May 1, 2025
narendra modi speech on abhijat marathi in mumbai
Home » …बस तिनेच माझी गुरु बनून मला मराठी शिकवलं – नरेंद्र मोदी
गप्पा-टप्पा

…बस तिनेच माझी गुरु बनून मला मराठी शिकवलं – नरेंद्र मोदी

अभिजात मराठी भाषा या मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा संपादित भाग…

पंतप्रधान नरेद्र मोदी म्हणाले, 

मराठी भाषेला अभिजात दर्जा हा देशाने छत्रपती शिवाजी महाराज यांना केलेला मानाचा मुजरा
गणपती बाप्पा मोरया. ही केवळ काही शब्दांची बेरीज नाही तर भक्तीचा अनंत प्रवाह
स्वातंत्र्यलढ्यात मराठी भाषेचे महत्त्वपूर्ण योगदान
मराठी साहित्य हा भारताचा अनमोल वारसा
मराठी साहित्याची परंपरा ही केवळ प्राचीनच नाही तर बहुआयामी

नवी दिल्‍ली – महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, माझे केंद्रातील सर्व सहकारी, अनेक पिढ्यांवर आपल्या गायकीचा ठसा उमटवणाऱ्या आशाताई,. अभिनेते बंधू सचिन, नामदेव कांबळे, सदानंद मोरे, महाराष्ट्र सरकारचे मंत्री बंधू दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा, भाजप मुंबई अध्यक्ष बंधू आशिष शेलार इतर मान्यवर बंधू आणि भगिनी!

महाराष्ट्रातील, महाराष्ट्राबाहेरील आणि, सर्व जगातील मराठी भाषक मंडळींचे मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणजे, क्लासिकल लँग्वेजचा, दर्जा मिळाल्याबद्दल, अतिशय मनापासून, अभिनंदन करतो.

केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी भाषेच्या इतिहासात आज सुवर्णक्षण आहे आणि मोरे यांनी अतिशय उत्तम पद्धतीने त्यांची मांडणी केली. महाराष्ट्रातील जनता, प्रत्येक मराठी भाषिक अनेक दशकांपासून या निर्णयाची, या क्षणाची प्रतीक्षा करत होता. महाराष्ट्राचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काहीतरी करण्याचे भाग्य मला लाभले याचा मला आनंद आहे. हा आनंदाचा क्षण सामाईक करण्यासाठी आज मी तुम्हा सर्वांमध्ये आहे. मराठीसोबतच बंगाली, पाली, प्राकृत आणि आसामी भाषांनाही अभिजात भाषांचा दर्जा देण्यात आला आहे. या भाषांशी निगडित लोकांचेही मी अभिनंदन करतो.

मराठी भाषेला अभिजात दर्जा हा देशाने छत्रपती शिवाजी महाराज यांना केलेला मानाचा मुजरा

मराठी भाषेचा इतिहास अतिशय समृद्ध आहे. या भाषेमधून ज्ञानाचे जे प्रवाह निर्माण झाले त्यांनी अनेक पिढ्यांना मार्गदर्शन केले आहे आणि ते आजही आपल्याला मार्ग दाखवत आहेत. याच भाषेतून संत ज्ञानेश्वरांनी वेदांताच्या चर्चेद्वारे सर्वसामान्य लोकांना एकत्र जोडले. ज्ञानेश्वरीने गीतेच्या ज्ञानाने भारताच्या आध्यात्मिक प्रज्ञेला पुनर्जागृत केले. याच भाषेतून संत नामदेवांनी भक्तीमार्गाची चेतना बळकट केली. याच प्रकारे संत तुकाराम यांनी मराठी भाषेत धार्मिक जागरुकतेची मोहीम राबवली. आणि संत चोखामेळा यांनी सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला बळकट केले.

आज महाराष्ट्र आणि मराठी धर्म वाढवणाऱ्या थोर संतांना मी साष्टांग दंडवत करतो. मराठी भाषेला हा दर्जा म्हणजे संपूर्ण देशाने छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या राज्याभिषेकाच्या तीनशे पन्नासाव्या वर्षात केलेला मानाचा मुजरा आहे.

स्वातंत्र्यलढ्यात मराठी भाषेचे महत्त्वपूर्ण योगदान

मित्रांनो,

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास मराठी भाषेच्या योगदानाने समृद्ध होत आहे. महाराष्ट्रातील अनेक क्रांतिकारक नेत्यांनी आणि विचारवंतांनी मराठी भाषेचा वापर जनजागृतीसाठी आणि लोकांची एकजूट करण्यासाठी केला. केसरी या मराठी वृत्तपत्रातून लोकमान्य टिळकांनी परकीय सत्तेची पाळेमुळे हलवून सोडली होती.  मराठीतून त्यांनी केलेल्या भाषणांनी लोकांच्या मनात स्वराज्य मिळवण्याची इच्छा जागृत झाली होती. न्याय आणि समतेचा लढा पुढे नेण्यात मराठी भाषेने महत्त्वाचे योगदान दिले. गोपाळ गणेश आगरकर यांनी ‘सुधारक’ या मराठी वृत्तपत्रातून समाजसुधारणेची मोहीम घराघरात पोहोचवली. गोपाळ कृष्ण गोखले यांनीही मराठी भाषेला स्वातंत्र्यलढ्याला दिशा देण्याचे माध्यम बनवले.

मराठी साहित्य हा भारताचा अनमोल वारसा

मित्रांनो

मराठी साहित्य हा भारताचा अनमोल वारसा आहे, ज्यामध्ये आपल्या संस्कृतीच्या विकासाच्या आणि सांस्कृतिक प्रगतीच्या कथा सुरक्षित आहेत. महाराष्ट्रात स्वराज्य, स्वदेशी, स्वभाषा आणि स्वसंस्कृतीची जाणीव मराठी साहित्यातून विस्तारली. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात सुरू झालेले गणेशोत्सव आणि शिवजयंतीचे कार्यक्रम, वीर सावरकरांसारख्या क्रांतिकारकांचे विचार, बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक समता चळवळ, महर्षी कर्वे यांची महिला सक्षमीकरण मोहीम, महाराष्ट्राचे औद्योगिकीकरण, कृषी सुधारणेसाठी केलेले प्रयत्न, या सर्वांची प्राणशक्ती मराठी भाषा होती. आपल्या देशाची सांस्कृतिक विविधता मराठी भाषेशी जोडली गेल्याने समृद्ध होत जाते.

गणपती बाप्पा मोरया ही केवळ काही शब्दांची बेरीज नाही तर भक्तीचा अनंत प्रवाह

मित्रांनो,

भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नाही. भाषेचा संस्कृती, इतिहास, परंपरा आणि साहित्याशी खोलवर संबंध असतो. आपण लोकगायन पोवाड्याचे उदाहरण घेऊ शकतो. पोवाड्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर वीरांच्या शौर्यगाथा अनेक शतकांनंतरही आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत. आजच्या पिढीला मराठी भाषेची ही एक अद्भुत देणगी आहे. आज आपण जेव्हा गणपतीची पूजा करतो तेव्हा हे शब्द साहजिकच आपल्या मनात घुमत राहतात, गणपती बाप्पा मोरया. ही केवळ काही शब्दांची बेरीज नाही तर भक्तीचा अनंत प्रवाह आहे. हीच भक्ती संपूर्ण देशाला मराठी भाषेशी जोडते. तसेच श्री विठ्ठलाचे अभंग ऐकणारेही आपोआप मराठीशी जोडले जातात.

मराठी साहित्याची परंपरा ही केवळ प्राचीनच नाही तर बहुआयामी

मित्रांनो,

मराठी भाषेला हे वैभव मिळवून देण्यासाठी मराठी साहित्यिक, लेखक, कवी आणि असंख्य मराठी रसिकांनी प्रदीर्घ प्रयत्न केले आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून अनेक प्रतिभावंत साहित्यिकांची सेवा लाभलेली आहे. यामध्ये बाळशास्त्री जांभेकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, केशवसुत, श्रीपाद महादेव माटे, आचार्य अत्रे, शांताबाई शेळके, गजानन दिगंबर माडगूळकर, कुसुमाग्रज आदी व्यक्तिमत्त्वांचे योगदान अतुलनीय आहे. मराठी साहित्याची परंपरा ही केवळ प्राचीनच नाही तर बहुआयामी आहे. विनोबा भावे, श्रीपाद अमृत डांगे, दुर्गाबाई भागवत, बाबा आमटे, दलित साहित्यिक दया पवार, बाबासाहेब पुरंदरे अशा अनेक व्यक्तिमत्त्वांनी मराठी साहित्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. मराठीची सेवा करणारे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, पु. ल. देशपांडे म्हटल्यावर लोकांना समजते.  डॉ.अरुणा ढेरे, डॉ.सदानंद मोरे, महेश एलकुंचवार, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते नामदेव कांबळे यांच्यासह तमाम साहित्यिकांच्या योगदानाचे देखील मी स्मरण करेन. आशा बगे, विजया राजाध्यक्ष, डॉ. शरणकुमार लिंबाळे, नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी अशा अनेक दिग्गजांनी वर्षानुवर्षे हे स्वप्न पाहिले होते.

मराठी भाषेची सेवा करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची संख्या मोठी

मित्रांनो,

साहित्य आणि संस्कृतीबरोबरच  मराठी चित्रपटाने देखील आपल्याला सन्मान मिळवून दिला आहे. आज भारतात चित्रपटांचे जे स्वरुप आहे त्यांचा पाया देखील व्ही शांताराम आणि दादासाहेब फाळके यांच्यासारख्या व्यक्तिमत्वांनी रचला होता. मराठी रंगभूमीने समाजातील शोषित, वंचित घटकांचा आवाज बुलंद केला आहे. मराठी रंगभूमीवरील दिग्गज कलाकारांनी प्रत्येक रंगमंचावर आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. मराठी संगीत, लोकसंगीत, लोकनृत्य या परंपरा आपल्या सोबत एक समृद्ध वारसा घेऊन पुढे जात आहेत.

बालगंधर्व , डॉक्टर वसंतराव देशपांडे , भीमसेन जोशी,  सुधीर फडके, मोगुबाई कुर्डीकर किंवा नंतरच्या युगातील लतादीदी, आशाताई, शंकर महादेवन, अनुराधा पौडवाल यांच्यासारख्या दिग्गज लोकांनी मराठी संगीताला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. मराठी भाषेची सेवा करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची संख्या इतकी मोठी आहे की त्यांच्या बाबतीत मी बोलू लागलो तर पूर्ण रात्र निघून जाईल. 

मित्रहो, 

माझं हे सौभाग्य आहे.. इथे काही लोकांना संभ्रम वाटत होता की मराठी बोलावं का हिंदी? माझं हे सौभाग्य होतं की मला दोन ते तीन पुस्तकांचे मराठीतून गुजराती अनुवाद करण्याचे भाग्य लाभले. आता गेल्या 40 वर्षांपासून माझा संपर्क नाही, अन्यथा मी बऱ्यापैकी मराठीत बोलू शकत होतो. परंतु आताही मला त्याने काही जास्त फरक पडत नाही आणि याचं कारण म्हणजे मी माझ्या पूर्वीच्या काळात अहमदाबाद येथील जगन्नाथजींच्या एका मंदिरात राहत होतो. तिथेच ‘कॅलिको मिल’ होती आणि ‘कॅलिको मिल”मध्ये मजुरांच्या वसाहती होत्या त्यामध्ये भिडे म्हणून एक महाराष्ट्रातील कुटुंब राहत होते आणि जेव्हा शुक्रवारी सुट्टी असायची. त्यावेळी बरेचदा परिस्थिती जरा अनिश्चित असायची म्हणजे विजेची परिस्थिती. मी कोणतेही राजकीय विधान करत नाही परंतु ते दिवस तसे होते. तर शुक्रवारी त्यांना सुट्टी असायची तेव्हा मी शुक्रवारी त्यांना घरी भेटायला जायचो. मला आठवते की त्यांच्या घराच्या बाजूला एक छोटी मुलगी होती ती माझ्याबरोबर मराठीत बोलत असे बस तिनेच माझी गुरु बनून मला मराठी शिकवलं. 

भाषा नेहमीच जिवंत राहील. आपले असे प्रयत्न असले पाहिजेत

मित्रहो, 

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेच्या अभ्यासाला प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे संशोधन आणि साहित्य संग्रहालाही प्रोत्साहन मिळेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की भारतातील विद्यापीठांमध्ये मराठी भाषेच्या अभ्यासाची सोय होईल. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मराठी भाषेच्या विकासासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल.  यामुळे शिक्षण आणि संशोधन या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.

मित्रहो, 

स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदाच असे सरकार आले आहे जे मातृभाषेतून शिक्षणास महत्त्व देते.  माझी एक आठवण आहे ,  की खूप वर्षांपूर्वी मी एकदा अमेरिकेत गेलो होतो तेव्हा मला एका कुटुंबात राहायला‌ मिळाले.  त्या कुटुंबातील एक पद्धत मला आवडली. ते कुटुंब तेलगू होते. त्यांच्या घरात काही नियम होते. खरंतर ते अमेरिकन होते रहाणीमानही तिकडचेच होते परंतु नियम  असा होतं की काहीही झाले तरी संध्याकाळी जेवणाच्या वेळी टेबलावर कुटुंबातील सर्वजण एकत्र बसतील आणि दुसरा नियम होता तो म्हणजे रात्रीचे जेवण घेताना कुटुंबातील  व्यक्ती तेलुगु भाषेशिवाय अन्य भाषा बोलणार नाहीत.  त्यामुळे तिथे जी  मुले जन्माला आली ती सुद्धा तेलुगु बोलू शकत होती.  महाराष्ट्रीयन कुटुंबात जाल तर आज सुद्धा आपल्याला सहजपणे मराठी भाषा ऐकायला मिळते, हे मी पाहिले आहे.  इतर लोकांमध्ये असे नसते. (मातृभाषा) सोडून देतात.  त्यांना हाय हॅलो करायला आवडते. 

मित्रहो, 

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंतर्गत मराठीत सुद्धा वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेणे शक्य झाले आहे.  एवढेच नव्हे.  सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना  मी एक विनंती केली होती.  मी म्हटले होते की, एखादा गरीब माणूस आपल्या न्यायालयात येतो आणि आपण त्याला इंग्रजीत निकाल देता. त्यातले त्या बिचाऱ्याला काय समजणार? काय दिले आहे तुम्ही? आणि मला आनंद वाटतो की आज आमची  जे निकाल/ निवाडा आहेत त्याचा जो ऑपरेटिव्ह भाग आहे, तो मातृभाषेत दिला जातो. मराठीत लिहिलेली विज्ञान , अर्थशास्त्र, कला, कविता आणि सर्व विषयांवरची पुस्तके उपलब्ध होत असतात आणि त्यांची संख्या वाढत आहे. या भाषेला कल्पनांची वाहक भाषा म्हणून आपण घडवणार आहात. जेणेकरून ही भाषा नेहमीच जिवंत राहील. आपले असे प्रयत्न असले पाहिजेत की मराठी साहित्यातील रचना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील.  माझी इच्छा आहे की मराठी भाषा जागतिक ऑडियन्स पर्यंत पोहोचायला हवी. आणि आपल्याला माहितीच असेल की भाषेतून अनुवादासाठी भारत सरकारने भाषिणी हे ॲप बनवले आहे. आपण नक्कीच याचा उपयोग करून कोणत्याही गोष्टी अगदी सहजपणे भारतीय भाषेत अनुवादित करू शकता. भाषांतराच्या या वैशिष्ट्यामुळे भाषेच्या भिंती कोसळून जातील. आपण मराठी बोला आणि मी जर भाषिणी ॲप घेऊन बसलो असेल तर ते गुजरातीत ऐकू शकेन,  हिंदीतही  ऐकू शकेन. तर अशी ही एक  व्यवस्था.  तंत्रज्ञानामुळे हे खूपच सहज साध्य आहे. 

मित्रहो,

आज आपण या ऐतिहासिक क्षणाचा आनंद साजरा करत आहोत. ही संधी आपल्यासाठी एक मोठी जबाबदारी घेऊन आली आहे. मराठी बोलणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे की एवढ्या सुंदर भाषेला पुढे नेण्यासाठी तिने स्वतःचे काही योगदान द्यायला हवे.  ज्याप्रकारे मराठी लोक साधे सरळ असतात तसेच मराठी भाषा सुद्धा अगदी सोपी आहे. या भाषेशी जास्तीत जास्त लोक जोडले जावेत, भाषेचा विस्तार व्हावा, पुढील पिढीलाही या भाषेचा अभिमान वाटावा,  यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. आपण सर्वांनी माझे स्वागत केलेत,  सन्मान केलात. मी राज्य सरकारचा आभारी आहे.  हा योगायोग होता की माझे अजून एका कार्यक्रमासाठी इथे येणे होणार होते. परंतु अचानक इथल्या माझ्या काही साथीदारांनी मला  म्हटले की अजून एक तास द्या आणि  त्यानुसार हा कार्यक्रम ठरला.  आपण सर्व मान्यवर व्यक्ती आहात, ज्यांचे जीवन या अशा गोष्टींशी जोडले गेले आहे. अशा सर्वांचे इथे उपस्थित असणे म्हणजेच मराठी भाषेच्या महानतेला दिलेली पावतीच आहे. त्यासाठी मी आपल्या सर्वांचा खूप आभारी आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन करतो.

महाराष्ट्रातील आणि जगातील सर्व मराठीजनांनाना खूप खूप शुभेच्छा देतो.  धन्यवाद.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading