April 22, 2025
Illustration of a futuristic Indian startup environment, showing technology and innovation replacing traditional retail models — inspired by government policy and youth innovation.
Home » भारतीय ‘ स्टार्टअप’ची कोंडी
विशेष संपादकीय

भारतीय ‘ स्टार्टअप’ची कोंडी

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी अलीकडेच भारतातील स्टार्टअप बाबत एक विधान केले होते. त्याबाबत सोशल मीडियावर उलट सुलट चर्चेचा भडीमार होत राहिला. या पार्श्वभूमीवर भारतातील स्टार्टअप कंपन्यांनी “व्यापारी किंवा किरकोळ सेवा स्वरूपाचे” व्यवसाय न करता तंत्रज्ञान समृद्ध स्टार्टअपची निर्मिती कडे वळणे गरजेचे आहे. त्याचा घेतलेला धांडोळा.

प्रा. नंदकुमार काकिर्डे

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी अलीकडेच स्टार्टअप महाकुंभच्या निमित्ताने बोलताना भारत व चीन या दोन देशातील स्टार्टअप कंपन्यांची तुलना केली होती. यामध्ये भारतीय स्टार्टअप कंपन्या खाद्यपदार्थ घरपोच पोहोचवण्या सारखे व्यापारी किंवा व्यावसायिक स्टार्टअप चालवतात मात्र चीनमधील स्टार्टअप कंपन्या तंत्रज्ञान समृद्ध नाविन्यपूर्ण स्टार्टअप कंपन्या सुरू करण्यात आघाडीवर आहेत असे सांगितले होते.

भारतीय स्टार्टअप कंपन्या सध्या ई-कॉमर्स किंवा झोमॅटो, स्विगी सारख्या खाद्यपदार्थ वितरण सेवा देणाऱ्या आहेत. तसेच अनेक कंपन्या इंटरनेटच्या माध्यमातून उत्पादने व सेवांची खरेदी विक्री करत असते. यामुळे देशातील सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध होत असला तरी खऱ्या अर्थाने देशाच्या औद्योगिक क्षेत्राचा विकास करण्यासाठी अशा स्टार्टअप कंपन्या फारश्या उपयुक्त नाहीत असे मत पियुष गोयल यांनी व्यक्त केले होते. एक प्रकारे त्यांचे विधान योग्यही होते.

‘ स्टार्ट अप ‘ म्हणजे कोणताही नवा व्यवसाय उद्योग किंवा धंदा सुरू करण्याचा पहिला टप्पा. अशा स्टार्टअप कंपन्या सामान्यतः विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात असतात. ज्या उद्योगांमध्ये नावीन्यपूर्णता, नाविन्यपूर्ण ते बरोबरच व्यापक प्रमाणावर विस्तार करण्याची व उच्च वाढीची क्षमता या स्टार्टअप मध्ये असते. एक प्रकारे या नव्या स्टार्टअप कंपन्या म्हणजे बाजारातील प्रचलित व्यवसायापेक्षा काहीतरी वेगळी उत्पादने किंवा सेवा किंवा त्याचे प्रारूप म्हणजे मॉडेल तयार करून त्याची वेगळी किंवा स्वतंत्र बाजारपेठ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.

चीन मधील स्टार्टअप कंपन्या जास्त ताकदवान आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या आहेत व त्या तुलनेत भारतातील कंपन्या या व्यापार किंवा सेवा क्षेत्रातील दिसतात असे त्यांचे मत होते. मुळातच या दोन्ही देशातील स्टार्टअप क्षेत्राची जी परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीम अस्तित्वात आहे त्यामुळे दोन्ही देशातील स्टार्टअपची ताकद व आव्हाने वेगवेगळी आहेत, हे प्रथम नमूद केले पाहिजे.

या पार्श्वभूमीवर चीन मधील स्टार्टअपची संख्या एक लाखाच्या घरात आहे. त्यांच्याकडे चांगल्या प्रकारे स्थापन झालेली परिसंस्था आहे. त्यातील युनिकॉर्न कंपन्यांचा आकडा मोठा आहे. चीनमधील स्टार्टअपचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर सेमीकंडक्टर, विद्युत वाहने तसेच कृत्रिम बुद्धिमत्ते व चालणारे व्यवसाय या क्षेत्रात त्यांची गुंतवणूक लक्षणीय आहे. या सर्वांमध्ये अद्ययावत सखोल तंत्रज्ञानाचा फार मोठा वाटा आहे. जागतिक पातळीवर आजही चीन हा विजेवर चालणारी वाहने त्यांना लागणाऱ्या बॅटऱ्या व इतर उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात अमेरिकेपेक्षाही आघाडीवर आहे. यामध्ये डीजेआय ही आघाडीची ड्रोन व कॅमेरा तंत्रज्ञान कंपनी असून तेथे दहा हजार पेक्षा जास्त कर्मचारी आहेत.

लॉजिस्टिक्स एक अग्रगण्य लॉजिस्टिक्स व सप्लाय चेन कंपनी असून तेथेही 10 हजार पेक्षा जास्त कर्मचारी आहे. बाईट् डान्स तंत्रज्ञान कंपनी मध्ये असून तेथील कर्मचाऱ्यांची संख्याही मोठी आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात होरायझन रोबोटिक्स, वेअराइड आणि सेन्सटाइम सारख्या स्टार्टअप्स आघाडीवर आहेत. तसेच ई-कॉमर्स मध्ये जेडी हेल्थ, मेईकाई आणि झियाओहोंगशु सारख्या कंपन्या ऑनलाइन शॉपिंग क्षेत्रात वर्चस्व गाजवत आहेत. फिनटेक क्षेत्रातअँट ग्रुप, वेबँक आणि हुओबी या आर्थिक तंत्रज्ञान (फिनटेक ) क्षेत्रातील प्रमुख खेळाडू आहेत. चिनी स्टार्टअप्सना लक्षणीय निधी मिळाला आहे, बाइटडान्स, जेडी लॉजिस्टिक्स आणि सेन्सटाइम सारख्या कंपन्यांनी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. या सर्व अग्रगण्य स्टार्टअप्सनी असंख्य गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे. होरायझन रोबोटिक्स आणि वी राइड या कंपन्यांमध्ये तर 40 पेक्षा जास्त मोठे गुंतवणूकदार आहेत. शीन, डेसेंट्रलँड आणि व्हीएसपीएन सारख्या स्टार्टअप्स कंपन्या तर जागतिक पातळीवर गेल्या असून त्यांची त्यांचे कार्य अनेक देशांमध्ये सुरू आहे.

या तुलनेत चालू वर्षाच्या प्रारंभी भारतातील एकूण स्टार्टअप ची संख्या 1.60 लाखांच्या घरात होती व त्यात एक अब्ज डॉलर पेक्षा जास्त बाजार मूल्य असलेल्या युनिकॉर्न ची संख्या 100 पेक्षा जास्त आहे. गेल्या वर्षाच्या पहिल्या सामायिक भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअपने साधारणपणे 4.1 अब्ज डॉलर्सची भांडवल उभारणी केलेली होती. यातील महिलांनी सुरू केलेल्या स्टार्टअप ची संख्या ही 75 हजारांच्या घरात आहे. व त्यातील काही स्टार्टअप मध्ये महिला संचालक ही आहेत.

भारताशी तुलना करताना चीनने या क्षेत्रात मोठी आघाडी घेतली आहे हे नाकारता येणार नाही. त्या तुलनेमध्ये भारतातील स्टार्टअप कंपन्या या प्रामुख्याने सेवा क्षेत्रावर आधारित असून फिनटेक म्हणजे आर्थिक व तंत्रज्ञान क्षेत्रातील संयुक्त कंपन्या होय. दोन्ही देशांनी या स्टार्टअप च्या क्षेत्रात चांगली कामगिरी गेल्या काही वर्षात केलेली असली तरी चीनमध्ये निर्माण झालेल्या कंपन्या या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असल्यामुळे त्यांना जागतिक पातळीवर चांगला लाभ होताना दिसत आहे. भारत सरकारने ही अलीकडेच देशातील स्टार्टअप कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहकार्य करण्यासाठी मोठी पावले उचललेली आहेत. दोन्ही देशांनी या क्षेत्रासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिलेला आहे ही त्यातील समाधानाची गोष्ट आहे. चीनचे धोरण आणि भारताचे धोरण हे स्टार्टअप ला प्रोत्साहन देणारे असले तरी चीनच्या पुढाकारामुळे धोरणात्मक क्षेत्रात त्यांच्या स्टार्टअप ची इलेक्ट्रिक वाहने व तंत्रज्ञान क्षेत्रात खूप जलद वाढ झालेली आहे

भारतामध्ये स्टार्टअप सुरू केल्यानंतर विविध प्रकारच्या प्रशासकीय नियामकांच्या अडथळ्यांची शर्यत त्यांना ओलांडावी लागते. आपल्याकडे अद्यापही सखोल तंत्रज्ञान उपलब्ध होण्यावर खूप मर्यादा आहेत. पायाभूत सुविधांमध्ये ही आपल्याकडे सर्व गोष्टी सहजगत्या उपलब्ध होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून राज्य पातळीवर सर्वत्र झारीतले शुक्राचार्य बसलेले आहेत. त्यांच्यामध्ये उद्योग स्नेही वातावरण व विश्वास याची कमतरता आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे भारतातील प्रशासनामध्ये व राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराची कीड पसरलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कितीही चांगल्या योजना निर्माण केलेल्या असल्या तरी देशातील विविध पातळीवरील प्रशासन या योजना सर्वतोपरी तळागाळापर्यंत जाऊन देशातील तरुण उद्योजकांना प्रोत्साहन दिले जाईल अशा प्रकारची वातावरण निर्मिती करताना दिसत नाहीत. या तुलनेमध्ये चीन खूप आघाडीवर असून सर्व पातळ्यांवर उद्योजकांना, तरुण तंत्रज्ञांना सातत्याने प्रोत्साहन दिले जाते. त्यांना आर्थिक व तंत्रज्ञान तसेच पायाभूत सुविधांचे भरपूर सहकार्य लाभते.

भारतामध्ये विविध क्षेत्रांचा स्टार्टअप च्या दृष्टिकोनातून विचार केला तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील संगणक प्रणाली विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा ई-कॉमर्स आणि त्यावर अवलंबून असलेल्या अनेक उद्योग सेवांमध्ये स्टार्टअप ची निर्मिती होऊ शकते. त्याचप्रमाणे आरोग्य क्षेत्रामध्ये विविध वैद्यकीय उपकरणे, टेली मेडिसिन, आरोग्य तंत्रज्ञान , कल्याणकारी योजना व त्याचप्रमाणे शारीरिक तंदुरुस्ती म्हणजे फिटनेस या क्षेत्रातही त्यास मोठा वाव आहे. आर्थिक सेवा क्षेत्रातील कंपन्यांचा विचार करता त्यामध्ये बँकिंग क्षेत्र विमा कंपन्या, फिनटेक, आणि गुंतवणूक क्षेत्रातही नवनवीन सेवा कंपन्यांचा प्रारंभ करण्यास मोठा वाव आहे. तसेच शिक्षण क्षेत्रात ऑनलाइन सेवा देणाऱ्या कंपन्या एज्युटेक कंपन्या शैक्षणिक संगणक प्रणाली निर्माण करणाऱ्या कंपन्या आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या ट्यूटरसारख्या सेवा सारख्या सेवांचा यात समावेश होऊ शकतो. त्याचप्रमाणे अक्षय ऊर्जा, शाश्वत शेती या क्षेत्रातही अनेक स्टार्टअप कंपन्या सुरू करण्याची संधी असून त्या पर्यावरण पूरक उत्पादने घनकचऱ्याचे किंवा एकूण कचऱ्याचे व्यवस्थापन या क्षेत्रातील कंपन्या सुरू करू शकतात. भारतामध्ये सध्या अन्नपदार्थ खाद्यपदार्थ व पेये या क्षेत्रातील अन्नपदार्थांचे घरपोच वितरण, जेवणाचे डबे किंवा मोठमोठ्या उपहारगृहामधून विशेष प्रकारच्या अन्नाचे अन्नपदार्थांचे वितरण या सेवा मोठ्या प्रमाणावर दिल्या जात आहेत. यामध्ये रोजगार निर्मिती जरी होत असली तरी त्यांची गुणवत्ता आणि शिक्षणाचा दर्जा हा अत्यंत कमी पातळीवर आहे. ई-कॉमर्सच्या क्षेत्रात किरकोळ व्यापार व विविध प्रकारची फॅशन व जीवनशैली निर्माण करणारी उत्पादने यांनाही भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर संधी आहे.

स्टार्टअप कोण सुरू करू शकते?

नाविन्यपूर्ण कल्पना, आवड आणि दृढनिश्चय असलेला कोणत्याही भारतीय विद्यार्थी, व्यावसायिक किंवा उद्योजक या प्रकारच्या स्टार्टअपचा प्रारंभ करू शकतो. नाविन्यपूर्ण कल्पना अमलात आणून प्रचलित व्यवसायामध्ये बदल करण्याची इच्छा असलेली कोणतीही व्यक्ती नवा स्टार्टअप करू शकते. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी बौद्धिक संपदा क्षेत्रामध्ये डिझाईन किंवा पेटंट निर्मिती करणाऱ्या व्यक्ती ही नवीन शोध विकसित करून स्टार्टअप कंपन्या सुरू करू शकतात. लहान व्यवसाय असलेल्या व्यक्ती किंवा त्याचे मालक त्यांचा व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टिकोनातून या नवीन स्टार्टअपचा विचार करू शकतात.

या स्टार्टअप कंपन्यांनी निर्माण केलेल्या नवीन उत्पादनामुळे किंवा सेवांमुळे त्यांची देशभरात किंवा परदेशात वेगाने पोहोच वाढते व वेगाने प्रगती होते. एखाद्या वेळेला अशा स्टार्टअपचे आकर्षक व्यवसायाचे मॉडेल तयार होते की त्याचा वेगाने विस्तार होत राहतो. अर्थात अशा प्रकारच्या स्टार्टअप कंपन्या सुरू करणे ही खूप मोठी जोखीम असते यात शंका नाही. यातील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक देशामध्ये व्यवसाय व्यापारामध्ये सातत्याने बदल होत असतात अशा बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता या स्टार्टअपची असणे आवश्यक असते. अर्थात कोणतीही स्टार्टअप कंपनी सुरू करणे हे केवळ एका व्यक्तीचे काम नाही तर त्यासाठी उत्तम संघ निर्मिती म्हणजे याला टीम बिल्डिंग म्हणतात त्याची सातत्याने गरज असते. योग्य व कार्यक्षम सहकाऱ्यांची निवड हे यशस्वी स्टार्टअपचे यशाचे मोठे गमक आहे. नजीकच्या भविष्यकाळात भारताला यात मोठी संधी निश्चित आहे.

(लेखक पुणे स्थित अर्थविषयक ज्येष्ठ पत्रकार असून माजी बँक संचालक आहेत)


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading