मागणी प्रमाणे चालत राहिलात तर त्यांना पैसा मिळेल पण तुम्ही समाज व राष्ट्र निर्मितीचे काम नाही करू शकणार..मग शाळा हे पवित्र मंदीर नाही तर केवळ दुकान ठरेल. शिक्षक हेही दुकानदार ठरतील. जगाच्या पाठीवर कोण्या दुकानदाराला मिळणारी प्रतिष्ठा ही कधीच राष्ट्र निर्मित्या एवढी नसते हे लक्षात घ्यायला हवे.
संदीप वाकचौरे
मागील महिना पूर्ण गाजला आणि माध्यमात चर्चेत राहिला तो नीट परीक्षेतील गैरप्रकार आणि पूजा खेडकर प्रकरणाने. माध्यमांनी अगदी प्राईम टाईम त्यासाठी खर्ची घातला. एका अर्थाने माध्यमांनी इतका वेळ त्यावर खर्च केला आहे याचा अर्थ हे प्रकरण अधिक गंभीर आहे हे अगदी खरेच. साधारण आपल्याकडे दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या की, परीक्षांमधील गैरप्रकारांचे प्रदर्शन माध्यमांवर दिसू लागते. त्या काळात थोडेफार दूरदर्शनवर आणि वर्तमानपत्रांमध्ये क़ॉपी पुरवणारी व्यवस्था, पालकांची असणारी धडपड हे घडताना दिसते.
अर्थात अलिकडच्या कालखंडात काही परीक्षांमध्ये गैरप्रकार घडणार हे जणू समाजाने मान्य केले आहे असेच चित्र आहे. मात्र जेव्हा विशिष्ट स्वरूपाच्या परीक्षा घेणारी व्यवस्था, नियुक्ती देणारे व्यवस्थापन यांचा जेव्हा समाजमन विचार करतो तेव्हा त्यांच्या बाबतीत एकदम खात्री असते की, येथे तसे काही घडू शकणार नाही. जेव्हा नीटमध्ये देखील गैरप्रकार पुढे आले तेव्हा अनेक भोळ्या भाबड्या आणि व्यवस्थेवर विश्वास ठेऊन असलेल्या सामान्यांना धक्का बसला. तो धक्का सहन होत नाही तोच भारतीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी म्हणून दाखल झालेल्या पूजा खेडकर यांच्या विषयीच्या बातम्या येऊन धडकल्या..आणि आता जणू सारेच क्षेत्र भ्रष्टाचाराने बरबटले आहे असेच वाटू लागले.
ही परीक्षा व्यवस्था अत्यंत कठोर, अगदी कडक आणि अत्यंत प्रामाणिकतेने घेतली जाणारी व्यवस्था असते असे मानले जात होते. त्या व्यवस्थेच्या प्रक्रियेबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले..मात्र या साऱ्या प्रकाराने धक्का बसला हे मात्र खरे..आपल्याला या व्यवस्था अधिक पारदर्शक करायला हव्यात असे वाटणे अपेक्षित आहे. मात्र त्यासाठी उपाय काय तर कायदा करणे, प्रभावी आणि अधिक कडक अंमलबजावणी करणे अशी प्रतिक्रिया उमटली. केंद्र आणि राज्य सरकारने कायदे देखील केले. त्यात शिक्षेच्या गंभीर मानल्या जाणाऱ्या तरतूदी देखील केल्या. मात्र कायदे करून सर्व प्रश्न सुटतील असे वाटणे हे भाबडेपणाचे लक्षण आहे. देशात आज आस्तित्वात असलेले हजारो कायदे, नियम आहेत म्हणून काही देशातील गुन्हेगारी संपली असे होत नाही हे आपण अनुभवत आहोत.
प्रश्न कायदे करून सुटले तरी तो मार्ग कदाचित व्यवस्था बदलाचा ठरेल मात्र तो परीवर्तनाचा निश्चित नाही हे लक्षात घ्यायला हवे. शेवटी आपल्याला या सर्वांवर मात करायची असेल तर समाजाची आणि अगदी माणसांच्या मानसिक परीवर्तनाची वाट चालण्याची निंतात गरज आहे. त्याशिवाय आपल्याला भविष्यच असणार नाही. व्यवस्थेत आपण जोवर माणूस घडवण्याच्या दिशेने पावले टाकत नाही तोवर ही व्यवस्था अशीच चालत राहणार यात शंका नाही.
मुळात आपल्याकडे शिक्षण व्यवस्थेचा विचार केवळ गुणवत्तेच्या अंगाने केला जात आहे. अर्थात गुणवत्ता म्हणजे समग्र विकास असे अर्थ अपेक्षित आहे. मात्र सध्या गुणवत्तेच्या व्य़ाख्या सातत्याने बदलत आहे. केवळ बौध्दिक विकास म्हणजे गुणवत्ता असे मानले जात आहे. ती गुणवत्ता आपल्याला जाणून घ्यायची असेल तर विवेक आणि शहाणपणाच्या दिशेचा प्रवास अपेक्षित आहे. आपल्या शिक्षणातून विवेक आणि शहाणपणाची वाट हरवत चालली आहे का ? असा प्रश्न पडावा अशीच वर्तमानाची परीस्थिती आहे. आज सारीच व्यवस्था केवळ परीक्षेतील मार्कासाठी काम करत आहे.आपल्या शिक्षणात माणूस घडविण्याचा, विवेक आणि शहाणपण पेरण्याचा विचार कोठेच प्रतिबिंबीत होताना दिसत नाही. त्यामुळेच आपल्या समाजातील प्रश्न आहेत.मुळात समाजात दिसणारे प्रश्न सोडवायचे असतील तर शिक्षण हाच पर्याय जग स्वीकारत असते. शिक्षण हेच समस्या निराकरणाचे एकमेव साधन आहे. समाजात समस्या आहेत आणि शाळा, महाविद्यालय देखील आस्तित्वात आहेत याचा अर्थ समाजात शिक्षणाची होणारी पेरणी परिणामकारक नाही हे लक्षात येईल. त्यामुळे शिक्षणातून काही पेरायचे राहून गेले आहे का ? असा प्रश्न पडावा अशी परीस्थिती आहे.
गेले काही वर्षात शिक्षणात गैरप्रकार वाढता आहेत हे मान्य करावे लागेल मात्र त्यामागे दुर्दैवाने शिक्षणात काम करणारी माणसं सक्रीय आहेत. नीटच्या परीक्षेत संशयीत म्हणून ज्यांना अटक करण्यात आली त्यात शिक्षकांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. दहावी, बारावीच्या परीक्षेच्या गैरप्रकारातही शिक्षक, स्थानिक व्यवस्थापन, शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे मनुष्यबळ कार्यरत असल्याचे चित्र आहे. याचा अर्थ कुंपनच शेत खाऊ लागले आहे. गुजरातमध्ये नीटच्या परीक्षा केंद्रावरील संबंधित संस्थेचे व्यवस्थापन परीक्षेत कॉपी प्रकारासाठी प्रोत्साहन देत होते. अर्थात हे काही फुकट घडत नव्हते तर त्यासाठी विद्यार्थ्यांकडून लाखो रूपये घेतले जात होते. हे सारे प्रकार पैशासाठीच घडता आहेत यात शंका नाही. पैसा हे जीवनाचे सर्वस्व आहे. शिक्षण ज्ञानाच्या वाटेने जाण्याऐवजी पोटार्थी दिशेचा प्रवास करू लागले आहे. त्यामुळे त्या शिक्षणातून जी पेरणी होणार तेच उगवणार आहे हे नैसर्गिक सत्य आहे.
आपल्याकडे शिक्षक भरती करताना देखील पैसा हेच सर्वस्व बनत असेल तर पैसे ओतून नोकरीत आलेले शिक्षक त्याच दिशेने आपला प्रवास घडवणार हे साहजिक आहे. शिक्षक गुणवत्तेवर भरायला हवीत मात्र गुणवत्ता म्हणजे पदवी, पदविकांचे मार्क नाही याचाही विचार करायला हवा. मात्र त्यापलिकडे शिक्षक म्हणून आवश्यक असणाऱ्या गुणांचा विचार करायला हवा. कधी काळी शिक्षक निवडताना व्यवस्थापन त्या पलिकडचा विचार करत होते. महान शास्त्रज्ञ सर सी. व्ही. रामन यांनी बंगलोरला संस्था काढली. त्या शाळेसाठी त्यांना शिक्षकांची भरती करायवयाची होती. अनेक उमेदवार मुलाखतीसाठी दाखल झाले होते. त्यांच्या मुलाखती सुरू होत्या. एका उमेदवारीची मुलाखत सी. व्ही. रामन यांनी घेतली आणि त्यांनी मुलाखत होताच त्याला सांगितले, की तुम्ही काही आमच्या गुणवत्तेच्या निकषाला पात्र ठरलेले नाही आहात. तेव्हा आम्ही तुमची निवड करू शकणार नाही.
त्यानंतर पुढे पुढील उमेदवाराच्या मुलाखती सुरूच होत्या. अर्थात संबंधित उमेदवाराच्या मुलाखती नंतर बराच वेळ इतर मुलाखती सुरू राहिल्या होत्या. दरम्यान त्यानंतर सी. व्ही. रामन मुलाखतीच्या कक्षातून बाहेर पडले. बाहेर पडताच त्यांना समोर ज्या उमेदवाराला नकार दिला होता तो उमेदवार त्यांना दिसला. मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांना प्रवासाचे पैसे वाटले जात होते.त्या पैसे वाटणाऱ्या कारकूनाजवळ तो उमदेवार उभा होता. त्याला पाहताच रामन यांना राग आला.
ते त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले, तुम्हाला मी सांगितले होते, की तुमची निवड आमच्या निकषानुसार झालेली नाही. मग तुम्ही का थांबलात इथे ? तो म्हणाला, “सर, मी तुमच्या गुणवत्तेच्या निकषाला उतरलो नाही, याची मला कल्पना आहे; पण हा माणूस प्रवास खर्चाच्या पैशाचे वितरण करतो आहे. माझ्या प्रवासाचे त्यांनी मला जे पैसे दिले आहेत ते पैसे माझ्या झालेल्या प्रवास खर्चापेक्षा अधिक आहेत. ते परत देण्यासाठी मी थांबलो आहे. यांना वेळ झाला, की पैसे परत देऊन मी जाणार आहे.”
रामन त्याचे उदगार ऐकताच क्षणभर थांबले आणि म्हणाले, “आत चल.” असे म्हणताच तो उमदेवार देखील घाबरला. अगोदरच एवढे बोलले आहे आता आत जाऊन काय घडणार आहे ? याची त्याला चिंता लागून होती. आत गेल्यावर रामन यांनी विचारले, ‘कधीपासून कामावर रुजू होऊ शकतोस ?’ त्याला कळेना, हा बदल काय आहे ? त्याने विचारले, ‘ अगोदर तर तुम्ही ओरडलात, हाकलून दिलेत, नाही घेणार म्हणून सांगितलेत आणि आता विचारत आहात, रुजू कधीपासून होशील ? असे काय झाले ?’ मोठी माणसे आपला विचार, आपले वागणेही कशी तपासून पाहत असतात.त्याची किती निर्मळपणाने, प्रांजळपणाने कबुली देत असतात, ते पाहणे महत्त्वाचे.
रामन म्हणाले, ” अगोदर मी तुला ज्ञानामधील उणिवेमुळे नाकारले होते. आता मी तुला घेतो आहे, तो तुझ्या चारित्र्यात समृद्धीसाठी घेतो आहे!” ही चारित्र्यसमृद्धी साधण्यासाठी शिक्षणाचा उपयोग केला गेला पाहिजे.असा विचार केला गेला तर स्वतःची समृधद् वाट सापडेलच पण त्याबरोबर अशा माणसांमुळे समाज अधिक समृध्द होण्यास मदत होईल. शिक्षक भरती करताना किती उंचीचा आणि मूल्यांचा विचार केला जात होता यासाठी हे उदाहरण पुरेसे आहे.
अशी माणसं शिक्षणाच्या क्षेत्रात आली तर देशाचे भविष्य निश्चित उज्ज्वल असणार यात शंका नाही. मात्र मुळात आज ज्ञान, मूल्य यांच्यापेक्षा मार्कच अधिक भाव खाता आहेत. शिक्षणातून एकवेळ आपला पाल्य नाही घडला तरी चालेल पण त्याला अधिक मार्क मिळायला हवे ही जाणीव त्यांना करून दिली जाते आहे. शिक्षणातून फक्त नोकरी मिळायला हवी. त्या पलिकडे फारशा अपेक्षा पालकांच्या नाहीत. शिक्षण आणि नोकरी, उदरनिर्वाह एवढाच संदर्भ वर्तमानात उरला आहे. फारच थोड्यांना यापेक्षा अधिक काही हवे असते. पण ते वेगळे तरी काय असते ? तर केवळ प्रतिष्ठा हवी असते. अनेकाना शिक्षण घेतल्यानंतर आपले मुलांनी श्रीमंत बनावे असे वाटत असते. मात्र त्याचवेळी आपल्या मुलांनी श्रीमंत व्हावे पण ते पैशाने नव्हे तर ज्ञानाने. त्यांनी माणूस व्हावे.समाजातील वेदना, दुःख कमी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे.
आपल्या ज्ञानाच्या जोरावरती राष्ट्र प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्यास सक्रियता दर्शवावी. यासाठी त्यांनी आपले ज्ञान कामी आणावे अशाही जाणीवा असलेले काही पालक भोवतालमध्ये आहेत. आपल्या मुलांनी ज्या क्षेत्रात पदार्पण केले त्या क्षेत्रात अत्यंत प्रामाणिकपणे काम करावे असे वाटणे महत्वाचे असते, पण अशा पालकांची संख्या कमी होत चालली आहे.
अब्राहम लिंकनचे हेडमास्तरस पत्र वाचले, की पालक म्हणून त्यांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्या शिक्षणातून रूजविणे ही काळाची गरज बनली आहे. शिक्षणातून त्या अपेक्षांची पूर्ती करणाऱ्या विचाराची पेरणी होण्याची गरज आहे. समाजात सगळीच माणसं न्यायप्रिय नसतात, नसतात सगळी सत्यनिष्ठ, हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी, मात्र त्याला हे देखील शिकवा जगात प्रत्येक बदमाशा गणिक असतो एक साधू चरित्र पुरूषोत्तमही..स्वार्थी राजकारण्याबरोबरही समर्पित नेतेही असतात. आणि….सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत. तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा घाम गाळून कमावलेला एकच छदाम आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यमान आहे.हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला.
तुमच्यात शक्ती असेल तर त्याला व्देष, मत्सरा पासून दूर रहायला शिकवा. शिकवा त्याला आपला धर्म संयमाने व्यक्त करायला. गुंडाना भीत जाऊ नको म्हणाव. त्यांना नमवन सर्वात सोप असतं. जमेल तेवढे दाखवित चला त्याला ग्रंथ भांडार. याच अदभूत वैभव मात्र त्याबरोबरच मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा.सृष्टीचे शाश्वत सौंदर्य अनुभवायला…कधी विक्रय करू नये हृदयाचा आणि आत्म्याचा. धिक्कार करणाऱ्याच्या झुंडी आल्यावर कानाडोळा करायला शिकवा त्याला. आणि ठसवा त्याच्या मनावर जे सत्य आणि न्याय वाटते. त्याच्यासाठी पाय रोवून लढत राहा. अस बरच काही लिंकन मुख्याध्यापकांना लिहिलेल्या पत्रातून अपेक्षित करीत आहेत. हे पत्र म्हणजे शिक्षणाची वाट दर्शित करणारा विचार आहे. या पत्राचा अत्यंत गंभीर विचार करण्याची निंतात गरज आहे. वर्तमानातील पालकांनी आणि शाळांनी याचा अर्थ समजून आपला प्रवास आपण सुरू केला तर बरेच काही हाती लागण्याची शक्यता आहे.
पत्रात ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्या पलिकडे शिक्षणातून दुसरे काही संस्कार होण्याची गरज नाही. कारण हा सारा प्रवास माणूस निर्मितीचा आहे. हे सारे शिक्षणातून अपेक्षित करण्याची गरज वर्तमानातही पालकांनी व्यक्त करायला हवी. शिक्षण संस्थानी या मागण्याची पूर्तता करण्यासाठी वाट निर्माण करण्याची गरज आहे. हे मागणे आपण पूर्ण करू शकलो तर समाज व राष्ट्राचे भले होईहे. आपण केवळ नोकरीपुरता विचार करून शिक्षण संस्थाकडून मागणी करू लागलो तर केवळ गर्दी उभी ठाकली जाईल. त्या गर्दीत समाज कसा निर्माण होणार ? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. त्यामुळे पालकांचे वर्तमानातील मागणे फारसे नाही, त्यांना भविष्याची उदरनिर्वाहाची वाट जगण्यापुरती हवी आहे. मात्र शिक्षण संस्थानी पोटाच्या विचाराच्या पलिकडे जाऊन विचार करण्याची गरज आहे.आपण त्या वाटा निर्माण करू शकलो नाही तर त्यांचे मोल कधीच समाज व राजकर्त्यांच्या मनावर राज्य करू शकणार नाही. राज्यकर्त्यांना देखील त्या संस्थाचा मोल जाणता येणार नाही. मागणी प्रमाणे चालत राहिलात तर त्यांना पैसा मिळेल पण तुम्ही समाज व राष्ट्र निर्मितीचे काम नाही करू शकणार..मग शाळा हे पवित्र मंदीर नाही तर केवळ दुकान ठरेल. शिक्षक हेही दुकानदार ठरतील. जगाच्या पाठीवर कोण्या दुकानदाराला मिळणारी प्रतिष्ठा ही कधीच राष्ट्र निर्मित्या एवढी नसते हे लक्षात घ्यायला हवे. आपल्याला प्रतिष्ठा हवी असेल तर आपणच त्या दिशेने प्रवास करायला हवा. त्यासाठी शिक्षणाच्या प्रवासाची दिशा बदलण्याची गरज आहे.
शिक्षक हा विचाराच्या दिशेने आणि विवेकाने चालणारा माणूस आहे. तो इतरांच्यापेक्षा वेगळा आहे तो यामुळेच. आपले सत्व आणि तत्व जपले तर हरवलेली प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त करणे शक्य आहे. आज हे आपण गमावल्यानेच पूजा खेडकरांसारखी प्रकरणे बाहेर येता आहेत. आपल्याला पैसा हवा आहे. त्याकरीता चांगला पैसा मिळून देणा-या नोकऱ्या हव्या आहेत. त्या मिळाव्यात म्हणून आपण हवे ते करण्यास तयार आहोत. ते करताना आपल्याला आपण शिक्षित आहोत ही जाणीव देखील होईनाशी झाली आहे. त्यामुळेच या वाटा धुंडाळळ्या जाता आहेत. पालकही त्यांना आधार देता आहेत. आपण हे करताना मुलांचे भविष्य अंधारमय करत आहोत हे देखील विसरत चाललो आहोत.
पालकांना अनेकदा आपली मुले सुखी व्हावीत असे वाटते, त्यात काही चुकीचे नाही. पण ह्या अंधुक इच्छेच्या पलीकडे जाऊन फारच थोडे पालक त्यांच्या सर्वांगीण विकासाची काळजी घेत अपेक्षा ठेवतात. बालकांच्या विकासात शिक्षणाचे मोल अनन्यसाधारण आहे. मात्र शिक्षणाची असणारी शक्ती अनेकाना ज्ञात नाही. शिक्षणाचा उददेश अनेकाना माहीत नाही. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा आपल्या मुलाची नोकरी, व्यवसाय यशस्वी व्हावा हीच बहुसंख्या पालकांची इच्छा असते.
ज्ञानसंपादनासाठी शिक्षणाच्या दरवाजे देखील किलकिल करत नाही हे वास्तव लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे शिक्षण प्रक्रियेत पुस्तक हे फार महत्वाचे साधन ठरते आहे. पुस्तकांबरोबरच स्मरणशक्तीची जोपासना येते व पाठीशी खऱ्या अभिजात विचारांचा आशय नसलेली पोपटपंची येते. हा प्रवास करण्यात अनेक पालकांना धन्यता वाटते. शाळांना हा मार्ग अधिक सुलभ वाटतो. अर्थात सुलभ आहे पण तो जीवन वाटचालीसाठी निश्चित दिशादर्शक नाही हे ही लक्षात घ्यायला हवे. शिक्षणातून समग्र विकासाची प्रक्रिया घडवून माणूस उभा करण्याचे आव्हान शिक्षणाने पेलण्याची गरज आहे. शिक्षणातून व्यवसायिक शक्ती यायला हवी, पण त्या पलिकडे विवेक निर्माण करण्याचेही आव्हान आहे. त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत आज योग्य दिशेने प्रवास घडत नसेल तर आपल्याला उद्याचे भविष्य देखील अंधाराच्या घट्ट काळोखातच शोधावे लागेल. शिक्षणाच्या प्रक्रियेत महत्वपूर्ण भूमिका शिक्षण व्यवस्थेनेच घेण्याची गरज आहे. ती संस्थानी घेतली नाही तर भविष्यात शिक्षणाचे स्वरूप बाजारी बनण्याची शक्यता अधिक आहे. त्यातून शिक्षण संस्थाच्या बरोबर तेथील मनुष्यबळाचे मोल हरवले गेले तर नवल वाटायला नको.
जागतिकीकरण, उदारीकरण, मुक्त अर्थव्यवस्था, खाजगीकरणाचे परिणाम सर्वच व्यवस्थेवर झाले आहेत. त्याला शिक्षणही अपवाद नाही. अलिकडे शिक्षणाचे बाजारीकरण वेगाने होताना दिसत आहे आणि त्यामुळे त्याचे परिणाम म्हणजे आपली शिक्षण व्यवस्था मूल्याधिष्ठित होण्याऐवजी ती बाजाराधिष्ठित ठरू लागली आहे. बाजार म्हटले की केवळ नफा मिळवणारी व्यवस्था उभी राहत असते. त्या बाजारातून आपल्याला फार काही मूल्यांचा विचाराची अपेक्षा करता येत नाही. बाजार आणि धंदा यांचेच नाते पक्के असते. त्यामुळे बाजारातून आपण माणूस घडविण्याचा विचार फारसा करू शकणार नाही. जोवर शिक्षण मूल्य आणि ज्ञानाच्या केंद्रस्थानी येत नाही तोवर शिक्षणातून माणूस घडणार नाही. जोवर शिक्षणातून आपण विवेक आणि शहाणपणाचा विचाराची पेरणी करण्यात यशस्वी होऊ शकत नाही तोवर आपण शिक्षणातील गैरप्रकाराला प्रभावीपणे आळा घालू शकत नाही. त्यासाठी कायदे केले तरी त्याचा परिणाम तात्पुरत्या स्वरूपात साधल जाईल पण तो मार्ग हा व्यवस्था परिवर्तनाचा ठरणार नाही हे लक्षात घ्यायला हवे..अन्यथा पूजा खेडकर यांच्यासारखे कितीतरी विद्यार्थी वाटा चालू लागतील..आणि एक दिवस ही व्यवस्था कोसळून पडेल यात शंका नाही. त्यासाठी शिक्षणातूनच परिवर्तनाची वाट चालावी लागेल..माणूस निर्मितीची विवेकी विचार चालावा लागेल.अन्यथा ही अंधाराची वाट आपल्या नशिबी कायम असणार आहे.
संदीप वाकचौरे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.