाहतींच्या काळात घरांच्या प्रत्येक रंगाला निरनिराळा अर्थ होता. उदाहरणार्थ : पिवळा रंग म्हणजे रुग्णालय, हिरवा रंग म्हणजे दळणवळणाचं केंद्र, निळा रंग म्हणजे पाणीपुरवठा केंद्र इत्यादी. इमारतींच्या रंगांवरून ती इमारत कसली आहे हे ओळखता येत असे. पुढच्या काळातल्या लोकांनीही रंगांमुळे घरं सुंदर दिसतात म्हणून ही प्रथा सुरू ठेवली.

माजी पंतप्रधान चालवतात दुकान

ग्रीनलॅंडमध्ये मंगोलियन पद्धतीच्या चपट्या नाकाच्या लोकांची वसाहत दिसून येते. इथं पर्यटन लोकप्रिय होत असलं तरी मासेमारी हाच उदरनिर्वाहाचा मुख्य व्यवसाय. सॅलमन, कॉड, ट्रॉऊट अशा माशांची शिकार करून त्यांवर प्रक्रिया करून त्यांची युरोप आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्यात होते, तसंच उन्हाळ्यात हे मासे कापून सुकवले जातात व हिवाळ्यात खाल्ले जातात. थंडीतही सील व व्हेल माशांची शिकार केली जाते. ग्रीनलॅंडमध्ये अगदी लहान लहान वस्त्यांची गावं, खूप विखुरलेली म्हणजे १००-१५० मैलांवर दिसून येतात. एकमेकांचा संपर्क केवळ बोटीनं. प्रत्येक गावात एक प्राथमिक शाळा असते व सर्व शिक्षण मोफत देण्यात येतं; पण महाविद्यालयीन शिक्षणासाठी नूक, इल्युलिसाट, सिसिमुट या गावांमध्ये जावं लागतं. नशीब अजमावायचं असेल तर कोपनहेगनशिवाय पर्याय नाही. मुला-मुलींनी शिक्षण घ्यावं म्हणून खूप प्रोत्साहन दिलं जातं; पण पुरुषवर्ग शिक्षणासाठी तेवढा उत्सुक नसतो. महिला मात्र चांगलं शिक्षण घेतात. अनेक क्षेत्रांत त्या आघाडीवर दिसून येतात. पंतप्रधानपदापर्यंतही महिला पोचल्याची उदाहरणं आहेत. इटिलेक इथल्या एका छोट्याशा दुकानात काही खरेदी करण्यासाठी आम्ही गेलो. आमची स्थानिक गाईड इड्डा हीसुद्धा बरोबर होती. ती आम्हाला त्या दुकानाच्या कॅश काउंटरवर बसलेल्या व्यवस्थापकाकडं घेऊन गेली. ‘हे आमच्या देशाचे माजी पंतप्रधान’ अशी त्यांची ओळख तिनं आम्हाला करून दिली. अत्यंत साध्या वेशातली आणि विनम्र अशी ती व्यक्ती त्या साध्याशा दुकानात काम करत होती.

ग्रीनलँडची जीवन पद्धती

ग्रीनलॅंडच्या काही छोट्या छोट्या गावांतल्या ग्रीनलॅंडवासियांशी प्रत्यक्ष गप्पा मारण्याची संधी मिळाली. सिसिमुट इथं एक कुटुंब चर्चमध्ये लहान बाळाच्या नामकरण समारंभाला त्यांचा पारंपरिक पोषाख घालून आलं होतं. पुरुषांचा जो अंगरखा असतो त्याला ‘अनोराक’ म्हणतात आणि पॅंट काळ्या रंगाची असते. स्त्रियांचा पोशाखही खूप आकर्षक असतो. ‘कलालू सूट’ असं त्याला म्हणतात. त्यांच्या पायात विशिष्ट प्रकारचे शूज असतात. ते सील माशाच्या कातडीपासून तयार केले जातात. इटिलेक या गावाची वस्ती जेमतेम दीडशे. आमच्यासाठी एका स्थानिक कुटुंबात कॉफीपानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यामुळे ग्रामीण जीवन पाहता आलं. आपल्या इथल्याप्रमाणेच ग्रामीण ग्रीनलॅंडवासियांच्या घरात प्रवेश करताना पायांतले बूट, चपला घराबाहेर काढून ठेवाव्या लागतात. तिथं घराबाहेरच्या व्हरांड्यात बुटांचं शेल्फ होतं व तिथं राहणाऱ्यांचे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा अशा तिन्ही ऋतूंसाठीचे निरनिराळे शूज त्यात ठेवण्यात आलेले होते. केक, चहा-कॉफी देऊन त्या कुटुंबानं आमचं स्वागत केलं. ग्रीनलॅंडिक व डॅनिश ही त्यांची स्थानिक भाषा. घरातल्या सगळ्यांना इंग्लिश येत नव्हतं, समजत नव्हतं. मात्र, डॉक्‍टरकीचं शिक्षण घेत असलेली मोठी मुलगी इंग्लिशमध्ये चांगला संवाद साधत होती.

शिक्षण, औषध, वैद्यकीय सेवा मोफत

ग्रीनलॅंडमध्ये कमालीची महागाई आहे. ग्रामीण भागात सरासरी वार्षिक उत्पन्न ९० हजार डॅनिश क्रोनरपर्यंत असतं; पण शहरात हेच साडेतीन लाख क्रोनरपर्यंत जातं. जिला जीवनात फारशी महत्त्वाकांक्षा नाही अशी व्यक्ती खेड्यातच राहते व काही ध्येय साध्य करायची इच्छा असेल तर नूक किंवा कोपनहेगनखेरीज पर्याय नसतो. मात्र, इथं राहणारा माणूसही पूर्णतः समाधानी वाटला. ग्रीनलॅंडमध्ये गावांना जोडणारे रस्ते अजिबात नाहीत. वाहतुकीचं एकमेव साधन म्हणजे बोट. त्यामुळे प्रत्येकाकडं बोट ही हवीच! इथं उत्पन्नावर सरसकट ४६ टक्के करआकारणी केली जाते म्हणजे प्रत्येकाचा निम्मा पगार कर भरण्यात जातो. मात्र, सर्व शिक्षण, औषध, वैद्यकीय सेवा, मोठ्या शस्त्रक्रिया सारं काही पूर्णतः मोफत आहे. गावात छोटा दवाखाना व त्यात शिक्षित नर्स किंवा डॉक्‍टर असतो. आजार गंभीर स्वरूपाचा असेल तर शहरातल्या रुग्णालयात बोटीनं किंवा अगदी हेलिकॉप्टरनं त्वरित हलवलं जातं. त्यासाठी गरीब व्यक्तीलाही पैसे मोजावे लागत नाहीत. अगदी कोपनहेगनला नेऊन मोठी शस्त्रक्रिया करावी लागली तरी ती मोफत असते व त्यात कोणताही भेदभाव केला जात नाही हे उल्लेखनीय. सरकारकडून वृद्धांची चांगली काळजी घेण्यात येते. त्यामुळे कर भरताना सर्वसामान्यांचीही काही कुरकूर नसते.

हिमनगांचे गाव इल्युलिसाट

ग्रीनलॅंडमधलं तिसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक लोकसंख्येचं गाव म्हणजे ‘इल्युलिसाट’. ग्रीनलॅंडिक भाषेत हिमनगांना ‘इल्युलिसाट’ असं म्हटलं जातं; त्यामुळे या शहराचं नावच इल्युलिसाट असं आहे. हे संपूर्ण शहर अजस्र अशा हिमनगांनीच घेरलेलं आहे ! त्याच्या सभोवतालच्या अनेक मैलांचा परिसर या हिमनगांनी व्यापलेला आहे. जिथपर्यंत दृष्टी जाईल तिथपर्यंत उंचच उंच असे लांबवर पसरलेले हिमनग दृष्टीस पडतात. त्यामुळे इल्युलिसाटला ‘हिमनगांची जागतिक राजधानी’च मानण्यात येतं. ‘युनेस्को’नं सन २००४ मध्ये ही ‘वर्ल्ड हेरिटेज साईट’ म्हणून घोषित केली आहे. आम्ही अगदी छोट्या बोटीतून या हिमनगांच्या जवळून, बाजूनं, मधून मनसोक्त प्रवास केला. जागतिक हवामानात जे बदल होत आहेत त्याचे गंभीर परिणाम इल्युलिसाट इथल्या हिमनगांमध्येही आढळून येतात. मोठ्या प्रमाणात वितळत असलेले हिमनग हे त्याचं उत्तम उदाहरण. या भागातले ग्लेशियर्स हे काही वर्षांत सहा मैलांनी (दहा किलोमीटर) आक्रसले. आर्क्‍टिक सर्कलमधल्या हवामानाबाबतचा एक विस्तृत अहवाल २५० शास्त्रज्ञांनी तयार केला आहे. या शतकाच्या आत उन्हाळ्यामध्ये आर्क्‍टिक सर्कलमधलं बर्फ संपूर्णतः वितळेल आणि त्याचे गंभीर परिणाम पाण्यातले प्राणी, मासे, जीव, वनस्पती यांच्यावर होऊ शकतील असं या अहवालात नमूद आहे. या हिमनगांच्या वितळण्यामुळे जगातल्या समुद्राच्या पाण्याच्या पातळीत निदान २० फुटांची वाढ अपेक्षित आहे. ग्लेशियर्स, हिमनग निसर्गाच्या दृष्टीनं अत्यंत उपयुक्त आहेत; पण ते धोकादायकही ठरू शकतात.

२४ तासांचा उजेड

आता आमची क्रूझ आर्क्‍टिक सर्कलमधून बाहेर पडून दक्षिण ग्रीनलॅंडच्या दिशेनं निघाली. याची पहिली जाणीव झाली ती म्हणजे रोजच्या कार्यक्रमपत्रिकेत सूर्योदय-सूर्यास्ताच्या वेळा देण्यात येऊ लागल्या. ग्रीनलॅंडमधला इल्युलिसाट, कांगारलुसाक, सिसिमुट, इटिलेक आदी भाग आर्क्‍टिक सर्कलमध्ये मोडतो. त्यामुळे तिथं जून – जुलै महिन्यात सूर्य उगवत नाही, मावळत नाही. २४ तासांचा उजेड असतो; पण ग्रीनलॅंडची राजधानी नूक इथं सूर्योदय पहाटे तीन वाजून सहा मिनिटांनी व सूर्यास्त रात्री ११ वाजून ४७ मिनिटांनी होतो! नूक हे १६ हजार लोकवस्तीचं ठिकाण. ग्रीनलॅंडचं राजकीय व सामाजिक घडामोडीचं मुख्य केंद्र. नूक याचा अर्थ द्वीपकल्प. म्हणजे ज्याच्या जवळजवळ सर्व बाजूंनी पाणी आहे असा भाग. या शहराची रचनासुद्धा अगदी अशीच आहे असं म्हणावं लागेल. या शहरात नव्या-जुन्या संस्कृतींचा संगम पाहायला मिळतो. जणू चित्रातल्या वाटाव्यात अशा रंगीबेरंगी प्राचीन आणि आधुनिक इमारतीही इथं दिसतात. शासकीय इमारतींवर ग्रीनलॅंडचा ध्वज फडकताना दिसला. स्थानिक कलाकारानं त्याचं डिझाईन तयार केलं असून सूर्य, सागर, बर्फ आणि हिमनग यांचं प्रतिनिधित्व त्या ध्वजात चित्रित आहे. नूकमधल्या रंगीबेरंगी घरांचं दृश्य मोठं मस्त दिसतं. इथंही समुद्रात अनेक छोटे-मोठे हिमनग वाहत होते. दुपारनंतर ओहोटी होती तेव्हा दोन हिमनग चक्क किनाऱ्याला लागले. साधारणतः सहा फूट उंच व तेवढ्याच रुंदीचा तो हिमनग अगदी पांढराशुभ्र होता. हात लावून बघितला तर हिमनग अक्षरशः दगडासारखा घट्ट व धारदार होता. काही वेळा याच्यापेक्षा मोठेही हिमनग किनाऱ्याला लागतात असं स्थानिक नागरिकांनी सांगितलं.

ग्रीनलॅंड ईशान्य नॅशनल पार्क

‘ग्रीनलॅंड ईशान्य नॅशनल पार्क’ हे जगातलं सगळ्यात मोठं पार्क म्हणून ओळखलं जातं. ते उत्तर ध्रुवाच्या बरंच जवळ आहे. ९ लाख ७२ हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचं हे पार्क म्हणजे बर्फ, ग्लेशियर्स, फिओर्ड् स यांचं साम्राज्य म्हणावं लागेल. उन्हाळ्याच्या अगदी थोड्या कालावधीत इथं जाता येतं. भौगोलिकदृष्ट्या उत्तर अमेरिका खंडात; पण राजकीयदृष्ट्या युरोपमध्ये येणारं ‘ग्रीनलॅंड’ हे जगातल्या पर्यटकांचं एक मोठं आकर्षण ठरत आहे. ग्रीनलॅंड विकत घेण्यामागं अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची बरीच उद्दिष्टं असतील. ती असोत. मात्र, भारतीय पर्यटकांनी या सर्वांगसुंदर आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या बेटाकडं पर्यटनस्थळ म्हणून पाहत एकदा तरी त्याचं पर्यटन करायलाच हवं !


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading