February 1, 2023
Ignorance pierced by the sword of knowledge
Home » ज्ञानरुपी तलवारीने छेदा अज्ञान
विश्वाचे आर्त

ज्ञानरुपी तलवारीने छेदा अज्ञान

ध्वनीतून भाषेचा जन्म झाला. अर्थपूर्ण संकेत देणारे ध्वनी म्हणजे शब्द. सोहमचा ध्वनी हा सुद्धा एक शब्द आहे. हा शब्द, हा ध्वनीचा सुर आपण जाणून घ्यायला हवा. कारण या जगात आपली तीच एक ओळख आहे. आपले अस्तित्वही तेच आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

निसिलें विवेकसाहणें । जें ब्रह्माहमस्मिबोधें सणाणें ।
मग पुरतेनि बोघें उटणें । एकलेंचि ।। 259 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 15 वा

ओवीचा अर्थ – तें ज्ञानरुपी खड्ग विवेकरुपी सहाणेवर पाजळलेलें असावें व मी ब्रह्म आहे अशा बोधाची त्यास तीक्ष्ण अशी धार असावी व मग तें एकट्या पूर्णबोधानें घासावें.

भाषेचा जन्म कसा झाला ? हे समजूण घेण्यासाठी प्रथम भाषा म्हणजे हे जाणणे आवश्यक आहे. भाषा म्हणजे मानवनिर्मित ध्वनीमधून निर्माण होणाऱ्या अर्थपूर्ण संकेताची योग्य मांडणी करून विनिमय साधणारी किंवा संदेशन करणारी एक सामाजिक संस्था होय. जन्माला आल्या आल्या सर्व मानवाच्या मुखातून रडण्याचा ध्वनी बाहेर पडतो. हा ध्वनीसुद्धा एक शब्दच आहे. हा प्रथम ध्वनी असे आपण समजतो. पण या अगोदरही एक ध्वनी आपल्यात उत्पन्न होतो. कदाचित तो आपले लक्ष त्यावर नसल्याने तो आपणाला ऐकू येत नाही. त्यामुळे त्याची ओळख आपणास होत नसावी. किंवा तो मुखातून उत्पन्न होत नसल्यानेही तो समजत नसावा. पण हा ध्वनी आपण आपल्या अंतःकरणाने ऐकला तरच समजतो. त्यासाठी तशी स्थितीही असावी लागते. पण हा ध्वनी आपणातून उत्पन्न होतो. हा मानवनिर्मितच ध्वनी आहे. जन्माला आल्यानंतर सर्व प्रथम आपला श्वास स्वतंत्र होतो. त्याचा ध्वनी सर्वप्रथम सुरु होतो. श्वास आत घेण्याच्या क्रियेत सो असा स्वर उत्पन्न होतो तर श्वास सोडताना हम् असा स्वर उत्पन्न होतो. म्हणजेच जन्माला आल्यानंतर प्रत्येक मानवातून पहिला शब्द निघतो तो सोहम असा आहे.

सोहम हा अर्थपूर्ण संकेत आहे. ती आपली ओळख आहे. म्हणजेच भाषेतून आपली ओळख होते. आपल्या नावाच्या शब्दाने निर्माण झालेली ओळख अन् जन्माच्या स्वरातून आपली झालेली ओळख यात आपण आपल्या नावाच्या ओळखीमध्येच गुरुफटून राहातो. आपणाला आपलीच ओळख करून घेण्याचा वेळ नसतो. इतरांनाही आपली खरी ओळख करून देण्यासाठी वेळ नसतो. नावाची ओळखच आपण खरी समजून आयुष्यभर त्या नावाला जपत राहातो. नाव कसे मोठे होईल यासाठी आपण आपले प्रयत्न करत राहातो. पण आपल्या मृत्यू बरोबरच आपले नावही संपते. काही वर्षे ही आपली आठवण इतरांना राहाते. पण ती चिरकाळ स्मरणात राहाणारी नसते. यासाठी प्रथम आपण आपली स्वतःची खरी ओळख करून घ्यायला हवी. यासाठीच आपला जन्म झाला आहे. हा स्वधर्म आहे असे समजून कार्यरत राहायला हवे. तरच जीवन सार्थकी जाईल.

ध्वनीतून भाषेचा जन्म झाला. अर्थपूर्ण संकेत देणारे ध्वनी म्हणजे शब्द. सोहमचा ध्वनी हा सुद्धा एक शब्द आहे. हा शब्द, हा ध्वनीचा सुर आपण जाणून घ्यायला हवा. कारण या जगात आपली तीच एक ओळख आहे. आपले अस्तित्वही तेच आहे. आपले सर्व जीवन, सर्वस्वच त्यात सामावलेले आहे. याचे ज्ञान आपण करून घेणे गरजेचे आहे.

घरात कात्री असते पण तिला धार नसेल तर कापड कापता येईल का? कापड कापता येईलही पण त्यासाठी पडणारे कष्ट हे अमाप असतात. तसेच ते काम योग्य प्रकारे होईल की नाही हे सुद्धा सांगता येणे कठीण असते. म्हणजेच कात्रीला योग्यप्रकारे धार करावी लागते. मग त्या कात्रीकडून कापड कापण्याचे काम योग्यप्रकारे होऊ शकेल. तसेच तलवारीला धार नसेल तर ती तलवार काही कामाची नाही. तलवारीचा वापर करण्यासाठी तिला योग्य प्रकारची धार असणे आवश्यक आहे. तरच ती उपयोगाची होऊ शकते. शस्त्राचा वापर शस्त्र म्हणून होत नसेल तर त्याला शस्त्र कसे म्हणता येईल.

अध्यात्म सुद्धा असेच आहे. यात विवेकरुपी खडकावर ज्ञानाला धार करावी लागते. तरच त्या ज्ञानाचा वापर अज्ञानाचा छेद घेण्यासाठी होईल. ज्ञान कशाचे तर आपल्या स्वरुपाचे. आपण कोण आहोत त्याचे. आपणच आपली ओळख करून घ्यायला हवी. ही ओळख होण्यासाठी अज्ञानाचा पडदा दूर सारायला हवा. ज्ञानाच्या तलवारीने आपली ओळख आपण करून घ्यायला हवी. मी ब्रह्म आहे अशी ओळख जेव्हा होईल तेव्हा त्या ज्ञानाची धार इतरांनाही ज्ञानी करण्यासाठी उपयोगी पडेल. आपलीच अनुभुती आपणास झाली तरच जगाची अनुभुती येईल.

Related posts

प्रेमाच्या पेटीनेच गाठता येतो मोक्षाचा तीर  

गुणवत्तेसाठीच पारंपारिक जातींचे संवर्धन गरजेचे

देवा तूं अक्षर…

Leave a Comment